‌‘हरिकथे‌’तील रामकहाणी

    25-Mar-2026
Total Views |

वैष्णव भक्तीची एक मोठी परंपरा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अस्तित्त्वात आहे. देशाचा दक्षिण भागही या वैष्णव भक्तीच्या रसामध्ये न्हाहून निघाला. यामध्ये रामकथेचा प्रसारदेखील लक्षणीय झाला. हा प्रसार होण्यासाठी महत्त्वाची ठरली ती, हरिकथा परंपरा. या परंपरेमुळेच दक्षिण आणि उत्तर असे देशाचे दोन भाग करण्यासाठी देवतांचा आणि संस्कृतीचा आश्रय घेणाऱ्यांचे अनेक मनसुबे उधळले गेले. हरिकथा, तिचे देशाच्या दक्षिण भागातील अनेक राज्यांमध्ये बदलणारे स्वरुप, त्यांची वैशिष्ट्य अशा अंगानी या हरिकथेतील रामकथेचा घेतलेला मागोवा...

दक्षिण भारतात कंबन यांचे ‌‘कंबरामायणम्‌‍‌’ अत्यंत लोकप्रिय आहे, ज्यामध्ये श्रीराम आणि सीतामाई यांचे गौरवपूर्ण वर्णन केलेले दिसते. या रसाळ रामकथेचा आधार घेऊनच साध्या श्रद्धाळू ‌‘हरिकथा‌’ सादर करणाऱ्या साधकांनी, ‌‘रामकथा‌’ जिवंत ठेवली. जनसामान्यांना या कथेचा, त्यातील जीवनमूल्यांचा विसर पडू दिला नाही. दक्षिण भारतातील समृद्ध सांस्कृतिक परंपरांमध्ये ‌‘हरिकथा‌’ हा एक अत्यंत प्रभावी आणि लोकमान्य कलाप्रकार आहे. कथा, संगीत, नृत्य, वाङ्मय आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेली ही परंपरा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, ती समाजप्रबोधनाचे आणि नैतिक मूल्यांच्या संवर्धनाचहेी प्रभावी माध्यम आहे. आजच्या बदलत्या काळातही हरिकथेचे महत्त्व अबाधित राहिले आहे, हे तिच्या आशयातील गूढता आणि सादरीकरणातील आकर्षणांमुळेच.

हरिकथा म्हणजे भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांशी संबंधित कथा सांगण्याची एक पारंपरिक पद्धत. कथाकार (हरिदास किंवा भागवत) संगीत, अभंग, लोक, संवाद आणि अभिनय यांच्या साहाय्याने कथेचे सादरीकरण करतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये हरिकथेची वेगवेगळी रूपे आढळतात. प्रत्येक प्रदेशात भाषिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांनुसार हरिकथेत सूक्ष्म बदलही दिसतात; परंतु तिचा गाभा एकच... परमेश्वर भक्ती आणि नैतिकता.

‌‘वैष्णव‌’ आणि ‌‘माध्व‌’ परंपरेचा प्रभाव

दक्षिण भारतातील हरिकथेवर ‌‘वैष्णव‌’ आणि विशेषतः ‌‘माध्व‌’ परंपरेचा मोठा प्रभाव आहे. भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांवरील श्रद्धा, भक्ती आणि तत्त्वज्ञान यांचे सखोल विवेचन हरिकथेतून केले जाते. मध्वाचार्यांच्या ‌‘द्वैत वेदांता‌’चा प्रभाव कथनात स्पष्ट दिसतो. जीव आणि ईश्वर यांतील भेद, ईश्वरभक्तीचे महत्त्व आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग यांची शिकवण कथेमधून दिली जाते. याच अनुषंगानेच रामाचीही कथा आपोआपच गुंफली जाते.

पुरंदरदास यांच्या रचनांचा वापर (कर्नाटक)

कर्नाटकातील हरिकथेत संत पुरंदरदास यांच्या रचनांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना ‌‘कर्नाटक संगीताचे पितामह‌’ असे म्हटले जाते. त्यांच्या कृत्यांमध्ये साधी भाषा, सखोल अध्यात्मचिंतन आणि लोकाभिमुखता आढळते. हरिकथाकार त्यांच्या कीर्तनांचा आणि पदांचा उपयोग करून, कथा अधिक प्रभावी बनवतो. त्यामुळे श्रोत्यांना केवळ कथा ऐकण्याचाच नव्हे, तर भक्ति रसात तल्लीन होण्याचा अनुभव येतो.

‌‘हरिकथा भागवत‌’ परंपरा

आंध्र प्रदेशात ‌‘हरिकथा भागवत‌’ ही परंपरा विशेष प्रसिद्ध आहे. येथे कथाकाराला ‌‘भागवतार‌’ असे म्हणतात. ‌‘भागवतार‌’ केवळ कथन करत नाही, तर तो गायक, वादक आणि कधीकधी अभिनेतादेखील असतो. तो संस्कृत लोक, तेलुगू पदे आणि स्थानिक बोलीतील संवाद यांच्या माध्यमातून कथा जिवंत करतो. ही परंपरा अत्यंत सजीव आणि संवादात्मक आहे, ज्यामुळे श्रोते कथेशी एकरूप होतात. भागवत सांगताना, एकूणच दशावतार आणि त्यातील श्रीविष्णू अवतार, श्रीराम हे उल्लेख स्वाभाविक येतात. ज्यामुळे श्रीराम कुणी पर, उत्तर भारतीय आक्रमक नसून आपलाच आहे, हा भाव सामान्यांमध्ये रुजतो.

हरिकथेत रामायणाचे सादरीकरण

हरिकथेत रामायणाला विशेष स्थान आहे. संपूर्ण ‌‘रामायण‌’ सांगण्याऐवजी, निवडक प्रसंग सांगण्यावरच भर दिला जातो. उदाहरणार्थ- रामजन्म, सीता स्वयंवर, वनवास, सुग्रीव मैत्री, हनुमानाचे पराक्रम, आणि रावणवध.

कथाकार प्रथम संस्कृत लोक सादर करतो, त्यानंतर त्याचे सोप्या भाषेत त्यावर भाष्य करतो. त्यात भावपूर्ण भक्तिगीते आणि कधीकधी विनोदी प्रसंगही लिलया गुंफले जातात. त्यामुळे ही कथा केवळ बोध देणारी रूक्ष विचार सांगणारी न राहता, ती रसपूर्ण आणि मनाला भिडणारी होते. या कथांमधूनच श्रोत्यांना श्रीरामाच्या आदर्श जीवनातून कर्तव्य, त्याग आणि धर्मनिष्ठा यांचे महत्त्वही समजते.

मंदिर, उत्सव आणि रामनवमीतील सादरीकरण

हरिकथा ही केवळ रंगमंचापुरतीच मर्यादित नसून ती गावोगावी मंदिरांमध्ये, जत्रांमध्ये आणि विविध उत्सवांमध्ये सादर केली जाते. विशेषतः रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी आणि अन्य धार्मिक सणांच्या वेळीही हरिकथांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. या कार्यक्रमांमुळे गावातील सर्व वयोगटांतील लोक एकत्र येतात. सामूहिक श्रवणाच्या अनुभवातून, सामाजिक ऐक्य वाढते आणि परंपरेचा वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरित होतो.

महिला हरिकथा कलाकारांची परंपरा

दक्षिण भारतातील अनेक महिला हरिकथा कलाकारांनी या परंपरेला समृद्ध केले. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या सादरीकरणात कोमलता, भावपूर्णता आणि स्पष्ट अभिव्यक्ती यांचा सुंदर मिलाफ दिसतो. प्राचीन भारतातील पवित्र आदर्श स्त्रिया- सीता, द्रौपदी, कन्नगी, गाग, तारा, मंदोदरी,अनसूया या कथेतून, पुन्हा एकदा जीवनाचे सार समजावतात. दहा भाषणांनी होणार नाही असे संस्कार या महिला कथावाचकांच्या एका सादरीकरणाने जनमानसावर होतात. महिला कलाकारांमुळे हरिकथेला एक वेगळाच दृष्टिकोन लाभला आहे. त्यांनी स्त्रीजीवन, कुटुंबातील भूमिका आणि समाजातील स्त्रियांचे स्थान, यांसारख्या विषयांवरही प्रकाश टाकला आहे. नव्याचा स्वीकार करताना जुनी आदर्श जीवनमूल्ये हरिकथेमधून ठसवली जातात.

नैतिक मूल्यांचे शिक्षण

‌‘हरिकथा‌’ म्हणजेच धार्मिक कथेतून नैतिक शिक्षण प्रभावीपणे देण्याचे साधन होय. धर्म, कर्तव्य, आदर्श गृहस्थाश्रम, राजधर्म आणि सामाजिक जबाबदारी यांचे विवेचन कथेमधून केले जाते.

‌‘रामायण‌’ आणि ‌‘महाभारता‌’तील उदाहरणांच्या माध्यमातून सत्य, प्रामाणिकपणा, त्याग आणि न्याय यांचे महत्त्व पटवून दिले जाते. त्यामुळे श्रोत्यांवर दीर्घकालीन परिणाम होतो आणि त्यांच्या आचार-विचारांमध्ये सकारात्मक बदल घडतो.

समाजप्रबोधनाचे साधन

‌‘हरिकथा‌’ ही समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे. पारंपरिक विषयांबरोबरच अनेक हरिकथाकारांनी सामाजिक प्रश्नांवरही भाष्य केले आहे. अंधश्रद्धा, जातिभेद, शिक्षणाचे महत्त्व, स्त्रीशिक्षण यांसारख्या विषयांना कथेमध्ये स्थान देण्यात आले आहे.

सोप्या भाषेत आणि मनोरंजक पद्धतीने मांडणी केल्यामुळे संदेश लोकांपर्यंत सहज पोहोचतो. त्यामुळे ‌‘हरिकथा‌’ ही केवळ भूतकाळातील परंपरा नसून, वर्तमानातील सामाजिकबदलाची साधनाही आहे.

परिणाम

हरिकथेचा समाजावर बहुआयामी परिणाम झाला आहे. एकीकडे ती धार्मिक आणि आध्यात्मिक जडणघडण करते, तर दुसरीकडे नैतिक आणि सामाजिक मूल्ये रुजवते. ग्रामीण भागात विशेषतः ‌‘हरिकथा‌’ ही लोकशिक्षणाचे माध्यम ठरली आहे. आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले असले, तरी हरिकथेचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट, तिच्या माध्यमातून पारंपरिक मूल्ये आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज अधिक जाणवते.

‌‘दक्षिण भारतातील हरिकथा‌’ ही एक समृद्ध, बहुआयामी आणि जिवंत परंपरा आहे. ती केवळ कथा सांगण्याची कला नसून, ती जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणारी, समाजाला दिशा देणारी आणि संस्कृतीचे संवर्धन करणारी एक प्रभावी साधना आहे. आंध्र प्रदेशातील ‌‘बुर्रकथा‌’ ही एक वैशिष्ट्यपूर्ण लोककला आहे. ‌‘बुर्रा‌’ म्हणजे कवटी; त्या आकाराच्या ढोलाच्या ठेक्यावर भटक्या कलावंतांकडून कथा सादर केल्या जातात. तामिळनाडूमधील ‌‘विल्लू-पट्टू‌’ या परंपरेत धनुष्याच्या तारांवर आघात करत, घंटांच्या निनादात कथा आणि गीते रंगतात.

‌‘कृते यद्ध्यायतो विष्णुं कलौ तद्‌‍ हरिकीर्तनात्‌‍‌’ या लोकानुसार, पूवच्या युगांत कठोर साधना आवश्यक होती; परंतु कलियुगात ‌‘हरिकीर्तन‌’ हा देवप्राप्तीचा सहज मार्ग मानला जातो. ‌‘हरिकथा‌’, ‌‘हरिकीर्तन‌’ आणि ‌‘कथाकलाक्षेप‌’ हे समानाथ शब्द असून, पुराणकथा व महाकाव्यांचे संगीतासह रसाळ निवेदन हा त्यांचा गाभा आहे. महाराष्ट्रात ‌‘कीर्तन‌’, तर दक्षिणेत ‌‘कथाकलाक्षेप‌’ ही संज्ञा प्रचलित आहे. तामिळनाडूमध्ये कथा ‌‘तामिळ‌’ भाषेत सांगितली जाते; पण संस्कृत, मराठी, तेलुगू, कन्नड, हिंदी अशा विविध भाषांतील रचना त्यात गुंफलेल्या असतात. तंजावूरच्या चोल, नायक आणि मराठा या सत्ताकाळांमुळे या कलेला वैविध्य लाभले. 1850च्या सुमारास तामिळ-मराठी संगमातून ‌‘तंजावूरशैली‌’ विकसित झाली आणि शतकभर लोकप्रिय राहिली.

‌‘निरूपण‌’ या परंपरेत कथा-गीते लिखित स्वरूपात जतन झाली आहेत. वैदिक काळातील ‌‘आख्यान‌’ आणि ‌‘सूत-पौराणिक‌’ ही कथनपरंपरा, तसेच तामिळ ‌‘तोन्मै‌’ या संकल्पना या कलेची प्राचीन मुळे दर्शवतात.

तंजावूरमध्ये मराठी कीर्तन येण्यापूव तीन शैली प्रचलित होत्या- ‌‘कथाप्रसंग‌’ (संगीतासह कथा), ‌‘प्रवचन‌’ (तात्त्विक विवेचन) आणि ‌‘कथाकलाक्षेप‌’ (कथा, संगीत, नृत्य यांचा संगम). तंजावूर कृष्ण भागवतार यांनी या कलेला नवे रूप देत मराठी छंदांचा समावेश केला. ही परंपरा ‌‘कीर्तन‌’, ‌‘हरिकथा‌’, ‌‘कथाकलाक्षेप‌’ अशा विविध नावांनी ओळखली जाते. कर्नाटकातही तिच्यावर पंढरपूर भजन परंपरा आणि तंजावूर हरिकथेचा प्रभाव दिसतो. अशा रीतीने ‌‘हरिकथा‌’ ही केवळ कथा सांगण्याची पद्धत नसून भक्ती, संगीत आणि संस्कृती यांचा सुंदर संगम घडवणारी समृद्ध परंपरा आहे. आजच्या काळात या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कारण, याच ‌‘हरिकथे‌’मधून रामकथा आणि आदर्शत्वाची मूल्ये समाजामध्ये अखंडपणे प्रवाही होणार आहेत.

- डॉ. रमा गर्गे
9421219859