मुंबई (विशेष प्रतिनिधी) - फणसाड वन्यजीव अभयारण्यात 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट'च्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या पक्षी गणनेमध्ये महाधनेश या पक्ष्याची विशेष नोंद करण्यात आली आहे (phansad wildlife sanctuary). दक्षिण कोकणामध्ये हा पक्षी सर्वसामान्यपणे दिसत असला तरी, उत्तर कोकणात खास करुन रायगडमध्ये आकाराने सगळ्यात मोठ्या या धनेशाच्या प्रजातीचा वावर दुर्मीळ आहे (phansad wildlife sanctuary). माणगावच्या उत्तरेकडे हा पक्षी सहसा दिसत नसल्याने फणसाडमधील या प्रजातीची नोंद विशेष आहे (phansad wildlife sanctuary). महत्त्वाचे म्हणजे या पक्षी गणनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आढळणाऱ्या चारही धनेश प्रजातींची नोंद फणसाड अभयारण्यातून करण्यात आल्या आहेत. (phansad wildlife sanctuary)
फणसाड वन्यजीव अभयारण्यामध्ये ठाणे वन्यजीव विभाग आणि 'एसबीआय फाऊंडेशन'च्या सहकार्याने 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट' दीर्घकालीन स्वरुपाच्या पक्षी गणनेचे काम करत आहेत. हंगामी स्वरुपात पार पडणारी ही गणना २० ते २२ मार्च या दरम्यान अभयारण्यात पार पडली. या गणनेत ३७ पक्षीनिरीक्षक, २२ स्वयंसेवक आणि १८ वनकर्मचारी सहभागी झाले होते. यांचे १३ गट तयार करुन या गटांनी अभयारण्यातील २६ ठिकाणी जाऊन 'लाइन ट्रान्सेक्ट' पद्धतीचा वापर करून पक्षी गणनेचे काम केले. ग्रीन वर्क्स ट्रस्टचे डाॅ. निखिल भोपळे आणि सर्वेश अभ्यंकर यांनी त्यांना त्यापूर्वी मार्गदर्शन केले. गणनेच्या या मोहिमेमधून पक्ष्यांच्या १५४ प्रजाती, फुलपाखरांच्या ५० प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या २४ प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या २० प्रजाती आणि उभयचरांच्या १३ प्रजातींची नोंद करण्यात आली. पक्ष्यांच्या नोंदवलेल्या १५४ प्रजातींपैकी २४ प्रजाती या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीत, तर १२७ प्रजाती या द्वितीय श्रेणीत संरक्षित आहेत.
या पक्षी गणनेमधील सर्वात महत्त्वाची नोंद ही महाधनेश पक्ष्याची ठरली. फणसाड धरणाच्या खोऱ्यात हा पक्षी आवाज देत उडत जाताना निदर्शनास आला. महाधनेश हा पक्षी दक्षिण कोकणामध्ये तसा सर्वसामान्यपणे दिसतो. मात्र, उत्तर कोकणात त्यातही रायगडपासून उत्तरेकडे त्याचे दर्शन दुर्मीळ मानले जाते. सद्यपरिस्थितीत महाधनेशाचा वावर आणि त्याच्या विणीची नोंद रायगड जिल्ह्यात माणगावपर्यंत आहे. तर पुण्यात ताम्हिणीपर्यंत त्याच्या वावर आहे. माणगावच्या उत्तरेस हा पक्षी गेल्या काही वर्षात नोंदवलेला नाही. त्यामुळे फणसाडमधील महाधनेशाची ही नोंद विशेष आहे. महाधनेशाशिवाय मलबारी कवड्या धनेश, मलबारी राखी धनेश आणि भारतीय राखी धनेश या तिन्ही प्रजातींची नोंद या गणनेत करण्यात आली. तसेच हिरवा शाही कवडा (ग्रीन इम्पीरियल-पिजन, कोतवालाच्या सही प्रजाती, रातव्याच्या चारही प्रजाती, बेडूकतोंड्या, तपकिरी वन घुबड या पक्ष्यांचीही नोंद करण्यात आली.