स्वान्तः सुखाय लिहिली ‌‘रघुनाथगाथा‌’

    25-Mar-2026
Total Views |

एका हस्तलिखित पोथीवरून दुसरी पोथी नकलून काढली जाई, तर दुसरीवरून तिसरी. असा क्रम काही हजार वर्षे चालू होता. अगदी दोन-अडीचशे वर्षांपूवपर्यंत म्हणजे जोवर छपाईचे तंत्रज्ञान आले नव्हते, तोपर्यंत चालू होता. सुवाच्य अक्षरात ग्रंथ लिहिणे अथवा आणखी कुणाकडून लिहून घेणे आणि ते हस्तलिखित योग्य व्यक्तींना भेट देणे, ही परंपरादेखील तशी जुनीच. प्राचीन काळापासून आजवर किती पोथ्या लिहिल्या गेल्या असतील, याचा अंदाज लावणेही तसे अवघडच काम. प्राचीन भारतीय साहित्याशी संबंधित आज उपलब्ध असलेल्या पोथ्या पाहिल्या; तर त्यातही ‌‘रामायण‌’, ‌‘महाभारता‌’च्या पोथ्यांची संख्या इतर कोणत्याही ग्रंथापेक्षा जास्तच भरेल. देशाच्या उत्तर भारतातील ‌‘रामायणा‌’वर भाष्य करणाऱ्या हस्तलिखितांचा घेतलेला मागोवा...

आपले प्राचीन वाङ्मय हजारो वर्षांपासून चालत आलेल्या मौखिक आणि लिखित परंपरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले. विशेषतः ‌‘रामायण‌’ आणि ‌‘महाभारत‌’ यांच्या परंपरा एखाद्या जिवंत झऱ्याप्रमाणे, भारतीय साहित्यसागराच्या स्रोत होत. ‌‘आर्ष‌’ म्हणजेच, ऋषींनी रचलेल्या या महाकाव्यांच्या पठणाची परंपराही फार प्राचीन आहे. याचा इसवी सनाच्या सहाव्या शतकातील पुरावा अगदी कंबोडियामधील एका मंदिरात मिळाला आहे.

हे ग्रंथ नेमके कधी लिपिबद्ध झाले असतील, हे सांगणे तसे खूपच कठीण आहे. एका हस्तलिखित पोथीवरून दुसरी पोथी नकलून काढली जात असे आणि दुसरीवरून तिसरी. असा क्रम काही हजार वर्षे चालू होता. अगदी दोन-अडीचशे वर्षांपूवपर्यंत छपाईचे तंत्रज्ञान अजून आले नव्हते, तोपर्यंत चालू होता. दूरदर्शनवर ‌‘रामायण‌’, ‌‘महाभारत‌’ मालिकांचे प्रसारण होत असताना रस्ते ओस पडायचे, हा काळ अनेकांनी अनुभवला आहे. प्राचीन काळातही हे ग्रंथ इतकेच लोकप्रिय होते की, रचना झाली तेव्हापासून आजवर त्यांच्या किती पोथ्या लिहिल्या गेल्या असतील, याचा अंदाज लावणेही अवघड आहे. प्राचीन भारतीय साहित्याशी संबंधित आज उपलब्ध असलेल्या पोथ्या पाहिल्या; तर त्यातही ‌‘रामायण‌’, ‌‘महाभारता‌’च्या पोथ्यांची संख्या इतर कोणत्याही ग्रंथापेक्षा जास्त भरेल.

प्राचीन काळी कागद नव्हता, तेव्हा ताडपत्रांवर म्हणजे ताडाच्या झाडाच्या पानांवर लिहित असत. दक्षिण भारतात ताडपत्रांवर कोरून लिहिले जात असे. हिमालयासारख्या पर्वतीय प्रदेशात, समुद्रसपाटीपासून साधारण चार हजार मीटर उंचीवर भोजाची झाडे वाढतात. त्या भागात, विशेषतः काश्मीरमध्ये या झाडांच्या सालीवर, म्हणजेच भूर्जपत्रांवर बोरूच्या किंवा कुंचल्याच्या साहाय्याने लिहिले जाई. त्यासाठी वापरली जाणारी शाई पाण्यात न विरघळणारी होती. संस्कृत भाषेतच; पण त्या-त्या प्रदेशातील लिपीमध्ये संस्कृत ग्रंथ लिहिले जात असत. काश्मीरमध्ये भूर्जपत्रांवर ‌‘शारदा‌’ नावाच्या लिपीत लिहिलेल्या पोथ्या सापडतात. काश्मीरहून आणलेल्या अशा काही पोथ्या पुण्याच्या ‌‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरा‌’च्या संग्रहात आहेत. गुजरात, राजस्थानात पोथ्या लिहून आणि जपून ठेवण्याची मोठीच परंपरा होती. तेथील राजांनी, संस्थानिकांनी शेकडो पोथ्या लिहून घेऊन, स्वतःचे खासगी ग्रंथसंग्रह निर्माण केले. नेपाळमध्ये पोथ्या खूप चांगल्याप्रकारे जतन झालेल्या दिसतात. ‌‘रामायण‌’, ‌‘महाभारत‌’ यांसारख्या ग्रंथांच्या आज उपलब्ध असलेल्या सर्वांत जुन्या प्रती नेपाळमध्येच मिळाल्या आहेत. ‌‘रामकथे‌’ची व्याप्ती भारतापुरतीच मर्यादित नव्हती. तिचे आताच्या भारताबाहेरील अनेक भाषांमध्ये अनुवाद प्राचीन काळीच केले गेले आहेत. ‌‘तिबेटी‌’, ‌‘खोतानी‌’ इत्यादी ‌‘रामायणे‌’ त्या-त्या प्रदेशात सापडलेल्या हस्तलिखितांमधूनच उजेडात आली.

एका हस्तलिखितावरून दुसरे लिहिताना त्यात चुका होणे, काही बदल होणे, जाणीवपूर्वक बदल करणे अशा गोष्टी घडणे स्वाभाविकच. पण, त्यामुळे मूळ लोकांमध्ये फरक पडला. विविध पाठपरंपरा निर्माण झाल्या. ‌‘रामायण‌’ आणि ‌‘महाभारता‌’च्या पाठपरंपरेचे प्राधान्याने दोन भाग पडतात, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय. उत्तर आणि दक्षिणेत आढळणाऱ्या पोथ्यांमध्ये अध्यायसंख्या, लोकसंख्या यात बराच भेद दिसून येतो. मजकूर काही ठिकाणी कमी, तर कधी जास्त घातलेला दिसतो. या सर्व बाबींचा अभ्यास चिकित्सक आवृत्ती तयार करताना केला जातो. ‌‘वाल्मीकी रामायणा‌’ची चिकित्सक आवृत्ती बडोद्याच्या ‌‘ओरिएण्टल रिसर्च इन्स्टिट्यूट‌’ने तयार केली आहे. ‌‘रामायणा‌’च्या ‌‘बालकाण्डा‌’चे उदाहरण घ्यायचे झाले, तर त्यासाठी 85पेक्षा जास्त पोथ्यांचा सूक्ष्म अभ्यास केला गेला. ‌‘रामायणा‌’ची सर्वांत जुनी पोथी संवत्‌‍ 1076 म्हणजेच, इ. स. 1020 यावष लिहिलेली आहे. ‌‘नेवारी‌’ लिपीत ताडपत्रांवर लिहिलेली ही पोथी नेपाळमध्ये काठमांडूत सापडली. ‌‘महाभारता‌’ची सर्वात प्राचीन पोथीदेखील नेपाळमध्येच सापडली होती, ही बाब लक्षणीय अशीच. ‌‘रामायणा‌’च्या बाबतीत उत्तरेतील पोथ्यांमध्येही पश्चिम भारतातील, वायव्य आणि ईशान्य भारतातील अशा तीन परंपरा दिसतात. ‌‘रामायणा‌’च्या चिकित्सक आवृत्तीच्या संपादकांच्या मते, उत्तरेकडच्या तुलनेत दक्षिण भारतातील पोथ्यांमध्ये ‌‘वाल्मीकी रामायणा‌’चा जास्त जुना पाठ जतन केलेला आढळतो. त्यामुळे दोन पाठपरांपरामध्ये जिथे लोकांच्या बाबतीत फरक आढळला, तिथे संपादकांनी दक्षिणी पाठाचा स्वीकार केला आहे. उत्तरेकडील परंपरांनीही काही ठिकाणी प्रसंगानुरूप बदल केल्याचे दिसते. उदाहरणार्थ, कैकेयी वायव्य प्रांतातील असल्यामुळे कदाचित असेल; पण वायव्येकडील ‌‘रामायणा‌’च्या परंपरेत कैकेयीची प्रतिमा थोडी उजळण्याचा प्रयत्न दिसतो. देवनागरी व्यतिरिक्त नेपाळी, मैथिली, बंगाली, शारदा, तेलुगु, ग्रन्थ, मल्याळम्‌‍ या लिपींमध्ये लिहिलेल्या पोथ्याही संपादकांनी अभ्यासल्या. देवनागरी लिपीमधील हस्तलिखिते उत्तर आणि दक्षिण भारतात सर्वत्र लिहिली गेली. ती वगळता, इतर लिपींपैकी पहिल्या चार उत्तरेतील; तर शेवटच्या तीन दक्षिण भारतातील आहेत.

सर्वसाधारणपणे पोथ्यांमध्ये चित्रे आढळत नाहीत. त्यामुळे सचित्र हस्तलिखित पोथ्या दुमळ आणि विशेष महत्त्वाच्या ठरतात. अकबरानेही शेकडो ग्रंथांच्या सचित्र पोथ्या तयार करून घेतल्या होत्या. सुबकरीत्या बांधलेली, पर्शियन सुलेखनकारांनी लिहिलेली आणि उत्तम चित्रकारांनी ज्यात चित्रे काढली आहेत अशी 24 हजार हस्तलिखिते त्याच्या ग्रंथालयात होती, असे सांगितले जाते. त्यातल्या बहुतांश पोथ्या आता नष्ट झाल्या असल्या, तरी काही पोथ्या आजही भारतातील आणि भारताबाहेरील काही ग्रंथालयांमध्ये जपून ठेवलेल्या दिसतात. ‌‘वेद‌’, ‌‘रामायण‌’ आणि ‌‘महाभारत‌’ या ग्रंथांमध्ये त्याला खूप रस होता. यांचे ‌‘फारसी‌’ अनुवाद करवून घेऊन त्याने, त्यांची हस्तलिखिते सुंदर हस्ताक्षरात लिहून घेतली आणि त्यातील कथांवर चित्रे काढून घेतली. सेनापती, सरदार इत्यादींना तो अशा पोथ्या भेट देत असे. इसवी सन 1582 मध्ये अशीच एक सुंदर पोथी अकबराने त्याचा सेनापती अब्दुल रहीमसाठी तयार करून घेतली. पर्शियन प्रकारच्या 346 हातकागदांवर लिहिलेली ही पोथी, आज अमेरिकेतील ‌‘स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट‌’मध्ये आहे. ज्यांना ‌‘मिनिएचर पेंटिंग्ज‌’ म्हणतात, अशी 130 चित्रे त्यात आहेत. प्रत्येक चित्राआधी एक पातळ कागद लावलेला असून, त्यावर बरेचदा त्या-त्या कलाकाराने स्वतःचे नाव लिहिलेले आहे. श्यामसुंदर, कासीम, नन्द, गोवर्धन अशी अनेक नावे दिसतात.

हस्तलिखित पोथ्यांमध्ये आढळणाऱ्या चित्रांचे रंग विविध खनिजद्रव्यांपासून बनवले जात असत. जसे- गेरू, अळता, शंख, चुना, नीळ, हरताळासारख्या पदार्थांचा रंग म्हणून वापर झालेला दिसतो. इतकेच काय, चांदी आणि सोन्याचा पातळ पापुद्रा घेऊन, त्याच्या रंगाची निर्मिती होते. अर्थातच, अशा पोथ्या एखाद्या अतिश्रीमंत व्यक्तीने अथवा राजानेच तयार करवून घेतलेल्या असत.

जगतसिंग नावाच्या मेवाडच्या राजाने इसवी सन 1649 ते 1653 या काळात तयार करवून घेतलेली ‌‘रामायणा‌’ची पोथीदेखील प्रसिद्ध आहे. यात मेवाड चित्रशैलीत चितारलेली 400हून अधिक चित्रे आहेत. तत्पूव, जगतसिंगाने ‌‘भागवतपुराण‌’, ‌‘गीतगोविन्द‌’ अशा ग्रंथांच्या सचित्र पोथ्या तयार करवून घेतल्या होत्या. या सर्व हस्तलिखितांतील बरीचशी चित्रे साहिबदिन नावाच्या चित्रकाराने, जसवंत भट्टारक यांच्या मार्गदर्शनाखाली काढली आहेत. साहिबदिनच्या हाताखाली अनेक चित्रकार काम करत असावेत. ‌‘रामायणा‌’च्या पोथीचाही तोच प्रमुख चित्रकार होता. त्यातील 158 चित्रे साहिबदिनने काढली आहेत. मनोहर नावाच्या चित्रकाराचेही नाव पोथीत येते. ‌‘रामायणा‌’त सात कांडे आहेत. एका कांडातील सर्व चित्रे एकाच चित्रकाराने काढली असल्याचे दिसते. अकबराच्या ‌‘फारसी रामायणा‌’त एका चित्रात एकच प्रसंग चित्रित केलेला दिसतो. याउलट, ‌‘रामायणा‌’च्या ‌‘मेवाडी‌’ पोथीत एकाच चित्रात एका छोट्या कथाभागातील महत्त्वाचे सर्व प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न दिसतो. दुर्दैवाने ही पोथी पूर्ण होण्याआधीच जगतसिंगाचा मृत्यू झाला. त्याच्या मुलाला या विषयात फार रस नसल्याने, पोथी पूर्ण होऊ शकली नाही, असा अंदाज आहे. आज या पोथीचे तीन भाग होऊन ते मुंबई, उदयपूर आणि लंडन येथे आहेत. ‌‘फारसी रामायणा‌’ची 18व्या शतकातील एक सचित्र पोथी रामपूर रझा ग्रंथालयात आहे. तिच्यात 258 चित्रे आहेत.

‌‘वाल्मीकी रामायण‌’ आणि ‌‘रामायणा‌’वर आधारित ‌‘रामायणकथासार‌’, ‌‘रामचरितमानस‌’ इत्यादी ग्रंथांच्या 100हून अधिक पोथ्या ‌‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरा‌’त आहेत. ‌‘वाल्मीकी रामायणा‌’च्या सुमारे 70 पोथ्या आहेत. क्षेमेन्द्राच्या ‌‘रामायणकथासारा‌’च्या एका हस्तलिखितात विविध रंगांमध्ये रंगवलेली 22 चित्रे आहेत. संस्थेच्या संग्रहातली ‌‘रामायणा‌’ची सर्वांत जुनी पोथी इ. स. 1456 यावष म्हणजेच, आजपासून बरोबर 570 वर्षांपूव लिहिली गेलेली आहे. तर, ‌‘रामायणसारा‌’च्या जुन्या पोथ्यांपैकी सर्वांत जुनी पोथी इ. स. 1395 या वर्षातली आहे. ‌‘रामकथा‌’ विविध प्रकारे, वेगवेगळ्या भाषांमध्ये सांगितली गेली. या प्रादेशिक भाषांमधील ‌‘रामायणां‌’ना त्या-त्या प्रदेशात खूप लोकप्रियता लाभल्याचेही दिसते. जसे की, ‌‘तुलसीरामायण‌’ किंवा बंगालमधील ‌‘कृत्तिवासी रामायण‌’. कृत्तिबास ओझा यांनी 14-15व्या शतकात ‌‘कृत्तिवासी रामायणा‌’ची रचना केली. या ‌‘रामायणा‌’तील वीरबाहूवधाच्या कथेची एक पोथी ‌‘भांडारकर‌’ संस्थेच्या संग्रहात आहे. इसवी सनाच्या 17व्या शतकातील ही पोथी बंगाली भाषा आणि बंगाली लिपीत लिहिलेली आहे.

यावष जानेवारीतील ‌‘रामायण‌’विषयक एक बातमी लक्षवेधक अशीच होती. अयोध्येतील ‌‘आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालया‌’ला 233 वर्षांपूवची ‌‘वाल्मीकी रामायणा‌’ची एक पोथी भेट देण्यात आली. देवनागरी लिपीतील ही पोथी विक्रम संवत्‌‍ 1849 म्हणजेच इसवी सन 1792 मध्ये लिहिली गेली आहे. महेश्वरतीर्थ यांची ‌‘रामायणावरची टीका‌’ (म्हणजे भाष्य) महत्त्वाची मानली जाते. या पोथीतही महेश्वरतीर्थांच्या टीकेसह लिहिलेले ‌‘रामायण‌’ आहे. प्राचीन टीकाकारांना उपलब्ध असणाऱ्या, ते टीका करत असलेल्या काव्यांच्या पोथ्या आज नष्ट झाल्या आहेत. याचाच अर्थ, आज या टीकाच आपल्याला त्या ग्रंथांच्या जास्त जुन्या पोथ्यांपर्यंत घेऊन जातात. म्हणूनच, प्राचीन साहित्याच्या अभ्यासासाठी टीकाग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हेच ‌‘रामायणा‌’च्या या पोथीचे महत्त्व आहे.

हस्तलिखिते लिहिण्याचा हा दीर्घोद्योग लोक पिढ्यान्‌‍पिढ्या का करत असावेत, असा प्रश्न साहजिकच पडतो. याचे उत्तर यश किंवा धन नसून, तुलसीदासांनी ते पुढील शब्दांत सांगून ठेवले आहे,

स्वान्तः सुखाय तुलसीरघुनाथगाथा|
भाषानिबन्धमतिमञ्जुलमातनोति॥

- डॉ. अमृता नातू
(लेखिका भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये कार्यरत आहेत.)
9359570834