
संस्कृतीच्या प्रवाहातील प्रत्येक टप्प्यावर मानवाची कलेची अभिव्यक्ती महत्त्वाची ठरली. आपले विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठीच माणसाने अनेक माध्यमे निवडली आणि कालौघात ती विकसित होत गेली. चित्रकला ही कायमच माणसाच्या प्राथमिक अभिव्यक्तीचे साधन राहिले. मग भारतीय जनमानसाचे प्रेरणास्थान असलेले ‘रामायण’देखील याला अपवाद कसे ठरेल? देशातील अनेक चित्रशैलींतील कलाकारांना ‘रामायणा’च्या स्मृती चितारण्याचा मोह झाला. यातूनच अनेक ‘चित्ररूपी रामायणे’ दिसतात. भारताच्या पूर्व भागामध्ये प्रामुख्याने ओडिशा राज्य आणि बंगाल प्रांतात ‘पट्टचित्र’ नावाची एक सुंदर शैली निर्माण झाली. या ‘पट्टचित्र’ शैलीमधील रामकथांचा घेतलेला मागोवा...
'पट्टचित्र’ ही भारतीय चित्रशैलीमधील एक अनोखी चित्रशैली. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात. हे दोन्ही प्रकार खूप निराळे आहेत. यातील पहिल्या प्रकाराला ‘ताल-पट्टचित्र’ असे म्हणतात. यामध्ये ताडाच्या झाडाची पाने कापून वाळवली जातात. त्यावर हळद व कडुलिंब यांच्या मिश्रणाची प्रक्रिया केली जाते. पाने सुमारे ३ द १८ अथवा लहान आकारात आयताकृती कापली जातात. त्यावर लोखंडाच्या अणकुचीदार लेखणीने चित्र हळुवारपणे; पण नेमकेपणाने कोरले जाते. कोरलेल्या पानावर काजळीचे काळे मिश्रण भरले जाते. यामुळे कोरलेले चित्र, काळ्या रंगात स्पष्टपणे दिसू लागते. तर, काही वेळेला ही चित्रे विविध रंग वापरून रंगवली जातात. अनेकदा काव्य, धर्मग्रंथ लिहिताना लेखनाबरोबर चित्रेही काढली जात असत. अशाप्रकारचे सचित्र ग्रंथ घरामध्ये असणे याला एक प्रतिष्ठा होती व ते सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेपणाचेही लक्षण मानले जाई.
या प्रकारात केलेली चित्रे सुमारे ८०० ते एक हजार वर्षे टिकतात. पोथीसाठी पानाला मधोमध भोक पाडले जायचे व अनेक पाने एकत्र ठेवण्यासाठी, या भोकातून दोरी घालून सर्व पाने एकत्रित बांधली जात असत. तसेच पोथीच्या तळाला व वरील बाजूस पानाच्या आकाराची लाकडाची पट्टी वापरली जात असे. यामुळे पोथी व चित्र सुरक्षित राहात. ‘ताल-पट्टचित्र’ प्रकारात ताडपत्राच्या आकार मर्यादेमुळे चित्राचाही आकार मर्यादित राहातो. म्हणूनच मोठ्या आकाराची चित्रे करण्यासाठी, पानाच्या कापलेल्या आडव्या पट्ट्या एकमेकांना धाग्यांनी बांधून मोठ्या आकारातील चित्र केले जाई. या प्रकारात पानाच्या दोन्ही बाजूस चित्र काढले जायचे. अशा पद्धतीने त्या कलाकारांनी मोठ्या आकारातील चित्रे तयार केली.
दुसर्या प्रकारची पट्टचित्रे काढण्यासाठी कापड वापरून, चित्रासाठी पृष्ठभाग तयार केला जायचा. पट्ट म्हणजे कापड आणि त्यावर काढलेले चित्र म्हणजे ‘पट्टचित्र’. सुती कापडावर चिंचेच्या बिया भिजवून तयार केलेली पेस्ट पसरून, त्यावर दुसरे कापड चिकटवले जायचे. अशा तर्हेने पुरेशा जाडीचा पट्ट तयार केला जायचा. त्यावर शंख-शिंपले यांच्या पावडरचे पातळ थर देऊन, चित्रासाठीचा पृष्ठभाग तयार केला जाई. वाळलेल्या या पृष्ठभागावर शंख, गोलाकार दगड अथवा लाकडाचा तुकडा याने घासून, पृष्ठभाग गुळगुळीत व चमकदार केला जाई. आजही याच प्रकारे ही चित्रनिर्मिती चालू आहे. तयार पृष्ठभागावर रेखांकन करून रंग भरले जायचे व शेवटी काळ्या रंगांनी चित्रातील सर्व आकारांना बाह्यरेषा दिली जायची व पांढर्या रंगाने काही ठिपके व अलंकारिक आकार वापरून हे चित्र पूर्ण केले जात असे.
पट्टचित्राच्या प्रमुख शैली ‘पुरी’ आणि ‘रघुराजपूर’ या मानल्या आहेत; पण पारलाखिमुंडी, चिकट, दानासही, सोनेपूर याठिकाणीही पट्टचित्रनिर्मिती केंद्रे आहेत. पट्टचित्रनिर्मिती नेमकी केव्हा सुरू झाली, याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. या चित्रनिर्मितीच्या मागे धार्मिक प्रेरणा हेच कारण प्रामुख्याने दिसून येते. श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे चित्रण या चित्रात प्राथमिक स्वरूपात दिसून येते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला या तीनही देवतांना उन्हाळ्याच्या त्रासापासून सुटका म्हणून स्नानविधी केला जातो. त्यावेळेस मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, या काळात १५ दिवस देवदर्शनास मज्जाव असतो. त्यावेळी पर्याय म्हणून तीनही देवतांचे एकत्रित चित्र काढले जाते व त्याचेच दर्शन घेतले जाते. या प्रथेतून पुढे श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची चित्रे काढण्याची पद्धत प्रचलित झाली. या कालावधीला ‘अनासर’ काळ संबोधतात व यातूनच या चित्रांना ‘अनासरपट्ट’ असे नाव पडले आहे. यातूनच पुढे ‘पट्टचित्र’ असे नाव रूढ झाले.
जवळजवळ प्रत्येक गावात शिव, राधा-कृष्ण, राम यांची मंदिरे होती. या मंदिरांमध्ये गादी घर म्हणून जागा असे. यामध्ये ‘भागवत’, ‘रामायण’ इत्यादी सचित्र धार्मिक ग्रंथ असायचे. तसेच अनेक श्रीमंतांच्या घरातून पट्टचित्र, सचित्र धर्मग्रंथ पूजनासाठी ठेवलले असत. यातूनच अनेक चित्रकारांना आपल्या कलेचे उपयोजन करता आले आणि त्यातूनच व्यापक उद्योजकता उभी राहिली. जनतेप्रमाणेच या कलाकारांना राजाश्रय लाभला. तत्कालीन गंग राजांनी चित्रकारांना, शिल्पकारांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. चित्रकार व शिल्पकार यांच्यासाठी रघुराजपूर येथे वसाहत वसवली. आजही रघुराजपूर येथे सर्व घरांमध्ये चित्र, शिल्पांचे काम केले जाते. येथे देश-विदेशातील पर्यटक आवर्जून भेट देतात.
येथील चित्रकार स्वयंप्रेरणेने विविध विषयांवर पारंपरिक पद्धतीने चित्रकृती करतात. यामध्ये गणपती, सरस्वती, लक्ष्मी, श्री जगन्नाथ, राधा-कृष्ण, रासलीला, दशावतार अशा विषयांबरोबरच, ‘रामायणा’वरही चित्रे काढली जातात. रामपंचायतन, रामदरबार, विष्णुअवतार राम, ‘रामायण’ काव्यातील विविध प्रसंग, रामभक्त हनुमान, ‘रामायणा’तील विविध प्रसंगांचे एकाच चित्रपट्टावर केलेले रचनाचित्र, अशाप्रकारे ‘रामायण’ चित्रांतून साकारले जाते. यातील प्रत्येक छोट्या चित्रात ‘रामायणा’तील एक कथा चित्रित केली जाते. अशा कथाचित्रांचा समूह एका मोठ्या चित्रात असतो. यामध्ये नऊ, १३, २१, ३६, ४८ अशा संख्येने चित्रे सामावलेली असतात; तर काही चित्रांच्या रचनेत मध्यभागी रामपंचायतन, त्याच्या बाजूने दशावतार व त्याच्या बाहेरील बाजूस ‘रामायणा’तील घटनाक्रमानुसार विविध प्रसंगाची चित्रे असतात. यामध्ये चित्रप्रसंगाची निवड, चित्ररचना, रंगसंगती, अलंकरण याबाबतचे सर्व सर्जक निर्णय चित्रकाराच्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात.
अशाप्रकारच्या संयुक्त चित्रांमध्ये प्रत्येक प्रसंगाचे चित्रण, त्यातील कथा प्रभावीपणे व्यक्त करताना रंगसंगती, शेजारील प्रसंगचित्राला खुलवणारी पूरक अशी करावी लागते.प्रत्येक चित्र चांगले करताना पूर्ण चित्रपट्टातील एकात्मता राखण्याचे सुत्र सांभाळले जाते. यात चित्रकाराचे रचनाकौशल्य, रंगांचा अभ्यास आणि चित्रतंत्रावरील प्रभुत्व यांचा कस लागतो. दुसर्या प्रकारची चित्रे ही प्रसंगचित्रे असतात. यामध्ये रामपंचायतन, राम-रावण युद्ध, शबरीची बोरे, भरतभेट, राम-सीता विवाह अशा विषयांवरील चित्रे काढली जातात. यामध्ये व्यक्तिरेखा हावभाव आणि गुणवैशिष्ट्यांसह रंगवतात. काही चित्रांमध्ये श्रीरामाला मिशी दाखवलेली आहे; तर वनवासातील चित्रप्रसंगात कधी वल्कले, तर कधी पितांबर आणि मुकुट घातलेला आढळतो. विविध प्रकारची झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी, जलचर यांच्या समावेशाने, चित्रात सौंदर्य निर्माण केले जाते. भावदर्शन होण्यासाठी रंगसंगतीचा उपयोग होतो.
याखेरीज संकल्पनात्मक चित्रे ही वैशिष्ट्यपूर्ण चित्रेदेखील याच प्रकारात आढळतात. यातील प्रमुख म्हणजे हनुमानाचे चित्र. येथे हनुमान आपली छाती फाडून हृदयस्थ रामाचे दर्शन सर्वांना देत आहे. या चित्राच्या इतर भागात डोंगर व दगडांचे मोठे आकार काढले आहेत. यातील प्रत्येक आकारात, रामकथेतील एखादा प्रसंग एकाच रंगामध्ये चितारला आहे. अशाप्रकारची संकल्पचित्रे तुलनेने दुर्मीळच. याखेरीज काही पट्टचित्रे केवळ दोन रंगात केलेली आढळतात. यात काळा आणि लालसर तपकिरी रंगाचच वापर दिसतो. चित्रपट्टाचे उभ्या-आडव्या रेषांनी, छोट्या ‘आयत’ आकारात विभाजन केलेले असते व प्रत्येक आयतामध्ये ‘रामायणा’तील प्रसंग काळ्या व तपकिरी रंगांच्या साहाय्याने चितारतात. कमी रंगात चित्रामध्ये रंगत आणण्याचे चित्रकाराचे कसब येथे लक्षात येते.
या चित्रातील रंगही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याचे रंगही नैसर्गिक सामग्रीपासून तयार केले जायचे. शिंपल्यापासून पांढरा, काजळीपासून काळा, झाडाची पाने-दगड यांपासून हिरवा, हिंगुळ वापरून लाल, हरिताळपासून पिवळा आणि खंडनीळपासून निळा असे रंग वापरात होते. या रंगांच्या मिश्रणातून जवळपास १२० रंगछटांचा वापर चित्रकार करत. अलीकडच्या काळात मात्र ‘अॅक्रेलिक’ रंगांचा वापरच सर्रास दिसतो. मात्र, आजही आपण रघुराजपूर येथे गेलात, तर परंपरेने ही कला पुढील पिढीकडे संक्रमित होताना दिसते. अनेक तरुण या पारंपरिक कलेचे शिक्षण घेताना दिसतात. तरीसुद्धा या कलाकारांपुढे असलेली आजची आव्हाने वेगळी आहेत. या गौरवशाली पारंपरिक कलाप्रकाराला आज लोकाश्रयाची गरज आहे.
‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या महाकाव्यांची मोहिनी आजही जनमानसावर आहे. यातील कथाप्रसंग आपल्याला प्रेरणा देतात. यापासूनच प्रेरणा घेऊन पट्टचित्र कलाकारांनी स्वतःच्या प्रतिभेने, अनेक चित्रविषयांना आपल्या चित्रपटांवर मूर्त स्वरूप दिलेले आहे. कथाबीज, कलात्मकता यांचा सुंदर संगम असलेली ही चित्रे, आपण विकत घेऊन आपल्या संग्रहात ठेवली पाहिजेत. अनेक प्रसंगांना आपण ही चित्रे भेट म्हणूनही देऊ शकता. यामुळे या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल आणि या प्रादेशिक कलाप्रकाराला ऊर्जित अवस्था प्राप्त होईल, असे वाटते.
- राहुल देशपांडे