‘आम्ही किष्किंधा नरेश वानरराज सुग्रीवाचे वंशज आहोत. आमच्या राजाने रामाला सीताशोधात मदत केली होती,’ आसाममधील ‘कारबी’ लोक हे अभिमानाने सांगतात. अरुणाचल प्रदेशातील ‘आका’ जनजातीचे लोक स्वतःचे नाते ‘जांबवाना’शी जोडतात; तर ‘जयंतीया’ लोकांत जुळी मुले झाली, तर त्यांचे नाव ‘राम-लखन’ ठेवण्याची प्रथा आहे. ईशान्य भारतातील जनमानसामध्ये ‘रामायण’ अशा प्रकारे घट्ट रुजले आहे की, सातत्याने होत असलेल्या धर्मांतरणाच्या अविवेकी प्रयत्नांनंतरही ईशान्य भारताच्या मातीमध्ये कृषी ते कला एवढ्या व्यापक अंगाने रामकथेचा सुवास दरवळतो. अशाच ईशान्य भारतातील विविध जनजातींमधील रामकथेच्या विस्ताराचा घेतलेला सर्वस्पश मागोवा...
1975 ते 1989च्या दरम्यान, जवळपास 20 वर्षे मी ‘विवेकानंद केंद्र’ आणि ‘विद्या भारती’ या शैक्षणिक संघटनेच्या कामानिमित्त ईशान्य भारतात राहिलो. काही काळ गुवाहाटीहून प्रकाशित होणाऱ्या ‘दि सेंटीनल’ या इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकारितादेखील केली. यादरम्यान, आसाम विश्व हिंदू परिषदेचे स्वामी बाणगोविंद परमपंथी यांनी ‘कारबी रामकथे’शी माझा परिचय करून दिला. त्याकाळात गुवाहाटी विद्यापीठाने ‘ईशान्य भारतातील रामकथेची परंपरा’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये ईशान्य भारतातील अनेक अभ्यासकांनी त्यांचे शोधनिबंधही प्रस्तुत केले होते. यामधूनच मला ईशान्य भारतातील रामायण-परंपरेची माहिती मिळाली. त्यानंतर मात्र, मला कधीही ‘कारबी’ लोकांनी स्वत:ला ‘सुग्रीवाचे वंशज’ म्हटल्याचे आश्चर्य वाटले नाही.
सुग्रीवाचे राज्य कावेरीच्या प्रदेशात होते. तेथूनच हे लोक स्थलांतरित झाले असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. ‘कारबी’ हा शब्द ‘कावेरी’ शब्दाचेच भ्रष्ट रूप असावे, असेही म्हणतात. आसामच्या कारबी आंगलोंग जिल्ह्यात निवास करणाऱ्या कारबी जनजातीचे ‘रामायण’ मौखिक परंपरेने, पिढी दर पिढी चालत आले आहे. ‘साबीन आलुन’ या नावाने प्रसिद्ध असलेली त्यांची रामकथा गेय स्वरुपाची आहे. त्यामधून कारबी संस्कृती, परंपरा, धारणा आणि त्यांच्या जीवनाचे यथार्थ दर्शन घडते. ही रामकथा गाणाऱ्या व्यक्तींना कारबी समाजात अतिशय मानाचे स्थान असते.
कारबी-परंपरेनुसार राम त्याच्या भावी श्वशुराच्या म्हणजेच राजा जनकाच्या घरी जातो आणि त्याच्या शेतीत काम करतो. आपण एक चांगला पती होऊ शकतो आणि त्याच्या मुलीची, म्हणजे सीतेची उत्तम काळजी घेऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी, रामाला असे करावे लागते. कारबी जनजातीत आजही लग्नासाठी मुलांना आपली क्षमता सिद्ध करून दाखवावी लागते. या परंपरेचे प्रतिबिंब आपल्याला ‘कारबी रामायणा’त दिसते.
अरुणाचलमध्ये असलेल्या ‘खामती’ जनजातीचे लोक बौद्ध धमय आहेत. त्यांच्या रामकथेचे नाव ‘लिक चाव लामांग’ असून, त्यावर आपल्याला जातक कथांचा प्रभाव दिसून येतो. रामकथेशी जवळीक असणारी एक लोककथा ‘मिशमी’ जनजातीत आढळून येते. ‘तिवा’ जनजातीत ‘रामायण खरांग’ या नावाने एक रामकथा प्रचलित आहे; तर ‘राभा’ लोकांच्या एका लोकगीतात म्हटले आहे, ‘चला, रामाच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा आपल्या प्रदेशात आला आहे, आपण सर्व त्याचे दर्शन घेण्यास जाऊ.’ अयोध्येला परत आल्यानंतर श्रीरामाने केलेल्या ‘अश्वमेध यज्ञा’ची स्मृती या लोकगीतामध्ये जपलेली दिसते.
मेघालय हे भारतातील एक नितांत सुंदर निसर्गसंपत्ती लाभलेले राज्य. या राज्यात ‘खासी’, ‘जयंतीया’ आणि ‘गारो’ जनजातीचे लोक राहतात. या जनजातीचे लोक मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन झाले आहेत; पण रामकथा मात्र येथील लोकांत आजही लोकप्रियच आहे. 1987 मध्ये रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेचे दूरदर्शनने प्रसारण केले होते, त्यावेळी मेघालयातील लोकही अत्यंत श्रद्धेने आणि एकाग्रतेने ही मालिका पाहत असत. ‘खासी रामायणा’ची रचना 1900च्या सुमारास ‘सेंग खासी’ या संघटनेचे प्रमुख संस्थापक जीबन रॉय यांनी केली. रामकथेला ‘खासी’ भाषेत आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. त्याचप्रमाणे ‘गारो’ भाषेत रामकथा अनुवादित करण्याचे काम रेदीन मोमीन यांनी केले. त्यांचे रामकथेसाठी केलेले कार्य त्यांच्या मृत्यूनंतर 1992 साली प्रकाशित झाले.
री-वार भागात राहणाऱ्या लोकांचीही रामयणाबाबत एक रंजक मान्यता आहे. हा भाग संत्री उत्पादक प्रदेश असून, येथील संत्री अतिशय मधुर असतात. येथील लोकांची अशी मान्यता आहे की, श्रीलंकेहून परत येताना रामाने ही संत्री आणली होती आणि या प्रदेशात टाकली. त्याचीच ही रसाळ आणि मधुर अशी फळे आहेत. त्रिपुरा राज्यात तर रामकथेची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपराच आहे. ‘राज रत्नाकर’ या 15व्या शतकात रचलेल्या काव्यात महाराज दशरथांच्या समकालीन राजा पुरुसेनाचा उल्लेखही आला आहे. राजा पुरुसेन अयोध्येत राजा दशरथाने आयोजित केलेल्या एका यज्ञ समारंभासाठी उपस्थित राहिला होता. तर, त्रिपुराचे महाराज रामगंगमानिक्य हे स्वत: श्रीरामाचे निस्सीम भक्त होते.
अलीकडे हिंसाचार, अव्यवस्था, यामुळे सतत प्रकाशझोतात आलेल्या मणिपूर राज्यातसुद्धा रामायण-परंपरा आहे. मणिपूरी लोकांनी त्यांचचे रामकथा कथक, लोकनृत्य, कीर्तन आणि संगीताच्या माध्यमातून जिवंत ठेवली आहे. तर, मणिपूरच्या ‘जत्रा’ परंपरेने ही कथा ‘लाइरीक’, ‘थिबा’, ‘माईबा’ म्हणून जतन केली. ख्रिश्चन पंथाचा स्वीकार केलेल्या ‘मिझो’ जनजातीत रामकथा ही ‘खेना आणि रामा’ यांची कहाणी आहे. या कथेतील पात्रांची नावे वेगळीच आहेत. उदाहरणार्थ, खेना (लक्ष्मण), हावलामान (हनुमान), लुप्पीरायबोन (महिरावण), लुकारीना (रावण) इत्यादी. ‘मिझो’ लोकपरंपरेत राम आणि खेनाला देवत्व बहाल केले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, या दोघांनी येथील लोकांना भाताची शेती करण्याचे तंत्र शिकविले. ‘मिझो’ लोकांत अनेक धार्मिक कार्यक्रमादरम्यान तांदळाचा उपयोग हा महत्त्वाचा मानला जातात. त्यावेळी या कार्यक्रमादरम्यान राम आणि खेनाचा अत्यंत आदराने उल्लेख केला जातो. ‘ज्यावेळी निसर्ग जगाची जडणघडण करीत होता, त्यावेळी राम आणि खेना यांनी तुला निर्माण केले!’, असे ते भाताच्या रोपट्याला उद्देशून ते म्हणतात.
श्रीरामाची कथा ईशान्य भारतातील अनेक जनजातींमध्ये लोककला, लोकसंगीत आणि लोकनृत्यातून आढळते. येथील स्थानिक जनजातींनी ही रामकथा त्यांच्या सोयीनुसार स्वीकारली आणि त्यात काही परिवर्तनदेखील केले असावे. हे बदल अर्थातच, त्यांच्या सांस्कृतिक वातावरणाला अनुरूप असेच होते; पण त्यामुळे मूळ कथेला कुठेही तडा गेला नाही, हे विशेष. आसाममध्ये तर अतिशय प्रगत अशी मौखिक आणि लिखित अशी रामायण-परंपरा आहे. कविश्रेष्ठ माधव कंदली यांनी लिहिलेली ‘रामकथा’ आजही आसामी लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे.
रामकथेची ही प्राचीन परंपरा आजही तितकीच लोकप्रिय आहे, हेच या विवेचनातून स्पष्ट होते. विविध जनजातींनी ‘रामकथा’ मौखिक परंपरेने जतन करून ठेवलेली आहे. ख्रिश्चन धर्मप्रसार आणि परिवर्तनामुळे ही परंपरा खंडित अथवा बाधित झालेली नाही, हेदेखील एक नोंद घेण्यासारखेच वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विख्यात पुरातत्त्व अभ्यासक हरिभाऊ वाकणकर यांनी, जनजाती समुदायात प्रचलित असणाऱ्या समस्त रामकथांचे संकलन आणि संशोधनाची आवश्यकता प्रतिपादन केली होती. या सर्व रामकथांचे वर्णन करताना त्यांनी एक चपखल शब्द वापरला, तो होता ‘वन रामायण’. ही ‘वन रामायणे’ आणखी एका दृष्टीने महत्त्वाची आहेत. श्रीरामाचा बराचसा काळ वनवासी समुदायासोबत गेला आहे. अगदी निषादराज गुह ते वानरराज सुग्रीवापर्यंत श्रीराम, लक्ष्मण आणि सीता अनेक वर्षे या वनवासी समुदायासोबत राहिले आहेत. निषाद, वानर अशा अनेक जनजाती समुदायांना संघटित करून, त्यांच्यात स्वाभिमान जागवून, रावणासारख्या बलाढ्य राक्षस सम्राटाशी युद्ध करून, पुनः न्यायाचे शासन स्थापित करण्याचे कार्य श्रीरामाने केले आहे. हा श्रीरामाचा इतिहास आहे आणि ‘क्रियासिद्धीः सत्त्वे भवति महतां नोपकरणे|’ अर्थात, महान व्यक्तींच्या कार्यांची सिद्धी त्यांच्या आत्मबल, धैर्य आणि दृढसंकल्पावर अवलंबून असते; ती साधने किंवा उपकरणांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसते, हा रामकथेचा संदेश आहे.
श्रीरामाचा अयोध्या ते श्रीलंका हा प्रवास, एक मिथिलेचा अपवाद वगळता उत्तर-दक्षिण असाच झाला आहे. श्रीलंकेला जाताना हिंस्र पशू, तसेच क्रूर राक्षसांची वस्ती असलेल्या घनदाट दंडकारण्यातून प्रवास करताना, आजच्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांतून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची राजसी पावले उमटली. पूर्वेकडील बंगाल, आसाम अथवा ईशान्येकडील राज्यांत मात्र श्रीरामाच्या प्रवासाचे दाखले दिसून येत नाहीत. मात्र, असे असले तरी येथील विभिन्न जनजाती समुदायांत ‘रामकथा’ प्रचलित असल्याचे भरपूर पुरावे आढळून येतात.
राम जिथे गेलासुद्धा नव्हता, त्या लोकांनादेखील त्याने आपलेसे केले. हा आदर्श घालूनदेखील दैवदुर्विलास पाहा की, ईशान्येतील लोक भारतीयच आहेत आणि हे त्यांनी 1962च्या चिनी आक्रमणाच्या घटनेपासून आजपर्यंत अनेकवेळा स्थापित केले आहे. तरीसुद्धा त्यांच्याबद्दलची आपलेपणाची भावना भारतातील इतर लोकांमध्ये अभावानेच दिसून येते. केवळ त्यांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी असल्याने, त्यांना भारतीय न मानण्याच्या घटना दिल्लीसह इतर मोठ्या शहरांत घडल्या. काही वर्षांपूव देशातील अनेक मोठ्या शहरांतून ईशान्य भारतातील विद्याथ मोठ्या संख्येने पलायन करते झाले, ही घटना आपल्या स्मरणात असेल. गेल्या काही दशकांपासून या जनजाती समुदायांना भारतीय परंपरा, संस्कृती, धार्मिकता यांपासून दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यांची सांस्कृतिक पाळेमुळे खणून, त्यांना भारतीय समाजापासून वेगळे करण्याचे कारस्थान मुख्यतः ‘ख्रिश्चन मिशनरी’ संघटना करीत आहेत. या आदिवासी समुदायांना ख्रिश्चन बनविले जात आहे; तेच येथील मूलनिवासी असल्याचा खोडसाळ प्रचारही ही मंडळी सर्रास करीत असतात. काही जनजाती समुदायात या प्रचाराचा परिणाम झालेला दिसून येतो. अशा खोडसाळ प्रचाराला निष्प्रभ करण्यासाठी, ईशान्येतील लोकांना जोडून घेण्यासाठी आणि भारताला सशक्त करण्यासाठी ‘वन रामायण’ परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याची खरोखरच आवश्यकता आहे.
- विराग पाचपोरे
(लेखक नागपूरस्थित वरिष्ठ पत्रकार असून, त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे.) 9226682290
[email protected]