हा खेळ सोहळ्यांचा...

    26-Mar-2026   
Total Views |
Experience Economy
 
"त्या मोबाईलमधून आधी डोके बाहेर काढ!” हे आजघडीला घराघरातून पालकांच्या तोंडी ऐकू येणारे वाक्य. परंतु,डिजिटल स्क्रीनच्या जोखडांतून मुक्त होत हळूहळू भारतीयांचा कल ‘एक्सपीरियन्स इकोनॉमी’ला हातभार लागेल, अशा सोहळ्यांकडेही वळलेला दिसतो. त्याचेच हे आकलन...
 
सोहळा... माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूचाही अलीकडे ‘सोहळा’ अर्थात ‘इव्हेंट’ होतो. पण, आता कॉन्सर्ट, शोज या तुलनेने पारंपरिक ‘इव्हेंट’च्या पलीकडे जात आगळावेगळा, अविस्मरणीय असा ‘एक्सपीरियन्स’ प्रदान करणार्‍या सोहळ्यांनाही भारतीयांची पसंती मिळताना दिसते. मग यामध्ये अगदी हॉटेल, पर्यटनापासून ते गेमिंग, योग अशा विविध क्षेत्रांचा समावेश होतो. ‘फिक्की-ईवायई २०२६’च्या एका अहवालात भारतीयांचा हा बदलता कल समोर आला आहे. २०२५ साली मनोरंजन क्षेत्रातील सर्वच डिजिटल माध्यमांना धोबीपछाड देत, अशा प्रत्यक्षात आयोजित कार्यक्रमांवर, जास्त भर दिल्याचे हा अहवाल अधोरेखित करतो. देशभरात झालेल्या अशा कार्यक्रमांत एकूण ४४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. ही आकडेवारी केवळ फुगवून सांगण्यात आलेला आलेख नव्हे, तर भारतीय प्रेक्षकांच्या बदलत्या सवयींचे आणि कलांचे दर्शन आहे. आता प्रेक्षक केवळ आशय पाहून आनंद घेण्यापेक्षा त्याचा सर्वांसोबत अनुभव घेऊ इच्छित आहेत.
 
२०२५ या वर्षात माध्यमक्षेत्रात नऊ टक्क्यांनी वाढ होऊन २.७८ लाख कोटींच्या उलाढालीचे क्षेत्र बनले. मात्र, यात प्रत्यक्षात आयोजित कार्यक्रमांनी संपूर्ण क्षेत्रालाच धक्का दिला. हा बदल केवळ शानशौक न राहता, भारतीय दर्शकांच्या बदलत्या सवयीचे द्योतक म्हणावा लागेल. केवळ डिजिटल माध्यमांवरील मजकुराचा आस्वाद घेणे नव्हे, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हेदेखील अलीकडे तितकेच महत्त्वाचे ठरताना दिसते. त्यामुळे हा एकप्रकारे रचनात्मक बदल म्हणावा लागेल. मोठा जनसमुदाय एकत्रित येतो, अशा सोहळ्यांच्या आयोजनात एकूण ४४ टक्के वाढ झाली आहे. यामध्ये संगीत क्षेत्रातील भव्य सोहळे, धार्मिक कार्यक्रम, सरकारी कार्यक्रमांचे आयोजन, धार्मिक मेळे आदींचा समावेश आहे. उदा. महाकुंभासारखा विशाल आयोजन सोहळा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या टूर्स इत्यादी. अशा कार्यक्रमांमुळे तिकीटविक्री, विमानप्रवास, हॉटेल बुकिंग, आयोजक व्यवस्थापन कंपन्या, जाहिराती आणि विपणनांवर होणारा खर्च आणि उलाढालही तितकीच मोठी असते. महत्त्वाच्या व्यक्तींचे लग्नसमारंभ, संगीत सोहळे आदींचाही यात समावेश होतो.
 
भारतातील अशा भव्य आयोजन सोहळ्यांची उलाढाल १४५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. वर्ष २०२८ मध्ये ती १९६ अब्ज डॉलर्सवर पोहोचेल, असा कयास आहे. हे आयोजन सोहळे केवळ दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांपुरते मर्यादित न राहता, भारतातील प्रत्येक शहरांमध्ये आपली किमया दाखवू शकतील, असा विश्वास या अहवालात वर्तविण्यात आला आहे. उदा. आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारतातील प्रवासाचे घ्या. अर्थात, ममता दीदींच्या कोलकात्यात चाहते आणि प्रेक्षकांची प्रचंड गैरसोय हा एक दुर्दैवी भाग सोडला, तर अन्य ठिकाणी मेस्सीचा दौरा यशस्वीच म्हणावा लागेल. हा सोहळा काही फक्त चाहत्यांना मेस्सीचे दर्शन व्हावे, म्हणून आयोजित केला नव्हता, तर त्यामागे आयोजकांचे प्रचंड मोठे व्यवस्थापन, जाहिराती आणि ब्रॅण्डिंगचाही तितकाच सर्वंकष विचार करण्यात आला होता. असा हा मेस्सीचा भारत दौरा हा फक्त एक ‘टीझर’ होता.
 
येत्या काळात भारतातील २० हून अधिक शहरांमध्ये अशाच ताकदीचे भव्य सोहळे उभे राहतील, अशी आशा आहे. २०२८ पर्यंत एकूण अशा सोहळ्यांची संख्या २०० पेक्षा जास्त असेल. आश्चर्य म्हणजे, डिजिटल क्रांती ही अशा सोहळ्यांना नुकसान पोहोचविण्याऐवजी फायदेशीर ठरत असल्याचेच दिसते. कारण, अशा सोहळ्यांची चर्चा समाजमाध्यमांवरही तितक्याच चवीने होताना दिसते. सेलिब्रिटी वर्ग, कलाकार, समाजमाध्यमांवरील इन्फ्लूएन्सर्स आणि चाहते-प्रेक्षक अशा सोहळ्यांचे भरभरून कौतुक करतात. परिणामी, अशा सोहळ्यांचीही प्रचंड मागणी निर्माण होते. गेल्याच वर्षी ‘कोल्ड-प्ले’ या कॉन्सर्ट-शो आयोजनामुळे तिकीट नोंदणी करणार्‍या संकेतस्थळावर आलेल्या ताणामुळे सर्व्हर डाऊन झाल्याचेही उदाहरण पाहायला मिळाले होते. नवी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाची तिकीटविक्री लाखो रुपयांना झाल्याचा रेकॉर्ड नोंदवण्यात आला होता. त्यानंतर या संपूर्ण सोहळ्याची प्रमुख वृत्तमाध्यमे, समाजमाध्यमांवर एकच चर्चा झाली. यामुळेच प्रत्यक्षात हा कार्यक्रम पाहणार्‍यांची संख्या आणि उत्सुकता वाढत गेली आणि अखेर संपूर्ण कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला. कार्यक्रम पाहण्यासाठी चाहत्यांनी आजूबाजूच्या उंचावरील जागा उदा. हॉटेल्स, उंच इमारतींचे पर्यायही सांगितले.
 
पूर्वी अशाच कार्यक्रमांना प्रत्यक्ष सोहळ्याचे, म्हणजेच ‘लाईव्ह इव्हेंट’ स्वरूप मानले जात होते. मात्र, आता कुंभमेळा, महत्त्वाच्या जत्रा, श्रद्धास्थानांवरील तीर्थाटन आदींचाही यात समावेश होऊ लागला. यात अगदी भव्य, आलिशान अशा विवाह सोहळ्यांचे आयोजनही आले. लाईव्ह म्युझिक किंवा कॉन्सर्ट-शोज् कितीही झाले, तरीही भव्य लग्न समारंभ आणि तीर्थक्षेत्रांतील वाढते पर्यटन या ४४ टक्के वाढीचे प्रमुख कारण आहे. अशा आयोजनांमुळे कोट्यवधींची गर्दी जमा झाली आणि एका मंदीच्या काळातही अब्जावधींची उलाढाल शक्य झाली. परंतु, भविष्यात जर का आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या भारतीय दौर्‍यांची संख्या वाढविण्याची गरज आहे, तर त्या दृष्टीने पायाभूत सुविधांच्याही निर्मितीचाही विचार व्हायला हवा. एकाचवेळी लाखोंच्या गर्दीचे नियंत्रण तथा व्यवस्थापन सहज शक्य होईल, अशी यंत्रणा उभी करणे, हे निश्चितच आव्हान असणार आहे.आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या दौर्‍यातील नकाशात पूर्वी भारताला स्थान नव्हते.
 
मात्र, इथल्या ‘जेन-झी’च्या लोकप्रियतेमुळे ते आता भारतीय दौरा हे दिग्गज कलाकार टाळू शकत नाहीत. भारतातून अशा आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टची होणारी कमाईही तितकीच जास्त आहे, हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. यात आता भारतीय कलाकारांचीही कमी नाही. भारतीय संगीत कलाकारांचेही आंतरराष्ट्रीय दौरे तितकेच चर्चेत असतात. ‘स्टॅण्डअप कॉमेडियन्स’च्या दौर्‍यांचीही विशेष चर्चा होते. सुप्रसिद्ध विनोदवीर झाकीर खानचा न्यूयॉर्क शहरातील मॅडिसन स्क्वेअर गार्डनवरील भव्य शोचीही ‘उल्लेखनीय कार्यक्रम’ म्हणून चर्चा होते. इतक्या भव्य कार्यक्रमांचे तिकीटदरही तितकेच महाग आणि सर्वसामान्यांना न परवडणारे असतात. मात्र, भारतीयांची खर्च करण्याची वाढती क्षमता, ‘फोमो’ (फिअर ऑफ मिसिंग आऊट) यांमुळे तिकीटविक्री तुफान होते. मुंबई-दिल्लीसारख्या शहरातील हा कल समाजमाध्यमांमुळे इतर शहरांमध्येही तितक्याच वेगाने पसरू लागला आहे. अशा ही ग्राहकांना प्रत्यक्ष अविस्मरणीय अनुभवांची विक्री करणार्‍या ‘एक्सपीरियन्स इकोनॉमी’ची क्षितिजे भविष्यात आणखीन विस्तारतील,यात शंका नाही.
 
 

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.