‘महाराष्ट्राची सत्त्वधारा’ म्हणून ज्या वारकरी भक्ती संप्रदायाचा गौरव केला जातो, त्या सत्त्वसंपन्न संप्रदायाची आराध्य इष्टदेवता श्री विठ्ठल आहे, हे सर्वश्रुत. या भक्तिपरंपरेतील श्रीगुरू निवृत्तीनाथ-ज्ञानदेवांपासून थेट संत गाडगे महाराजांपर्यंतची संतमालिका, हे महाराष्ट्रचे वैभव-ऐश्वर्य एकविध विठ्ठलभक्ती करणाऱ्या या संतांना, विठ्ठलाएवढाच श्रीराम प्रिय व आराध्य वारकरी संतांच्या अभंग साहित्यातील ‘रामभक्ती’ उत्कट व भावविलोभनीय आहे. विठ्ठल, कृष्ण, आणि राम हे वारकरी संतांसाठी एकच आहेत. हा त्यांचा अद्वैत भक्तिभाव, विश्वात्मक उदात्त व्यापक दृष्टीचेच दर्शन आहे. रामकथेपेक्षा ‘रामनाम’ हा संजीवनी महामंत्र त्यांना श्रेष्ठ वाटतो. एक-‘राम एव परब्रह्म’ असे आराध्यदैवत राम आणि दोन-‘नित्य विजयी रघुनंदन’ असा प्रतापी प्रेरणादायी योद्धा रघुवीर. असे दोन प्रकारच्या रामाचे दर्शन आपणास वारकरी साहित्यातून घडते. संत एकनाथ कृत ‘भावार्थ रामायण’ हा मराठी भाषेतील रामकथेवरील पहिला, आद्यग्रंथ मानला जातो. संत रामदास, संत तुकाराम या उत्तरकालीन संतांच्या रामभक्तीचे प्रेरणास्थान म्हणूनही ‘भावार्थ रामायणा’ला विशेष स्थान व मान आहे. चैत्रातील ‘रामनवमी’ वारकरी फडांवर-मठांमध्ये उत्सव म्हणूनही साजरी होते. वारकरी संप्रदायाच्या ‘रामकृष्णहरी’ या नाममंत्र जपात, पहिले स्थान ‘श्रीराम’नामाला आहे.
आरंभिक
भारताप्रमाणेच महाराष्ट्रातही अनेक धर्मसंप्रदाय गुण्यागोविंदाने नांदलेले आहेत. महानुभव, नाथ, वारकरी, समर्थ आणि दत्त हे त्यांपैकीचे प्रमुख संप्रदाय मानले जातात. या अनेक संप्रदायांमध्ये होऊन गेलेल्या असंख्य संतांचे महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, साहित्यिक जीवनामध्ये अपूर्व योगदान आहे. 13व्या शतकातील संत निवृत्तीनाथांपासून ते थेट 20व्या शतकातील संत गाडगे महाराज, गोंदवलेकर महाजांपर्यंतची सलग 700 वर्षांची प्रदीर्घ संतपरंपरा हे महाराष्ट्राचे धार्मिक, सांस्कृतिक ऐश्वर्य. या प्रदीर्घ संतपरंपरेतील संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदास या अग्रणी संतांना ‘महाराष्ट्राचे पंचप्राण’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राएवढी प्रदीर्घ संतपरंपरा क्वचितच अन्य कोण्या प्रांत व प्रदेशाला लाभली असेल. या सकल संतमालिकेचा महाराष्ट्राच्या जडणघडणीतील वाटा फारच मोठा. ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणूनही या संतांच्या कार्याची नोंद काही अभ्यासकांनी केलेली आहे. प्रबोधन चळवळीतील न्या. म. गो. रानडे यांनी ‘मराठी सत्तेचा उदय’ (Rise of the maratha power) या ग्रंथात संत मंडळाच्या कार्याचे नेमकेपणाने योगदान अधोरेखित केले असून, बलाढ्य मोगलादी बादशहा-सुलतानांना शह देत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापण्याचा जो भीमपराक्रम केला, त्यामागे संतमंडळींनी केलेल्या समाजजागृतीचा, स्वधर्म-स्वदेश चेतनेचा मोठा वाटा आहे, हे न्या. रानडे यांनी न्यायाधीशाच्या भूमिकेतून दाखवून दिले आहे.
या संतांचे मुख्य कार्य हे धार्मिक-आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि ते स्वाभाविकही आहे. त्यांचे ओजस्वी, तेजस्वी साहित्य हेच त्यांचे साधन असून, त्यांच्या सामाजिक क्रांतिकार्याचे प्रभावी शस्त्रही आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामागे ‘बुडते हे जन न देखवे डोळा|’ अशी सामाजिक कणव आहे. संतांचे साहित्य हे ‘कलेसाठी कला’ अशा स्वरूपाचे नसून, ‘जीवनासाठी, जीवन उन्नत करण्यासाठी कला’ स्वरूपाचे आहे. ‘तैसा वाग्विलास विस्तारू| गीतार्थे विश्व भरू| आनंदाचे आवारू| मांडू जगा|’ असा त्यामागे व्यापक उद्देश आहे. एवढेच नव्हे, तर ‘जे का रंजले गांजले| त्यासी म्हणे जो आपुले| तोचि साधू ओळखावा| देव तेथेचि जाणावा॥’ असे समाजभानही त्यामागे आहे. अशा या संतसाहित्यातून घडणारे ‘रामदर्शन’ पाहण्यासाठी आपणास सर्वप्रथम महाराष्ट्र भूमीत नांदलेल्या पाच प्रमुख धर्मसंप्रदायांपैकी सर्वांत मोठ्या, विशाल ‘वारकरी’ भक्तिपरंपरेपासूनच श्रीगणेशा करावा लागतो. वारकरी भक्ती संप्रदायाला महाराष्ट्राची सत्त्वधारा म्हणूनही राजारामशास्त्री भागवत, इरावती कर्वे आदी अभ्यासकांनी गौरवलेले आहे.
श्रीगुरू निवृत्ती-ज्ञानदेवांचा ‘परब्रह्म राम’
पारमार्थिक समतेचा संदेश देणारे 13व्या शतकातील संत निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरू आणि सकल वारकरी संतांचे परात्पर श्रीगुरू मानले जातात. मध्ययुगीन भक्ती आंदोलनातील वारकरी संतसाहित्याचा आरंभ निवृत्तीनाथांपासून होतो. त्यांचे सुमारे 550 अभंग असून, त्यामध्ये सकल संतांच्या साहित्यातून प्रतित होणाऱ्या भक्तिविचारांची प्रकृती, प्रवृत्ती आणि प्रेरणा यांचे बीजरूप दर्शन घडते. निवृत्तीनाथांचे 50-55 अभंग राम आणि रामनामाचे महत्त्व सांगणारे आहेत. त्यातून ‘निवृत्ती परम निरंतर राम| सर्वाघटी राम बिंबलासे|’ असे रामाच्या परब्रह्म स्वरूपाचे निर्गुण दर्शन घडते. निवृत्तीनाथांचे शिष्य व धाकटे बंधू ज्ञानदेव. वारकरी विचारधारेचे-संप्रदायाचे प्रवर्तक व संघटक म्हणून त्यांचे कार्य अपूर्व आहे. ज्ञानदेव म्हणतात-
धन्य धन्य आमुचे जन्म|
मुखी रामनाम उत्तम॥
जया रामनामे प्रेम| तोचि तरेल सर्वथा॥
संत ज्ञानदेव हे सकल संत परंपरेचे मेरूमणी आहेत. मराठी साहित्य शारदेच्या गळ्यातील कंठमणी आहेत. अनेक संतांचे सांगाती, परात्पर गुरू, मार्गदर्शक आणि वारकरी भक्ती आंदोलनाचे प्रवर्तक आहेत. म्हणूनच सकल संतांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया|’ अशा श्रद्धाभावाने त्यांना वंदन केलेले आहे. महान योगी, प्रतिभासंपन्न महाकवी, साक्षात्कारी संत, द्रष्टा-क्रांतदश, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, विनय व वात्सल्याची प्रत्यक्ष मूत असलेल्या संत ज्ञानदेवांची विठ्ठलभक्ती सर्वश्रुत. पण त्यांच्या साहित्यात विठ्ठलाएवढेच रामनाम महात्म्यालाही विशेष स्थान आहे, याकडे अभ्यासकांचे, भाविकांचे फारसे लक्ष गेलेले नाही. विठ्ठलाची एकविध भक्ती हा वारकरी पंथाचा मुख्य आचार धर्म आहे; पण त्याचबरोबर नाम-रूप भेदापलीकडे ईश्वरी तत्त्व एकच आहे. अशा त्यांच्या उदात्त समन्वयशील दृष्टीला विठ्ठल, राम, कृष्ण, शिव सारे एकच आहेत. वारकऱ्यांच्या दृष्टीने विठ्ठल व रामात कोणताही भेद नाही. म्हणूनच विठ्ठलाच्या नामाने, विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य धन्य होणारे संत ज्ञानदेव उपरोक्त अभंगात, रामनामाने आपला जन्म धन्य धन्य झाल्याची कृतार्थता व्यक्त करतात.
‘राम कृष्ण हरी’ हा वारकऱ्यांचा सांप्रदायिक अधिकृत नामजपमंत्र आहे. या नामजपात थेट ‘विठ्ठल’, ‘पांडुरंग’ असे नाम नाही आणि तरीही हा अधिकृत नाममंत्र मानला गेला; कारण विठ्ठल हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे, अशी समस्त वारकऱ्यांची श्रद्धा असून ‘राम’, ‘कृष्ण’ आणि ‘हरी’ हे तिन्ही भगवान विष्णूंचेच अवतार आहेत. त्यामुळे ज्ञानदेवादि संतांच्या दृष्टीने जी रामभक्ती, तीच विठ्ठलभक्ती आणि जो रामनाम महिमा आहे, तोच विठ्ठलनाम महिमा आहे.
नामदेव गाथेतील ‘रामकथा माहात्म्य’
भक्ती आणि ज्ञानाचा सुरेख संगम साधून विठ्ठलभक्तीची पताका थेट पंजाबात फडकावणारे संतशिरोमणी, पांडुरंगाचा प्रेमभांडारी, संत ज्ञानदेवांचे सखेसांगाती संतशिरोमणी नामदेव. ‘ज्ञानदेवे रचिला पाया|’ ही संत बहिणाबाईंची उक्ती ‘ज्ञानदेवे-नामदेवे रचिला पाया|’ अशी परिवर्धित केली, तर अधिक सार्थ व समर्पक ठरावी, असे संत नामदेवांचे ज्ञानदेवांच्या कार्यामध्ये योगदान आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर उत्तर भारतीय लोकजीवनात समता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याचे महान कार्य संत नामदेवांनी (इ.स. 1270 ते 1350) केले. संत नामदेवांच्या कार्याचा गौरव अनेकांनी, अनेक प्रकारांनी केलेला आहे.
संत ज्ञानदेवांच्या समाधीनंतर पुढे तब्बल 50-55 वर्षे संत नामदेवांनी भक्तिपंथाचे नेतृत्व केले व विठ्ठलभक्ती सकल समाजात मोठ्या प्रेमभावाने रूजवली. इ.स. 1270 ते 1350 असा संत नामदेवांचा कार्यकाल असून, त्यांच्या कार्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजरात, राजस्थान, पंजाब आणि उत्तर भारतात आजही दिसून येतो. पंजाबमधील ‘घुमान’ शहरातील नामदेवांचे स्मृतिमंदिर-गुरुद्वारा त्याची धवल साक्ष आहे. संत नामदेवांनी ग्रंथलेखन केले नाही, पण त्यांच्या अभंगाची गाथा, ‘नामवेद’ म्हणूनच वारकऱ्यांमध्ये पूजनीय आहे. संत नामदेवांच्या अभंगरचना लडिवाळ असून आत्मनिष्ठ आहेत. संत नामदेव हे मराठीतील पहिले संत चरित्रकार आहेत. एवढेच नव्हे, तर डॉ. शं. गो. तुळपुळेंच्या मते संत नामदेव हे मराठीतील पहिले आत्मचरित्रकारही आहेत.
अयोध्यें केला अवतारू| राम नाम या दातारु॥
संत नामदेवांच्या अभंग गाथेमध्ये जी 30 प्रकरणे आहेत, त्यांत एक स्वतंत्र प्रकरण ‘श्री रामकथा महात्म्य’ नावाचे असून या प्रकरणात 27 अभंग आहेत. वारकरी संप्रदायाचा मंत्र ‘राम कृष्ण हरी’ असल्याने, वारकरी संतांना राम व विठ्ठल हे एकच आहेत हे आपण मागे सविस्तर पाहिले आहेच. त्यामुळे संत नामदेवांनी विठ्ठलाएवढेच जिव्हाळ्याने रामाबद्दल लिहिलेले आहे. वारकरी कीर्तनकारांना चैत्र शुद्ध नवमीच्या रामजन्म उत्सवाच्या कीर्तनास उपयुक्त ठरेल, अशा दृष्टीने अत्यंत संक्षेपात संत नामदेवांनी या प्रकरणात रामचरित्रातील ठळक प्रसंगाचे भक्तिभावपूर्ण वर्णन केलेले आहे. वारकरी संप्रदायात रामनवमीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. संत नामदेवांच्या या ‘रामकथा महात्म्य’ प्रकरणाबद्दल विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात, “संत नामदेव प्रभू रामचंद्र चरित्र तीन टप्प्यांत कथन करतात. पहिल्या टप्प्यात कौसल्येचे डोहाळे आणि प्रभू रामचंद्रांचा जन्म वर्णिलेला आहे. दुसऱ्या टप्प्यात रामचंद्रांचे सगळे चरित्र नामदेवांनी थोडक्यात सांगितले आहे. शेवटच्या टप्प्यात हनुमंताने रामदूत म्हणून जो पराक्रम केला आणि लंका जाळून एक प्रकारे सीताशुद्धी घडवून आणली, त्याचे गतिमान वर्णन आहे.” या तीन टप्प्यांतील अभंगातून नामदेवांच्या रामभक्तीचे विविध स्तर आपल्या डोळ्यांपुढे येतात.
संत नामदेवांचे मराठीप्रमाणेच अनेक हिंदी अभंग-पदे असून, त्यामधून रामभक्तीचे विलोभनीय दर्शन घडते. खरे तर, संत नामदेव विठ्ठलाचे सगुण उपासक आहेत, पण हिंदी पदामध्ये नामदेव रामाच्या निर्गुण रूपाचेच गुणकीर्तन करतात. शिखांच्या ‘गुरू ग्रंथ साहिब’ ग्रंथामध्ये संत नामदेवांचे 60 पेक्षा अधिक अभंग आहेत. त्यातही रामाचा उल्लेख आहे.
संत एकनाथांचे ‘भावार्थ रामायण’
महाराष्ट्रीय वैभवशाली संत मंडळींमध्ये 16व्या शतकात श्रीक्षेत्र पैठण येथे होऊन गेलेल्या संत एकनाथ (इ.स. 1533 ते 99) यांना ‘शांतिब्रह्म’ म्हणून ओळखले जाते. संत बहिणाबाई यांनी भागवत संप्रदायाचे ज्या रूपक अभंगात, ‘ज्ञानदेवे रचिला पाया|’ म्हणत संत ज्ञानदेवांचे आणि ‘तुका झालासे कळस|’ म्हणत संत तुकारामांचा सार्थ गौरव केला आहे; त्याच अभंगात संत एकनाथांच्या अपूर्व कार्याचा गौरव करताना बहिणाबाई म्हणतात, “जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत॥” महाराष्ट्रातील ज्ञानदेव-नामदेव प्रणित भक्ती चळवळीला पुनश्च सुदृढ बळकटी देण्याचे कार्य संत एकनाथांनी केलेले आहे.
संतकार्याचे सामाजिक मूल्यमापन करताना ज्येष्ठ विचारवंत प्रा. गं. बा. सरदार म्हणतात, “संत एकनाथ आदी संतमंडळाचे कार्य हा केवळ त्यांच्या अत्युत्कट भगवद्भक्तीचा सहजोद्रेक नव्हता, तर वस्तुतः ती धार्मिक प्रबोधनाची एक मोठी चळवळ होती. डॉ. सदानंद मोरे म्हणतात, “संतकार्यामुळे भक्ती चळवळीला नवचैतन्य प्राप्त झाले. संत एकनाथ हे कर्ते समाजसुधारक होते.”
मराठीतील पहिली ‘रामकथा’
फेडावया देवाची साकडी| स्वधर्म वाढवावया वाढी|
नामे मोक्षाची उभवावया गुढी|
सूर्यवंशा गाढी दशा आली॥
‘भावार्थ रामायण’ या प्रचंड ग्रंथाद्वारे मराठीत पहिली रामकथा लिहून वीररसाच्या संजीवनीने मृतवत समाजात पुरुषार्थाचे स्फुल्लिंग फुलविणाऱ्या, संत एकनाथांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव, न्या. रानडे यांनी “हे महाराष्ट्राचे खरे नाथ होत,” अशा शब्दांत केला असून तो गौरव सार्थ व समर्पक आहे. 297 अध्याय, 40 हजार ओव्यांचा सप्त खंडात्मक ‘भावार्थ रामायण’ वीररसयुक्त रामदर्शन आहे.
संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत सेना महाराज एवढेच नव्हेत, तर संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदास यांच्या अभंगातील रामदर्शनही मोठे हृद्य आहे. मात्र, या सर्व संतांनी गायलेला राममहिमा व संत एकनाथांनी गायलेला राममहिमा यात खूप फरक आहे. एकनाथ पूर्व संत साहित्यातून होणारे रामदर्शन हे भक्ती-आराधना-जप या उद्देशाने प्रेरित आहे. ते रामदर्शन प्रामुख्याने परब्रह्म, परमात्मा रामाचे म्हणजेच निर्गुण रामाचे आहे. त्यांच्या अभंगामध्ये रामायणातील काही प्रसंग, घटना त्यांचे केवळ उल्लेख आहेत. त्याचा उद्देशही रामनामाचे सामर्थ्य दाखवून, भक्तभाविकांना रामनामाकडे वळविण्याचा पुरता मर्यादित आहे. थोडक्यात एकनाथपूर्व संत साहित्यातील रामदर्शन हे नामस्मरण भक्तीएवढ्याच उद्देशाने आहे.
संत एकनाथ काळात राजकीय स्थितीमध्ये खूपच बदल होऊन, सारा महाराष्ट्र धर्मांध मुसलमान बादशहा- सुलतानांच्या ताब्यात गेलेला होता. आपला धर्म पालन करणे, हिंदूंना अशक्यप्राय झाले होते. सारा हिंदू समाज धर्मांध अत्याचारापुढे मृतवत झाला होता. अशा मृतवत हिंदू समाजात धर्मांध असुरी शक्तीविरुद्ध स्वधर्म-स्वसंस्कृतीविषयी स्वाभिमान जागृत करण्यासाठी, संत एकनाथांनी योद्ध्या रामाचे पुरुषाथ, स्वधर्मरक्षक, वीररसपरिपूर्ण असे चरित्र लिहिले. ते म्हणजे ‘भावार्थ रामायण!’ एकनाथपूर्व संतांचा ‘परब्रह्म राम’ आणि एकनाथांचा ‘पुरुषाथ योद्धा राम’ असा फरक आपणास स्पष्ट जाणवतो.भावार्थ रामायण लिहिण्यामागची एकनाथांची प्रेरणा निखळ सामाजिक व राष्ट्रीय आहे, लोकोद्धाराची आहे. म्हणून ते रामायणाला ‘जगदोद्धारक रामकथा’ म्हणतात. रामायणाकडे ‘राष्ट्रीय प्रेरणा ग्रंथ’ म्हणून ते पाहतात. संत एकनाथांनी ‘भागवत’ भाष्यामध्येही विष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीराम अवताराचे अनेक ओव्यातून वर्णन केलेले आहे. त्या राम अवतार दर्शनाच्या ओव्यांपैकी काही निवडक ओव्या पुढीलप्रमाणे आहेत,
जो अवताराचे मूळपीठ|
जो वीरवृत्ती आणि उद्धट|
तो अवतारामाजी श्रेष्ठ|
अतिवरिष्ठ ‘श्रीराम’॥ 245 (अ.4)
जो देवांचे बंध सोडी|
नवग्रहाची बेडी तोडी|
जेणे रामराज्याची रोकडी|
उभविली गुढी तिन्ही लोकी॥248॥
या लागी राम राम|
नित्य जपे जो हे नाम|
तो पुरुषांमाजी पुरुषोत्तम|
कर्माकर्म अतीत तो॥252॥
ऐशी रामनामाची ख्याती|
जगदुद्धारे केली कित|
धन्य धन्य जे परिसती|
धन्य जे गाती रामचरित्र॥254॥
‘राघवदास’ तथा
संत तुकारामांची रामभक्ती
‘तुका झालासे कळस|’ अशा शब्दांत ज्यांच्या अभंगकार्याचा गौरव केला जातो, ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज केवळ ‘वारकरी भूषण’, ‘महाराष्ट्र भूषण’च नव्हेत, तर महाराष्ट्राचे ‘संस्कृती पुरुष’ आहेत. संत ज्ञानदेवांनी सुरुवात केलेल्या स्वतंत्र दर्शनाच्या नव्या मांडणीवर तुकोबांनी पूर्णत्वाचा कळस चढविला. तुकोबांची अभंगसंपदा हे महाराष्ट्राचे, मराठी भाषेचे वैभव आहे. या अभंगांमध्ये जे विविध विषय आहेत, त्यामध्ये ‘श्रीरामचरित्र’पर 14 अभंग आहेत. तसेच, इतर काही अभंगांतूनही रामनामाचे महात्म्य त्यांनी गायलेले आहे. ‘झाले रामराज्य काय उणे आम्हासी|’ असे कृतकृत्यतेचे उद्गार त्यांच्या अभंगातील रामदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. तुकोबांना स्वप्नदृष्टांतात गुरूकडून लाभलेला मंत्रही ‘राम कृष्ण हरी’ हाच होता. तुकोबांच्या अभंगातून विशेषत्वाने जाणवणाऱ्या रामभक्तीविषयी डॉ. शं. दा. पेंडसे म्हणतात, “ही रामभक्ती संत एकनाथांकडूनच तुकोबांना मिळालेली दिसते.” तुकोबांनी साधकावस्थेमध्ये संत एकनाथांच्या ‘भावार्थ रामायण’ ग्रंथाचेही अध्ययन केले होते. याविषयी संत चरित्रकार महिपती (ताहराबादकर) म्हणतात, “प्रासादिक एकनाथांची वचने| जे का भावार्थ रामायण|”
रामनाम मंत्राचे तुकोबांनी विविध प्रकारे महात्म्य कथन केलेले आहे. या नाममंत्रासाठी काही आर्थिक मूल्य-पैसे मोजायचे नाहीत, ते मोफत आहे. त्यासाठी जाती-वर्णाचेही बंधन नाही. हे नाम घेण्याचा सर्वांना समान अधिकार आहे. हा सर्वांत सोपा व उघडा मंत्र आहे.
नाम घेता न लगे मोल|
दोचि अक्षराचे काम|
उच्चारावे रामनाम॥
नाही वर्ण धर्म याती|
नामी अवघेचि सस्ती|
तुका म्हणे राम नाम|
चैतन्य निजधाम॥
तुकोबांना विठ्ठलाएवढाच रामही प्राणप्रिय वाटत होता. गंमत म्हणजे, ‘रंगो रामनामी वाणी|’ अशी मागणी-विनवणी विठ्ठलाच्या पायी डोके ठेवून करतात. हेच त्यांच्या अद्वैतभक्तीचे दर्शन आहे. तुकोबा आपणास एका अभंगामध्ये ‘राघवदास’ म्हणवून घेण्यातही धन्यता मानतात. तुझे नाम माझे मुखी असो देवा| विनवितो राघव दास तुझा|
संतांची ‘रामभक्ती’ : काही अभंग वचनेपृथ्वी श्रीराम, आकाश हे धाम|
आपण विश्राम स्थूलरूपे॥
सूक्ष्म स्थूल राम साधक परम|
रामनाम सर्वोत्तम सर्वारूपी॥
निवृत्ती सप्रेम जोडती सर्वकाळ|
पंढरीये राम विश्रामले॥
- श्रीगुरू निवृत्तीनाथधन्य कुळ तयाचे|
राम नाम हेचि वाचे|
दोष हरतील जन्माचे|
श्रीराम म्हणताचि॥
कोटी कुळाचे उद्धरण|
मुखी राम नारायण॥
राम कृष्ण स्मरण|
धन्य जन्म तयाचे॥
- संत ज्ञानेश्वरराम नामे चित्त प्रेमे ओसंडत|
नित्यानित्य तृप्त हरिभक्ती॥
- संत मुक्ताबाई
अयोध्ये केला अवतारू|
राम नामया दातारू॥
श्रीराम सोयरा आला माझ्या घरा॥
दिधल्या म्या थारा हृदयामाजी॥
- संत शिरोमणी नामदेव
स्मरण हेचि करू|
वाचे राम राम स्मरू|
आणिक न करू काम|
वाचे धरू हाचि नेम॥
-संत जनाबाई
चोखा म्हणे हेचि ग्रंथाचे पै सार|
राम हा निर्धार जप करी॥
-संत चोखामेळाउठा उठा सकळीक घ्या रामनाम|
पूर्ण होय काम सत्य मान॥
-संत सेना महाराजनिज धर्माचे संरक्षण |
करावया दुष्ट निर्दाळण|
श्रीराम अवतार परिपूर्ण|
कृपेने आपण येथे आला॥
रणी भंगला रावण|
नित्य विजयी रघुनंदन॥
-संत एकनाथकेला रावणाचा वध|
अवघा तोडिला बंध|
लंका राज्ये विभीषणा|
केली चिरकाल स्थापना॥
औदार्याची सीमा|
काय वूर्ण रघुरामा॥
जाले रामराज्य काय उणे आम्हासी|
-संत तुकाराम रामा तू माझा जिवलग सांगाती|
झी मज अंती अंतरसी॥
उपनिषदाचे सार| राम रूप निर्विकार॥
-संत बहेणाबाई
(संत तुकाराम शिष्या)- विद्याधर ताठे
9881909775
[email protected]