साठये करिअर कॉन्क्लेव्ह 2026चे विले पार्ले येथे उद्घाटन

    28-Mar-2026
Total Views |

मुंबई : (Career Conclave 2026) साठये महाविद्यालय, विले पार्ले येथे आयोजित साठये करिअर कॉन्क्लेव्ह 2026 चे आज सकाळी 10.00 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात योग्य दिशा मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला.

या कॉन्क्लेव्हचे उद्घाटन पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन (पीटीव्हीए) चे खजिनदार बंसीधर धुरंधर आणि साठये महाविद्यांयालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी , साठये महाविद्यालयाचे तसेच पीटीव्हीएच्या जनसंपर्क अधिकारी जाह्नवी खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. गजेन्द्र देवडा यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कॉन्क्लेव्हचे उद्दिष्ट, महत्त्व आणि आजच्या बदलत्या करिअर विश्वात मार्गदर्शनाची गरज यावर प्रकाश टाकला. यावेळी ठाणे,मुंबई आणि नवी मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते, यावरून या उपक्रमाचे महत्त्व आणि आकर्षण अधोरेखित झाले.

उद्घाटनपर भाषणात धुरंधर यांनी शिक्षण आणि उद्योग यांमधील दरी कमी करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. प्राचार्य डॉ. राजवाडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाची बांधिलकी व्यक्त केली, तर खांडेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांसाठी तो अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. या कॉन्क्लेव्हमध्ये विविध कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि करिअर तज्ज्ञ सहभागी झाले असून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास कार्यशाळा, आंतरवासिता व नोकरीच्या संधी तसेच थेट संवादाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कार्यक्रमाचा समारोप प्रा. सुभाष बन्सोडे यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक आणि सहभागी यांचे मनःपूर्वक आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुरज पंडित, प्रा. अनुराधा नामजोशी आणि डॉ. स्वरूपा साळवी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी या कॉन्क्लेव्हच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले. मुंबईतील विविध भागातील विद्यार्थ्यांच्या सहभागासह हा कॉन्क्लेव्ह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, करिअर जागरूकता आणि व्यावसायिक तयारीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.