कलेची शोक‌‘कळा‌’

    30-Mar-2026   
Total Views |

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ जगभरातील नागरिकांना बसत आहे. ऊर्जास्रोतांवर या युद्धाचा झालेला थेट परिणाम लक्षात घेता, या युद्धास पूर्णविराम कधी मिळणार याकडेच जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे. मागच्या 200 वर्षांमध्ये अमेरिकेसारख्या देशाने, आपल्या विस्तारवादी धोरणांना अनुकूल अशी परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून किती ठिकाणी ठिणग्या पेटवल्या, याचे वास्तव मागच्या काही दशकांमध्ये लोकांसमोर आले. व्हिएतनाम असो किंवा अफगाणिस्तान, एका ठरावीक टप्प्यानंतर अमेरिकेला आपलं बस्तान बांधून त्या त्या राष्ट्रातून निघावंच लागलं. या वास्तवाचे पुरेसे आकलन झाल्यामुळेच, आता या युद्धाच्या विरोधात अमेरिकेतील नागरिकच रस्त्यावर उतरले. त्यामुळे यानंतर आता जागतिक पटलावर जे बदल घडतील, त्यामुळे आपल्या शतकाचे भविष्य नव्याने आकाराला येईल, हे नक्की. तूर्तास या युद्धामुळे होत असलेल्या हानीकडे दृष्टिक्षेप टाकणे गरजेचे.

सर्वसाधारणपणे युद्धाच्या आगीमध्ये सर्वाधिक पोळळे जातात त्या स्त्रिया आणि बालके. एका संपूर्ण पिढीच्या मनावरच एका युद्धाची छाया गडद होते आणि त्यांचं भविष्यच याच अंधारात पिचलं जातं. युद्धकाळामध्ये या दोन घटकांवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराच्या कहाण्या ऐकून, वाचून, अंगावर काटा येतो. युद्धाच्या वणव्यामध्ये माणसांचा मृत्यू वाईटच असतो; मात्र त्याहून वाईट असतं, माणसांनी प्राणपणाने जपलेली सांस्कृतिक प्रतीकं जमीनदोस्त होणं. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये काही दिवसांपूव, तेहरानमधील प्रसिद्ध गोलेस्तान पॅलेसचे नुकसान झाले. गोलेस्तान पॅलेस हा केवळ एक राजवाडा नसून तो इराणी कला, वास्तुकला आणि इतिहासाचा एक अमूल्य वारसा आहे. हा राजवाडा ‌‘युनेस्को‌’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. पर्शियन संस्कृतीचा हा एक अमूल्य ठेवा आहे, असं मत काही इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केलं. सदर राजवाडा म्हणजे एकेकाळी कजार राजवंशाच्या सत्तेचे केंद्र होते. यात पर्शियन वास्तुकला आणि पाश्चात्य प्रभावाचा एक सुंदर संगम पाहायला मिळतो. ऐतिहासिक स्थळांचे जतन-संवर्धन हा कळीचा मुद्दा आहेच मात्र, त्यातही ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती उद्भवलेली असते, तिथल्या वास्तू संरक्षित करण्याची जबाबदारी अधिक महत्त्वाची होऊन बसते.

ऐतिहासिक वास्तू ज्या प्रकारे युद्धाच्या बळी ठरतात. त्याचप्रकारे, युद्धाचा फटका बसतो, तो कला व्यवहारात असलेल्या कारागिरांना, व्यावसायिकांना. आतापर्यंत दुबई हे ठिकाण या साऱ्या संघर्षापासून कोसो दूर आहे, अशीच अनेकांची समजूत होती; मात्र ज्यावेळी क्षेपणास्त्रांनी पाम जुमेराह बेटावरील एक हॉटेल, मेझॉन वेब सर्व्हिसेसचे डेटा सेंटर, अमेरिकन वाणिज्य दूतावास, विमानतळ आणि जेबेल अली बंदर आदी ठिकाणांना लक्ष्य केले, त्यावेळी युद्धाची तीव्रता अनेकांना जाणवली. पाम जुमेराह बेटापासून जवळच असलेल्या मदिनात, जुमेराह येथे ‌‘आर्ट दुबई‌’चे प्रदर्शन एप्रिल महिन्यात भरणार आहे. या प्रदर्शनावरसुद्धा आता युद्धाची छाया आहे. स्थानिक कलाकारांना याचा थेट फटका बसत असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक कलासंग्राहकांनी या प्रदेशाकडे पाठ फिरवली आहे. साहजिकच, युद्धामुळे चित्रं, शिल्पं आदी गोष्टींच्या व्यवस्थापनाचाही प्रवासखर्च वाढला आहे. खरेदीदारांच्या भूमिकेतून काहींना ही ‌‘चैन‌’ आज परवडणारी नसेल; मात्र यावरच उपजीविका असलेल्या कलाकारांसमोर नवीन प्रश्नं निर्माण झाले आहेत. सोथबी आणि क्रिस्टीसारख्या मोठ्या लिलाव घरांना असे दिसून आले की, युद्धामुळे जागतिक खरेदीदारांच्या मानसिकतेतच बदल झाला आहे. त्यामुळे भविष्यात कला क्षेत्रातील व्यापाराची गणितंसुद्धा पूर्णपणे बदलू शकतात.

ऊर्जाक्षेत्र हा जणू माणसाच्या जीवनाचा केंद्रबिंदूच. ऊर्जाक्षेत्रावरील परिणामामुळे इतर क्षेत्रे प्रभावित होतात आणि त्याचे पडसाद आपल्याला रोजच्या जीवनातही बघायला मिळतात. कुठलेही राष्ट्र ज्यावेळी युद्धाच्या सिंहगर्जना करीत रणांगणावर उतरते, त्यावेळी काही तात्कालिक घटनांमुळेच संघर्ष पेटलेला असतो. योग्य वेळी तो संघर्ष मिटला नाही की, त्याचं रूपांतर भयावह युद्धामध्ये होतं. युद्धं वेळीच आटोक्यात आले नाही की, त्याचा परिणाम सबंध मानवजातीला भोगावाच लागतो. इतिहासातील हेच धडे पुन्हा एकदा समजून घेण्याची वेळ आली आहे.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.