
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलच्या युद्धाला एक महिना लोटल्यानंतरही हा जीवघेणा संघर्ष थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मात्र, या संघर्षामुळे युद्धग्रस्त देशांमधून स्वतंत्र होण्याची वर्षानुवर्षे मागणी करणार्या काही देशांच्या आशा पल्लवित झालेल्या दिसतात. कुर्दिस्तानही त्यापैकीच एक. हाच धोका ओळखून इराणने कुर्दबहुल भागांतील नेत्यांच्या अटकेची मालिका आरंभली, तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकअंतर्गत असलेल्या कुर्दिस्तानच्या प्रमुखांना नवरोजच्या नुकत्याच शुभेच्छा दिल्या. त्या पार्श्वभूमीवर, इराणला शक्तिहीन करण्यासाठी कुर्दिस्तान, खुजेस्तान या स्वतंत्र राष्ट्रांच्या चळवळींना अमेरिकेकडून बळ दिले जाऊ शकते का, त्याचा ऊहापोह करणारा हा लेख...
दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी एकेकाळी अनेक देशांच्या सीमारेषा आखल्या होत्या. नवीन देशांची निर्मितीही केली. भविष्यातील सामरिक धोरणांना मदत होऊ शकेल आणि नवीन उद्भवू शकणार्या संघर्षांना समोर ठेवून, या देशांची निर्मिती करण्यात आली होती. आता इराण या युद्धामध्ये कमजोर आणि नेतृत्वहीन झालेला दिसत असताना, अनेक अल्पसंख्याक वांशिक लोकसंख्या असलेल्यांची स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळण्याची इच्छादेखील बळावली, तर त्यांना दोष देता येणार नाही.
यामध्ये प्रामुख्याने ज्या वंशाच्या लोकांचे नाव समोर येते, ते म्हणजे ‘कुर्द’, कुर्द या वंशाचे लोक आखातातील इराण, तुर्कीये, सीरिया, इराक या चार देशांमध्ये विखुरले गेले आहेत. कुर्द वंशाचे लोक लढाऊ समजले जातात. अमेरिकेने ‘इसिस’च्या विरोधात सीरियामधील कुर्द वंशाच्या लोकांना हत्यारे देऊन त्यांचा ‘इसिस’च्या विरोधात पुरेपूर वापर करून घेतला होता. पुढे तुर्कीयेच्या एर्दोगान यांनी कुर्द लोकांवर आक्रमण करून त्यांचा संहार करण्याची सुरुवात केली, तेव्हा अमेरिका कुर्द लोकांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली नाही.
वर उल्लेखलेल्या चारही देशांमध्ये रहिवासी असणारे कुर्द वंशाचे लोक एकत्र येऊन फक्त कुर्द लोकांसाठी स्वतंत्र ‘कुर्दिस्तान’ची मागणी करू शकतील. या सर्व चार देशांमध्ये मिळून एकत्र सुमारे ३० लाख कुर्द लोक पसरले आहेत. इराणच्या एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के, इराकच्या लोकसंख्येच्या १५ टक्के आणि तुर्कीयेच्या लोकसंख्येच्या १५ ते २० टक्के कुर्दांची लोकसंख्या आहे. इराकमध्ये सद्दाम हुसेनने तो जिवंत असेपर्यंत तेथील स्थानिक कुर्दांना आवाज उठवू दिला नव्हता. तीच गोष्ट सीरियातील बशर अल असद, तुर्कीये व इराणचीही. त्यासाठी अमेरिका कुर्दांना आवश्यक असा शस्त्रास्त्रपुरवठाही करत होती. या शस्त्रास्त्रपुरवठ्याला तुर्कीयेने वेळोवेळी कडाडून विरोध केला होता.
अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्षात आखातातील सर्व देश होरपळत असताना, ‘कुर्दिस्तान’च्या मागणीने जोर पकडला; तर स्वतंत्र ‘कुर्दिस्तान’चा मुद्दा पुन्हा चर्चेत येऊ शकतो. अमेरिका, इस्रायल, युरोपियन महासंघ यांचा या मागणीला सक्रिय पाठिंबा मिळाला; तर ‘कुर्दिस्तान’च्या मागणीला अधिक जोर मिळू शकतो. इराक, सीरियामध्ये ‘ड्रूझ’, ‘याझिदी’ यांसारखे इतर वंशाचेही लोक राहतात. पण, कुर्द लोकांची जनसंख्या लक्षणीय आहे. परंतु, वर उल्लेखलेल्या चारही राष्ट्रांशी संघर्ष करत ही स्वतंत्र राष्ट्र बनविण्याची वाटचाल खडतरच नाही; तर अशक्यच होती. या चारही देशातील कुर्द लोकांच्या ताब्यात असलेले भूभाग आणि त्यातही विशेषतः इराकमधील भूभाग तेलाच्या साठ्यांनी समृद्ध भूभाग आहेत.
इस्रायलचे माजी पंतप्रधान नेफताली बेनेट यांनी मागेच इराणनंतर तुर्कीये इस्रायलच्या निशाण्यावर असेल, असे जाहीर केले होते. तुर्कीये आणि इराणमध्ये कुर्द वंशाच्या लोकांची संख्या बरीच मोठी आहे, याची येथे नोंद घेणे आवश्यक. सध्याच्या युद्धकाळात अस्थिर वातावरणात ‘कुर्दिस्तान’ची मागणी पुढे येऊ शकते. कारण, अमेरिकेला इराणचे तुकडे करायचे आहेतच. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याची वाच्यता केलेली आहे. आता तर बशर अल असद यांची सीरियातील इराणसमर्थक राजवट कोसळलेली आहे आणि तेथे सध्या अमेरिकेला आणि इस्रायलला अनुकूल अशी राजवट आलेली आहे. सीरियाचे येत्या काळात किती तुकडे पडतात, हे बघावे लागेल. त्यामुळे कुर्द लोकांना अमेरिकेचा, तसेच इस्रायलचा पाठिंबा मिळू शकतो. अर्थात, या जर-तरच्या गोष्टी असल्या; तरी भविष्यात काय दडले आहे हे कोणी सांगू शकत नाही, हेच खरे.
वरील चारही देशांत तेथील ‘कुर्दिश’ वंशाच्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे स्वतंत्र ‘कुर्दिस्तान’ बनवायचा; तर या चारही देशांतील थोडाथोडा भूभाग बाजूला काढावयास लागेल, ज्याला साहजिकच या देशांचा कडाडून विरोध असेल. या स्वतंत्र ‘कुर्दिस्तान’च्या मागणीमुळे इराक व अन्य ठिकाणी परत स्थानिक नागरी संघर्ष पेटेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. इराणने तर या मुद्द्यावर त्यांच्या देशाच्या इराकला भिडलेल्या सीमा एकेकाळी बंद करावयाच्या धमक्या दिल्या होत्या. कुर्द लोकांच्या या स्वातंत्र्याच्या मागणीला अमेरिकेने विरोध दर्शविला नव्हता, ही गोष्ट विशेष नोंद घेण्याजोगी होती.
‘अरबील’ हा इराकमधील कुर्दबहुल भूभाग. तेथे कुर्द लोकांचे दोन राजकीय पक्ष आहेत. ‘कुर्दिस्तान डेमोक्रेटिक पक्ष’ व ‘पेट्रिओटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान.’ इराकी अधिकार्यांबरोबर कुर्द लोकांच्या अनेक बैठका यापूर्वीच्या काळात होत होत्या. इराकी सरकारचा विरोध असतानाही, यापूर्वी कुर्द लोकांनी अरबीलमध्ये सार्वमत घेतले होते. अरबीलमध्ये तेलाच्या विहिरीही कुर्द लोकांच्या प्रभावाखाली होत्या. त्यांनी या विहिरींमधील तेल इराक सरकारला विकून महसूल गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. पण, इराकी सरकारने कुर्द लोकांच्या प्रभावाखाली तेल विहिरी नंतर स्वतःच्या ताब्यात घेतल्या होत्या.
इराकचे विद्यमान सरकार तेथील सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यात अपयशी ठरले असून, आम्ही इराकचे शेजारील राष्ट्र म्हणून ‘कुर्दिस्तान’चे अस्तित्व निर्माण करू, अशी कुर्दांची भूमिका आहे. गेल्या १०० वर्षांत मध्य-पूर्व राष्ट्रांमध्ये कुर्दांची स्वतंत्र वांशिक ओळखच पुसली जात आहे. त्यामुळे ‘आता नाही तर कधी?’ अशी कुर्दांची अनेक वर्षांची भूमिका आहे. कुर्द लोक सध्याच्या काळात ‘कुर्दिस्तान’ बनविण्यात किती यशस्वी होतात, याकडे आखातातील अनेकांचे लक्ष लागले आहे.
पाच वर्षांपूर्वी फ्रान्सने या क्षेत्रातील युद्धात आणि शांतता चर्चेत कुर्दांना फ्रान्स साहाय्य करेल, असे आश्वासन फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले होते. सुमारे तीन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यापूर्वी कुर्दांना पाठिंबा दर्शविला होता. इराणमधील युद्ध जसजसे अंतिम टप्प्यात येईल, तत्पूर्वी ‘स्वतंत्र कुर्दिस्तान’ची चळवळ सुरू होऊ शकते. गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायलने कुर्दांच्या स्वतंत्र कुर्दिस्तानला पाठिंबा दर्शविला आहे. ज्यूवंशीय आणि कुर्द वंशाचे लोक यांच्यामध्ये सख्य असल्याने ‘कुर्दिस्तान’च्या मागणीला जोर येऊ शकतो. सौदी अरब आणि रशियाचाही या कुर्द लोकांना पाठिंबा मिळू शकतो, असेही सांगितले जाते.
कुर्द वंशाच्या नागरिकांची सर्वाधिक लोकसंख्या इराक, इराण आणि तुर्कीयेमध्ये आहे, हे वास्तव आहे. याबरोबरच पाकिस्तान आणि इराणच्या सीमारेषेवर राहणारे बलुची लोक स्वतंत्र ‘बलुचिस्तान’च्या, तर पश्तुनी लोक ‘पश्तुनिस्तान’च्या निर्मितीसाठी प्रयत्न करताना दिसू शकतात. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सिंधी लोकांनाही ‘स्वतंत्र सिंध’ देशाचे वेध लागले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे उर्वरित पाकिस्तान हा फक्त ‘उरलो पंजाबी पाकिस्तानपुरता’ या स्थितीला जाऊ शकेल.
इराक, इराण आणि कुवेतच्या सीमेवर ‘खुजेस्तान’ची निर्मिती होण्याची शक्यता आहे. अर्थात, हे सर्व एकदम घडू शकेल अशी शक्यता नाही. पण, या गोष्टींना वेग येऊ शकतो. इराणमध्ये शाह रझा पहलवी परत येऊ शकतील का, हेही येणारा काळच ठरवेल. पाकिस्तानात राहणार्या ज्या शियाधर्मीय नागरिकांना इराणबद्दल उमाळे फुटत असतील, त्यांनी ताबडतोब इराणमध्ये निघून जावे, असा आदेशच पाकिस्तानचे सध्याचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी काढला असल्याचे सांगतात. त्यामुळे पाकिस्तानात राहणार्या शिया धर्मियांची पंचाईत झाली असल्याचे सांगतात.
गेली पाच दशके अमेरिका आणि ब्रिटिश राजसत्तेच्या टेकूवर उभ्या असलेल्या अनेक अरबी सत्ता, ज्यामध्ये संयुक्त अरब अमिराती, सौदी अरब, ओमान, कतार, बहारीन येतात, त्या सर्वांना अमेरिका आखातातून अंग काढून घेत असल्याचे लक्षात आल्याने त्या गोंधळल्या आहेत. अमेरिका आपले आखातातील तळ पुन्हा बांधू इच्छित नाही, हे लक्षात आल्यानंतर या अरबी सत्ताधार्यांमध्ये सत्तासंघर्ष उद्भवू शकतो. आपल्या सत्तेच्या इच्छा दाबून ठेवणार्यांच्या इच्छा-आकांक्षांना पुन्हा पंख फुटताना दिसू शकतात.
- सनत्कुमार कोल्हटकर