डॉ. उषा पंजाबी यांनी दि. 2 ऑक्टोबर 1974 रोजी मूक-बधिर संघटना स्थापन केली. इंदोर, मध्य प्रदेश इथे कार्यरत असलेल्या संघटनेच्या माध्यमातून बधिर बालक-बालिकांना एकत्र आणण्याचे आव्हानात्मक कार्य केले. या विद्यार्थ्यांची शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, रोजगार, नैतिक उन्नती कशी होईल, यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. त्यानिमित्ताने संस्थेचा कार्यपरिचय करुन देणारा हा लेख...
डॉ. उषा पंजाबी यांचा जन्म दि. 27 जून 1956 रोजी इंदोर येथे एका सुसंस्कृत व शिक्षित कुटुंबात झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वष टायफॉईडमुळे त्या श्रवणशक्ती गमावून बसल्या. उपचार निष्फळ ठरू लागल्यानंतर त्यांची अंतःशक्ती जागृत झाली. परिणामी, त्यांनी स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले आणि स्वतः एक आदर्श निर्माण करून पुढील पिढीला सुंदर जीवन देण्याचा दृढ निश्चय केला. त्यांनी ‘बीएस्सी’ (जैवशास्त्र), ‘एमए’ (समाजशास्त्र), ‘डीएसी’ (एच.आर.), नॅचरोपॅथीमध्ये डॉक्टरेट, संस्कृत कोविद, एस.पी., अमेरिकाअंतर्गत मेक्सिको येथील डेफ स्कूलमध्ये 25 दिवस अध्यापन प्रशिक्षण, तसेच जिल्हा उद्योग केंद्रातून बटिक व ब्लॉक प्रिंटिंगचे प्रशिक्षण घेतले. या सर्व शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी बधिर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले सर्व कौशल्य आत्मसात करून त्यांची यशस्वी मार्गदर्शक बनल्या.
संस्थेची स्थापना आपल्यासारखेच अनेक बधिर विद्याथ शिक्षणापासून वंचित आणि असाहाय्य असल्याचे पाहून त्यांनी सन 1968 पासून तरुण बधिरांमध्ये जाऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचे कार्य सुरू केले. दि. 2 ऑक्टोबर 1974 रोजी मूक-बधिर संघटना स्थापन करून बधिर बालक-बालिकांना एकत्र आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी हाती घेतले. त्यांचे म्हणणे आहे की, “माझ्या कार्याला माझ्या कुटुंबाची संस्कृती, आचार-विचार, वर्तन आणि शिकवण यांचे मोलाचे पाठबळ लाभले.” त्यांचा ठाम विश्वास आहे की, “कुटुंब हीच बालकाची पहिली शाळा आहे. आईच्या मायेने आणि वडिलांच्या योग्य देखरेखीनेच बालकाचा सर्वांगीण विकास होतो.”
या कार्यात प्रथम त्यांना पालकांच्या विचारसरणीत बदल घडवून आणावा लागला. समजूतदार व शिक्षणाची ओढ असलेल्या तरुण बधिरांचे सहकार्य घेतले. त्यांच्या सांकेतिक भाषेचे अध्ययन केले. अध्यापनाच्या योग्य पद्धतींचा सखोल अभ्यास केला. समाजातील विविध स्तरांशी संपर्क साधताना अनेकदा त्यांना निराशाही आली; कारण अनेकांना अशा शारीरिक मर्यादा स्वीकारण्याची मानसिक तयारीच नव्हती. बधिर बालिका अत्यंत त्रासात जीवन जगत होत्या; काही वेळा अपघातांच्याही बळी ठरत होत्या. त्यांचे एकच ध्येय होते, माझ्यासारख्या बधिर बालिकांचे जीवन अडथळ्याविना घडवणे. या कठीण वाटचालीत त्यांच्या विद्वान माता-पित्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन त्यांना सातत्याने मिळत राहिले. त्यांनी दिलेला मंत्र होता, “बेटा, तुझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून काम कर. कितीही विरोध झाला, तरी मागे हटू नकोस. सत्याची नाव डगमगेल, पण कधीच बुडणार नाही.” याच प्रेरणेतून धीर, गंभीर, अथक, अचल व अडोल अशा उषा यांनी बधिरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केला. शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, रोजगार, नैतिक उन्नती, सामाजिक व कौटुंबिक समस्यांचे निराकरण, व्यक्तिमत्त्व विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, खेळ, मनोरंजन अशा सर्व सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. आज ‘अशासकीय इंदोर डेफ बायलिंग्वल ॲकेडमी’ (‘मूक-बधिर संघटने’द्वारे संचलित) ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते. उषा शिस्तबद्ध पद्धतीने वसतिगृह चालवतात, जिथे सुमारे 300 विद्याथ-विद्यार्थिनी राहतात. नर्सरीपासून महाविद्यालय, ‘बीएड’, सांकेतिक भाषा प्रशिक्षण केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण यांचा लाभ हजारो बधिर विद्यार्थ्यांना मिळत आहे. आजपर्यंत पाच हजारांहून अधिक बधिर विद्याथ येथून शिक्षण घेऊन देशभर कार्यरत आहेत.
समाजसेवी, दानशूर व्यक्ती, शासकीय अधिकारी यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला. इंदोरचे सर्व जिल्हाधिकारी त्यांच्या कार्याचे मुक्त कंठाने कौतुक करतात. 2015 साली पाकिस्तानातून भारतात आलेल्या मूक-बधिर गीतेसाठी उषा यांच्या संस्थेची निवड झाली. गीतेने येथे पाच वर्षे शिक्षण व प्रशिक्षण घेतले. आज संस्था आपला सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. विविध राज्यांतून आलेल्या बधिर विद्यार्थ्यांसाठी ही संस्था वटवृक्षासारखा आधार बनली आहे. त्यांचे म्हणणे आहे, “जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. प्रत्येक घटना काहीतरी शिकवून जाते. पुरस्कार मला अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देतात. ज्यांच्या रक्तात सेवाभाव असतो, ते अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहतात.”
उषा यांना राष्ट्रपती पुरस्कार, राज्यस्तरीय सन्मान, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य पुरस्कार लाभले आहेत. आजही त्या घरात, अंगणात किंवा शाळेच्या परिसरात बसून बधिर मुलांना शिकवताना दिसतात. त्या खऱ्या अर्थाने बधिरांची ओळख पटवणारी मातृशक्ती आहेत.
- अमिता मराठे
7389707831