‘सरके चुनर...’चा वाद कोर्टात, नोरा फतेहीने देश सोडण्याची वकिंलांची मागणी
24-Mar-2026
Total Views |
मुंबई : मागच्या काही वर्षांत अभिनेत्री आणि नृत्यांगणा नोरा फतेहीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कॅनडामध्ये जन्मलेली आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केलेली अभिनेत्री नोरा फतेही सध्या मात्र मोठ्या वादात सापडली आहे. कन्नड चित्रपट KD Devil मधील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या गाण्याच्या हिंदी आवृत्तीत अत्यंत अश्लील शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, १० वकिलांच्या गटाने केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधत नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर तिला भारतातून डिपोर्ट करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, भारत सरकारने ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावर बंदी घातली असून राष्ट्रीय महिला आयोग यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गाण्याचे गीतकार रकीब आलम यांनी मात्र याबाबत दिग्दर्शकावर जबाबदारी टाकत, कन्नड गाण्याचे शब्दशः हिंदी भाषांतर जबरदस्तीने करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गृह मंत्रालयासोबतच माहिती आणि प्रसारण मंत्रालय, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, या संपूर्ण वादात चित्रपटाचे निर्माते किंवा गाण्यात दिसणारे संजय दत्त यांच्या तुलनेत नोरा फतेहीलाच अधिक लक्ष्य करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
वकिलांच्या याचिकेत या गाण्याला “अत्यंत अश्लील” आणि “यौन उत्तेजक” असे संबोधण्यात आले आहे. तसेच हे गाणे सार्वजनिक नैतिकतेला आणि महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोरा फतेहीने अशा प्रकारच्या कंटेंटशी जोडून भारतात काम करण्याच्या विशेषाधिकाराचा गैरवापर केल्याचा दावाही करण्यात आला आहे. याचिकेत Foreigners Act, 1946 तसेच Passport (Entry into India) Act, 1920 यांसारख्या कायद्यांचा उल्लेख करत, सार्वजनिक शालीनता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांबरोबरच महिलांचे अश्लील चित्रण (निषेध) अधिनियम, १९८६ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अंतर्गतही या गाण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर टीका वाढल्यानंतर नोरा फतेहीने या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. तिने सांगितले की, तिने हे गाणे सुमारे तीन वर्षांपूर्वी कन्नड भाषेत शूट केले होते आणि त्या वेळी तिला गाण्याच्या शब्दांचा अर्थ माहिती नव्हता. तसेच, हिंदी डब किंवा बदललेल्या गीतांबाबत तिला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.
नोरा फतेहीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले की, “मला कन्नड भाषा येत नाही, त्यामुळे मी निर्मात्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला. हिंदी आवृत्तीमध्ये काय बदल करण्यात आले, याबाबत मला काहीच माहिती नव्हती.” तिने पुढे सांगितले की, गाण्याच्या लॉन्चवेळी तिला काही दृश्यांबाबत आक्षेप होता आणि AI च्या मदतीने तयार केलेल्या काही चित्रांचाही वापर करण्यात आला होता, ज्यामुळे ती नाराज झाली होती. हिंदी आवृत्ती पाहिल्यानंतर वाद निर्माण होईल याची कल्पना आल्याने तिने स्वतःला या प्रोजेक्टपासून दूर ठेवले आणि त्याचे प्रमोशनही केले नाही. तरीही, याचिकाकर्त्या वकिलांनी नोरा फतेहीचे स्पष्टीकरण फेटाळून लावत ते “नंतर केलेले समर्थन” असल्याचे म्हटले आहे. कलाकारांना प्रोजेक्टसाठी मानधन आणि प्रसिद्धी मिळत असताना त्यातील कंटेंटपासून स्वतःला दूर ठेवता येत नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच AI तंत्रज्ञानाचा वापर केल्याने जबाबदारी कमी होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या वादात अलीगढ येथील मुस्लिम पर्सनल दारुल इफ्तानेही नोरा फतेहीविरोधात फतवा जारी केला असून, गाण्याचा कंटेंट इस्लामिक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरील वाद संसदेतही पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गाण्यावर बंदी घातल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. यामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.