‘चंदा’ की, कट्टरतेचा धंदा?

    28-Mar-2026   
Total Views |


युद्धग्रस्त इराणला मदत करण्याच्या नावाखाली जम्मू-काश्मीरमध्ये कोट्यवधी रुपये जमा केले गेले. ही गोष्ट वरकरणी मानवी संवेदनशीलतेची वाटू शकते. पण, जेव्हा या पैशांच्या प्रवाहाभोवती संशयाचे ढग दाटू लागतात, तेव्हा प्रश्न फक्त दानापुरता मर्यादित राहत नाही; तर तो थेट राष्ट्रीय सुरक्षेच्या केंद्रस्थानी येतो. काश्मीरमधून इराणच्या मदतीसाठी थोडेथोडके नव्हे तर सुमारे 17.91 कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात मोठा हिस्सा स्थानिक स्तरावरून रोख स्वरूपात गोळा केल्याचा संशय आहे. इथेच धोक्याची घंटा वाजते. कारण, अधिकृत मार्गाने जाणारा पैसा आणि गल्लोगल्ली, कोणत्याही पारदर्शक यंत्रणेशिवाय गोळा होणारा पैसा, या दोघांमध्ये जमीन-आसमानाचा फरक असतो. या प्रक्रियेत काही संशयित नेटवर्क सक्रिय असू शकतात, अशी शंका निश्चितच उद्भवू शकते. अशाप्रकारच्या ‌‘क्राऊडफंडिंग‌’मध्ये सर्वात मोठा धोका असतो, तो पारदर्शकतेचा अभाव. लोकांची भावना खरी असते; पण त्या भावनेचा गैरफायदा घेणारे हात नेहमीच सावलीत लपलेले असतात. इतिहास साक्षी आहे की, याच मार्गाने काहीवेळा निधी चुकीच्या दिशेने वळवला गेला आहे. जर हा पैसा खरोखरच गरजूंना पोहोचत नसेल आणि तो स्थानिक पातळीवर अस्थिरता, कट्टरता किंवा बेकायदेशीर कारवायांसाठी वापरला जात असेल, तर ही केवळ आर्थिक फसवणूक नाही; तर सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षेवर थेट घाव आहे.

या संपूर्ण चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा हरवू नये, तो म्हणजे स्थानिक समाजाचे भवितव्य. जे कोट्यवधी रुपये बाहेरच्या कारणांसाठी गोळा होत आहेत, तेच जर काश्मीरमधील शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मुलांच्या भवितव्यासाठी वापरले गेले असते, तर चित्र किती वेगळे असते? अशी मदत तेथील पूरस्थितीनंतर किंवा भारताच्या कोणा एका कोपऱ्यातील आपत्तीसाठी काश्मीरमधून आजवर किती प्रमाणात आली? मदत करणे चुकीचे नाही.; पण ती योग्य मार्गाने, पारदर्शकतेने आणि जबाबदारीने झाली पाहिजे, अन्यथा ‌‘मानवतेच्या‌’ नावाखाली नकळतपणे आपणच अस्थिरतेला खतपाणी घालत आहोत, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. भावना महत्त्वाच्या; पण त्या विवेकाच्या चौकटीत राहिल्या, तरच समाजाला बळ देतात, अन्यथा त्या सहजपणे कोणाच्या तरी अजेंड्याचे साधन बनतात, हेच यातून दिसून येते.



‘बॉलीवूड’चा बुरखा फाटला!


बॉलीवूडने अनेक दशके अंडरवर्ल्डला चित्रपटांतून ‘स्टाईल’ आणि ‘ग्लॅमर’ नावाचा तडका दिला. दाऊद इब्राहिम हे नाव केवळ गुन्हेगारीसाठी नव्हे, तर रुबाब, सूट-बूट, काळा चष्मा आणि ‘पॉवर’ यांचे प्रतीक म्हणून प्रेक्षकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न झाला. पडद्यावरचा दाऊद जितका निर्दयी, तितकाच करिश्माई अशी प्रतिमानिर्मिती आजवर करण्यात आली. पण, आता ‘धुरंधर २’ने अंडरवर्ल्डचा हा जादूई बुरखा टराटरा फाडला आहे!
साधारण १९९०च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा थेट बॉलीवूडच्या सेटवर पोहोचला. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार कोणीही या छायेतून सुटले नव्हते. काळ्या पैशाच्या ओघाने काही चित्रपट उभे राहिले, तर काही करिअर्स मोडून पडली.

याच पार्श्वभूमीवर ‘डी-कंपनी’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’ आणि ‘डी-डे’ यांसारख्या चित्रपटांनी दाऊद-प्रेरित पात्रांना मोठेपणा दिला. राम गोपाल वर्मा यांच्या सिनेमातला दाऊद थंड डोकयाचा, रणनीतीत पारंगत आणि सर्वांवर नियंत्रण ठेवणारा वगैरे दिसतो, तर ‘डी-डे’मध्ये ऋषी कपूर यांनी साकारलेला दाऊद क्रूर असला, तरी ‘स्टायलिश’ होता. गुन्हेगारीला इथे एक सिनेमॅटिक आकर्षण मिळाले, जे वास्तवाच्या क्रौर्याला झाकून टाकत होते. मात्र, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर-द रिवेंज’ या प्रवाहाला सरळ धडक देणारा ठरला. चित्रपटातले ‘बडे साहब’ हे पात्र ना रुबाबदार आहे, ना सर्वशक्तिमान. तो अंथरुणाला खिळलेला आजारी, एकाकी आणि परिस्थितीने गुदमरलेला आहे. ज्या व्यक्तीला एकेकाळी पडद्यावर ‘हिरो’ म्हणून दाखवले गेले, तोच ‘धुरंधर’मध्ये कमकुवत, असाहाय्य दिसतो. हा बदल केवळ कथानकाचा नाही; तो चित्रपटाच्या नैतिकतेचाही प्रश्न आहे. अनेक वर्षे बॉलीवूडने गुन्हेगारांना ‘ग्लॅमर’ दिले, त्यांच्या आयुष्याला ’हीरोइझम’ची किनार दिली; पण वास्तव वेगळेच होते. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटासारख्या भीषण घटनांनी देश हादरला, शेकडो निष्पाप जीव गेले. त्या रक्तरंजित इतिहासाच्या पार्श्वभूमीवर ‘स्टायलिश डॉन’ ही प्रतिमा किती विसंगत होती, याची जाणीव ‘धुरंधर २’ करुन देतो.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक