आधुनिक शहरी जीवनशैलीत आपण अनेकदा ‘स्वयंभू’ (self-made) असल्याबद्दल व्यक्तीचे कौतुक करतो. आपण राहण्यासाठी टोलेजंग टॉवर्स बांधतो, जे आपल्याला खासगीपण (privacy) देतात, आपण व्यावसायिक स्वातंत्र्याला महत्त्व देतो आणि आपल्या वैयक्तिक संघर्षांना कोणालाही न सांगता सोसण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आपण जर आफ्रिकेतील गवताळ प्रदेश किंवा महासागराच्या अथांग खोलीत डोकावले, तर निसर्ग आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगत असतो. निसर्गात ‘स्वतंत्र’ राहणे, म्हणजे मृत्यूला आमंत्रण असू शकते; तर ‘परस्परावलंबित्व’ हा जगण्याचा मूळ मंत्र आहे.
२१व्या शतकातील ‘डिजिटल बर्नआऊट’पासून ते कोलमडलेल्या नागरी पायाभूत सुविधांपर्यंतच्या ‘अदृश्य भारांना’ (invisible burdens ) सामोरे जात असताना, प्राणीजगत आपल्याला सामूहिक आरोग्याचा एक सखोल आराखडा देते. हे आपल्याला शिकवते की ‘एकत्र येणे’ ही केवळ सामाजिक निवड नाही, तर ती एक मूलभूत अस्तित्वाची जैविक गरज आहे.
‘सोशल बफरिंग’चा मूक आधार
संकटात सापडलेल्या हत्तीच्या पिल्लाला पाहून त्याचा कळप ज्या प्रकारे प्रतिसाद देतो, ते निसर्गातील सर्वांत हृदयस्पर्शी दृश्यांपैकी एक आहे. जेव्हा एखादे लहान पिल्लू घाबरलेले किंवा जखमी असते, तेव्हा त्याला केवळ शारीरिक मदत मिळत नाही, तर त्या पिल्लाच्या आजूबाजूचे प्रौढ हत्ती एक विशिष्ट लयीत आणि कमी कंपनांचा आवाज (rumbling) काढू लागतात. हा आवाज जमीन आणि हवेतून कंपनांच्या स्वरूपात प्रवाहित होतो. ते आपल्या सोंडेने त्या पिल्लाचे डोके, तोंड आणि पाठीला स्पर्श करून त्याला भावनिक धीर देतात. शास्त्रज्ञ याला ‘सोशल बफरिंग’ (social buffering) म्हणतात. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, कळपाच्या केवळ अस्तित्वाच्या जाणिवेमुळे आणि स्पर्शाने, त्रस्त झालेल्या प्राण्यांच्या शरीरातील ‘कोर्टिसोल’ (ताण देणारे संप्रेरक) पातळी झपाट्याने खाली येते. तो कळप प्रभावीपणे त्या पीडितासाठी जणू ‘बाह्य मज्जासंस्था’ (external nervous system) म्हणून काम करतो. कळपातील सर्व त्या मानसिक आघाताला एकमेकांमध्ये विभागून घेतात, जेणेकरून तो घाबरलेला एकटा जीव त्या ओझ्याखाली दबून जाऊ नये.
माझ्या मानसिक उपचाराच्या अनुभवात, मला या ‘राबलिंग’चा मानवी प्रतिध्वनी दिसतो. जेव्हा एखादे कुटुंब संकटाच्या वेळी एकत्र बसते किंवा जेव्हा एखादा आधार गट (support group) सामूहिक शांतता पाळतो, तेव्हा ते ‘सोशल बफरिंग’च करत असतात. आपण सस्तन प्राणी आहोत; जेव्हा आपण आपल्यासाठी ‘सुरक्षित’ वाटत असलेल्या समूहात असतो, तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके एकमेकांशी जुळतात आणि आपली मज्जासंस्था शांत व्हायला लागते. याउलट, एकटेपणामुळे आपला मेंदू सतत भयभीत अवस्थेत राहतो, जणू काही आपण एखाद्या उघड्या माळावर शिकारी प्राण्यासमोर एकटेच असाहाय्य्य उभे आहोत.
मधमाशांची लोकशाही : अहंकाराशिवाय समन्वय
हजारो जीव स्वतःच्या सवयीनुसार वागताना एखाद्या हुकूमशहाच्या आदेशाशिवाय एकजुटीने कसे काय वागू शकतात? ते विखुरलेले किंवा विस्कलेले का वाटत नाहीत? जेव्हा मधमाशांची एखादी वसाहत त्यांच्या पोळ्यापेक्षा मोठी होते, तेव्हा ‘स्काऊट माश्या’ नवीन घराच्या शोधात बाहेर पडतात. शोधून परत आल्यावर त्या ‘वॅगल डान्स’ (waggle dance) करून त्यांना मिळालेल्या ठिकाणांची माहिती देतात. इतर माश्या त्यांचे बारकाईने निरीक्षण करतात, मग त्या जागांवर जाऊन पाहतात आणि पटले, तरच त्या डान्समध्ये सामील होतात.
या मधमाशा माझे ठिकाण श्रेष्ठ की तुझे, यावरून भांडत बसत नाहीत. त्या ‘कोरम सेन्सिंग’ (quorum sensing) नावाची प्रणाली वापरतात. एकदा का एका विशिष्ट ठिकाणासाठी ठरावीक संख्येने माश्या नाचू लागल्या की, संपूर्ण थवा एकत्र तिथे स्थलांतरित होतो. ही एक विकेंद्रित लोकशाही आहे, जिथे सर्वांत उत्तम विधायक कल्पनेचा विजय होतो; सर्वांत मोठ्या आवाजाचा नाही.
स्टर्लिंग पक्ष्यांचे गुपित : साताचा नियम
स्टर्लिंग पक्ष्यांचे हजारो थवे आकाशात ढगासारखे आकार बदलत उडताना पाहून आश्चर्य वाटते की, ते एकमेकांवर आदळत कसे नाहीत आणि त्यांचा आकार कसा काय शिस्तीत टिकून राहतो? या थव्याचे नेतृत्व कोण करत असते? आश्चर्य वाटेल, याचे उत्तर आहे, कोणीही करत नाही.
गणितीय प्रारूपांनी असे दाखवून दिले आहे की, प्रत्येक स्टर्लिंग पक्षी एका सोप्या नियमाचे पालन करतो, तुमच्या जवळच्या फक्त सात शेजार्यांवर लक्ष ठेवा! केवळ आपल्या जवळच्या सात पक्ष्यांशी जोडून राहिल्यामुळे, ते पक्षी एक प्रचंड आणि एकसंध हालचाल तयार करतात.
शहरी लवचिकतेसाठी (urban resilience) हा एक महत्त्वाचा धडा आहे. वाहतुककोंडी, प्रदूषण किंवा पाणीटंचाई अशा शहराच्या ‘मोठ्या’ समस्यांमुळे आपण अनेकदा हतबल होतो. पण, स्टर्लिंग पक्षी आपल्याला शिकवतात की आपल्याला संपूर्ण ‘ढगाचे’ व्यवस्थापन करण्याची गरज नाही. जर इमारतीतील प्रत्येक रहिवासी किंवा कर्मचार्यांमधील प्रत्येक सदस्य आपल्या ‘जवळच्या सात’ लोकांशी प्रेमाने आणि सहकार्याने वागला, तर समाजाचा हा संपूर्ण थवा सुरक्षितपणे उडू शकतो. ‘एकत्र येणे’ ही एक स्थानिक कृती आहे, जिचा जागतिक प्रभाव पडतो.
सामाजिक विधींचा ‘जैविक डिंक’
चिम्पांझींपासून ते बॅबूनपर्यंतच्या प्रगत प्राणी जगतात, एकत्र राहण्यासाठी एकमेकांचे केस विंचरण्याचे (grooming) विधी केले जातात. तासन्तास ते एकमेकांच्या अंगावरील कीड काढण्यात घालवतात. जैविक दृष्टिकोनातून, हे केवळ स्वच्छतेसाठी नाही; तर हा एक ‘सामाजिक डिंक’ (social glue) आहे, जो शरीरात ‘ऑसिटोसिन’ आणि ‘एंडोर्फिन’सारखी रसायने स्रवण्यास मदत करतो.
प्रख्यात शास्त्रज्ञ फ्रान्स डी वाल यांनी नोंदवले आहे की, वादानंतर हे प्राणी एकमेकांचे केस विंचरून नाते पुन्हा जोडतात. प्रतिकूलतेची जागा मैत्रीपूर्ण स्पर्शाने घेण्याची ही क्षमता उच्च भावनिक बुद्धिमत्तेचे लक्षण आहे.
आपल्या मानवी जगात, आपण हे ‘ग्रूमिंग विधी’ मोठ्या प्रमाणावर सोडून दिले आहेत. आपण एकत्र चहा पिणे, बैठकीपूर्वीच्या गप्पा किंवा शेजार्यासोबत संध्याकाळी फिरणे टाळतो, कारण आपल्याला वाटते की ते वेळेचा अपव्यय आहे. पण, विज्ञान सांगते की, हेच विधी संकटाच्या वेळी टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेला विश्वास निर्माण करतात. या सामाजिक विधींच्या डिंकाशिवाय, आपला समूह केवळ अनोळखी लोकांची गर्दी बनतो. पुढच्या भागात आपण प्राण्यांच्या जगातील त्या अदृश्य नियमावलीचा वेध घेणार आहोत, जी त्यांना संघर्षावर मात करायला, लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यायला आणि एकसंध राहायला शिकवते. कारण खरी लवचिकता (esilience) ही केवळ वैयक्तिक नसून ती सामूहिक असते.
- डॉ. शुभांगी पारकर