आरोग्याच्या क्षेत्रात काही धोके असे असतात, जे हळूहळू मानवी शरीराला पोखरत जातात. त्यांचे गांभीर्य लक्षात येईपर्यंत ते गंभीर रूप धारणही करतात. मूत्रपिंड विकार हे त्यांपैकीच एक. बदलती जीवनशैली, अपुरी तपासणी आणि जागरूकतेचा अभाव यांमुळे ही समस्या अधिक गुंतागुंतीची होत आहे. विशेष म्हणजे, अनेकदा शरीर कोणतीही ठळक सूचना देत नाही आणि त्यामुळे धोका अधिक वाढतो. याच पार्श्वभूमीवर वाढत्या दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराचा घेतलेला आढावा...
भारतात दीर्घकालीन मूत्रपिंड विकार ही समस्या आता हळूहळू मूक महामारीचे स्वरूप धारण करू लागली आहे. अलीकडेच केलेल्या एका अभ्यासातून, या आजाराचे धक्कादायक वास्तव समोर आले. सुमारे दोन हजार लोकांवर आधारित या अभ्यासात तब्बल ६० टक्के रुग्णांना स्वतःला त्यांना दीर्घकालीन मूत्रपिंड विकार असल्याची जाणीवच नव्हती. म्हणजेच, प्रत्येक दहा रुग्णांपैकी सहाजण अज्ञानाच्या अवस्थेतच आजाराशी झुंज देत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. ही बाब आरोग्यव्यवस्थेतील गंभीर उणीवदेखील अधोरेखित करणारी ठरते. या अभ्यासातील आकडेवारीकडे पाहिल्यास चित्र आणखी स्पष्ट होते. शहरी भागात ५७.५ टक्के आणि ग्रामीण भागात ६१.८ टक्के रुग्णांमध्ये दीर्घकालीन मूत्रपिंड विकार आढळून आला. मात्र, यांपैकी शहरी भागातील केवळ १.४ टक्के आणि ग्रामीण भागातील १६.५ टक्के रुग्णांना आपल्या आजाराची कल्पना होती. ही तफावत केवळ माहितीअभावी नसून, प्राथमिक आरोग्ययंत्रणेतील अपुर्या तपासण्या आणि दुर्लक्ष यांचे द्योतक आहे.
दीर्घकालीन मूत्रपिंड विकार हा आज सुरुवातीच्या टप्प्यात तो कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाही. रुग्णाला थकवा, अंगाला सूज, भूक मंदावणे किंवा मूत्रातील बदल जाणवू लागतात, तेव्हा अनेकदा मूत्रपिंडाची कार्यक्षमता ६०-७० टक्क्यांपर्यंत घटलेली असते. अशा अवस्थेत उपचारांची मर्यादा वाढते आणि रुग्ण डायलिसिस किंवा प्रत्यारोपणासारख्या अंतिम टप्प्याच्या उपचारांकडे ढकलला जातो. त्यामुळे लवकर निदान हेच या आजाराविरुद्धचे सर्वांत प्रभावी शस्त्र ठरते.
केलेल्या अभ्यासातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ग्रामीण आणि शहरी भागातील भिन्न वास्तव. ग्रामीण भागात अनेक रुग्ण अत्यंत प्रगत अवस्थेत निदानासाठी येतात. विशेष म्हणजे, सुमारे ५० टक्के ग्रामीण रुग्णांमध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांसारखी पारंपरिक कारणे आढळत नाहीत. परिणामी, पर्यावरणीय घटक, दूषित पाणी, कृषीमध्ये रसायनांचा वापर किंवा अनियंत्रित औषधोपचार यांसारख्या बाबींचाही सखोल अभ्यास करण्याची गरज निर्माण होते. दुसरीकडे, शहरी भागात जीवनशैलीमुळे निर्माण झालेले आजार, विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाब हेच दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराचे प्रमुख कारण म्हणून पुढे येते.
भारतातील आरोग्य धोरणाचा विचार केला, तर दीर्घकालीन मूत्रपिंड विकार अजूनही दुय्यम स्तरावरच राहिलेला दिसतो. राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये मधुमेह आणि रक्तदाब यांवर भर दिला जातो; मात्र मूत्रपिंड तपासणी ही नियमित आरोग्य तपासण्यांचा भाग अद्यापही झालेली नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर रुग्ण निदानापासून वंचित राहतात. त्यातच तपासण्यांचा खर्च, आरोग्यविम्याचे मर्यादित कवच आणि ग्रामीण भागातील आरोग्यसुविधांची कमतरता या समस्या परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करतात. या पार्श्वभूमीवर उपाययोजना केवळ वैयक्तिक नव्हे, तर व्यापक पातळीवर असणेही आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये ‘क्रिएटिनिन’ आणि मूत्रातील ‘अल्ब्युमिन’ यांसारख्या साध्या, स्वस्त चाचण्या नियमितपणे उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यामध्ये सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्ती जसे की, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता असलेल्या रुग्णांसाठी वार्षिक तपासणी बंधनकारक करणे अनिवार्य आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे अत्याधुनिक निदान साधनांचा वापर केल्यास, अगदी दुर्गम भागातही लवकर निदान शक्य होऊ शकते.
दीर्घकालीन मूत्रपिंड विकार हा उपचारांपेक्षा प्रतिबंध आणि वेळेवर निदानावर अवलंबून असलेला आजार आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, मीठ व साखरेचे नियंत्रित सेवन, तसेच वेदनाशामक औषधांचा अतिरेक टाळणे या साध्या उपाययोजना दीर्घकालीन परिणामकारक ठरतात. त्याचबरोबर, नियमित आरोग्यतपासणी ही सवय म्हणून अंगीकारणेही आवश्यक आहे. जर वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर डायलिसिस आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण यांसारख्या खर्चिक उपचारांवरील अवलंबित्व झपाट्याने वाढेल आणि आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण येईल. त्यामुळे ही ‘मूक महामारी’ केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न राहिलेली नसून, ती राष्ट्रीय आरोग्यसुरक्षेचे मोठे आव्हान होत चाललेली आहे. सजगता, प्रतिबंध आणि धोरणात्मक निर्णय या त्रिसूत्रीनेच या वाढत्या संकटावर नियंत्रण मिळवता येईल.