पाश्चात्त्य संस्कृतीचा त्याग करुन, संपूर्ण जगभरातल्या मुस्लीम देशांनी इस्लामिक राज्य आणि ‘मुस्लीम ब्रदरहुड’ संकल्पना जगावी, यासाठी १९२०च्या आसपास हसन अल-बन्ना यांनी इजिप्तमध्ये ‘मुस्लीम ब्रदरहुड’ची स्थापना केली. या बन्ना यांचे नातू तारिक रमजान यांना पॅरिसच्या न्यायालयाने नुकतीच १८ वर्षांची शिक्षा सुनावली. तारिक याच्यावर तीन महिलांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला. हा तोच तारिक आहे, जो आधुनिक जगात कुराणच्या शिकवणीचा चांगला अर्थ कसा लावायचा, यावर मांडणी करायचा आणि आणि ‘इस्लामिक स्कॉलर’ म्हणून त्याची ओळख होती. तारिक रमजानला २००४च्या ‘टाइम्स’मध्ये १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थानही मिळाले होते.
जगभरात ज्यावेळी ‘मी-टू चळवळ’ उभी राहिली, त्यावेळी अनेक स्त्रिया त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात खुलेआम बोलू लागल्या. भूतकाळातील शोषणाविरोधात त्यांनी आवाज उठवला. नेमके त्याच काळात तारिकविरोधातही तीन महिलांनी शोषणाचा दावा केला. तारिकने त्यांच्यावर बलात्कार केला, असे त्या तिघींचे म्हणणे. त्यापैकी एक ४१ वर्षीय हेंडा अयारी, जी पूर्वाश्रमीची सलाफिस्ट मुस्लीम होती आणि आता स्त्रीवादी कार्यकर्ता आहे. तिने गुन्हा नोंदवला की, २०१२ साली तारिकने तिच्यावर बलात्कार केला, लैंगिक हिंसा केली, उत्पीडन केले आणि धमक्याही दिल्या.
तारिक तेव्हा ‘इस्लामिक स्कॉलर’ म्हणून एका संमेलनामध्ये व्याख्यान द्यायला पॅरिसमध्ये आला होता. पण, संमेलनानंतर तारिकने त्याच ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तर, क्रिस्टेल नावाच्या महिलेनेही असाच गुन्हा दाखल केला की, तारिक २००९ साली एका कार्यक्रमाला आलेला तेव्हा ‘इस्लामिक स्कॉलर’ म्हणून ती त्याला भेटली. मात्र, भेटीनंतर त्याने तिच्यावर हिंसक हल्ला करत अत्याचार केला, तर तिसर्या महिलेने सांगितले की, तारिकने २०१६ साली तिच्यावर अत्याचार केला. २०१७ साली या तीन महिलांनी केलेल्या आरोपामुळे तारिकची चौकशी सुरू झाली.
पहिल्यांदा तारिकने गुन्हे नाकारले. आपण असे केलेच नाही. सच्चा मुसलमान असे करू शकत नाही, असे म्हणत त्याने इस्लाममधल्या इमानचे पुरावे दिले. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर तारिकचे म्हणणे बदलले. तो म्हणाला, "या तिघींशी माझे लैंगिक संबंध होते. मात्र, त्यामध्ये त्यांची संमती होती. आमच्यात जे काही झाले, ते चर्चा करून आणि सहमतीने झाले.” मात्र, या तीनही महिलांनी त्यांच्यावरच्या अत्याचाराचे पुरावे सादर केले. त्यानुसार, तारिक याच्यावर पॅरिसमध्ये गुन्हे दाखल झाले. त्याला न्यायालयाने १८ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच १८ वर्षांनंतर सुटका झाल्यावर फ्रान्समध्ये पाय ठेवण्यास निर्बंध घातले आहेत.
तारिक याला शिक्षा सुनावल्यानंतर दोन गट पडले आहेत. इस्लामिक गटाला वाटते की, तारिककडून चूक झाली, तरी तारिकला अशी सजा देणे चुकीचे आहे. नाइन्साफी आहे. कारण, तारिक ‘इस्लामिक स्कॉलर’ आहे. जगभरात इस्लामविरोधी वातावरण आहे, अशा वेळी तारिक इस्लामबद्दल सकारात्मक जागृती करतो. ‘कुराण’, ‘शरिया’ हे आजच्या जगात कसे चांगले होऊ शकतात, यावर लोकांशी संवाद साधतो. एकप्रकारे इस्लामबद्दलची कटू भावना जगातून दूर कशी होईल, यासाठी काम करतो. त्यामुळे अशा इस्लामच्या बंद्याला शिक्षा देणे, हे इस्लामिक जगतासाठी चांगले नाही, असे त्यांचे म्हणणे.
तर, दुसर्या गटाचे म्हणणे आहे की, तारिक हा कधीच सुधारणावादी मुस्लीम नव्हता. तो पाश्चिमात्य देशांमध्ये लोकप्रियता मिळवण्यासाठी इस्लामच्या सुधारणेविषयी बोलायचा. मात्र, प्रत्यक्षात तो कट्टर धर्मांध आहे. तो जगासमोर इस्लामचे खोटे चित्र रंगवतो. तसेच तारिकने एकदा जाहीर केले होते की, त्याचे एका फ्रान्स महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असून, तिच्यापासून त्याला चार मुलेही आहेत. पण, या महिलेच्या किंवा त्या मुलांच्या हक्काबद्दल तो काहीच बोलला नाही. तसेच जगभरातील दहशतवाद्यांच्या विरोधात तो कधीच काही बोलत नाही. ‘सुधारणावादी इस्लामिक स्कॉलर’ हा त्याचा मुखवटा आहे. असो. इस्लामिक संस्कृती सोडून इतर सगळे हराम आहे, अशी विचारसरणी इस्लामिक देशांमध्ये रुजवणार्या हसन अल-बन्ना यांचा नातू तारिक. या ‘इस्लामिक स्कॉलर’च्या अधःपतनाला कोणती संस्कृती जबाबदार म्हणायची? हलाल की, हराम संस्कृती?