
हिंदू संस्कृतीचा सर्वोत्तम आणि कर्मयोगशास्त्राची देणगी देणारा अमौलिक ग्रंथ म्हणजे, ‘श्रीमद्भगवद्गीता’ आणि लोकमान्य टिळकांच्या बुद्धिमत्तेचा कळसाध्याय म्हणजे, याच ‘श्रीमद्भगवद्गीते’तील आध्यात्मिक ज्ञानावर आधारित व्यावहारिक नीतिशास्त्रांची उकल करणारा त्यांनी लिहिलेला अलौकिक, अद्भुत आणि अद्वितीय ग्रंथ अर्थात, ‘गीतारहस्य’ होय. या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी खोल तात्त्विक विचारांची मांडणी अगदी शुद्ध व सुबोध; पण तितकीच आकर्षक व गंभीर स्वरूपाची भाषाशैली वापरून केली आहे. या ग्रंथात त्यांनी ‘भगवद्गीता’ संपूर्ण नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्याची जाणीव होते. या कारणाने ग्रंथाने मोठी विचारक्रांती घडवून आणली. हे करत असताना त्यांनी ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाचा त्रिवेणी संगम साधला आहे आणि म्हणूनच, हा ग्रंथ एक युगप्रवर्तक ग्रंथ म्हणून नावारूपाला आला. उद्या दि. ३० मार्च रोजी ‘गीतारहस्य’ जयंती. त्यानिमित्ताने हे चिंतन...
श्रीमद्भगवद्गीते’चा अर्थ शंकराचार्यांनी संन्यासपर, ज्ञानेश्वरांनी भक्तिपर लावला, तर लोकमान्य टिळकांनी मात्र ‘गीतारहस्य’ या ग्रंथात ‘निष्काम कर्मयोगा’चे विवेचन केले आहे. माणसाला कर्म क्षणभरही चुकत नाही, हे रहस्य लोकमान्यांनी ग्रंथात यशस्वीरीत्या निदर्शनास आणले. ‘श्रीमद्भगवद्गीते’चे सार व त्यानुसार आचरण सामान्य जनांपर्यंत पोहोचावे, म्हणून १४व्या शतकात एका १६ वर्षांच्या कोवळ्या मुलाने ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाची निर्मिती केली. काही शतके लोटल्यावर म्हणजेच, १८व्या शतकाच्या उत्तरार्धात एका १६ वर्षांचाच मुलगा १८७२ साली त्यांचे वडील गंगाधरपंत मृत्युशय्येवर असतानाच, वडिलांच्या इच्छेखातर ‘भगवद्गीते’वर आधारित ‘भाषा-विवृत्ती’ या नावाच्या ‘प्राकृत टीका’ वाचून दाखवण्यास सुरुवात करतो. त्याच्या मूळ स्वभावानुसार ग्रंथकाराने काय लिहिले आहे, याकडे जास्त लक्ष न देता, स्वतंत्र विचाराने गीतेचे अंतिम तात्पर्य काय असेल, या कुतूहलाने आकर्षित होतो. हा कुमार म्हणजे विद्वानमान्य, विचारसिद्ध कर्मयोगी व तपस्वी अर्थात, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!
लोकमान्यांनी हा मरणमुख पित्याचा प्रसंग आपल्या ‘गीतारहस्य’ ग्रंथाच्या प्रस्तावनेत जाणीवपूर्वक आपल्या वाचकांसाठी मांडला आहे. ही गीतेच्या अंतिम तात्पर्याची जिज्ञासा त्यांनी १८७२ ते १९१० म्हणजे, तब्बल ३८ वर्षे जोपासली. वेळेअभावी आणि स्वातंत्र्यलढ्यातील अनंत व्यापामुळे त्यांना या विचारांना मूर्तरूप देता आले नाही. ३८ वर्षांत त्यांनी या विचारावर अनेक ग्रंथ वाचले, विचारमंथन चालू ठेवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते ‘भगवद्गीता’ जगले व त्या अनुभवावरून त्यांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथाची निर्मिती केली.
‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहिण्याअगोदर लोकमान्य टिळकांनी ‘भगवद्गीते’ची अनेक पारायणे केली. वेगवेगळ्या टीकाकारांच्या अनेक ‘टीका’ वाचताना त्यांना टीकाकारांनी दिलेली उत्तरे समाधानकारक वाटत नव्हती व इतर उपाय सुचत नसल्याने हीच उत्तरे बरोबर आहेत, असा त्यांचा समज होण्याचा संभव असल्याने त्यांनी सर्व ‘टीका’ व ‘भाष्ये’ बाजूला सारून गीतेचीच स्वतंत्र विचारपूर्वक मांडणी करत, गीता ‘निवृत्तिपर’ नसून ‘कर्मयोगपर’ आहे. किंबहुना, गीतेत जिथे-जिथे ‘योग’ म्हटले आहे, त्याचा अर्थ ‘कर्मयोग’ असल्याचा त्यांना बोध झाला. १९१०चा हिवाळा चालू झाल्यावर नेहमीच्या कार्यतत्पर सवयीनुसार त्यांनी बुधवार, दि. २ नोव्हेंबर १९१० (कार्तिक शुद्ध प्रतिपदा, शके १८३२) रोजी त्यांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिखाणास सुरुवात केली आणि अवघ्या पाच महिन्यांत म्हणजे गुरुवार, दि. ३० मार्च १९११ (फाल्गुन वद्य ३०, शके १८३२) रोजी नऊ वह्या लिहून पूर्ण केल्या. या संपूर्ण संशोधन आणि लेखनामुळे मंडालेच्या तुरुंगात त्यांना एक वेगळे तेज व विलक्षण वलय प्राप्त झाले होते. तुरुंगात त्यांनी जे संदर्भग्रंथ आपल्याभोवती जमविले होते, त्यावरून त्यांची विद्याविषयक अभिरुची दिसून येते.
मंडाले तुरुंगातील उष्म आणि दमट वातावरण, शरीर मधुमेहाने पोखरलेले, ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात बिनखेळत्या हवेच्या कोठडीत घामाच्या धारा वाहत असताना, अंगाची लाहीलाही होत असताना, मातृभूमीपासून दूर आणि पराकोटीची अन्यायकारक शिक्षा भोगत असताना लिखाण करणे काही सोपी गोष्ट नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतही लोकमान्य टिळकांनी हा अलौकिक ग्रंथ लिहिला. अर्जुनाला संभ्रम झाल्यावर ‘भगवद्गीता’ जन्माला आली, तर जनतेला संभ्रम झाल्यावर ‘गीतारहस्य’ ग्रंथ, असेच म्हणावे लागेल. योगायोगाने श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला आणि ‘गीतारहस्य’चा जन्मसुद्धा तुरुंगातच झाला.
लोकमान्यांचे पहिले दोन ग्रंथ (The orion आणि the artic home of vedas) त्यांनी लेखनिकाकडून लिहून घेतले, तर कैदेत असल्याकारणाने ‘गीतारहस्य’ ग्रंथ लेखकाकडून लिहून न घेता, त्यांनी स्वहस्ते लिहिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मूळ गीता ही ‘निवृत्तिपर’ नसून ‘कर्मयोगपर’ आहे. किंबहुना, गीतेमधील ‘योग’ हा एकेरी शब्द ‘कर्मयोग’ या अर्थाने योजिला आहे. हा ग्रंथ लिहीत असताना दिवसाला सरासरी साडेअकरा पाने लिहिण्याचा वेग त्यांनी ठेवला होता. या त्यांच्या लिहिण्याच्या वेगामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेचेच नव्हे, तर त्यांच्या कार्यक्षमतेचेसुद्धा कौतुक करावेसे वाटते. ग्रंथाच्या शेवटी- ‘समर्पये ग्रंथ मिमश्रीशीच जनतात्माने’ असे लिहून हा ग्रंथ जनताजनार्दनाला अर्पण करायला ते विसरले नाहीत. शंकराचार्यांनी मांडलेल्या गीतेतील अर्थाला लोकमान्य छेद देत आहेत, असे समजल्यावर लोकांनी त्यांना सावध केले. त्यावर टिळक म्हणाले, "आचार्यांची थोरवी मलाही मान्य आहे. पण, आपल्या पूर्वजांनी स्वतंत्र विचार करून स्वतंत्र शास्त्र निर्माण केले. ‘ग्रंथप्रामाण्या’ची जागा ‘बुद्धिप्रामाण्या’ने घ्यायला हवी.”
ग्रंथलेखन संपत आले असता, त्यांनी या पुस्तकाचा परिचय व्हावा म्हणून ‘केसरी-मराठा’च्या व्यवस्थापकांकडे पत्र पाठवले. ते प्रथम ‘मराठा’मध्ये प्रसिद्ध झाले व त्यावर आधारित कित्येक हिंदी पत्रकार भक्तांनी लेख लिहिले. लोकमान्य मंडालेच्या कारागृहातून सुटून परत आले (जून १९१४), तरी त्यांच्या ‘गीतारहस्या’च्या नऊ वह्या इंग्रजांनी जप्त केल्या होत्या. इंग्रजांना त्यात ‘राजद्रोह’ आहे, असे वाटत होते म्हणून त्यांनी ‘ओरिएंटल ट्रान्सलेटर’कडे या स्वहस्तलिखित वह्या तपासणीसाठी पाठवल्या. टिळकांच्या स्नेह्यांना या वह्या परत मिळतील की नाही, याबद्दल शंका होती. त्यावर टिळक म्हणाले, "गीतारहस्य ग्रंथ माझ्या डोक्यात आहे, सिंहगडावर जाऊन मी तो ग्रंथ परत कधीही लिहून काढू शकतो.” या प्रसंगावरून लोकमान्यांचे मन किती ‘गीता-रहस्यमय’ झाले होते ते लक्षात येते. ऑगस्ट १९१४ला या वह्या इंग्रजांनी परत केल्या. स्वहस्तलिखित वह्या परत मिळताच लोकमान्य तत्परतेने ग्रंथ छपाईच्या मागे लागले.
‘गीतारहस्य’ ग्रंथ छपाईस देण्यापूर्वी हस्तलिखिताची भाषेच्या व रचनेच्या दृष्टीने नीट तपासणी व्हावी, म्हणून हे काम त्यांनी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्यावर सोपवले. भाऊशास्त्री लेले यांनी स्वयंप्रेरणेने मुद्दाम पुण्यात येऊन हस्तलिखित वाचून त्यात कित्येक मार्मिक सूचना केल्या. ग्रंथांमधील उतार्यांसह संदर्भ तपासणीसाठी हरी रघुनाथ भागवत यांनी सिंहगडावर जाऊन टिळकांच्या सांगण्यावरून अतिशय काळजीने काम केले. छपाईच्या आधीची ही प्राथमिक कामे झाल्यावर टिळकांनी छपाईसाठी जी प्रत हवी, ती सुवाच्य हस्ताक्षरात पाच-सहा तरुणांकडून लिहून घेतली. ग्रंथाच्या प्रस्तावनेत तरुणांची नावे देण्याचे ते विसरले नाहीत. प्रस्तावना बरीच प्रदीर्घ असून, त्यात या तरुणांबरोबरच, रा. रा. वामन गोपाळ जोशी, नारायण कृष्ण गोगटे, रामकृष्ण दत्तात्रय पराडकर, रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर, अप्पाजी विष्णू कुलकर्णी, तसेच मार्मिक सूचना केल्याबद्दल रा. रा. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, वेदशास्त्रसंपन्न काशिनाथशास्त्री लेले यांचे आभार मानले आहेत.
१९१४-१८ साली उद्भवलेल्या पहिल्या महायुद्धामुळे छपाईच्या कागदांची उणीव न भासू दिल्याबद्दल मुंबईतील स्वदेशी कागदाच्या गिरणीचे मालक ’M/S डी. पदमजी अॅण्ड सन्स’, पुण्यातील ’रे पेपर मिल’चे मालक आणि चित्रशाळेचे मालक यांचेसुद्धा टिळकांनी प्रस्तावनेत आभार मानले आहेत. पुढे टिळकांनी जून १९१५ मध्ये ग्रंथात सुधारणा व छपाई करून आपली जिज्ञासा पूर्णत्वास नेली. ‘गीतारहस्य’ ग्रंथाच्या छपाईप्रसंगी पहिल्या आवृत्तीमध्ये पृष्ठसंख्या सांगायची; तर दीडपट ‘डेमी’ आकाराची म्हणजे, मोठ्या आकाराची ५७६ पृष्ठे असून, त्याच्या तब्बल सहा हजार प्रती विकल्या गेल्या. टिळकांनी पहिली प्रत पंढरपूरच्या विठोबाला, दुसरी प्रत कसबा गणपतीला आणि तिसरी प्रत गुरुवर्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धनांना अर्पण केली. ग्रंथाची किंमत कमीत-कमी ठेवायची म्हणजे, ती सामान्यांतील सामान्य माणसाला परवडेल, असे त्यांचे मत होते. त्यानुसार, टिळकांनी प्रत्येक प्रतीची किंमत तीन रुपये निश्चित केली. लोकमान्यांच्या हयातीत ‘गीतारहस्या’ची तीन पुनःमुद्रिते प्रकाशित झाली.
लोकमान्यांच्या शतपैलू व्यक्तिमत्त्व व अष्टपैलू कार्याची आणि कालातीत सामर्थ्याची प्रचिती देणारा हा ग्रंथनिर्मितीचा प्रवास होता. ‘कर्मयोगाचा सिद्धांत’ जसा ‘भगवद्गीते’चे मर्म आहे, तसाच तो ‘गीतारहस्य’ ग्रंथाचासुद्धा आहे. हा ग्रंथ लिहिताना लोकमान्य टिळकांनी बंदिवासात मिळालेल्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग केला. लोकमान्य टिळकांनी याच ‘भगवद्गीते’कडे संपूर्णपणे नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून बघून (‘कर्मयोग’ सिद्धांतावर आधारित) ‘गीतारहस्य’ ग्रंथाची निर्मिती केली आहे. हे करत असतानाच, त्यांनी ‘ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगा’चा त्रिवेणी संगम साधला आहे. अशा या महान विभूतीच्या हातून खडतर वातावरणात हा अद्वितीय ग्रंथ लिहून पूर्ण झाला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लोकमान्यांचे व ‘गीतारहस्य’चे वर्णन करताना असे म्हटले आहे की, "लोकमान्यांचे कार्य म्हणजे देवळातील गाभारा व सभा मंडप आणि ‘गीतारहस्य’ म्हणजे देवळाचा कळस.”
‘भगवद्गीता’ हा कर्मयोगाचा ग्रंथ लोकमान्य टिळकांच्या परम श्रद्धेचा होता आणि ‘गीतारहस्य’ हा अजरामर ग्रंथ लोकमान्यांच्या कार्यरूपी आयुष्याचा कळसाध्याय! त्यांनी ज्ञानार्जनाची आवड राष्ट्रकार्यासाठी दडपून टाकली. राष्ट्रमातेच्या चरणी त्यांनी केलेल्या विविध त्यागात हा त्याग सर्वोत्तम होता.
दरवर्षी दि. ३० मार्चला आपण ‘गीतारहस्य’ जयंती साजरी करतो. श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे अर्जुनाला ‘भगवद्गीता’ सांगून कर्तव्य करायला सज्ज केले, त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी रचलेला ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ आपल्याला आधुनिक युगात लढण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करेल, यात काही शंकाच नाही. कोणाला गीतेत नुसती ‘भक्ती’ दिसली, कोणाला ‘ज्ञानयोग’ आढळला, कोणाला ‘पतंजली योग’ आढळला, कोणाला ‘संन्यासमार्ग’ सापडला. पण, त्या रत्नाकरांतून ज्ञानमूलक व भक्तिप्रधान अशा ‘निष्काम कर्मयोगा’चा कोहिनूर काढला फक्त टिळकांनीच! ज्ञानोत्तरही मानवाने निष्काम बुद्धीनेच कर्म करावे, असे प्रबोध श्रीसमर्थांनंतर लोकमान्य टिळकांनीच उपदेशिला. १९व्या शतकात ‘निबंधमाला’, तसेच २०व्या शतकात ‘गीतारहस्य’ लोकांना कार्याची स्फूर्ती देणारे जिवंत झरे ठरले. भविष्यात गीतेच्या अभ्यासकांना ‘गीतारहस्य’ ग्रंथ दुर्लक्षून चालणार नाही, हेच ‘गीतारहस्य’ ग्रंथाचे सर्वात मोठे यश आहे.
‘गीतारहस्य’ ग्रंथ श्रेष्ठ आहेच; पण तो श्रेष्ठ असल्याचे मुख्य कारण म्हणजे, लोकमान्यांनी केवळ कर्मयोग सांगितला नाही; तर आपल्या जीवनात तो प्रत्यक्ष जगूनही दाखवला. मंडालेत असताना पत्नीचे निधन, त्याआधी मोठा मुलगा विश्वनाथ याचे निधन ही दुःखे त्यांनी शांतपणे पचवली. आघातामागून आघात होत असताना, त्यांची स्थितप्रज्ञ वृत्ती ढळली नाही. सिद्धावस्थेतील पुरुषानेही व्यवहार कसा करावा, याचे जे शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध विवेचन टिळकांनी ‘गीतारहस्या’त केलेले आहे, ते त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात प्रतिबिंबित झालेले आढळून येते. ‘गीतारहस्य’ ग्रंथाद्वारे त्यांनी स्वतःच्या जीवनकार्याचे तात्त्विक समर्थन करणारी मांडणी केली.
भारतकालीन श्रीकृष्णाप्रमाणे ‘गीतारहस्य’कालीन लोकमान्य स्थितप्रज्ञ होते. भारतीय तत्त्वज्ञानात उणीव तर नाहीच; पण ते सर्वांगसंपन्न असून, पाश्चिमात्यांच्या तत्त्वज्ञानाहूनही काही गुणांमुळे अधिक उजवे आहे, असे सिद्ध करून लोकमान्य टिळकांनी भारतीयांच्या सात्त्विक स्वाभिमानाला न्याय दिला. ‘गीतारहस्या’तही देशविषयक कर्तव्याची महती वर्णिली आहेच. लोकमान्य टिळकांनी स्वतःपुढे आयुष्याचा जो आदर्श ठेवला होता, तोच भावी पिढ्यांपुढे ‘रहस्या’च्या रूपाने ठेवला आहे.
- शैलेंद्र रिसबूड