हास्यकल्लोळातलं वास्तव - ‘एकदा पाहावं करून’

    28-Mar-2026
Total Views |

मराठी रंगभूमीवर वेगळा ठसा उमटवणारे प्रसिद्ध लेखक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांचे नाटक म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच. त्यांच्या ‘एकदा पाहावं करून’ या हलक्याफुलक्या विनोदी नाटकाने तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे, यावेळीही दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरे यांनीच सांभाळली आहे, ज्यांनी याच नाटकाला पूर्वीही रंगमंचावर साकारलं होतं. त्यामुळे जुन्या आठवणी आणि नव्या सादरीकरणाचा सुंदर मिलाफ या नाटकात पाहायला मिळतो.

हलकेफुलके विनोद, चपखल संवाद आणि सहज अभिनयामुळे हे नाटक आजही प्रेक्षकांना तितकंच भावतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हसवणारा हा प्रयोग नाट्यगृहात अक्षरशः हास्यकल्लोळ निर्माण करतो. मग नेमकं हे नाटक कसं उलगडतं? ‘एकदा पाहावं करून’ची एका ताज्या, नव्या दृष्टिकोनातून सादर केलेली ही समीक्षा.
नाटकाच्या शुभारंभापासूनच या नाटकाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, पुणे आणि मुंबई येथे प्रयोग अक्षरशः हाऊसफुल ठरत आहेत. कमी कालावधीत ५० प्रयोग पूर्ण करणं, हेच या नाटकाच्या लोकप्रियतेचं जिवंत उदाहरण आहे. नातेसंबंधांमधील कधी गोड, तर कधी टोचणार्‍या वास्तवाला हलक्याफुलक्या विनोदांची जोड देत ही कलाकृती प्रेक्षकांसमोर उलगडते.

कथेच्या मध्यभागी आहेत दोन परस्परविरोधी पुरुष आणि त्यांचे विचार, स्वभाव आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे अगदी भिन्न. ९०च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर रंगणारी ही कथा दोन मध्यमवयीन व्यक्तींभोवती फिरते. एकीकडे आहे बेधडक, बिनधास्त आणि काळ्या पैशातून संपत्ती कमावणारा कानडी बाप्पाजी धारसोड (वैभव मांगले); तर दुसरीकडे आहे भित्रा; पण स्वतःला नैतिकतेचा कट्टररक्षक समजणारा वकील बबनराव बाकरे (आनंद इंगळे). मात्र, खरी मजा तेव्हा सुरू होते, जेव्हा परिस्थिती त्यांना एकमेकांचे व्याही बनण्यास भाग पाडते! कारण, बबनरावची मुलगी सायली आणि बाप्पाजीचा मुलगा बकुळ एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्नाचा ठाम निर्णय घेतात. या प्रेमकथेभोवती गुंफलेल्या प्रसंगांतून हास्याचे फवारे उडतात. गमतीदार भेटी, अनपेक्षित वळणं आणि रंगतदार संवादांनी नाटक रंगत जातं. पण, केवळ विनोदापुरती मर्यादित न राहता, ही कथा शेवटी एक धारदार वास्तव समोर आणते. ‘सभ्यपणा’ हा नेहमीच नैतिकतेतून जन्म घेत नाही, तर अनेकदा तो केवळ संधीच्या अभावातून निर्माण होतो, हा विचार नाटक अत्यंत प्रभावीपणे मांडतं. हसत-खेळत पुढे जाणार्‍या या प्रवासात, प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच अंतर्मुखही केलं जातं. हीच गंमत आणि पुढील सगळा नाट्यमसाला तुम्हाला नाट्यगृहात अनुभवता येईल.

प्रसिद्ध नाट्य-दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या रंगतदार दिग्दर्शनाने या नाटकात रंग भरले आहेत. तीन अंकी असलेलं हे नाटक क्षणभरही कंटाळवाणा वाटत नाही. उलट, प्रारंभीपासूनच विनोदाचे फवारे उडवत प्रेक्षकांना हे नाटक खिळवून ठेवतं. आनंद इंगळे आणि वैभव मांगले यांचं अचूक विनोदी टायमिंग ही या नाटकाची मोठी ताकद ठरते. त्यांच्या सहज अभिनयाला उत्तम संवादांची जोड मिळाल्यामुळे प्रत्येक प्रसंग अधिकच खुलतो. त्यांना भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख आणि नेहा कुलकर्णी यांनी प्रभावी साथ दिली आहे. क्षणात बदलणारं नेपथ्य नाटकाच्या गतीला अधिक उठावदार बनवतं. या नाटकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे, अनुभवी आणि तरुण कलाकारांचा सुंदर संगम. मुख्य कलाकारांसह गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील यांसह संपूर्ण टीम आपल्या दमदार सादरीकरणातून प्रेक्षकांचं मनापासून मनोरंजन करते.
नाटकाचा गाभा विनोदी असला, तरी काही ठिकाणी संवादांची पुनरावृत्ती जाणवते आणि काही प्रसंग किंचित ताणलेले वाटतात, हेही प्रामाणिकपणे नमूद करावेच लागेल. मात्र, हीच लहानशी उणीव नाटकाच्या एकंदर प्रभावावर फारशी छाया टाकत नाही. कारण, मधूनमधून येणारं संगीत, हलकंफुलकं नृत्य आणि प्रसंगांची रंगतदार मांडणी प्रेक्षकांची लय अजिबात ढळू देत नाही. उलट, प्रत्येक टप्प्यावर नव्या ऊर्जेने नाटक पुढं सरकत राहतं.

वेशभूषेच्या बाबतीत नाटकाने विशेष उठावदार छाप सोडली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वभाव, तिची पार्श्वभूमी आणि त्या काळाचा (९०च्या दशकाचा) साज अचूक टिपणारी वेशभूषा रंगमंचावर जिवंत भासते. मंगल केंकरे यांनी ही जबाबदारी अत्यंत बारकाईने पार पाडत, नाटकाच्या दृश्यात्मक सौंदर्यात भर घातली आहे. एकंदरीत, ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक केवळ हसवण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर प्रेक्षकांना हलकं वाटण्याचा, ताण विसरण्याचा आणि थोडं हसत जगण्याचा एक सुंदर अनुभव देतं. आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनात हा प्रयोग म्हणजे एक सुखद विरंगुळा ठरतो. जसं की, नाटकाचं नाव जसं सांगतं, तसं ते खरोखरच एकदा पाहावं असंच आहे.

दिग्दर्शक :
विजय केंकरे

निर्मिती :
भूमिका, प्रवेश क्रिएशन्स, अस्मय थिएटर्स

कलाकार : आनंद इंगळे, वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील

नेपथ्य : राजन भिसे

रेटिंग : ३ स्टार


- अपर्णा कड