तृणमूलचा ‌‘रामद्वेष‌’

    25-Mar-2026   
Total Views |

मागील काही वर्षांपासून रामनवमीच्या शुभदिनी हिंदूंनी काढलेल्या शोभायात्रांवर दगडफेक करणे, यात्रामार्गात ऐनकेन प्रकारे विघ्न आणणे, असे प्रकार धर्मांधांकडून वाढलेले दिसतात. आता रामनवमीच्या पूर्वी अशीच एक संतापजनक घटना प. बंगालमध्ये उघडकीस आली. बंगालमध्ये निवडणुकांमुळे वातावरण तापलेले असताना, नंदीग्राममध्ये प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. हा पुतळा खास रामनवमीच्या निमित्ताने तयार केला जात होता. परंतु, जिहाद्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना करीत, शिरही काढून नेण्याचा नीचपणा केला. नंदीग्राम हा बंगालमधील भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांचा मतदारसंघ. त्यामुळे मुद्दाम अधिकारींना आणि हिंदूंना खिजवण्यासाठीच जिहाद्यांकडून हा अश्लाघ्य प्रकार केला गेल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

प. बंगालमध्ये अशाच प्रकारे मंदिरातील देवी-देवतांच्या मूर्तीच्या विटंबनेचे प्रकार नवीन नाहीत. यापूर्वीही, दुर्गामातेच्या मूर्तीला असेच लक्ष्य करण्यात आले होते. आता रामनवमी अवघ्या काही तासांवर असताना, जिहाद्यांनी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विटंबना केली. बंगालमधील ‌‘रामद्वेष‌’ हा असल्या जिहाद्यांपासून ते अगदी मुख्यमंत्री ममतादीदींच्याही नसानसांत भिनलेला! ‌‘जय श्रीराम‌’ची घोषणा कानी पडताच, दीदींचा तर तिळपापड होतो. म्हणून, मागे ‌‘जय श्रीराम‌’ घोषणा देणाऱ्यांना त्यांनी थेट तुरुंगात डांबले. एवढेच नाही, तर मागे तृणमूलचा आमदार मदन मिश्राने तर चक्क “प्रभू श्रीराम हे मुस्लीम होते,” असा हिंदूंच्या आस्थांना, श्रद्धांना मुद्दाम धक्का लावणारा निर्लज्जपणे दावा केला होता, तर तृणमूलचा राज्यसभेतील खासदार साकेत गोखलेने अयोध्येतील राम मंदिराविरोधात याचिकाही दाखल केली होती. एकूणच काय, तर प. बंगालमध्ये हिंदू बहुसंख्य असले; तरी तेच सध्या दहशतीखाली जगत असल्याचे चित्र आहे. मागे ममतादीदींनी तर, “आम्ही सत्तेत नसल्यास हिंदूंना संपवायला एक सेकंदही लागणार नाही,” असे म्हणत, याच जिहादी फौजांची भीती हिंदूंच्या‍ मनात घालण्याचा प्रयत्न केला होता. आता हिंदूंना जीवितासाठी, धार्मिकस्वातंत्र्यासाठी दीदींना सत्तेवरून खाली खेचावेच लागेल, अन्यथा भविष्यात बंगालची स्थितीही बांगलादेशसारखी झाल्याशिवाय राहणार नाही!

काश्मीरचे ‌‘जिनाप्रेम‌’

अभ्यासक्रमातील पुस्तके आणि वाद हे समीकरण नवीन नाहीच. मग ती पुस्तके ‌‘एनसीईआरटी‌’ची असो वा अन्य राज्यांतील. अभ्यासक्रमांतून दिशाभूल करणाऱ्या, अपूर्ण किंवा गैरलागू इतिहासाचे विद्यार्थ्यांना धडे देण्याचे खोडसाळ प्रकार हे एकप्रकारे इतिहासाचे विकृतीकरणच. असाच काहीसा प्रकार जम्मू-काश्मीर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या एका पुस्तकात आढळून आल्याने वादंग निर्माण झाला. कारण, राज्यशास्त्राच्या ‌‘एमए‌’साठीच्या पुस्तकात ‌‘अल्पसंख्याक आणि देश‌’ या धड्यात पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवताच, ‌‘अभाविप‌’नेही याविरोधात कडक पवित्रा घेतल्यामुळे हा उल्लेख आता इतिहासाच्या पुस्तकातून हटविला जाणार आहे. पण, मुळात असा उल्लेख राज्यशास्त्राच्या पुस्तकात करण्यामागचे कारणच काय? अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या समितीला हा संदर्भ खटकला का नाही? यांसारखे प्रश्न उपस्थित होतात.

याच पुस्तकात पूव ‌‘द्विराष्ट्रवादा‌’च्या सिद्धांताविषयीच्या धड्यात जिनांचे नाव होते. ते तसे असण्याबद्दल वादही नाही. पण, अभ्यासक्रमबदलानंतर हा उल्लेख टाळून थेट जिनांची ‌‘भारतातील अल्पसंख्याकांचे नेते‌’ म्हणून प्रतिमानिर्मितीत करण्यात काय हशील? ज्या जिनांमुळे भारताची दुर्दैवी फाळणी झाली, लाखो हिंदूंचे रक्त सांडले, लाखोंना विस्थापित व्हावे लागले, त्या जिनांचा ‘अल्पसंख्याकांचे नेते‌’ असा उदोउदो करायची मुळी तसूभरही गरज नाहीच. परंतु, राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुखांनुसार हे सगळे ‌‘यूजीसी‌’च्या आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या नियमानुसार करण्यात आले. विद्यार्थ्यांना इतिहासाचे सर्व कंगोरे, दृष्टिकोन समजावे, हा म्हणे आमचा हेतू होता. पण, अशा अर्धवट, दिशाभूल करणाऱ्या इतिहासाचे काश्मीरसारख्या आधीच संवेदनशील राज्यांत काय परिणाम उमटतील, हे राज्यशास्त्राच्या प्राध्यापकालाही कळू नये? काँग्रेससह डाव्यांनी कायमच इतिहासाचा हिंदूंविरोधात अस्त्रासारखा वापर करून कित्येक पिढ्यांच्या मनात मुस्लीम शासकांपासून ते नेत्यांची एक सकारात्मक प्रतिमा पेरण्याचे षड्यंत्र यशस्वी केले. हासुद्धा तसाच काहीसा प्रकार. तेव्हा अशा प्रकारांपासून सावध राहून, वेळीच अशा षड्यंत्रांचा भांडाफोड करणे महत्त्वाचे!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची