रामकथा ही अनेक माध्यमांमधून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रवाही झाली. त्यामुळेच देशाच्या सर्व दिशांना ती पसरली आणि जनमानसामध्ये रुजली. यामध्ये देशाचा दक्षिण भागही आलाच. देशाच्या दक्षिणेकडच्या जनमानसावर असलेला चित्रपटांचा प्रभाव हा वादातीत असाच. या चित्रपटासारख्या माध्यमांनाही रामकथेची भूरळ पडली. आणि या चित्रपटांनी रामनामाची ही गंगा अधिकच प्रवाही केली. दक्षिणेस प्रसिद्ध झालेल्या चित्रपटांमधून प्रवाही झालेल्या रामकथेचा...
तामिळ चित्रपटसृष्टीत रामायणावर आधारित अनेक चित्रपट आले. प्रारंभीच्या पौराणिक चित्रपटांमध्ये (सुमारे 1930-1960च्या काळात) रामकथा प्रामुख्याने भक्तीपर स्वरूपात सादर केली गेली. या चित्रपटांमधून श्रीरामांचे दैवी आणि अलौकिक रूप अधोरेखित झाले. राम हे मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि धर्माचे पालन करणारे नायक म्हणून उभे राहिले. या चित्रपटांमधून त्यांचे व्यक्तिमत्त्व भक्तिभावाने सादर केलेले दिसते. सीतेचे चित्रणही या काळात अत्यंत पारंपरिक असेच होते. त्याकाळी आलेल्या चित्रपटांनी सीतेचे चित्र पतिव्रता, त्यागमूत आणि धैर्यशील स्त्री असेच रंगवले होते. मात्र, आधुनिक चित्रपटांमध्ये, सीतेचे व्यक्तिमत्त्व अधिक स्वतंत्र आणि स्वतःच्या अधिकारांच्या बाबतीत सजग असलेली स्त्री अशा रूपातही दिसू लागले आहे. रावणाच्या चित्रणातही काळानुसार बदल झाले. सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये तो स्पष्टपणे खलनायक म्हणून दाखवला गेला परंतु, नंतरच्या काही चित्रपटांत, विशेषतः ‘रावण’सारख्या चित्रपटात, त्याचे पुनर्मूल्यांकन करण्यात आल्याचे दिसते. त्याला विद्वान, सामर्थ्यवान आणि काही अंशी सहानुभूती मिळवणारे पात्र म्हणूनही दाखवले गेले. या बदलांवर त्या काळातील सामाजिक आणि राजकीय विचारधारांचा अप्रत्यक्ष असलेला प्रभाव सहज दिसून येतो. विशेषतः स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात दक्षिण भारतात काही ठिकाणी, रामकथा वेगळ्या दृष्टिकोनातून मांडली गेली. द्रविड चळवळीच्या प्रभावाखाली, उत्तर भारतीय ‘आर्य’ परंपरेविरोधात रामायणाकडे टीकात्मक नजरेने पाहिले गेले. काही विचारवंतांनी तर उत्तर आणि दक्षिण भारत यांमध्ये भेद अधोरेखित करण्याचाही प्रयत्न केला.
ई. वी. रामासामी ‘पेरियार’ यांनी रामाचे चित्रण आक्रमक शासक म्हणून, तर रावणाचे स्थानिक नायक म्हणून करण्याचा प्रयत्न केला. काही साहित्य, नाटके आणि कथनांमध्ये रावणाला विद्वान व न्यायप्रिय राजा म्हणून मांडले गेले, तर रामाला बाहेरून आलेला शासक म्हणून दाखवण्यात आले होते. या दृष्टिकोनातूनच पारंपरिक रामभक्तीला ग्रहण लावणारा एक विचारप्रवाह निर्माण झाल्याचे दिसते. याचा वापर काही राजकीय गटांनी प्रादेशिक ओळख बळकट करण्यासाठीही केला. तथापि, दक्षिण भारताच्या जनमानसामध्ये मात्र रामभक्तीची समृद्ध परंपरा आजही घट्टपणे दृढ आहे. कंबन यांचे कंबरामायणम् अत्यंत लोकप्रिय असून, त्यात श्रीराम आणि सीता यांचे अत्यंत गौरवपूर्ण आणि भावपूर्ण वर्णन केलेले आहे. आजच्या काळात, विशेषतः दूरदर्शन मालिकांमध्ये, मूळ रामायण कथनाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न होताना दिसून येतो.
सीता कल्याणम् (1934)
या तामिळ चित्रपटाचे विशेष असे की, याची निर्मिती ‘प्रभात फिल्म कंपनी’ने केली होती. आणि हा चित्रपट बाबुराव पेंढारकर यांनी, के. रामनाथ यांच्याबरोबर दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या निर्मितीमागे एक वेगळीच कहाणी आहे. व्ही. शांताराम यांनी आपल्या ‘सैरंध्री’ या मराठी चित्रपटातील आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी, हा तामिळ चित्रपट करण्याचे ठरवले. खर्च कमी करण्यासाठी कोल्हापूरमधील आधीच्याच सेट्सचा पुनर्वापर करण्यात आला.
चित्रपटाची कथा सीतेच्या स्वयंवरावर आधारित आहे. मिथिलानगरीचे राजा जनक आपल्या कन्या सीतेसाठी स्वयंवर आयोजित करतात. स्वयंवरचा पण असा असतो की, जो शिवधनुष्य उचलून त्यास प्रत्यंचा लावू शकेल, त्याला सीता वरमाळा घालेल. अनेक राजे आणि राजकुमार अपयशी ठरतात, परंतु अयोध्येचा राजकुमार श्रीराम सहजपणे धनुष्य उचलतात आणि सीतेशी विवाह करतात. चित्रपटातील गाणी थेट चित्रीकरणावेळीच कलाकारांनी स्वतः गायली होती. त्यावेळी वाद्यवृंद कॅमेराच्या मागून वाजत असे. ही त्या काळातील पद्धत होती. ‘सीता कल्याणम्’ हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला आणि व्ही. शांताराम यांचा हा प्रयोग मोठाच यशस्वीही ठरला.
लवकुश (1963)
हा चित्रपट एकाचवेळी तामिळ आणि तेलुगू भाषेत चित्रित केला होता. याचे लेखन व दिग्दर्शन सी. पुल्लय्या आणि सी. एस. राव यांनी केले. ‘ललिता शिवज्योती फिल्म्स’ने निर्मिती केलेला हा चित्रपट, 1934 मधील लवकुश चित्रपटाची पुनर्निर्मिती होती.
या चित्रपटाची कथा रामायणातील उत्तर कांडावर आधारित असून, राम आणि सीतेचे जुळे पुत्र लव आणि कुश यांच्या जीवनावर हा चित्रपटाची कथा केंद्रित आहे. चित्रपटात एन. टी. रामाराव यांनी रामाची, तर अंजली देवी यांनी सीतेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तब्बल 27 गाणी होती.
‘लवकुश’ हा सुद्धा दक्षिणेकडे प्रचंड लोकप्रिय ठरला. हा चित्रपट तब्बल 75 आठवडे चित्रपटगृहात दाखवला गेला आणि 1963 साली त्याने एक कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. या चित्रपटाच्या तेलुगू आवृत्तीला, सर्वोत्तम तेलुगू चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पुढे हा चित्रपट कन्नड आणि 1974 साली हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला.
या चित्रपटातील कथानकाची सुरुवात रामाच्या राज्याभिषेकाने आणि रामराज्याच्या सुवर्णकाळाने होते. मात्र, एका धोब्याने सीतेच्या पावित्र्यावर प्रश्न उपस्थित केल्याने, राम तिला वनवासास पाठवतात. वनात सीता लव आणि कुश यांना जन्म देते. ते मोठे होत असताना अखेरीस अयोध्येत पोहोचतात. पुढे रामाच्या अश्वमेध यज्ञानिमित्तान,े वडील आणि पुत्र यांच्यात संघर्ष उभा राहतो. शेवटी लव-कुश यांचा राज्याभिषेक होतो आणि राम आपला अवतार संपवून देवलोकात परत जातात.
संपूर्ण रामायणम् (1958)
या पौराणिक चित्रपटाचे दिग्दर्शन के. सोमू यांनी केले. हा चित्रपट वाल्मिकींच्या रामायणावर आधारित असून, यामध्ये एन. टी. रामाराव यांनी श्रीरामांची, तर शिवाजी गणेशन यांनी भरताची भूमिका साकारली आहे. 1958 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ‘सिल्व्हर जुबिली’ हिट ठरला. 1960 साली तो हिंदीत ‘रामायण’ या नावानेही प्रदर्शित झाला.
हा चित्रपट संपूर्ण रामायणाची कथा प्रभावीपणे मांडतो. अयोध्येचा राजा दशरथ निःसंतान असल्याने चिंताक्रांत असतो. राज पुरोहित असलेल्या वसिष्ठ ऋषींच्या सल्ल्याने तो पुत्रकामेष्टी यज्ञ करतो. त्यातून राजा दशरथाचे चार पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न जन्म घेतात. दुसरीकडे मिथिलेचा राजा जनकाला शेतात एक बालिका सापडते, तीच सीता. विश्वामित्र ऋषी राम-लक्ष्मणाला आपल्या यज्ञरक्षणासाठी घेऊन जातात. ते दोघे ताडका, मारीच आणि सुबाहू यांचा पराभव करून, यज्ञ यशस्वी करतात. पुढे सीतेच्या स्वयंवरात राम शिवधनुष्य उचलून भंग करतात. स्वयंवराचा पण जिंकल्यावर दोघांचा विवाह होतो.
रामांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असतानाच, कैकेयीच्या दासी मंथरेच्या प्रभावामुळे रामांना 14 वर्षांचा वनवास आणि भरताला राज्य अशी मागणी केली जाते. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासास जातात. भरत मात्र रामांच्या पादुका ठेवून राज्य चालवतो. वनात शूर्पणखेचा अपमान झाल्यावर रावण सीतेचे अपहरण करतो. जटायू प्रयत्न करूनही अपयशी ठरतो. पुढे राम-लक्ष्मणांना शबरी भेटते आणि ते सुग्रीव व हनुमानाशी मैत्री करतात. हनुमान लंकेत जाऊन सीताशोध घेतो आणि रामाला संदेश देतो. राम सेतू बांधून वानरसेनेसह लंकेवर आक्रमण करतात. भीषण युद्धात कुंभकर्ण व इंद्रजित मारले जातात आणि शेवटी राम रावणाचा वध करतात. सीता अग्निपरीक्षेद्वारे आपले पावित्र्य सिद्ध करते. शेवटी राम अयोध्येत परत येतात आणि त्यांचा राज्याभिषेक होतो. रामराज्याची पुन्हा स्थापना होते.
नंदमुरी तारक रामाराव (एन. टी. आर.) हे भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक, संपादक आणि पुढे राजकारणी म्हणूनही त्यांनी मोठे योगदान दिले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चारवेळा, एकूण सात वर्षे कार्यभार सांभाळला. 1982 साली त्यांनी ‘तेलुगू देशम पाट’ची स्थापना केली होती.
‘सीता राम कल्याणम्’ हा 1961 सालचा तेलुगू पौराणिक चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शनही एन. टी. रामाराव यांनीच केले आहे. या चित्रपटात त्यांनी स्वतः रामाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आणि अनेक पुरस्कारही या चित्रपटाने मिळवले. हा चित्रपट तामिळ भाषेतही प्रदर्शित झाला. एन. टी. रामाराव यांनी ‘लवकुश’ (1963), ‘श्री रामांजनेय युद्धम्’ (1974) यांसारख्या चित्रपटांत, भगवान रामाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली होती. तसेच श्रीकृष्ण, भगवान शिव आणि श्रीराम या देवतांच्या भूमिकांमुळे ते जनमानसात अतिशय लोकप्रिय झाले. त्यांच्या या भूमिकांमुळे त्यांना, ‘जनतेचा तारणहार’ अशीही ओळख मिळाली आणि भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी एक वेगळीच छाप निर्माण केली.
श्रीरामराज्यम् (2011)
जुन्या ‘लवकुश’ चित्रपटाचा ‘श्रीरामराज्यम्’ या नावाने पुन्हा नव्याने केला गेला. तामिळ, तेलुगू, मल्याळी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. हिंदीत हाच चित्रपट ‘अयोध्यापती श्रीराम’ या नावाने प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात नंदमुरी बालकृष्ण यांनी भगवान रामाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका त्यांच्या वडिलांनी, एन. टी. रामाराव यांनी मूळ ‘लवकुश’मध्ये साकारली होती. चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांनी दिले होते. ‘श्रीरामराज्यम्’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तो व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरला. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.
त्याशिवाय ‘सेतुबन्धनम्’ हा 1937 साली प्रदर्शित झालेला चित्रपट रामायणावर आधारित होता. ‘सीता राम कल्याणम्’ हा 1961चा चित्रपट. तसेच बरेच चित्रपट तामिळ आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांत काढले गेले.
एकूणच दक्षिणेतील चित्रपटसृष्टीने दक्षिण भारतामध्ये रामायणाचे अनेक प्रवाह आणले. कालौघात त्यात बदलही झाले. रामकथेची ही निर्मळ गंगा दक्षिणेमध्ये प्रवाही करण्यामध्ये तामिळी चित्रपटसृष्टीची भूमिका निश्चितच व्यापक अशीच..