मुंबई : (Dattatreya Hossabale) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शंभर वर्षांच्या वाटचालीत सेवा आणि समर्पण भावनेने देशसेवा व राष्ट्रनिर्माणात महत्त्वपूर्ण योगदान दिले. देशभक्तीने ओतप्रोत आणि समाजहिताची भावना असलेले व्यक्तिमत्त्व संघाच्या नित्य शाखांमधून आज घडतायत. संघाचे कार्य हिंदू समाजाला संघटित, सशक्त आणि समर्थ बनविण्यासाठी चालू आहे, असे प्रतिपादन सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित प्रमुख जनगोष्ठी कार्यक्रमात ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत सरकार्यवाह पुढे म्हणाले, संघ सामान्य व्यक्तीच्या वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्यनिर्मितीच्या दृष्टीने कार्य करतो. समाजाच्या प्रगतीसाठी समाजाचे संघटन, सामूहिक प्रयत्न आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात प्रत्येकाचे योगदान असावे. संघ सर्व प्रकारच्या भेदभावांना दूर करून समाजासाठी कार्य करतो. संघ केवळ एक संघटन नसून राष्ट्रीय आंदोलन आहे आणि कार्यकर्त्यांसाठी ती एक जीवनशैली आहे. संघकार्याचा उद्देश भारताला समरस, सक्षम आणि समर्थ बनविणे हा आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, सेवा कार्य तसेच देश-विदेशातील सध्याच्या परिस्थिती, शिक्षण धोरण, संस्कार आणि संघातील महिलांच्या सहभागाबाबत प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे सरकार्यवाहांनी दिली. यावेळी निवृत्त लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालये व विद्यापीठांचे प्राध्यापक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रसिद्ध गायक, खेळाडू, वृत्तपत्रांचे मुख्य संपादक, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि साधू-संत सहभागी झाले होते. या प्रसंगी मंचावर प्रांत संघचालक डॉ. वीरसिंह रांगडा, सह प्रांत संघचालक अशोक शर्मा, विभाग संघचालक भूषण रैना आणि जिल्हा संघचालक प्रदीप कुमार उपस्थित होते.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक