रामायण असो वा महाभारत, या दोन्ही ग्रंथात केवळ धार्मिक किंवा नैतिक मूल्यांचीच अभिव्यक्ती नाही, तर त्यामध्ये भारतीय उपखंडातील विविध प्रदेशांना जोडणाऱ्या सांस्कृतिक आणि भौगोलिक अनुभवांचीही साखळी आहे. महाभारताचा भौगोलिक पट आसामपासून गांधारपर्यंतच्या पूर्व-पश्चिम पट्ट्यात पसरलेला दिसतो, तर रामायणाची कथा अयोध्येपासून सुरू होऊन गंगातट, विन्ध्य प्रदेश, दंडकारण्य आणि पुढे दक्षिणेकडील प्रदेशांपर्यंत विस्तारलेला श्रीरामांचा वनवास, भारतीय भूगोलाच्या व्यापक पटावर उलगडताना दिसतो. या भौगोलिक भागात झालेल्या उत्खननाविषयी...
स्वातंत्र्य मिळाल्यावर, आपल्या इतिहासाचा शोध आधुनिक पद्धतीने घेण्यास सुरुवात झाली. अर्थात, उत्खननाद्वारे प्राचीन नगरी शोधण्याचे काम सुरू झाले. महाभारतात उल्लेखलेल्या स्थळांचा शोध प्रख्यात पुरातत्त्वज्ञ बी. बी. लाल यांनी 1950-1952 या काळात घेतला. हस्तिनापूर, अहिछत्र, कुरुक्षेत्र आदि स्थळांवर त्यांनी उत्खनन केले. सर्वांत खालच्या थरात त्यांना Painted Grey Ware (PGW) म्हणजे, राखाडी रंगाच्या भांड्यांचा शोध लागला. उत्खनन करताना विविध स्तरांतून मिळालेल्या अवशेषांतून त्यांनी काही कालखंड ठरवले आहेत.
इ.स. पूर्व 2,600 ते इ.स. पूर्व 1,200 Ochre Coloured Pottery (OCP) गेरु रंगाची भांडी इ.स. पूर्व 1,200 ते इ.स. पूर्व 600 Painted Grey Ware (PGW) राखाडी रंगाची भांडी इ.स. पूर्व 700 ते इ.स. पूर्व 200 Northern Black Polished Ware (NBPW) उत्तर भारतीय काळ्या रंगाची चकाकी असणारी भांडी या संशोधनामुळे लाल यांचा उत्साह द्विगुणित झाला. पुढे काही वर्षांनी म्हणजे सन 1976 मध्ये, रामायणातील काही स्थळांचे उत्खनन त्यांनी सुरू केले. रामायणात उल्लेखलेल्या स्थळांचे उत्खनन आणि संशोधन, पुढे सन 1986 पर्यंत सुरू होते. या उत्खननासाठी त्यांनी वाल्मीकि रामायणातील पाच स्थळे निवडली.
अयोध्या ः उत्तर प्रदेशातील शरयू नदीच्या उजव्या तटावर वसलेले हे नगर, रामायण काळातील महत्त्वाचे नगर होते. कोसल राज्याची ही राजधानी होती. अयोध्येतील एक चौ. किमीमधील एका टेकाड आणि इतर 14 ठिकाणी त्यावेळी उत्खनन करण्यात आले. त्यामध्ये जन्मभूमी स्थळ, हनुमान गडी, कौसल्या घाट या स्थळांचादेखील समावेश होता. या उत्खननातून लोहाची आणि तांब्याची हत्यारे सापडली. तसेच Northern Black Polished Ware (NBPW) भांडीदेखील सापडली. या ठिकाणी शुंग, कुषाण आणि गुप्त काळातील वसाहतीचेदेखील पुरावे मिळाले. अयोध्येजवळील रानोपाली येथे इसवी सनाच्या पहिल्या शतकातला, एक शिलालेख मिळाला. त्या लेखावर ‘धनदेवाने बांधलेले केतन (देऊळ?)’ असा उल्लेख आहे. आणि या धनदेवाचे विशेषण ‘कोसलाधीप’ असे आहे. यावरून त्याकाळीदेखील कोसल राज्य अस्तित्वात असावे, असे दिसते. अयोध्यातील रामजन्मभूमी परिसरात केलेल्या उत्खननातून जे अवशेष मिळाले, ते पुढे न्यायालयात जन्मभूमीची बाजू मांडताना अतिशय महत्त्वाचे ठरले.
श्रृंगवेरपूर : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील गंगेच्या डाव्या तीरावर वसलेले हे गाव. या ठिकाणी असलेल्या टेकाडाचे उत्खनन केले गेले. येथे गेरु रंगाची मातीची भांडी मिळाली (Ochre Coloured Pottery - OCP) याचा कालखंड NBPW (Northern Black Polisehed Ware) पेक्षा आधीचा आहे. इथेदेखील शुंग, कुशाण आणि गुप्त काळाचे पुरावे आणि त्याचबरोबर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा जलवितरण व्यवस्थेचेही अवशेष मिळाले.
भारद्वाज आश्रम : आधीच्या दोन स्थळांप्रमाणे या ठिकाणी टेकडीवजा परिसर नव्हता, तर ही जागा सपाट होती. प्रयागराज जिल्ह्यातील या ठिकाणी असलेले भारद्वाज ऋषींचे मध्ययुगीन काळातले मंदिर, तिथे रामायण काळात भारद्वाज ऋषींचा आश्रम असल्याचे साक्ष देत होते. येथील उत्खननात भट्टीत भाजलेल्या विटा, भांडी, टेराकोटाच्या छोट्या मूत, अभिलेख असलेल्या मुद्रा मिळाल्या. या सर्व गोष्टी गुप्त काळातील होत्या, तर अधिक उत्खनन केल्यावर छइझथ प्रकारची भांडीदेखील मिळाली.
चित्रकूट : सध्याच्या काळातील उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर असणाऱ्या या प्रदेशात, मंदिरांची दाटी आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्खनन अवघड होते. पण बी. बी. लाल यांनी या ठिकाणी काही उत्खनन केले आणि इथेदेखील त्यांना छइझथ प्रकारची भांडी मिळाली, या पुराव्यातून चित्रकुटाची प्राचीनता सिद्ध झाली.
नंदीग्राम : श्रीरामांच्या वनवास काळात भरताने याच ठिकाणाहून कोसल राज्याचा राज्यकारभार पाहिला. तो नंदिग्रामपासून दूर एकाकी राहात असे. याठिकाणीदेखील वरीलप्रमाणेच अवशेष मिळाले.
या उत्खननातून एक मोठी गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे, या सर्व ठिकाणी, काळाच्या एका टप्प्यावर, एकाचवेळी मानवी वस्ती होती. या प्रदेशांमध्ये इ.स. पूर्व पहिल्या सहस्रकापासून, मानवी वस्ती अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होते. काही ठिकाणी जलव्यवस्थेच्या रचनाही आढळल्या असून, त्या त्या काळातील सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक विकासाचा संकेत देतात.
या उत्खननांमधून रामायणातील घटनांची ऐतिहासिक तिथी निश्चित करणे शक्य नसले, तरी रामायणात उल्लेखिलेल्या अनेक स्थळांवर प्राचीन काळापासून वस्ती आणि सांस्कृतिक व्यवहार अस्तित्वात होते, हा महत्त्वाचा निष्कर्ष निघतो.
अयोध्येपासून सुरू झालेला श्रीरामांचा प्रवास गंगातट, विंध्य प्रदेश, दंडकारण्य, किष्किंधा आणि पुढे दक्षिण सागरापर्यंत पोहोचतो. हा प्रवास भारतातील अनेक भौगोलिक प्रदेशांना जोडतो. लाल यांच्या संशोधनात्मक उत्खननाप्रमाणेच, रामायणातील इतर ठिकाणीदेखील असे संशोधन करणे महत्त्वाचे ठरते. याशिवाय, रामायणाशी संबंधित इतरही अनेक पुरातत्त्वीय आणि शिलालेखीय पुरावे आढळतात. प्रयागराजमधील गढवा किल्ल्यावर केलेल्या उत्खननातून प्राचीन वास्तूचे अवशेष सापडले असून, काही विद्वानांच्या मते, हे अवशेष स्थानिक शिलालेखात उल्लेख राम मंदिराचे असू शकतात. या परिसरात आढळलेल्या एका शिलालेखात, चंदेल राजवंशातील राजा कृतिवर्मनच्या काळात (इ.स. 11वे शतक) रामाशी संबंधित धार्मिक परंपरेचा उल्लेख आढळतो. त्यानुसार श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी चित्रकुटाकडे जाताना, या प्रदेशात विश्रांती घेतल्याची मान्यता आहे. (ऑर्गनायझर 20 सप्टेंबर 2025)
Archaeology of Ramayana sites या बी. बी. लाल यांच्या संशोधन प्रकल्पातील सर्वांत महत्त्वाचे आणि कायद्याच्या कसोटीवर सिद्ध झालेले संशोधन म्हणजे, बाबरी मशिदीच्या आवारातील उत्खनन. या ठिकाणी सर्वांत खालच्या स्तरात NBPW तर सापडलेच, पण त्यावरच्या थरांमध्ये आधीच्या मंदिरांचेही फाऊंडेशन मिळाले.
सन 1976 मध्ये अयोध्यातील रामजन्मभूमी परिसरातील उत्खननास सुरुवात झाली, त्यावेळी बी. बी. लाल यांच्याबरोबर संशोधकांचा एक गटदेखील होता. त्या गटात प्रोफेसर लाल यांचे विद्याथ आणि तरुण संशोधक होते, के. के. मोहम्मद. त्यांचे रामजन्मभूमी संदर्भातील योगदान मोठेच आहे. बाबरी ढाँचाच्या पश्चिमेला असणाऱ्या वास्तूचे अवशेष हे दहाव्या आणि 11व्या शतकात, गुर्जर प्रतिहार वंशाने बांधलेल्या मंदिराचे अवशेष असल्याचे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आणि त्याचवेळी बाबरी मशिदीच्या जागी पूव राम मंदिर होते, हेदेखील त्यांनी पुराव्यानिशी सांगितले.
दि. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी ढाँचा पाडण्यात आला, त्यानंतर झालेल्या उत्खननातून 200 हून अधिक शिल्प पटले (sculpture panels) आणि जुन्या मंदिराचे अवशेष सापडले. त्याचबरोबर काही शिलालेखसुद्धा सापडले. यामधील सर्वांत महत्त्वाचा शिलालेख म्हणजे ‘विष्णू हरी’ शिलालेख. 12व्या शतकातील हा शिलालेख गडवाल राजा गोविंदचंद्राच्या कारकिदत कोरला गेला. या शिलालेखातील महत्त्वाचा उल्लेख म्हणजे. ‘बालीला आणि रावणाला ठार मारणारा.’ यावरूनच हे मंदिर रामाशी संबंधित होते, हे अधोरेखित होते.
उत्खननात सापडलेल्या सर्व मूत, शिलालेख, अभिलेख असणाऱ्या मूत आणि इतर गोष्टी ‘अयोध्या ट्रस्ट’तर्फे , आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालयात ठेवल्या जाणार आहेत. याशिवाय अयोध्या, लखनौ आणि Archaeological Survey of India म्हणजे, पुरातत्त्व खात्याच्या संग्रहातही अशा वस्तू जतन केल्या गेल्या आहेत. रामायणात वर्णिलेला ‘दंडकारण्य प्रदेश’देखील संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आधुनिक भूगोलानुसार हा प्रदेश मध्य भारतातील विस्तीर्ण वनक्षेत्राशी संबंधित मानला जातो. या भागात विविध ठिकाणी प्रागैतिहासिक व ऐतिहासिक काळातील मानवी वस्तीचे पुरावे आढळले आहेत.
रामायणात वर्णिलेल्या किष्किंधा प्रदेशाशी संबंधित स्थळांची ओळख, आधुनिक काळात प्रामुख्याने हंपी परिसराशी जोडली जाते. तुंगभद्रा नदीच्या काठी असलेल्या या प्रदेशात अनेक प्राचीन गुहा, टेकड्या आणि मानवी वस्तींचे अवशेष आढळतात. या परिसरातील पुरातत्त्वीय अवशेषांवरून, प्राचीन काळापासून येथे मानवी वस्ती अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होते.
त्याचप्रमाणे रामायणातील दक्षिणेकडील महत्त्वाचे तीर्थस्थान म्हणजे रामेश्वरम्. परंपरेनुसार येथे रामाने लंकेकडे प्रस्थान करण्यापूव, शिवपूजा केल्याचा उल्लेख आढळतो. विशेषतः रामसेतू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सागरी रचनेबाबतही भूगभय आणि उपग्रहाधारित निरीक्षण झाले आहे. मात्र, या रचनेचा उगम नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत.
या सर्व पुरातत्त्वीय संशोधनातून घटनांची तिथी निश्चित करता येत नाही; परंतु यातून दोन मुद्दे स्पष्ट होतात. पहिला म्हणजे, रामायणात असलेल्या अनेक स्थळांमुळे प्राचीन काळापासून मानवी वस्ती अस्तित्वात होती आणि दुसरा म्हणजे, अयोध्या आणि आसपासच्या परिसरात मानवी वस्ती आणि त्याअनुषंगाने प्राचीन धार्मिक परंपरा अस्तित्वात होत्या.
रामायण काळातील पुरातत्त्वीय संशोधन हे यापुढेही सुरूच राहणार आहे. पण या सर्वांपलीकडे जाऊन भारतीय जनमानसांत श्रीराम कथा आजही नांदत आहे. इथल्या परंपरेत, रोजच्या जीवनात, पूजेत, मंदिरात श्रीराम वसले आहेत. संत तुकाराम म्हणतात,
अणुमाजि राम रेणुमाजि राम|
तृणीकाष्ठी राम वर्ततसे|
बाहेरी अंतरी राम चराचरी|
विश्व विश्वाकारि व्यापलासे॥
- विनिता फाटक-हिरेमठ
8308908899