चित्र सांगती चरित रामाचे!

    25-Mar-2026
Total Views |

भारत देशाची संस्कृती ही अनेकविध संस्कृतींचा संगम आहे. भारताच्या सांस्कृतिक प्रवाहाची गंगा अखंड प्रवाही ठेवण्याचे कार्य याच विविध संस्कृतींनी केले. यामध्ये देशातील आदिवासी संस्कृतीचा वाटा मौलिक असाच. याच भारतीय संस्कृतीचे प्रेरणास्थान असलेली रामकथेची भूरळ आदिवासी संस्कृतीवर न पडेल, तोच नवल! रामकथेचे भारवाहक होत तिचे नित्यगान करण्याचा मोह आदिवासी कलाकारांनाही ना रामायण काळात आवरला ना आज. ठाकर आदिवासी समाजाचे वैशिष्ट्य असलेली ‌‘चित्रकथी‌’ हे त्याचेच उत्तम उदाहरण. या ‌‘चित्रकथी‌’चा इतिहास, सांस्कृतिक महत्त्व, सादरीकरणाची पद्धत यामाध्यमातून रामकथा कशी आदिवासी समाजाच्या जनमानसामध्ये प्रवाही झाली, त्याचा घेतलेला मागोवा...

कोकणातील ‌‘दशावतार‌’, ‌‘डबलबारी‌’ आणि ‌‘रोंबाट‌’ या लोककला महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. मात्र, कोकणच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग असलेली ‌‘चित्रकथी‌’ ही कला मात्र थोडी अपरिचित अशीच. ‌‘चित्रकथी‌’ची विलोभनीय चित्रपरंपरा हा कोकणचा सांस्कृतिक वारसा खऱ्या अर्थाने जपला तो वनवासी पाड्यांनी. देशातील डोंगरदऱ्यांत, गावकुसांत आणि आदिवासी पाड्यांमध्ये अनेक कलांची जोपासना झाली. यापैकीच ठाकर आदिवासी समूहाने पिढ्यान्‌‍पिढ्या जपलेली कला म्हणजे ‌‘चित्रकथी‌’ होय! ही कला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, सध्या मात्र ती दुमळ होत चालली आहे.

‌‘चित्रकथी‌’ कलेचा उगम महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी या गावी झाला, असे मानले जाते. ऐतिहासिक संदर्भांनुसार, ‌‘चित्रकथी‌’ कलाकारांचा संबंध थेट शिवकाळाशी जोडला जातो. असे म्हटले जाते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये या फिरस्त्या चित्रकथी कलाकारांच्या खांद्यांवर ‌‘हेरा‌’ची (Spies) जबाबदारी होती. मनोरंजनाच्या बहाण्याने हे कलाकार शत्रूच्या गोटात शिरून, गुप्त माहिती गोळा करत असत. त्यानंतर ही मिळवलेली माहिती तेवढ्याच गुप्ततेने महाराजांपर्यंतही पोहोचवत.

‌‘चित्रकथी‌’चा अर्थ तिच्या नावातच दडला आहे. चित्रांच्या माध्यमातून सांगितली जाणारी कथा म्हणजेच ‌‘चित्रकथी‌’! ‌‘चित्रकथी‌’ ही महाराष्ट्रातील, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळीच्या ठाकर आदिवासी जमातीची प्राचीन लोककला. यात चित्रांच्या माध्यमातून ‌‘रामायण‌’, ‌‘महाभारत‌’ आणि पौराणिक कथा सादरीकरणाचा ‌‘दृश्य-श्राव्य‌’ आविष्कार आहे. यात कागदावरील चित्रमालिका दाखवून, गाणी व संवादांच्या साहाय्याने कथा सांगितली जाते. पौराणिक कथा जिवंत करणारा हा कार्यक्रम रात्रभर रंगतो. ही कथा सादर करणाऱ्यांना ‌‘चित्रकथी‌’ असे म्हणतात. पौराणिक कथांमधून लोकशिक्षण आणि मनोरंजन असा दुहेरी उद्देश येथे साधला जातो. या प्राचीन कलेचा उल्लेख सोमेश्वराच्या ‌‘मानसोल्लास‌’मध्येही आढळतो. त्यामध्ये म्हटले आहे की, ‌‘वर्णकैः सह यो वक्ति स चित्रकथको वरः गायका यव्र गायन्ति विना तालैर्मनोहरम्‌‍.‌’

‌‘चित्रकथी‌’मध्ये प्रामुख्याने ‌‘रामायण‌’, ‌‘महाभारत‌’ आणि स्थानिक पुराणांतील कथा सांगितल्या जातात. एखादे आख्यान निवडून त्यावर प्रसंगानुरूप चित्रे काढतात. प्रत्येक चित्र साधारण 15 इंच लांब आणि 12 इंच रुंद आकाराच्या कागदावर काढले जाते. कागदाच्या दोन्ही बाजूस ही चित्रे काढण्यात येतात. यामध्ये साधारणत: 30 ते 50 चित्रांचा एक संच असतो, ज्याला ‌‘पोथी‌’ म्हणतात. कथानकाच्या घटनाक्रमानुसारच त्यांचा क्रम ठरलेला असतो. एका कथानकाच्या चित्रांची एक पोथी तयार होते. पूव हस्तनिर्मित कागदावर किंवा हाताने बनवलेल्या जाड कागदावर ही चित्रे काढली जात असत. आता काळ बदलल्यने आधुनिक कागद वापरले जात असले, तरी त्यावरील पारंपरिक स्पर्श जपण्याचा प्रयत्न मात्र यामध्ये कटाक्षाने केला जातो.

या चित्रांमध्ये गडद काळ्या रंगाच्या जाड बाह्यरेखा (आऊटलाईन्स) असतात. चित्रात लाल, पिवळा, निळा आणि हिरवा यांसारख्या प्राथमिक रंगांचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. सुरुवातीच्या काळात ही चित्रे नैसर्गिक रंगांत, म्हणजेच झाडांच्या साली, फुले, दगड आणि माती यांपासून बनवलेल्या रंगांत काढली जात असत. या शैलीतील मानवी आकृत्यांचे चेहरे वैशिष्ट्यपूर्ण असतात. मोठे टपोरे डोळे, टोकदार नाक आणि चेहऱ्यावरचे स्पष्ट भाव ही या कलेची खरी ओळख. शरीराची ठेवण डौलदार असते, त्यातील रेखीवपणा आणि जिवंतपणा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

कथा सादरीकरणाला ठाकर कलावंत ‌‘पोथी सोडणे‌’ म्हणतात. हे आदिवासी कलावंत गावातील मंदिरात चित्रकथीचा खेळ सादर करतात. कलाकार मंदिरात घोंगडीवर मांडी घालून बसतात. त्यानंतर सर्वप्रथम सूत्रधार पोथीची पूजा करतो. सूत्रधाराच्या समोर एक लाकडी फळी उभी केली जाते. सूत्रधाराच्या उजव्या हातात तीन तारी वीणा, तर डाव्या हाताच्या अंगठा आणि करंगळीमध्ये टाळ गुंतविलेला असतो; तर साथीदारांकडे डमरू आणि तुणतुणे ही वाद्ये असतात. सूत्रधार रिद्धी-सिद्धीसह गणपतीला वंदन करून गाऊ लागतो. आख्यान सादर करताना, प्रथम त्या प्रसंगाला अनुरूप असे चित्र फळीवर लावतात आणि त्याविषयी वर्णनपर ओवीचे गायन केले जाते. त्यानंतर त्या ओवीचे निरूपणदेखील सूत्रधार करतो. तसेच आख्यानातील पात्रांचे संवाद सूत्रधार आणि साथीदार एकमेकांच्या साथीने म्हणत, कथानक प्रवाही ठेवतात. नंतर कथानकाच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगांची चित्रे फळीवर लावली जातात. आख्यानाचे निरूपण करताना, सूत्रधार मराठी भाषेसोबतच स्थानिक भाषेचाही वापर विनोदासाठी करतो. तसेच काही दाखले देण्यासाठी, विद्यमान घटनांचा आधारही यामध्ये घेतला जातो. सूत्रधाराचे निरूपण कौशल्य आणि गायनातील गोडवा रसिकांना यामध्ये खिळवून ठेवतो. पिंगुळीतील ‌‘ठाकर‌’ आदिवासींकडे असलेल्या पोथ्यांत ‌‘रामायण‌’, ‌‘महाभारता‌’तील अनेक आख्याने, तसेच डांगीपुराण, नंदीपुराण, जालंदर-वध, कपिलासुर अशी अनेक आख्याने आहेत. या आख्यानांतील पदे, कवने आणि संवाद एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने हस्तांतरित केले जातात.

‌‘चित्रकथी‌’चे सादरीकरण हे खरोखरच मंत्रमुग्ध करणारे असते. सूत्रधार आपल्या पहाडी आवाजात, कथेतील पात्रे आणि प्रसंग गाण्यांच्या माध्यमातून उलगडत नेतो. रात्रीच्या वेळी दिवटीच्या प्रकाशात जेव्हा ही चित्रे दाखवली जातात, तेव्हा कथेतील प्रसंग डोळ्यांसमोरच घडत असल्याचा भास रसिकांना होतो.

एकेकाळी मनोरंजनाचे प्रमुख साधन असलेली ही कला आज, अस्तित्वाची लढाई लढत आहे. टीव्ही, चित्रपट आणि इंटरनेटच्या युगात या पारंपरिक कलेकडे दुर्लक्ष झाले असून, चित्रकथी करणारे कलाकार आता हाताच्या बोटावरच मोजण्याइतकेच उरले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या कलेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पिंगुळी येथील परशुराम गंगावणे (माझे वडील) आणि आम्ही सगळे कुटुंबीय या कलेचे जतन करण्यासाठी खूप कष्ट घेत आहोत. केवळ ‌‘चित्रकथी‌’च नाही; तर कळसूत्री बाहुल्या, लेदर पपेट्स, पांगुळ बैल अशा अनेक लोककला आहेत. या कलांना नवसंजीवनी देण्याचे काम माझे वडील करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना ‌‘पद्मश्री‌’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. पिंगुळीमध्ये ‌‘ठाकर लोककला संग्रहालय‌’ (ठाकर आर्ट कॉम्प्लेक्स) उभारले आहे, जिथे पर्यटक आणि कलाप्रेमींना या कलानिर्मितीची पद्धत जवळून पाहता येते.

‌‘चित्रकथी‌’ ही केवळ एक कला नसून, तो महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. आपल्या पूर्वजांनी चित्रांच्या माध्यमातून ज्ञान आणि मनोरंजन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे पोहोचवले, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आजच्या काळात चित्रकथीला केवळ ‌‘संग्रहालयातील वस्तू‌’ न ठेवता, तिला आधुनिक स्वरूपात लोकांसमोर आणण्याची गरज आहे. जेव्हा आपण या चित्रांच्या माध्यमातून सांगितल्या जाणाऱ्या कथा ऐकतो, तेव्हा आपल्याला आपल्या मातीचा आणि परंपरेचा खरा सुगंध येतो. ही कला टिकवून ठेवणे ही केवळ कलाकारांचीच नव्हे, तर प्रत्येक मराठी माणसाची
जबाबदारी आहे.

- चेतन गंगावणे