मुंबई : (Devendra Fadnavis) राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथिगृह येथे '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा' कार्यक्रमांतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालये व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माहिती तंत्रज्ञान तथा संस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह सर्व मंत्रालय विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "माहिती तंत्रज्ञान विभागाने 'एक राज्य, एक पोर्टल' ही संकल्पना राबवावी. शासनाच्या अनेक वेगवेगळ्या संकेतस्थळांमुळे नागरिकांचा होणारा संभ्रम टाळण्यासाठी सर्व सेवांचे एकत्रीकरण असलेले एकच पोर्टल माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने तयार करावे. सर्व शासकीय सुविधा नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने प्राधान्याने काम करावे. महा आयडी प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांसाठी एक विशिष्ट 'महाआयडी' तयार करण्यात येईल. ज्यामुळे केवळ एका आयडीच्या आधारावर सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. यासोबतच अनेक विभागांचे कामकाज हे बहुतेक प्रमाणात ई- ऑफीस झाले असून ते 'लो पेपर' वरून 'नो पेपर'वर नेण्यासाठी मुख्य सचिवांनी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा," अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केलेल्या 'महासारथी' या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, "हे संकेतस्थळ म्हणजे आपली डेटा बँक आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्व शासकीय डेटा एकत्रित करण्यात आला असून त्याद्वारे एकमेकांशी संवाद साधता येईल. तसेच नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी महाराष्ट्र इंटिग्रेटेड डेटा एक्सचेंज तयार करत असून ज्यामुळे डाटा ड्रिव्हन निर्णय प्रक्रिया राबविता येणे शक्य होणार आहे."
पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण
प्रशासकीय कामगिरीत गेल्या १५०-२०० दिवसांत ४२ विभागांचा आढावा घेऊन या काळात साधारण ४० हजार पदांवर अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामात गतिमानता आली आहे. तसेच iGOT प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्सच्या कालावधीतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असल्याने सर्व शासकीय विभागाचे आणि सहभागी कर्मचाऱ्यांचे आणि सेवाकर्मीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....