ऊर्जाक्षेत्रातील अतुलनीय नेतृत्व

Total Views |
Atul Kharate
 
ऊर्जाक्षेत्रातील प्रभावी आणि दूरदृष्टीचे नेतृत्व, ‌‘इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लि.‌’ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अतुल खराटे यांच्याविषयी...
 
माणसाच्या आयुष्यातील सुरुवातीचे संस्कार त्याच्या व्यक्तिमत्त्वाची दिशा ठरवतात, असे म्हटले जाते. अतुल खराटे यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात मिळविलेले यश, हे याच विचारांचे जिवंत उदाहरण ठरावे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे बालपण गेलेल्या अतुल खराटे यांच्या आयुष्याची पायाभरणी केवळ शिक्षणानेच नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांनी झाली. खराटे यांचे शालेय शिक्षण बुलढाणा तालुक्यातील लिलाधर भोजराज चांडक विद्यालय, मलकापूर येथे झाले. घरातील संघसंस्कारांमुळे त्यांना बालपणापासूनच शिस्त, देशभक्ती आणि समाजकार्यातील सहभागाची ओळख झाली. शाळेतील वातावरणही तितकेच संस्कारक्षम असल्याने, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मूल्यांची रुजवण ही लहानपणापासूनच झाली.
 
खराटे यांच्या कुटुंबाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला संबंध, ही एक परंपराच आहे. त्यांचे आजोबा पुंडलिकराव खराटे यांचा, संघाशी संबंध द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या संपर्कातून आला. विदर्भातील प्रवासादरम्यान झालेल्या या भेटीतून प्रेरित होऊन, पुंडलिकराव यांनी नांदुरा आणि मलकापूर परिसरातील संघकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. यासाठी गावागावांत जाऊन त्यांनी राष्ट्रकार्यासाठी लोकांना एकत्र केले. हाच वारसा पुढे अतुल खराटे यांचे वडील, रमेशराव खराटे यांनीही तितक्याच निष्ठेने जपला. 1975च्या आणीबाणीच्या काळात रमेशराव खराटे आणि त्यांच्या वडिलांनी, ठाणे व नाशिक येथे तुरुंगवासही भोगला. मात्र, कठीण परिस्थितीतही त्यांनी आपल्या विचारांशी कधी तडजोड केली नाही. हीच जिद्द, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा अतुल खराटे यांच्या मनातही खोलवर रुजली आहे.
 
संघसंस्कारांतून घडलेली ही मानसिकता त्यांच्या पुढील जीवनप्रवासात ठळकपणे दिसते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खामगाव विभागीय कार्यालयात, ज्युनिअर इंजिनिअर म्हणून काम सुरू केले. 1996 ते 1998 या कालावधीत त्यांनी ‌‘महावितरण‌’मध्ये नोकरी केली. मात्र, व्यापक ध्येय डोळ्यांसमोर ठेवलेल्या अतुल खराटे यांनी, खासगी क्षेत्रात प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
 
या निर्णयाने त्यांच्या करिअरला एक नवेच वळण मिळाले. त्यांनी ऑईल आणि गॅस क्षेत्र निवडत, पुढील दोन दशकांत ऊर्जा, तेल व वायू, पुरवठा साखळी आणि हरित ऊर्जाक्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. नागपूर, मुंबईसह विविध राज्यांमध्ये काम करत त्यांनी, ऊर्जाक्षेत्राच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज ते ‌‘इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लि.‌’ येथे, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी स्वतःला सातत्याने समृद्ध केले. करिअरच्या उमेदीच्या काळात कामाच्या व्यापामुळे, पदव्युत्तर शिक्षणाची त्यांची इच्छा काही काळ मागे पडली होती. तरीही त्यांनी शॉर्ट टर्म पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केले. दिल्लीतील पोस्टिंगदरम्यान त्यांनी ‌‘युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज‌’ येथून, ‌‘ऑइल ॲण्ड गॅस मॅनेजमेंट‌’मध्ये ‌‘एमबीए‌’ पूर्ण केले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी डी. वाय. पाटील, नेरुळ येथून 2021 ते 2025 या कालावधीत ‌‘ऊर्जाव्यवस्थापन‌’ विषयात ‌‘पीएचडी‌’ संपादन केली.
 
विविध पदव्युत्तर डिप्लोमा आणि ‌‘पीएचडी‌’मधूनच त्यांची ज्ञानाची ओढ स्पष्ट दिसते. आयआयएम अहमदाबाद येथील वरिष्ठ नेतृत्व कार्यक्रमात सहभागी होऊन, त्यांनी नेतृत्वकौशल्यांना अधिक धार दिली. उद्योगक्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांनी समाजाशी नाते जपले. विविध औद्योगिक व सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जाक्षेत्रातील चर्चांमध्ये योगदान दिले. ‌‘जी20‌’अंतर्गत आयोजित उपक्रमांमध्येही सक्रीय सहभागी होत त्यांनी, भारताच्या ऊर्जाधोरणांना दिशा देण्याचा प्रयत्न केला.
 
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते धोरणात्मक व्यवसाय विकास, नवीकरणीय ऊर्जाउपक्रम, जोखीम व्यवस्थापन आणि ‌‘सीएसआर‌’ यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचे नेतृत्व करतात. त्यांच्या कार्यपद्धतीत संघातून मिळालेली संघटित कार्यसंस्कृती, पारदर्शकता, दीर्घकालीन विचार आणि राष्ट्रहिताला प्राधान्य ही मूल्ये स्पष्टपणे दिसतात. अतुल खराटे यांचा प्रवास हा केवळ एका गावातील मुलाने उच्च पद गाठण्याचाच नाही; तो संस्कार, विचारसरणी आणि निष्ठेचादेखील आहे. संघाच्या शाखेतून आत्मसात केलेली शिस्त, संघटनकौशल्य आणि ‌‘राष्ट्र प्रथम‌’ ही भावना त्यांनी आयुष्यभर जपली. आज जागतिक पातळीवर ऊर्जा क्षेत्र झपाट्याने बदलत असताना, तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या युगातही मूल्यांना घट्ट धरून ठेवणारे नेतृत्व दुर्मीळ आहे. अतुल खराटे यांचे व्यक्तिमत्त्व या दुर्मीळतेचे प्रतीक ठरावे. ते केवळ उद्योगविश्वात यशस्वी नाहीत, तर समाजाला दिशा देणारे आणि पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या कार्यातील स्थिरता, निर्णयांतील दूरदृष्टी आणि कृतीतून प्रकट होणारी राष्ट्रनिष्ठा, हीच त्यांच्या यशाची खरी ओळख.
 
आज जगभरात युद्धजन्य परिस्थिती असताना, अतुल खराटे यांच्यासारख्या राष्ट्रप्रेरित आणि अनुभवी नेतृत्वाखाली भारत ऊर्जा सुरक्षितता, विकास आणि आत्मनिर्भरतेचा प्रकाश देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे. त्यांच्या पुढील राष्ट्रकार्यासाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.