रामटेक : भारताला विदर्भाची देण

    29-Mar-2026
Total Views |

विदर्भाच्या भूभागात, नागपूरच्या ईशान्येला सुमारे 50 किमीवर उभा असलेला रामगिरी पर्वत (आजचा रामटेक) हा केवळ रामभक्तीचा केंद्रबिंदू नाही, तर भारतीय इतिहासातील एक अद्वितीय पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक स्थळ आहे. येथे उभे राहिल्यावर जाणवते की, हा प्रदेश केवळ एका पौराणिक स्मृतीवर आधारलेला नाही; तो शतकानुशतके चालत आलेल्या राजसत्ता, धर्म, व्यापार आणि काव्यपरंपरेचा एक संगम आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या श्रीराम नवमीनिमित्ताने प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेकच्या भूमीविषयी...

रामटेक‌’ या नावाचा अर्थच सांगतो की, येथे एक संकल्प घडला. ‌‘टेक‌’ म्हणजे प्रतिज्ञा आणि पौराणिक कथेनुसार, वनवासात आलेल्या रामाने येथे ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा नायनाट करण्याची शपथ घेतली. त्यामुळे हे स्थळ संकल्पसिद्धी म्हणूनही ओळखले जाते. रामटेकला ‌‘सिंदूरगिरी‌’ हे नावही आहे. एक आख्यायिका सांगते की, येथेच विष्णूचा नरसिंह अवतार हिरण्यकश्यपुला संपवतो आणि त्याच्या रक्ताने हा डोंगर गडद लाल होतो. या नावांमध्येच या स्थळाची बहुस्तरीय पौराणिक ओळख दडलेली आहे.परंतु, रामटेकचे खरे ऐतिहासिक महत्त्व उलगडते, ते कालिदासाच्या ओळींमधून आणि वाकाटक काळाच्या शिलालेखांमधून.

‌‘मेघदूत‌’ हे कालिदासाचे (इ.स. चौथे-पाचवे शतक) सुप्रसिद्ध खंडकाव्य, ज्यात एक यक्ष, एका वर्षाच्या वनवासात रामगिरीवर राहताना, विरहाच्या वेदनेतून मेघाला आपला दूत बनवतो आणि त्याला हिमालयाच्या दिशेने पाठवतो. अनेक परंपरा आणि अभ्यास हे रामगिरी आधुनिक रामटेकशी जोडतात. येथे दरवष भरणारा ‌‘कालिदास महोत्सव‌’ हा त्याच काव्यपरंपरेचा जिवंत उत्सव आहे. संस्कृत नाटके, काव्यवाचन आणि शास्त्रीय नृत्याने भरलेला! रामगिरीच्या त्या हिरव्यागार टेकड्यांवर, पावसाळ्याच्या पहिल्या ढगांकडे पाहताना, कालिदासाच्या ओळी स्वतःच मनात घुमू लागतात, हा योगायोग नाही, ही भूमीची किमया आहे!

इसवी सन चौथ्या-पाचव्या शतकात उदयास आलेले वाकाटक साम्राज्य हे विदर्भातील एक प्रमुख राजसत्ता होते. वाकाटकांची राजधानी नंदीवर्धन (आजचे नागर्धन) रामटेकपासून केवळ सहा किमी अंतरावर होती, ज्यामुळे रामगिरी पर्वत त्यांच्या धार्मिक आणि राजकीय संकुलाचा एक अविभाज्य भाग बनला होता. हे स्थळ भारतातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे इसवी सन चौथ्या शतकापासून अखंड ऐतिहासिक विकासाचा मागोवा घेता येतो.

रामगिरीवरील सर्वांत महत्त्वाच्या पुराव्यांपैकी एक म्हणजे केवळ नरसिंह मंदिरातील वाकाटक शिलालेख. हा इसवी सन पाचव्या शतकातील शिलालेख संस्कृतमध्ये, उत्तरकालीन ब्राह्मी लिपीत, 15 ओळींमध्ये कोरलेला आहे. तो वाकाटक राजवंशाची वंशावळ आणि मंदिराच्या उभारणीची नोंद करतो. हा शिलालेख एका वाकाटक राजकन्येची-अतिभावतीची कथा सांगतो, जी आपल्या मातृकुलातील काकांशी-विदिशाचे उपराजा घटोत्कचगुप्त यांच्याशी विवाहित होती. स्कंदगुप्ताविरुद्धच्या उत्तराधिकार संघर्षात घटोत्कच पराभूत झाल्यावर, राणीचा भाऊ-वाकाटक राजा प्रवरसेन दुसरा तिला विदर्भात परत घेऊन आला. हा शिलालेख म्हणजे केवळ एक धार्मिक दस्तऐवज नाही; तो गुप्त आणि वाकाटक घराण्यांमधील गुंतागुंतीच्या राजकीय आणि वैवाहिक संबंधांचा एक दुमळ साक्षीदार आहे.

या शिलालेखाचा पहिला अर्थ मांडण्याचे श्रेय ‌‘महाराष्ट्र पुरातत्त्व सर्वेक्षण विभागा‌’चे संचालक डॉ. ए. पी. जामखेडकर यांना जाते, ज्यांनी 1986 मध्ये तो प्रभावती गुप्ताशी जोडला. प्रभावती गुप्ता-चंद्रगुप्त दुसऱ्याची कन्या आणि वाकाटक राजा रुद्रसेन दुसऱ्याची राणी या विदर्भातील वैष्णव परंपरेच्या एक प्रमुख प्रवर्तक होत्या. त्यांनी या प्रदेशात नरसिंहाच्या उपासनेची सुरुवात केली, असे संशोधन सांगते. हे विशेष आहे, कारण वाकाटक राजे मूळतः शैव होते.

हान्स बाकर यांच्या संशोधनाने या शिलालेखाची आणखी एक महत्त्वाची परत उघडली. बाकर यांच्या मते, हा शिलालेख मूळतः विष्णूच्या त्रिविक्रम रूपाला समर्पित होता. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, शिलालेखाचा मूळ स्रोत जवळचे त्रिविक्रम मंदिर होते आणि भोसले काळातील नरसिंह मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी हा दगड तेथून इकडे आणला गेला असावा. हे निरीक्षण रामटेकच्या मंदिरसमूहाची बहुस्तरीयता आणि काळाच्या ओघात होणाऱ्या पुनर्रचनेची प्रक्रिया अधोरेखित करते.

रामगिरीवर पाचव्या शतकात पूर्व वाकाटक साम्राज्याच्या राज्यकर्त्यांनी बांधलेली पाच मंदिरे होती. केवळ नरसिंह मंदिर, त्रिविक्रम मंदिर, वराह मंदिर या सर्व मंदिरांची एकत्रित उपस्थिती सांगते की, रामटेक हे एक प्रमुख वैष्णव तीर्थक्षेत्र होते, जिथे विष्णूच्या विविध अवतारांची एकत्रित उपासना होत होती. या मंदिरांची स्थापत्यरचना पाहिली, तर त्यात प्रारंभीच्या दगडी बांधकामाचे स्पष्ट संकेत दिसतात. स्थानिक लाल वालुकाश्मामध्ये घडवलेले, साध्या मंडपांनी युक्त, अलंकारिकतेपेक्षा संरचनात्मक स्पष्टता आणि धार्मिक उद्देश यांना प्राधान्य देणारे.

मध्ययुगीन काळात रामटेक गोंड राजवटीच्या अधिपत्याखाली आला आणि नंतर मराठा राजवटीत आला. आजचे मुख्य रामाचे मंदिर (गड मंदिर) नागपूरचे मराठा राज्यकर्ते रघुजी भोसले यांनी 18व्या शतकात बांधले. उंच तटबंदी, प्रवेशद्वारांची रचना, टेकडीवरील मंदिरांची मांडणी हे सर्व मिळून एक किल्लेसदृश धार्मिक संकुल तयार करतात. परंतु, या भोसलेकालीन भव्यतेमागे वाकाटक, कलचुरी आणि त्याही पूवचे स्तर दडलेले आहेत. यात 11व्या-12व्या शतकातील शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरही आहे, जे रामटेकच्या बहुधार्मिक परंपरेचे प्रतीक आहे.

मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चढताना, प्रत्येक टप्प्यावर एक वेगळी अनुभूती मिळते. खालील जग मागे सरकत जाते आणि वर पोहोचल्यावर एक विस्तीर्ण, शांत दृश्य उलगडते. एका बाजूला खिंडसी सरोवराचे निळे पाणी, दुसऱ्या बाजूला विदर्भाचे सपाट पठार. ही केवळ भौतिक उंची नाही; ती एक मानसिक आणि आध्यात्मिक उंची आहे, जिथे इतिहास, पौराणिकता आणि काव्य एकत्र श्वास घेतात.

रामटेकमध्ये राम हे केवळ एक ऐतिहासिक किंवा पौराणिक पात्र नाहीत; ते एक स्मृती आहेत, एक टेक, एक संकल्प आणि त्या संकल्पाभोवती शतकानुशतके विविध राजवंश, विविध धर्मपरंपरा आणि विविध संस्कृती एकत्र विणल्या गेल्या. वाकाटक राण्यांचा उदारहस्त, कालिदासाची काव्यदृष्टी, भोसल्यांची निर्मितीशक्ती हे सारे या एका पर्वतावर एकत्र आले आणि रामगिरीला एक अद्वितीय कालगर्भ दिला.

अखेरीस, रामगिरीच्या शिखरावर उभे राहून जेव्हा आपण त्या शांत परिसराकडे पाहतो, तेव्हा जाणवते की, येथे काळ थांबत नाही; पण तो थरांमध्ये साचत जातो. प्रत्येक मंदिर, प्रत्येक शिलालेख आणि प्रत्येक पायरी ही त्या साचलेल्या काळाची साक्ष आहे. आणि त्या साक्षींच्या मधे उभे राहून, आपण एक गोष्ट हळूहळू समजून घेतो की, श्रद्धा ही केवळ भावनेत नसते; ती स्मृतीत, स्थापत्यात आणि इतिहासाच्या प्रत्येक स्तरात जिवंत असते.

- इंद्रनील बंकापुरे
7841934774