गोर बंजारा साहित्यसंवर्धनासाठी...

    31-Mar-2026   
Total Views |
Dr. Subhash Rathod
 
गोर बंजारा समाजाचा शूर, धर्मशील, वैभवशाली इतिहास आहे. त्या समाज इतिहासासाठी आणि भविष्यासाठी कार्य करणारे डॉ. सुभाष राठोड यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
मराठा आणि विदर्भ सीमाभागातील बंजारा लोकसाहित्य व बोलीभाषेचा अभ्यास’ या विषयावर सुभाष राठोड यांनी ‘पीएचडी’ केली. त्यांचा फोटो वर्तमानपत्रात प्रकाशित झाला. याचा कोण आनंद त्यांच्या पित्याला म्हणजे, हेमाजी राठोड यांना झाला. ‘माझ्या पोराचा फोटो पेपरात आला’ असं म्हणत ते वर्तमानपत्र त्यांनी नेहमीच त्यांच्या खिशात ठेवले. त्यांना इतका अभिमान वाटत होता की, येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाला ते वर्तमानपत्र दाखवत. त्यांच्या आनंदाचे मोल होऊच शकत नव्हते. कारण, समाजात उच्चशिक्षण घेऊन साहेबाच्या पदावर असलेले काही लोक होते. आपण खेडूत गरीब, आपला पोरगा कधी इतका शिकेल का, हा विचार हेमाजी करत असत. मात्र, त्यांच्या मुलाने डॉ. सुभाष राठोड यांनी ते स्वप्न पूर्ण केले. त्यांनी ‘डीएसएम’, ‘एमए मराठी’, ‘एमएसडब्लू’, ‘एमएड’, ‘एमफील’ ‘सेट (मराठी)’, ‘सेट (शिक्षणशास्त्र)’, ‘नेट (मराठी)’ आणि ‘पीएचडी’ अशा कला शाखेसोबतच शिक्षणशास्त्र ते सामाजिक कार्यातही उच्चशिक्षण घेतले आणि त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागली.
 
जालना जिल्ह्यातील नायगावच्या बंजारा समाजाच्या तांड्यातले हेमाजी राठोड आणि सुंदराबाई यांना तीन अपत्ये. त्यापैकी एक सुभाष. घरात वारकरी संप्रदायाचे संस्कार. गावातही सलोख्याचे आणि धार्मिकतेचे वातावरण. त्या वातावरणाचे संस्कार सुभाष यांच्यावर झाले. मात्र, घरी आर्थिक ओढाताण होती. तुटपुंजी कोरडवाहू शेती. त्यात पोटापुरतेही पिकत नसे. त्यामुळे राठोड दाम्पत्य ऊसतोडीसाठी दुसर्‍या गावी जात. त्यावेळी मुलांना ते आजी-आजोबांकडे गावी ठेवत असत. आपल्याला जगवण्यासाठी आई-बाबांना गाव सोडून, आपल्याला सोडून जाव लागतं, हे कधी संपेल? असा विचार त्या लहान वयातही सुभाष करत असत. हा प्रश्न आई-बाबांना विचारल्यावर ते म्हणायचे, "लेकरा, तू शिकून मोठा हो. चांगल्या नोकरीला लागलास, तर हे भोग भोगावे लागणार नाहीत.” हे ऐकून सुभाष यांचा निश्चय पक्का होई की, पैसे नाहीत म्हणून शिकायचे नाही ही सबब द्यायचीच नाही, तर शिक्षणासाठी स्वत: कष्ट करायचे, पैसे जमवायचे.
 
या पार्श्वभूमीवर गावात माध्यमिक शाळा नव्हती, म्हणून त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी राहून पुढील माध्यमिक शिक्षण करायचे ठरवले. चार-पाच मुले एकत्र राहायची. दिवसभर एका छोट्या खानावळीत वेटरचे काम करायचे. तिथेच जेवणाखाण्याची सोय व्हायची. दिवसा तर जेवायला वेळ मिळतच नसे, रात्री त्या खानावळीत उरलेले, शिळेपाके, उष्टे अन्न जेवायला मिळे. पुढे त्यांनी दहावीनंतर महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. शिक्षण खर्चिक होते. ते नव्वदचे दशक होते. पनवेलमध्ये रस्तेबांधणी आणि इतर बांधणी मोठ्या प्रमाणात होत होती. तेव्हा सुभाष हे दरउन्हाळ्याच्या सुटीत ते गावकर्‍यांसोबत जालन्याहून पनवेलला यायचे. तिथे पाल बांधून राहायचे. उघड्यावरच सगळे जगणे. पण, दोन-तीन महिने काम करून पैसे जमावून, ते पुन्हा गावी यायचे आणि वर्षभर शिकायचे. असे करत-करत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. इतके शिक्षण म्हणजे खूप झाले, आता सुभाषने लग्न करायला पाहिजे, असे लोक म्हणू लागले. नातेवाईकांमुळे हेमाजी यांनाही वाटू लागले की, मुलाने आता लग्न करावे. पण, सुभाष यांनी स्पष्ट सांगितले की, मला अजून शिकायचे आहे आणि लग्न केले, तर उच्चशिक्षित मुलीसोबतच करणार. कालांतराने त्यांचा विवाह संतोषी या उच्चशिक्षित युवतीशी झाला. त्यानंतरही त्यांनी शिक्षण घेतले. आता पुणे येथे ‘रयत शिक्षण संस्थे’च्या महाविद्यालयात ते अध्यापक म्हणून नोकरी करत आहेत.
 
असो. या काळात डॉ. सुभाष यांच्या लक्षात आले की, काही लोक समाजाला भरकटवण्यासाठी सक्रिय आहेत. ‘बंजारा समाज हा हिंदू नाही,’ असे हा गट सांगत फिरतो. त्यासाठी खोटा इतिहासही लिहितो. त्यामुळे समाजात अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे सुभाष यांनी गावोगावच्या तांड्यांवर फिरून समाजात जागृती केली. ते तांड्यामध्ये जाऊन समाजबांधवांशी संवाद साधत, आपण बंजारा हिंदूच आहोत याबद्दल चर्चा-संवाद पुराव्यासकट करत. यामुळे ‘बंजारा हिंदू नाहीत,’ असे सांगणार्‍या लोकांपासून तांड्यावरचा भोळाभाबडा समाज सावध झाला. तसेच डॉ. सुभाष यांनी समाजातील मुलींच्या शिक्षणासाठीही काम सुरू केले. ‘गोर बंजारा अस्मिता संघ’ आणि ‘राष्ट्रीय बंजारा परिषद साहित्य विंग’च्या साहाय्याने ते समाजात जागृती-चेतना निर्माण करण्याचे काम करू लागले. त्यांच्या कार्यासाठी त्यांना ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’चा ‘राष्ट्रीय विद्या सरस्वती’ पुरस्कार, ‘इंडियन नेट-सेट असोसिएशन महाराष्ट्र’ राज्याचा ‘विद्यारत्न’ पुरस्कार, ‘इंडियन सॉलिडरिटी कौन्सिल, नवी दिल्ली’चा ‘लाईफटाईम अचिव्हमेंट गोल्डमेडल अवॉर्ड’, ‘मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी’चा ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ. सुभाष म्हणतात, "हिंदू धर्म-संस्कृतीचा वारसा सांगणारा आमचा गोर बंजारा समाज. समाजाचा खरा वैभवशाली धर्मशील इतिहास समाजासमोर आणायचा आहे. त्यासाठी मी संशोधन आणि लेखन करत आहे. यापुढेही समाजाच्या उज्ज्वलतेसाठी काम करेन.” म्हणूनच डॉ. सुभाष राठोड हे समाजासाठी सर्वार्थाने दीपस्तंभ आहेत.
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.