गुजराती लोकसंस्कृतीतील रामगाथा

    25-Mar-2026
Total Views |

गुजरात ही भक्तीची भूमी. येथील सांस्कृतिक जडणघडणीत ‌‘वैष्णव‌’ परंपरेचा वाटा सिंहाचा. भगवान कृष्णाच्या द्वारकेमुळे गुजरातला ‌‘कृष्णभूमी‌’ म्हटले जाते; परंतु वैष्णव धर्माच्या प्रभावामुळे ‌‘राम‌’ आणि ‌‘कृष्ण‌’ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून लोकमानसात रुजले आहेत. 15व्या शतकात नरसिंह मेहता यांनी ‌‘वैष्णव जन तो तेणे कहिये...‌’ सारख्या पदांतून जो रामतत्त्वाचा प्रचार केला, तो लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचाच भाग झाला. गुजरातमधील ‌‘रामानंदी संप्रदाय‌’ आणि ‌‘स्वामीनारायण संप्रदाय‌’ यांनी, रामभक्तीला लोकसंस्कृतीचा अविभाज्य घटक बनवले. याच गुजरातच्या लोकधारेमध्ये मुरलेल्या रामकथेचा आढावा...

लोककथा आणि मौखिक वाङ्मय

गुजराती मौखिक साहित्यात ‌‘रामायण‌’ हे केवळ महष वाल्मीकींच्या संस्कृत लोकांपुरतेच मर्यादित नाही. काळाच्या ओघात अनेक लोककवींनीही आपल्या प्रादेशिक बोलीत (सौराष्ट्री, कच्छी, भिल्ली) रामायणाला मानवी भावभावनांचे नवे आयाम दिले.

मानवी राम ः लोककथांमध्ये राम हा केवळ ‌‘अवतारी पुरुष‌’ नसून, ‌‘मर्यादा पुरुषोत्तम‌’ आणि संकटांशी लढणारा एक धीरोदात्त नायक म्हणून येतो. तो सामान्यांसारखाच सुख-दुःखाचा अनुभव घेताना दिसतो.

शबरी आणि केवट ः गुजरातच्या आदिवासी पट्ट्यात (डांग आणि साबरकांठा) शबरीच्या बोरांच्या कथा मौखिक परंपरेने जिवंत आहेत. येथील लोककथांत राम हा जातिभेद मिटवणारा ‌‘समतावादी‌’ राजा म्हणून चित्रित झाला आहे.

डांगी रामायण आणि स्थानिक संदभर्

डांगमधील आदिवासींमध्ये ‌‘डांगी रामायण‌’ ही एक स्वतंत्र मौखिक परंपरा आहे. हे रामायण ‌‘वाल्मीकी रामायणा‌’पेक्षा वेगळे असून, त्यात स्थानिक भूगोलाचा संदर्भ आढळतो.

अंजनी कुंड (हनुमानाचा जन्म) ः
डांगमधील लोक मानतात की, हनुमानाचा जन्म याच भागात झाला. राम येथे आले, तेव्हा अंजनी मातेने त्यांना हनुमानाची ओळख करून दिली, ज्यामुळे या भूमीचे रामाशी अतूट नाते जोडले गेले.

वनरक्षक राम ः स्थानिक कथेनुसार, रावणाने सीतेचे हरण करून नेताना डांगमधील टेकड्यांवर विश्रांती घेतली होती. रामाने पाठलाग करताना, येथील आदिवासींना धनुष्यबाण चालवण्याची कला शिकवली, जेणेकरून ते जंगलाचे रक्षण करू शकतील. आजही ‌‘डांग दरबार‌’सारख्या उत्सवात या प्रसंगांचे सादरीकरण केले जाते.

लोकगीतांतील राम ः वात्सल्य आणि कारुण्य गुजराती लोकगीतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील जिव्हाळा. येथील स्त्रिया रामाला आपला भाऊ, मुलगा किंवा जावई मानून गाणी गातात.

सीता मातेचा हट्ट ः
‌‘नवरंग काचळी‌’ हे गाणे अत्यंत लोकप्रिय आहे. यात सीता माता रामाकडे एका सुंदर चोळीचा (काचळीचा) हट्ट करते. हे गाणे रामायणातील पात्रांचे ‌‘मानवी गुणांचे‌’ दर्शन घडवते.

मूळ गुजराती लोकगीत ः
सीते कहे छे रामने, लाजो नवरंग काचळी,
ही रे मढेलुं तेज, राम मारा रघुवीर रे.
काचळी लखावो राम, अयोध्येना चोकमां,
भरत-लक्ष्मण जोवे, राम मारा रघुवीर रे.
पांच रंगे पाळी बांधो, त्रण रंगे तारा,
नवमे रंगे मारी च निवडी, राम मारा रघुवीर रे.
सीताजी पेरीने चाल्यां, अयोध्येनी शेरीमां,
जोई जोई हरखाय लोक, राम मारा रघुवीर रे.

वनवासाचे कारुण्य ः ‌‘रामनो वनवास‌’ हे गीत ‌‘विरह‌’ रसात असून राम जेव्हा वनवासात जातात, तेव्हा अयोध्येच्या जनतेची आणि निसर्गाची काय अवस्था होते, याचेच यतार्थ वर्णन यामध्ये केले आहे.

मूळ गुजराती लोकगीत ः
राम लखु रे वनवास, सीताजी चाले साथमां,
लक्ष्मण चाले पाछळ रे, अयोध्या रूए साथमां.
वनना पखी पूछवा लाग्यां, क्यां गया रघुनाथ?
पाणी विनानी माछली तळफे,
एम तळफे दशरथतात.
अयोध्येना महल सूना, सूनी सरयू नी धार,
सीता विनानी सोन्यानी नगरी, लागे छे अंधार.
राम विनाना राजवाडा, सूना लागे सती ने,
कौशल्या माता रूए, राखे कोण धीरज धरी ने.

मराठी अर्थ ः राम वनवासाला निघाले आहेत, सीता त्यांच्या सोबत आहे आणि लक्ष्मण मागे चालला आहे; संपूर्ण अयोध्या रडत आहे. वनातील पक्षी विचारत आहेत की, रघुनाथ (राम) कुठे गेले? ज्याप्रमाणे पाण्याविना मासे तडफडतात, तशीच अवस्था पिता दशरथांची झाली आहे. अयोध्येचे राजवाडे आणि शरयू नदीची धार सुकी (उदासीन) झाली आहे. सीतेविना ही सोन्याची नगरी अंधकारमय भासत आहे. कौशल्या माता रडत आहे, त्यांना आता धीर कोण देणार?

लग्नातील राम-सीता ः ‌‘अमने जोडी जडी‌’ हे गीत लग्नकार्यात नवरदेव आणि नवरीला राम-सीतेची उपमा देण्यासाठी गायले जाते.

मूळ गुजराती लोकगीत ः
राम-सीतानी जोडी रे, अमने जोडी जडी,
अयोध्येना राजकुंवर, परणवा चालीया.
सोन्याना वाडके केशर घोळ्या,
अमने जोडी जडी,
राघवे तिलक कीधां, परणवा चालीया.
जन कनी मेडीये तोरण बांध्यां,
अमने जोडी जडी,
सीताजी हरखाई जोवे, परणवा चालीया.
हाथे हाथे छे छेडे छेडा, अमने जोडी जडी,
अमर रहो आ जोडी,
राम-सीतानी जोडी.

मराठी अर्थ ः राम आणि सीतेची ही अवीट जोडी आम्हाला गवसली आहे. अयोध्येचे राजपुत्र लग्नासाठी निघाले आहेत. सोन्याच्या वाटीत केशर कालवून राघवाने (रामाने) कपाळावर टिळा लावला आहे. जनक राजाच्या महालाला तोरणे बांधली आहेत, सीता माता हर्षाने पाहत आहे. दोघांचे हात हातात आहेत आणि वस्त्रे एकमेकांना बांधली (गाठ मारली) आहेत. ही राम-सीतेची जोडी युगायुगांसाठी अमर राहो.

लोककला प्रकारांतील ‌‘रामायण‌’

गुजरातच्या विविध लोककलांनी रामायणाचे तत्त्वज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

भवाई ः असित ठाकर यांनी रचलेला हा 700 वर्षे जुना लोकनाट्य प्रकार, आजही जिवंत आहे. ‌‘भवाई‌’मध्ये रामायणाचे प्रतिबिंब सामाजिक प्रबोधनाच्या रूपात दिसते.

रामदेवचा वेश ः हा वेश लोकदैवत रामदेव पीर यांच्याशी संबंधित असला, तरी त्यात रामतत्त्वाचा प्रभाव आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिसते.

कांचळी आणि सीतेची व्यथा ः भवाईत पुरुषच स्त्री-पात्रे (कांचळी) साकारतात. सीतेच्या वनवासाच्या प्रसंगातून समाजातील स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली जाते.

उपरोधिक संवाद ः भवाईत ‌‘भंगल‌’ वाद्याच्या साथीने होणारे संवाद सध्याच्या समाजव्यवस्थेवर टीका करण्यासाठी, रामायणातील संदर्भांचा वापर करतात. उदा. हनुमानाच्या पात्राद्वारे ‌‘खऱ्या स्वामीभक्तीची‌’ व्याख्या मांडली जाते.

पुतळ्यांचा खेळ ः सौराष्ट्रात ‌‘भट‌’ किंवा ‌‘नट‌’ समाजाचे कलाकार, बाहुल्यांच्या खेळाद्वारे रामायणातील युद्धाचे प्रसंग दाखवतात. रात्रीच्या वेळी मशालीच्या प्रकाशात पडणाऱ्या बाहुल्यांच्या सावल्या, युद्धाचे दृश्य अधिक भव्य आणि रोमांचक बनवतात.

गरबा आणि गरबी ः नवरात्रीत गायल्या जाणाऱ्या गरब्यांमध्ये, रामाच्या जन्मापासून ते रावणवधापर्यंतचे प्रसंग असतात.

राम जन्म ः अयोध्या चोकमां राम जन्म्या रे अशा गीतांनी रामाच्या जन्माचा आनंद व्यक्त होतो.

सीतेचा शृंगार ः लग्नानंतर सीता अयोध्येत येते, तेव्हा तिच्या दागिन्यांचे आणि ‌‘चुडल्याचे‌’ (बांगड्या) वर्णन करणारी गाणी आवडीने गायली जातात.

गुजराती ः राम सीतानी जोडी रे, अमे घुमावाने आव्या, लक्ष्मणजीनी लकडी रे, अमे रास रमाव्या आव्य

मराठी अर्थ ः आम्ही राम-सीतेची जोडी पाहून, गरब्याचा फेर धरण्यासाठी आणि लक्ष्मणजींच्या शक्तीचा आधार घेऊन रास खेळायला आलो आहोत.

प्रादेशिक विविधता आणि उत्सव

गुजरातच्या भौगोलिक रचनेनुसार रामाचे स्वरूपही बदलत जाते :

सौराष्ट्र ः येथे राम हा ‌‘शौर्याचे‌’ प्रतीक आहे. ‌‘दुहा‌’ आणि ‌‘छंद‌’मध्ये रामाच्या पराक्रमाचे वर्णन ‌‘वीर‌’रसात केले जाते.

उत्तर गुजरात ः लग्नाच्या गाण्यांत नवरदेवाला ‌‘राम‌’ आणि नवरीला ‌‘सीता‌’ मानले जाते. येथील लोकसंस्कृतीत राम हा ‌‘आदर्श वर‌’ आहे.

आदिवासी पट्टा (डांग) ः येथे रामाला ‌‘निसर्गाचा रक्षक‌’ मानले जाते. ‌‘डांगी नृत्य‌’ करताना रामायणातील कथा आणि गाणी गायली जातात.

रामनवमी ः चैत्र नवरात्रीत रामनवमीला घराघरांत ‌‘पंजिरी‌’चा प्रसाद वाटला जातो आणि ‌‘रामायण पारायण‌’ करून हा उत्सव साजरा केला जातो.

प्रमुख संदर्भ ग्रंथ

या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी खालील पुस्तके अत्यंत महत्त्वाची आहेत ः
झवेरचंद मेघाणी यांनी ‌‘राधियाळी रात‌’ (Radhiyali Raat) या संग्रहात ज्या लोकगीतांचे संकलन केले आहे, ती गाणी प्रामुख्याने स्त्रियांनी पिढ्यान्‌‍पिढ्या जतन केलेली मौखिकसंपदा आहे. या पुस्तकात राम हा ‌‘अयोध्येचा सम्राट‌’ असण्यापेक्षा, एका ‌‘कुटुंबाचा घटक‌’ म्हणून अधिक अधोरेखित होतो. खाली ‌‘राधियाळी रात‌’मधील रामाच्या मानवी रूपाचे दर्शन घडवणारी काही महत्त्वाची उदाहरणे दिली आहेत ः

कौशल्या मातेचे वात्सल्य आणि मुलाचा विरह ः
मेघाणींनी संकलित केलेल्या एका गीतामध्ये, राम वनवासाला निघाल्यावर कौशल्या माता ज्याप्रकारे विलाप करते, ते वाचताना राम हा केवळ देव न वाटता एक ‌‘सामान्य मुलगा‌’ वाटतो.

लोकगीत (राधियाळी रात मधून) ः हा रे! मारा रामजीने वनवास आप्या रे, दशरथ राय! मारा काळजाना कटका चालीया रे, हवे अयोध्ये कोण रहे?

मराठी अर्थ ः अहो राजा दशरथ, तुम्ही माझ्या रामाला वनवासात पाठवले? माझ्या काळजाचा तुकडा (मुलगा) सोडून चालला आहे, आता या अयोध्येत कोण राहणार?

येथे ‌‘काळजाचा तुकडा‌’ (काळजाना कटका) हा शब्दप्रयोग रामाला पूर्णपणे मानवी पातळीवर आणतो. आईचे दुःख हे देवाच्या अवतारासाठी नसून, आपल्या पोटच्या गोळ्यासाठी असल्याचे दिसते.

डॉ. हसु याज्ञिक - (Gujarati Loksahityama Ramkatha) ः लोकसाहित्यातील रामायणाचे संशोधनात्मक विलेषण. हे पुस्तकही फार महत्त्वाचे आहे.

डॉ. हसु यांचे निष्कर्ष ः त्यांच्या मते, लोकसाहित्यातील रामकथा ही ‌‘प्रवाही‌’ आहे. ती प्रत्येक पिढीनुसार आणि समाजाच्या गरजेनुसार स्वतःला बदलत असते. वाल्मीकींचा राम ‌‘नियम‌’ सांगतो, तर लोकसाहित्यातील राम ‌‘प्रेम‌’ आणि ‌‘कर्तव्य‌’ शिकवतो.

पुष्कर चंदरवाकर - ‌‘लोकसाहित्यनी केडे‌’ (Loksahityani Kede) ः लोकसंस्कृतीतील देवांच्या मानवी रूपावर प्रकाश टाकणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे. चंदरवाकर यांनी ‌‘लोकसाहित्यनी केडे‌’मध्ये रामाला लोकजीवनाच्या ‌‘उंबरठ्यावर‌’ उभे केले आहे. त्यांच्या मते, देव जेव्हा माणसासारखा वागू लागतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने ‌‘लोकदेव‌’ होतो. रामाचे रडणे, सीतेचा हट्ट, लक्ष्मणाचे रागवणे आणि हनुमानाची निष्ठा ही सर्वच मानवी लक्षणे, लोकसंस्कृतीने ‌‘रामायणा‌’त अशाप्रकारे गुंफली आहेत की, ते आपल्याच घराची गोष्ट वाटते.

- प्रणव पाटील
9850903005