सारसबाग गणपती परिसरात ईदनिमित्त जमावाकडून नमाज पठण?

भाविकांना घ्यावे लागले पोलीस बंदोबस्तात बाप्पाचे दर्शन; उद्भवलेल्या परिस्थिती विरोधात नागरिकांकडून आक्षेप

    28-Mar-2026   
Total Views |
Pune Sarasbaug
 
पुणे : (Pune Sarasbaug) पुण्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या सारसबाग गणपती मंदिर परिसरात चैत्र शुद्ध विनायक चतुर्थीच्या सायंकाळी मुस्लिम समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने सहकुटुंब जमल्याची घटना घडली. ईदचा दुसरा दिवस असल्याने काही कुटुंबांनी सार्वजनिक बागेच्या आवारात एकत्र येऊन भोजन केले, तर काहींनी नमाज पठण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर काही हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी अशा प्रकारची गर्दी झाल्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत केली; मात्र पोलीस बंदोबस्तात भाविकांना गणपतीचे दर्शन घ्यावे लागले.
 
या घटनेनंतर शहरात विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली असून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या मंदिर परिसरात अशा प्रकारच्या एकत्रित कार्यक्रमास परवानगी कोणत्या निकषांवर देण्यात आली, याबाबत महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडे स्पष्टीकरणाची मागणी होत आहे. तसेच, अशा कार्यक्रमांसाठी पर्यायी सार्वजनिक जागा किंवा संबंधित समाजाच्या धार्मिक स्थळांजवळ व्यवस्था का करण्यात आली नाही, याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. काही सामाजिक संघटनांनी यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
 
हेही वाचा : Aviation Rules: अजित दादांच्या विमान दुर्घटनेनंतर VVIP विमानप्रवासासाठी नवे कडक नियम; आता पायलटचा निर्णय...
 
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही ही बाब महत्त्वाची मानली जात असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना इतर धार्मिक स्थळांच्या परिसरात घडल्यास प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक