शेतामध्ये सातत्याने एक पीकपद्धती अवलंबल्यास त्याचे कळत-नकळतपणे दुष्परिणाम होताना दिसून येतात. शेतीमधील पिके व वनस्पतींच्या विविधतेचे आणि एकूण जैवविविधतेचे महत्त्व विशद करणारा हा लेख.
भारत देशामध्ये वैदिक काळापासून ऋषी आणि कृषी संस्कृती एकत्र नांदत आल्या आहेत. प्राचीन काळापासून हरित संस्कृतीचा पुरस्कार करणारा निसर्गपूजक असा भारत देश हा मुख्यत्वे कृषिप्रधान देश आहे, हे सर्वश्रुत आहे. या आधुनिक काळातदेखील अनेक भारतीय शेतकरी नक्षत्र, तिथी व मुहूर्त यांना अनुसरून शेती करताना आढळतात. भारतात कृषिक्षेत्रामध्ये सातत्याने विकास होत असून शेती करताना प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असलेला दिसून येतो. असे असले तरी, भारतात अजूनही बहुतांश शेती ही निसर्गआधारित आहे. निसर्गनियमास अनुसरून शेती केल्यास त्याचा शेतकऱ्यास लाभ होताना दिसून येतो. निसर्गाच्या नियमांमधील एक मूलभूत निसर्ग नियम म्हणजे शेतामध्ये अधिकाधिक प्रमाणात नैसर्गिक जैववैविध्य राखणे.
जैवविविधता व्याख्या आणि प्रकार
जैविक विविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध प्रकारच्या सजीवांमध्ये आणि त्यांच्या अधिवासांमध्ये आढळणारी विविधता होय. जैवविविधतेचे प्रामुख्याने पुढील तीन प्रकार आहेत.
जनुकीय विविधता
जनुकीय विविधता म्हणजे एकाच प्रजातीच्या जनुकांमधील विविधता (उदाहरणार्थ, गव्हाच्या विविध जाती, तांदळाच्या विविध जाती, इत्यादी)
प्रजाती विविधता
प्रजाती विविधता म्हणजे एका विशिष्ट अधिवासात आढळणाऱ्या विविध प्रजाती (उदा., वनस्पती, प्राणी, कीटक, पक्षी, इत्यादी)
परिसंस्था विविधता
परिसंस्था विविधता म्हणजे परिसंस्थांमधील विविधता (उदा., जंगल, समुद्र, नदी, वाळवंट, इत्यादी)
जैवविविधतेचे संगोपन केले नाही, तर निसर्गात असमतोल निर्माण होऊन निसर्गाचा ऱ्हास उद्भवतो. निसर्गात संतुलन राखण्यासाठी जैवविविधतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
शेतातील वनस्पतींकडे दुर्लक्ष
अनेकदा शेती करताना शेतकऱ्यांकडून पिके आणि वनस्पती यांची विविधता या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष होत असलेले दिसून येते. शेतीमधून अधिकाधिक उत्पन्न मिळावे, म्हणून बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतामध्ये दरवष ‘एक पीक पद्धती’चा (उदा., ऊस, तांदूळ, इत्यादी) वापर करताना दिसून येतात. या एकेरी पीकपद्धतीचे, म्हणजेच ‘मोनोकल्चर’चे विपरीत परिणाम शेतातील जैविक विविधतेवर होताना दिसून येतात.
शेती ही जंगलाची प्रतिकृती
शेतामध्ये पिके आणि वनस्पती यांची विविधता राखणे, याकरिता नेमके काय करायचे, ते आपण येथे जाणून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, अशी विविधता राखण्यासाठी शेतामध्ये जंगलाचे मॉडेल असावे. याचा अर्थ, शेत ही जंगलाची छोटी प्रतिकृतीच असावी. आता साधारण भारतीय जंगल डोळ्यांसमोर आणूया. जंगल हे निसर्गतः निर्माण झालेले असते. निसर्गात वर्षानुवर्षे अखंडपणे चालू असलेल्या नैसर्गिक घडामोडींचे एकूण फळ म्हणजे जंगलाची निर्मिती. जंगल हे विविध कीटक, सरीसृप, अष्टपाद पशु-पक्षी, सपुष्प-अपुष्प वनस्पती, नदी-नाले-ओढे-झरे, रेती-वाळू-दगड-धोंडे-खडक अशा विविध सजीव-निजव नैसर्गिक घटकांमुळे अत्यंत समृद्ध परिसंस्था असते. आपली वसुंधरा ही ‘सुजलाम् सुफलाम्’ होण्यास मुख्यत्वे पृथ्वीवरील या जंगलांचे अस्तित्व कारणीभूत ठरते. कारण जंगलांमुळे जमिनीतील भूजलाची पातळी राखली जाऊन त्यात सातत्याने वाढ होत असते. त्यामुळे ‘पृथ्वीची फुप्फुसे’ असे जंगलांचे यथार्थ वर्णन केले जाते. भारतात सदाहरित वने, निम्न सदाहरित वने, शुष्क पानगळी वने, वर्षावने अशी वेगवेगळ्या प्रकारची विपुल जंगले आहेत. खरोखर भारतास जैवविविधतेचे निसर्गदत्त वरदानच लाभले आहे.
शेतातील पिके व वनस्पतींच्या विविधतेचे महत्त्व
शेतामध्ये नैसर्गिक जैवविविधता राखण्यासाठी मुख्य पीक, आंतरपीक याव्यतिरिक्त जंगलात विविध वनस्पती असतात. तशा वनस्पतींचे विविध प्रकार म्हणजे देशी वृक्ष, झुडुपे, लता-वेली, गवत (उदा., बांबू, झाडू गवत), शाकवगय वनस्पती अथवा हर्ब्स (उदा. केळे) पाणवनस्पती (शेतात नैसर्गिक ओढा किंवा कृत्रिमरित्या तयार केलेला पाणवठा असल्यास त्यात लावण्यासाठी विशिष्ट जलीय वनस्पती) यांची योग्य निवड करून त्यांची योग्य पद्धतीने लागवड करावी. शेतामध्ये वनस्पतींची अशी विविधता आणण्याचे प्रयत्न करत असताना वेळेवर तण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. चुबुक काटा (lternanthera caracasana), गाजर गवत (Parthenium hysterophorus), रानमोडी (Eupatorium perfoliatum), बेशरम (Ipomoea carnea) इत्यादी हानिकारक वनस्पती वा तण मुळापासून काढून टाकावे आणि त्या जागी शेतीस पूरक ठरणाऱ्या वनस्पती लावाव्यात. घोळू (Portulaca oleracea), दगडी पाला (Tridax procumbens), पुनर्नवा (Boerhavia diffusa), भुईआवळी (Phyllanthus niruri), सहदेवी (Cyanthillium cinereum) इत्यादी नैसर्गिकरित्या उगवलेल्या औषधी अशा तण सदृश वनस्पती माफक प्रमाणात शेतामध्ये जरूर ठेवाव्यात. कारण, या वनस्पतींमुळे माती घट्ट धरली जाते आणि मातीचा पोत सुधारण्यास मदत होते. शिवाय, यांच्यामुळे शेतात येणाऱ्या विविध परागवाहक जीवांना खाद्य मिळू शकते.