रुपाली चाकणकर यांनी केलं महत्वाचं ट्विट, खरात प्रकरणात उचललं महत्वाचं पाऊल! राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा दिला राजीनामा

    27-Mar-2026
Total Views |

Rupali Chakankar
 
 
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महत्वाची माहिती दिली आहे. सध्या अशोक खरात प्रकरण महाराष्ट्राच्या वर्तूळात केंद्रस्थानी आहे. सर्वच ठिकाणी या प्रकरणाची चर्चा आहे. याच प्रकरणात अनेक धक्कादायक व्हिडिओ उघडकीस येत होते. राज्याच्या राजकारणात अनेक नेत्यांच्या सोबत खरातचे फोटो उघड होऊ लागल्याने एकच खळबळ माजली होती. या प्रकरणामुळेच रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत महत्वाची माहिती सादर केली आहे.
 
 
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.”. अशी सुरुवात करत चाकणकर यांनी आपला या गोष्टीशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे आपल्या संदेशात त्या म्हणतात. खरातच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.



सुनेत्राताईंशी फोनवर चर्चा झाल्यानंतर दिला राजीनामा

चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याशी चर्चेअंती राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. चाकणकर यांनी जरी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरीही त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कायम होत्या. या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्या विरोधक आणि पक्षांतर्गत लोकांकडून वारंवार केली जात होती. या चर्चेअंती चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील एका महत्वाच्या पदावरुन अशाप्रकारे गच्छंती होण्यामुळे चाकणकरांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
एका ओळीत संपवला राजीनाम्याचा विषय

चाकणकर यांनी आपण देत असलेल्या राजीनाम्याचा उल्लेख करत एका ओळीत विषय संपवलेला आहे. आपण राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असा उल्लेख आपल्या राजीनाम्यातील पत्रात केला आहे.