धारणीय वेग - ईर्षा (भाग 12)

    31-Mar-2026
Total Views |
Jealousy
 
शरीर स्वस्थ व मन शांत असणे आरोग्यासाठी गरजेचे आहे, हितकर आहे. धारणीय मानस आवेगांच्या लेखामालेत अजूनपर्यंत विविध मानसभावांचा उगम, त्याची लक्षणे व कारणे आपण वाचलीत. त्यावरील उपाय व उपाय न केल्यास व्याधी याबद्दल सविस्तर आपण वाचले. याच लेखमालेतील पुढील मानस धारणीय आवेग म्हणजे ईर्षा. ईर्षा (jealousy) या आवेगाबद्दल आजच्या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.
 
विविध रोगांमध्ये मनोकायिक रोगांचे प्रमाण खूप अधिक आहे (Psychosomatic Illnesses) नावाप्रमाणेच, या व्याधींमध्ये मनाचा व शरीराचा सहभाग असतो. व्याधी संक्रमण स्वरूपाचे नसतात. बरेचदा मानसभाव, त्यांच्या आवेगामुळे शरीरामध्ये असंतुलन निर्माण होते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागतो. मानस भावनांचा आवेग जितका जास्त तीव्र किंवा प्रदीर्घ काळासाठी असतो, तेवढा अधिक शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होताना दिसतो. तसेच, मानसिक-भावनिक घालमेल शमविली की शारीरिक त्रास, रोगही आपोआप शमतात. त्यांची तीव्रता कमी होते. विविध पचनाच्या तक्रारी (अजीर्ण, IBS, अम्ल-पित्त, Peptic Ulcer इ.) त्वचाविकार (Psoriasis, ECZEMA, तारुण्यपिटिका, अंगावर पित्त उठणे, खाज, केस गळणे, केस पिकणे इ.) श्वसनाच्या तक्रारी (दमा), मायग्रेन, छातीत धडधडणे, रक्तचाप वाढणे, पाठदुखी, खांदेदुखी, डोकेदुखी, मळमळ, झोपेच्या तक्रारी इ. अनेक रोगांमध्ये व तक्रारींमध्ये मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आढळते.
 
मानसिक भावभावना हे मनुष्याच्या विविध अनुभवांचे नैसर्गिक स्वरूप, पैलू आहे. मनुष्याच्या अनुभवानुसार त्याचे मन व त्यातील भाव उत्पन्न होत असतात. प्रत्येक व्यक्तीची एकाच घटनेला प्रतिक्रिया ही भिन्न-भिन्न असते. उदा. सध्या परीक्षेचा मौसम सुरू आहे. परीक्षा खूप चांगली जर गेली नाही, तर काही विद्यार्थी थोडे निराश होतात; पण पुढील परीक्षेत अधिक मेहनत घेण्यासाठी सरसावतात, तर काही विद्यार्थी खिन्न होतात, रडू लागतात. अपयशाला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नसते. इतर काही विद्यार्थी बिनधास्त असतात. मी माझा प्रयत्न केला; त्याचा निकाल जो येईल तो बघू, या विचाराचे असतात. अशा वेळेस जर एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर खूप चांगला गेला, तर त्यावर इतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही खूप भिन्न-भिन्न असतात. काहींना काहीच फरक पडत नाही; काही मित्र आनंदी होतात, तर काही मित्र आनंद होण्याचा केवळ आव आणतात. काही वर्गातील इतर मित्र मनातल्या मनात शिव्या घालतात; तर काही ईर्षेला पेटतात!
 
ईर्षा म्हणजे मत्सर. ‌‘मला जर नाही मिळाले, तर इतरांनाही मिळू नये,‌’ ही भावना होय. ईर्षा ही एक भावनिक प्रतिक्रिया आहे, जी भीती किंवा धमकीतून निर्माण होते. एखादी गोष्ट (जिवाभावाची) किंवा व्यक्ती हरवण्याची, सोडून जाण्याची भीती किंवा धोका जेव्हा निर्माण होतो, तेव्हा त्या व्यक्तीची जी प्रतिक्रिया उत्पन्न होते, ती म्हणजे ईर्षा होय. ईर्षा म्हणजे असूया. (Envy = feeling of resentment / discontentment) हा भाव तेव्हा उत्पन्न होतो, जेव्हा इतरांकडे असलेल्या वस्तू/परिस्थिती/यशप्राप्ति (Achievements), मालमत्ता (Possessions), स्वभाववैशिष्ट्ये इ. (Characteristics/Qualities) इ. आपल्यालाही प्राप्त व्हावी, याची तीव्र इच्छा (Desire) उत्पन्न होते. (‌‘त्याच्याकडे आहे, पण माझ्याकडे नाही; मग माझ्याकडे नसेल, तर त्याच्याकडेही नसावी,‌’ अशी वृत्ती) इतरांचे यश, प्रगती, आनंद इत्यादींबद्दल मनात कटुता, खिन्नता उत्पन्न होणे, हे ईर्षेमुळे घडते. मग यामुळे राग-चिडचिड-निराशा (Anger & Frustration) निर्माण होते. अपुरेपणाची भावना निर्माण होते.
 
‌‘इन्फेरिओरिटी कॉम्प्लेक्स‌’ही निर्माण होतो. स्वतःच्या यशात-आनंदात मन समाधानी, आनंदी राहात नाही. सतत आपण कमी आहोत, या गैरसमजुतीत जी व्यक्ती राहू लागते. काही वेळेस ईर्षेला पेटलेली व्यक्ती समोरच्या व्यक्तीचे नुकसानही करू शकते. येन केन प्रकारेण दुसऱ्या व्यक्तीला खाली खेचणे, पाडणे याबद्दल सतत चिंतन-ध्यास घेऊन तशी पावले उचलली जातात.
आपल्या आसपास, वृत्तपत्रात कित्येकदा अशा बातम्या आपण वाचत असतो की इतरांची प्रगती, यश, उपलब्धी न सहन झाल्यामुळे त्या इसमास/त्याच्या परिवारातील लोकांना/व्यवसाय इत्यादींमध्ये नुकसान करण्याचा कट रचला (किडनॅपिंग, शुटिंग, डिस्ट्रक्शन इ.)
 
ईर्षेचा त्रास त्या व्यक्तीला स्वतःला तर होतोच, पण काही वेळेस ज्या व्यक्तीबद्दल ईर्षा निर्माण झाली आहे, तिलाही इजा/नुकसान होऊ शकते, करवली जाऊ शकते. ईर्षा कायम दोन व्यक्तींमध्ये होते. काही वेळेस, घरांतून लहान मुलांमध्ये तुलना केली जाते. सख्या भावंडांमध्ये, चुलत-मामे भावंडांमध्ये, वर्गातील मुलांमध्ये, घराशेजारी राहणाऱ्या मित्र-मैत्रिणींमध्ये मोठे (वडीलधारी) व्यक्ती तुलना करू लागतात. (त्याला/तिला इतके गुण मिळाले, किती छान गाते, किती उत्तम खेळतो, सभाधीटपणा, विनयशीलता, हुशारी इ.) आपल्या पाल्याची सतत इतरांशी तुलना आणि नकारात्मक निंदा बरेचदा त्या पाल्यामध्ये ईर्षेची भावना जागृत करते. बालसुलभ, सहज ईर्षा ही स्वाभाविक आहे. उदा. आईने तान्हुल्याला जवळ घेतले, कडेवर घेतले, तर मोठ्या दादा-ताईला वाटणे की त्या बाळाला नाही, मला घ्यावे, हे स्वाभाविक. पण, त्या दादा/ताईला समजाविले की ते समजते आणि खेळात रमतेही. पुढे जाऊन दादा-ताईच त्या बाळाचे आदर्श बनतो आणि जे जे मोठे पाल्य करेल, वागेल, तसे छोटे पाल्यही वागते; पण काही वेळेस या भावनेला, ईर्षेला खत-पाणी घातले जाते आणि मग दोन भावंडांमध्ये चुरस लागते, स्पर्धा लागते व ज्याच्यात ईर्षा निर्माण झाली आहे, तो अधिक यशस्वी झाला, तर उत्तम केल्याच्या आनंदापेक्षा दुसऱ्याचा पराभव झाला, यात अधिक यशस्वी वाटते.
 
पण, ईर्षेला पेटलेल्या भावंडाचे जर उत्तम/प्रथम/वरचढ झाले नाही, तर त्याला ते सहन होत नाही. पराभवापेक्षा त्या इतर व्यक्तीच्या यशाची ईर्षा अधिक भासते. या मानस आवेगामुळे त्या व्यक्तीचा स्वभाव बदलू लागतो. इतरांच्या यशात, आनंदात समाधान न मानता त्याबद्दल घृणा, तिरस्कार व ईर्षा वाटू लागते. अशा वेळेस ती व्यक्ती इतरांबरोबर रमत नाही, सोशालिस्ट करू शकत नाही. त्या व्यक्तीबरोबरच्या नात्यात कटुता येऊन नातेसंबंध बिघडतात आणि घरातील व्यक्ती असल्यास सगळ्याचा नात्यांमध्ये ताण येऊ लागतो. अशा मानसभावामुळे त्या व्यक्तीचे मनोधैर्य, मानसिक संतुलन बिघडते, मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि स्वस्थ राहण्यासाठी, स्वास्थ्य टिकविण्यासाठी मनाची सकारात्मक (positive mindset) अवस्था अत्यंत गरजेची आहे.
 
ईर्षेला पेटलेली व्यक्ती द्वेषाकडे वळते (hatred) हा द्वेषभाव खूप तीव्र स्वरूपाचा आणि रुतलेला (deep seated) असू शकतो. शत्रुता जेव्हा उत्पन्न होते, जी चुकीच्या कारणाने उत्पन्न झालेली आहे, ती केवळ नकारात्मकच भाव असते. ज्या व्यक्तीबद्दल द्वेष वाटतो, ती खूप चांगली वागली, मैत्री-स्नेह-आपुलकीने वागली, तरी त्याचे असे वागणे, या व्यक्तीला जमत नाही. खरे तर द्वेष करण्यासारखे ती व्यक्ती वागलेली नसते. पण, ईर्षेपोटी नकारात्मक भावना उत्पन्न झाल्यामुळे ते कळत नाही. 
 
 
- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)