'वैशाली'चा सुवर्णप्रवास; इमारतीपलीकडचं एक जिवंत कुटुंब!

    30-Mar-2026   
Total Views |


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कांदिवली पश्चिमेतील कांदिवली गाव परिसरात १९७६ साली उभी राहिलेली म्युनिसिपल एम्प्लॉइज ‘वैशाली’ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीला स्थापनेची नुकतीच ५० वर्षे पूर्ण करून सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल झाली आहे. साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नातून साकारलेली ही चार मजली, पंचवीस सदनिकांची इमारत केवळ निवासस्थान न राहता एक कुटुंब बनली आणि त्या कुटुंबाचा सुवर्णप्रवास नुकताच भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला.

१९७६ च्या मार्च ते मे या कालावधीत एकामागून एक अशी २५ कुटुंबे वैशालीत दाखल झाली. त्या काळात सोसायटीसमोर केवळ दहा फुटी कच्चा रस्ता आणि आजूबाजूला वोरा कॉलनीपासून डहाणूकर वाडीपर्यंत पसरलेली मोकळी जागा होती. या मोकळ्या मैदानात दररोज संध्याकाळी क्रिकेट रंगायचे, तर सकाळ-दुपारी कॅरम, पत्ते यांसारखे बैठे खेळ रंगायचे. रात्री गच्चीवर विविध वयोगटांनुसार गप्पांचे फड रंगत असत.

सोसायटीतील सण-उत्सव हा वैशालीच्या संस्कृतीचा आत्मा ठरला. गणेशोत्सव, गौरी-गणपती, श्रीकृष्ण जन्मोत्सव, तुळशी विवाह, होळी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा सर्व सणांमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्साही सहभाग असे. अण्णा वर्तक यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोसायटीच्या एकजुटीला नवे बळ दिले. विशेष म्हणजे, होळी आणि गांधी जयंती निमित्त संपूर्ण इमारत झाडून-पुसून स्वच्छ करण्याची परंपरा होती, ज्यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी होत.

सोसायटीत कोणाकडेही लग्नकार्य असो वा अडचण; संपूर्ण 'वैशाली' कुटुंब एकत्र उभे राहत असे. प्रत्येक घरातील पाहुणे हे संपूर्ण सोसायटीचे पाहुणे मानले जात. ही ‘एकमेकांसाठी जगण्याची’ भावना वैशालीची खरी ओळख बनली. कालांतराने मुली विवाहानंतर सासरी गेल्या, तर काही मुलं नोकरीनिमित्त इतर ठिकाणी स्थायिक झाली. संपर्क कमी झाला, मात्र तुटला नाही. यतीन नाचणे यांच्या पुढाकाराने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुन्हा सर्वजण एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

वैशाली सोसायटीच्या ५० वर्षांच्या प्रवासानिमित्त २१ मार्च रोजी कांदिवलीतील कमला विहार स्पोर्ट्स क्लब येथे भव्य स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले. १९७६ पासून आजपर्यंत दिवंगत झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर दिवसभर गप्पागोष्टी, गाणी आणि जुन्या आठवणींना उजाळा देत वातावरण भारावून गेले. सुरुवातीच्या पिढीतील उपस्थित ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेल्या सदस्यांनाही त्यांचा मान घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली.

स्नेहमिलनाच्या शेवटी सर्वांच्या मनात एकच भावना होती; हा दिवस संपलाच नसता तर! मात्र वास्तवाच्या बंधनांमुळे कार्यक्रम आवरता घ्यावा लागला. जड अंतःकरणाने, पण गोड आठवणींचा खजिना मनात साठवून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. वैशाली सोसायटीचा हा प्रवास केवळ इमारतीचा नाही, तर नात्यांचा, संस्कारांचा आणि एकात्मतेचा जिवंत इतिहास आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक