अशोक खरात या महाराष्ट्रातील भोंदूबाबाचे बनवेगिरीचे किस्से ऐकताना संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगाच्या ओळी आठवतात -
ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करोनि म्हणती साधु॥
अंगा लावुनिया राख| डोळे झाकुनी करिती पाप॥
दावुनिया वैराग्याची कळा| भोगी विषयांचा सोहळा॥
तुका म्हणे सांगो किती| जळो तयांची संगती॥
स्वतःला देवच समजणारा भोंदूबाबा खरात किती बनेल होता, याचे आता रोज नवनवीन किस्से समोर येत आहेत. लैंगिक अत्याचाराचे आठ गुन्हे केल्याने अशोक खरातच्या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. या प्रकरणातील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या अवघ्या राज्याला अचंबित आणि आत्मचिंतन करायलाही लावणार्या आहेत. कारण, भोंदूबाबा आणि भोंदूगिरी याला कायमचे हद्दपार करण्याचे पाऊल उचलण्याची गरज आता तीव्रपणे निर्माण झाली आहे. खरात किती बनेल होता, याचे पहिलेच उदाहरण म्हणजे खरात मर्चंट नेव्हीत कॅप्टन नसून जहाजावर चक्क सफाई कामगार होता, अशी माहिती आता समोर येत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी किती खालची पातळी गाठून लोकभावनेचा खेळ करतात, त्याचे खरात हे जिवंत उदाहरण.
एखाद्यावर लोक पूर्ण आंधळेपणाने विश्वास ठेवतात आणि हा भोंदूबाबा याचाच गैरफायदा घेतो. यात त्याने अनेकांकडून पैसे उकळल्याचेही समोर आले. एक किलो मधाची बाटली तो नऊ लाख रुपयांना विकायचा. मुळात एवढ्या मोठ्या किमतीला लोक त्या गोष्टी विकत घ्यायचे, ही पण आश्चर्याची गोष्ट. सगळ्यात मोठी धक्कादायक बाब म्हणजे, हरणाची कस्तुरी अशीच अव्वाच्या सव्वा किमतीला अनेकांना दिली होती. पण, प्रश्न हा आहे की, ती जर खरोखरंच हरणाची कस्तुरी होती, तर त्याने कुठे आणि कशी मिळवली? त्याचसोबत सिन्नरच्या मिरगावात त्याने बांधलेल्या मंदिरात अघोरी प्रकारासाठी वन्यप्राण्यांची हत्या करून त्यांच्या अवयवांचा वापर केल्याचा संशयदेखील व्यक्त केला जात आहे. एकूणच, अजून काय-काय खुलासे होतात आणि त्यातून काय अघोरी कृत्ये समोर येतात, ते कळेलच. पण, संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या अभंगाप्रमाणे सामान्य लोक जागृत राहिले, तर असे भोंदूबाबा भविष्यात पुन्हा निर्माण होणार नाहीत.
स्त्रीशक्तीचे हित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २५ मार्च रोजी ‘भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक, २०२६’ विधानसभेत सादर केले. यात ‘शक्ती’ कायद्यातील दोन तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे डिजिटल माध्यमांवर केलेली स्त्रियांची बदनामी हा लैंगिक गुन्हा ठरणार आहे. यामुळे स्त्रियांना अजून मोठे संरक्षण मिळणार असून, स्त्रियांवर होणारे अनुचित प्रकार नक्कीच कमी होतील. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म हा जसा सोयीचा आहे, तसाच अशा घटनेत खूप चुकीचा आणि मानसिक त्रासाचा बनला आहे. त्यामुळे या विधेयकास वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. एखाद्या मुलीचे फोटो, व्हिडिओ काढून तिला धमकी देणे आणि त्याचा गैरफायदा घेणे, असे प्रकार यामुळे थांबतील. मध्यंतरी अजय देवगण याचा या घटनेबाबत एक चित्रपट आला होता, ज्यात एक तरुण एका तरुणीचे व्हिडिओ चित्रण करून तिला धमकी देत असतो. ही गोष्ट चित्रपटात दाखवली गेली. कारण, समाजात अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा आहे.
मोबाईलवर तर कधी काय व्हायरल केले जाईल, हे हल्ली सांगता येत नाही. पण, अशा व्हायरल व्हिडिओमधील पीडितेला काय परिणाम भोगावे लागत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. अॅसिड हल्ल्यातील पीडितेची दुर्दैवी कथा तर त्या पीडितेला आपले दुःख कमी करण्याऐवजी पीडितेची ओळख पटल्याने दुःख अजून वाढवत असते. त्यामुळे हा कायदा गरजेचाच होता. सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात पुण्यातील एरवंडे येथील एक घटना आठवते, ज्यात एका ७० वर्षीय वृद्ध दाम्पत्यास चक्क अश्लील व्हिडिओ आणि फोटो टाकून देण्याची धमकी देऊन त्यांच्या बँक खात्यातून जवळपास दोन कोटी रुपये लंपास केले होते आणि त्यांना सायबर गुन्हेगाराने २२ दिवस दहशतीखाली ठेवले होते. मग तरुण मुलींची काय अवस्था होत असेल, याचा विचार न केलेला बरा! त्यामुळेच हे विधेयक अशा पार्श्वभूमीवर स्वागतार्ह आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे हेदेखील आता तितकेच गरजेचे.
- अभिनंदन परूळेकर