मुंबई : (Pm Modi Rajya Sabha Speech) पश्चिम आशियामध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारतही या परिस्थितीपासून अलिप्त नसून, अशा आव्हानात्मक काळात संयम, दृढनिश्चय आणि एकजूट आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. मंगळवारी राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर निवेदन देताना भारताची भूमिका मांडत देशातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले. जागतिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत देशाच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.(Pm Modi Rajya Sabha Speech)
देशाच्या धैर्य आणि प्रयत्नांची परीक्षा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोणतेही संकट हे देशाच्या धैर्य आणि प्रयत्नांची परीक्षा घेत असते. गेल्या ११ वर्षांत भारताने अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आवश्यक वस्तूंचा पुरवठा भारतात सुरळीत राहावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशाने ५३ लाख मेट्रिक टन (MT) सामरिक तेलसाठा निर्माण केला असून, त्यात आणखी ६५ लाख मेट्रिक टनची भर घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या १० वर्षांत भारताची तेल शुद्धीकरण क्षमतेतही लक्षणीयरीत्या वाढ करण्यात आली आहे.(Pm Modi Rajya Sabha Speech)
इंधनासाठी पर्यायी व्यवस्था
"मी देशाला आश्वासन देऊ इच्छितो की, भारताकडे पुरेसा कच्च्या तेलाचा साठा आणि अखंड पुरवठ्याची व्यवस्था आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सरकार केवळ एलपीजीवर अवलंबून न राहता घरगुती वापरासाठी पीएनजी (PNG) च्या वापराला प्रोत्साहन देत आहे. तसेच, इंधन पुरवठा साखळी आणि खते यांसारख्या विषयावर धोरणे आखण्यासाठी सरकारने ७ अधिकारप्राप्त गट स्थापन केले आहेत. जहाज निर्मिती क्षेत्रासाठी ७०,००० कोटी रुपयांचा भव्य प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून भविष्यात अशा जागतिक संकटांचा सामना करणे सोपे होईल.(Pm Modi Rajya Sabha Speech)
होर्मुझच्या जलमार्गाविषयी काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधान म्हणाले की, "होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे, जिथून कच्चे तेल, एलपीजी आणि खतांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. सध्या या मार्गावर जहाजे अडकून पडल्याने भारताच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गावरील अडथळे भारतासाठी अस्वीकार्य आहेत." जर ही स्थिती अधिक काळ राहिली, तर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीत मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.(Pm Modi Rajya Sabha Speech)
इराण-अमेरिका युद्धावर मोदी-ट्रम्प यांची चर्चा!
इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. ट्रम्प यांचा फोन आल्याचे त्यांनी सांगितले. भारत शक्य तितक्या लवकर तणाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच होमुर्झची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली आणि सुरक्षित उपलब्ध राहणे हे संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्वाचे आहे. शांतता आणि स्थैर्याच्या दिशेने पाऊले उचलण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांबद्दल आम्ही संपर्कात राहू, असेही मोदी म्हणाले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\