Dhurandhar: The Revenge मधल्या अतीफ अहमदची खरी स्टोरी

    24-Mar-2026   
Total Views |

Atiq Ahemad Vs Atif Ahemad in Dhurandhar 2

 
अलाहाबादचा चकिया प्रांत, सफेद कुर्ता, डोक्यावर पगडी आणि चेहऱ्यावर एक प्रकारचे गँगस्टर आणि माफिया असल्याचा माज असलेलं स्मित हास्य. धुरंधर २ या सिनेमातील सुरुवातीचं दृश्य तुम्हाला थेट गँगस्टार माजी खासदार अतीक अहमदच्या काळात घेऊन जातात. दि. १५ एप्रिल, २०२३. अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमदची पोलीसांच्या सुरक्षा कवच भेदून हत्या करण्यात झाली. लाईव्ह चॅनल सुरू असताना ही झालेली हत्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी होती. पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी व अंडरवर्ल्डशी असलेलं त्यांचं कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे दिग्दर्शक आदित्य धरचा धुरंधर २ हा चित्रपट.


Atiq Ahemad Vs Atif Ahemad in Dhurandhar 2  
चित्रपटात नाव जरी अतीफ अहमद दाखविण्यात आलं असलं तरीही प्रेक्षकांच्या व्यक्तीरेखा नेमकी कोण हे लक्षात येते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जसक्रीत म्हणजेच रणवीर सिंह आणि त्याचा मित्र पिंडा बंदुका आणि अंमली पदार्थांच्या खरेदीसाठी आतीफ अहमदकडे पोहोचतात. याच सीनने चित्रपटाची सुरुवात होते. खासदार असताना सुरू असलेला त्याचा बेकायदेशीर व्यापार आणि त्याला असलेला पाकिस्तानी यंत्रणांशी जुळणारी आतीफ अहमदची तार स्पष्ट दिसून येते. सुरुवातीलाच चित्रपटाचा डिस्कक्लिमर दिला असला तरीही चित्रपटातील अतीफ अहमदचे पात्र तंतोतंत अतीक अहमदशी जुळते. नेमकं चित्रपटात दाखवलेल्या सर्व गोष्टी सत्य आहेत का? अतीक अहमदवर असलेले आरोप आणि चित्रपटातील दृश्य यांच्यात साम्यता आहे का? जाणून घेऊयात डिकोडींग धुरंधर या सिरिजच्या नव्या भागात.


 Atif Ahemad in Dhurandhar 2
 
पहिल्या सीनमध्ये अतीफ अहमदला चकियाचा ड्रग्ज किंग म्हणून दाखविण्यात आले आहे. अतीफ कुणाला भेटायला जात नाही, मात्र त्याच्याकडे लोक हे अंमली पदार्थ खरेदीसाठी येत असत. दुसरा सीन म्हणजे उत्तर प्रदेशचे डीजीपी संजय कुमार यांना दाखविण्यात आले आहे. हे पात्र उत्तर प्रदेशच्या माजी डीजीपी प्रशांत कुमार यांच्यासारखे रेखाटण्यात आले आहे. याच सीनमध्ये युपी पोलीसांना अतीफ अहमदचं पाकिस्तानी कनेक्शन लक्षात येतं. इतकेच नव्हे तर भारतात बनावट नोटा पसरविण्याचं रॅकेटही तोच चालवत असल्याचं त्यांना समजतं. ही गोष्ट पोलीसांना कळल्यानंतर अतीफ आणि त्याच्या भावाला अटक होते. त्यानंतरच अहमदच्या गँगवर कारवाई सुरू होते.


 Atif Ahemad in Dhurandhar 2
 
२०१६ मध्ये झालेली नोटबंदी आयएसआय आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर याचा बुरखा फाडण्यासाठी झाल्याचं दाखविण्यात आले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी युपी पोलीसांना अतीफ अहमदचं फेक करन्सी मार्केटबद्दलचं सत्य सांगितलं. मात्र, प्रत्यक्षात दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये अतीक अहमद हा उमेश पाल हत्याकांड आणि हत्यार तस्करी प्रकरणात पोलीस आणि युपी एसटीएफने त्याला अटक केली होती. अतीक अहमदशी परदेशी कनेक्शनमुळे एटीएसलाही तपासात सामील करण्यात आले होते. १३ जुलै २०२३ रोजी सीजेएम कोर्टात पहिली चार्जशीट दाखल झाली होती. चार्जशीटमध्ये अतीक अहमदने मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाले होते की, त्याचे कनेक्शन आयएसआयशी थेट होते. मात्र, पोलीसांनी फेक करन्सीच्या व्यवहाराचा उल्लेख चार्जशीटमध्ये केलेला नाही.
 
चित्रपटात केलेल्या दाव्यानुसार, नोटबंदीपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी युपीच्या डीजीपींना भेटून अतिफला अटक करण्याचा प्लान केला. मात्र, प्रत्यक्षात नोव्हेंबर २०१६ रोजी उत्तर प्रदेशात डीजीपी सैय्यद जावेद अहमद होते. त्यांची नियुक्ती २०१६ रोजी झाली होती. चित्रपटात डीजीपी संजय कुमार दाखविण्यात आले आहेत. १९९०च्या बॅचचे आयपीएस प्रशांत कुमार त्यावेळी डीजीपी नव्हते. प्रशांत कुमार फेब्रुवारू २०२४ रोजी डीजीपी बनले आणि २०२५मध्ये निवृत्तही झाले. त्यामुळे चित्रपटात दाखविण्यात आलेली ही टाईमलाईन वास्तवात तशी नाही.
 
चित्रपटात दावा केल्यानुसार, अतीफ अहमद आयएस आय आणि लष्करशी संपर्कात होता. नेपाळमार्गे भारतात हत्यारांची तस्करी करत होता. पोलीसांच्या दाव्यानुसार, अतीक म्हणतो माझ्याकडे हत्यारांची कमी नाही. माझे थेट संबंध आयएसआय आणि लष्करशी आहेत. पाकिस्तानातून हत्यारे घेऊन जाणारे ड्रोन पंजाबच्या गावात उतरवले जात. तिथून माझी माणसं हत्यारं गोळा करतो. मी आणि माझा भाऊ अशरफ ही ठिकाणं चांगलीच ओळखून आहोत. प्रत्यक्षात अतीक अहमदने पोलीसांना सांगितल्यानुसार, त्या जागेवर घर क्रमांक नाही. पोलीस मला घेऊन तिथे पोहोचले तर मी जागा ओळखू शकेन. या जबाबानंतर अतीफला कसारी मसारी येथील जंगलात अज्ञातस्थळी नेण्यात आले. तिथे बरीचशी हत्यारे सापडली. त्यानंतर दोन्ही भावांना मेडिकल चेकअपसाठी नेत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि ते जागीच ठार झाले.


 Dhurandhar 2
 
जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतीक अहमद एक खासदार तर होता पण कुख्यात गँगस्टरही होता. त्याच्याकडे ब्रिटीश बुलडॉग रिवॉल्वर ४५५ बोर आणि एक वॉल्वर पी८८ होती. ही दोन्ही हाय प्रोफाईल हत्यारं होती. जी सहजासहजी मिळू शकत नाहीत. उत्तर प्रदेशच्या माजी डीजीपी डॉ. विक्रम सिंह यांच्या म्हणण्यानुसार, पाल हत्या प्रकरणात अतीकने आयएसआयने पाठविलेल्या हत्यारांचा वापर करण्यात आला होता. ही कबुली खुद्द अतीकनेच दिली होती. त्याच्या या जबाबानंतर पोलीसांनी अन्य ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी पाकिस्तानातून आलेल्या पाक ऑर्डिनेन्स फॅक्ट्रीचा शिक्का असलेली काडतूसे आणि हत्यार सापडले होते.
 
तिसऱ्या एका सीनमध्ये आतीफ आणि अशरफची हत्या झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्याचा अंत हा खऱ्या सीन प्रमाणेच प्रत्येक अँगलने दाखविण्यात आलायं. १५ एप्रिल २०२३ रोजी रात्री १०.३० वाजता पोलीसांच्या ताब्यात असताना आणि मीडिया बाईट देत असताना अतीक अहमदची हत्या झाली. हल्लेखोर पत्रकार बनून सुरक्षा कवच भेदून आत गेले होते. त्यानंतर अचानक जवळ येऊन अतीक अहमदच्या डोक्यात गोळी घातली जाते. अतीक आणि त्याचा भाऊ अशरफला मारल्यानंतर हल्लेखोर पोलीसांना शरण येतात.
 
चित्रपटात केलेल्या दाव्यानुसार, हा सगळा सीन लाईव्ह पाकिस्तानात बसलेल्या आयएसआय अधिकारी इलियास काश्मीरी उर्फ मेजर इकबाल (अभिनेता अर्जून रामपाल) पाहत होता. अशरफच्या हत्येने त्याचा डाव फसला. मात्र, प्रत्यक्षात ३ जून २०११ रोजी अमेरिकन ड्रोन हल्ल्यात इलियास काश्मीरीची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी तो आपल्या साथीदारांसोबत सफरचंदाच्या बागेत बसला होता आणि अतीक अहमदची हत्या २०२३मध्ये झाली होती. त्यामुळे चित्रपटातील हा सीन प्रत्यक्षातील टाईमलाईनला मॅच करत नाही.
 
एसटीएफ आणि रॉच्या संयुक्त कारवाईमुळे अतिकचे कनेक्शन उघड झाल्याचा दावा चित्रपटात करण्यात आला आहे. मात्र, २०२१मध्येच युपीच्या एसटीएफ आणि रॉच्या एका सिक्रेट मिशनमध्ये जीशान कमर नावाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. जिथे कसाबचं ट्रेनिंग झालं होतं, तिथेच जिशानला प्रशिक्षण देण्यात आल्याची कबुली त्याने दिली होती. जीशानने युपी एसटीएफला दिलेल्या माहितीनुसार, २०१७ रोजी तो प्रयागराजहून पाकिस्तानात गेला होता. तेव्हा अतीकच्या भावाने म्हणजेच माजी आमदार अशरफने पार्सपोर्ट अधिकाऱ्याला पासपोर्ट लवकर तयार व्हावा यासाठी पत्र पाठवले होते. याच वेळी अतीक अहमदचे आयएसआय कनेक्शन पहिल्यांदा लक्षात आले.
 
२४ फेब्रुवारी २०२३ रोजी जया पाल यांच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस. याच दिवशी त्यांचे पती वकिल उमेश पाल यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. उमेश पाल आमदार राजू पाल यांच्या हत्येतील महत्वाचे साक्षीदार होते. त्याचा आरोपही अतीक अहमदवरच होता. अर्थात पाल हत्याकांडा मागे माफिया डॉन अतीक अहमदच होता. उमेशच्या मृत्यूनंतर अतीक सहीत १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, अतीकच्या मृत्यूनंतर ४० महिने उलटूनही अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नाही. उमेशच्या हत्येतील एकूण सहा आरोपी ठार झाले. मात्र, त्याची पत्नी शाईस्ता, गुड्डू मुस्लीम याच्याशिवाय शूटर अरमान आणि साबीर यांना अटक झाली नाही.. आतीकच्या मृत्यूनंतर आयएस २२७ ही त्याची गँग पूर्णपणे संपुष्टात आली आहे.
 
अतीक गेल्यानंतरही भीतीचे सावट अद्याप कायम आहे... २४ तास सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक त्यांच्या घराबाहेर तैनात असतात. आयएस २२७ गँग अद्यापही सक्रीय असू शकते, अशी भीती स्थानिकाना आहे. अद्यापही या गँगवर हत्या, खंडणींसारखे गुन्हे दाखल होत आहेत. अतीक अहमदच्या मृत्यूनंतरही पाल कुटूंबियांचा बदला घेण्यासाठी आजही काहीजण आसूसलेले आहेत, अशी पाल यांची पत्नी सांगते. गुड्डु मुस्लीमने वकिल पाल यांच्या घरावर बॉम्ब फेकला ज्यात पाल यांची हत्या झाली. गुड्डू मुस्लीमचा चेहरा मी आजही विसरू शकत नाही, अशा त्या सांगतात. अतीकचा खात्मा झाल्यानंतरही पाल कुटूंब भितीच्या छायेत आजही आहे. पतीची हत्या झाल्यानंतर जया यांच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज पोहोचला. त्यात लिहीलं होतं. बदला ऐसा लो की, चार लोग देखकर यही बोले....
  
 

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.