चलो जलाएं दीप वहां...

    24-Mar-2026   
Total Views |

महापुरुषांच्या विचारांवर नुसती चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या विचारांनी कार्य करणे गरजेचे, असे मानून समाजकार्य करणारे गजानन साबळे; त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

धर्मादाय आयुक्तांनी निकाल दिला - “रुग्णालयाने सरकारी नियमाप्रमाणे त्या गरजू-गरीब रुग्णांचे उपचार निःशुल्क करावेत. गरीब रुग्णांसाठी तीन वर्षे दिलेले पैसे परत करावेत आणि नियमाप्रमाणे गरजू गरीब रुग्णाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास नकार देणाऱ्या त्या अधिकाऱ्याला सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात यावे.” तो निकाल गजानन साबळे यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. कारण, सरकारने जाहीर केलेल्या नियमाप्रमाणे, यादीत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये ठरावीक संख्येपर्यंत गरीब रुग्णांना निःशुल्क उपचार घेता येतात. पण, अनेक रुग्णालये ही सेवा नाकारतात. याचे उदाहरण म्हणजे, ‌‘शिवछत्रपती‌’ पुरस्कारप्राप्त झालेल्या एका खेळाडूला किडनीचा आजार झाला होता. होते नव्हते ते त्यांनी सगळे उपचारांमध्ये गमावले. गजानन यांनी नामांकित आणि श्रीमंत रुग्णांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या त्या रुग्णालयाला विनंती केली की, सदर रुग्णाचे उपचार विनाशुल्क करावे. मात्र, रुग्णालयाच्या संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, “रुग्णालयात यांचे उपचार होऊ शकत नाहीत. तुम्हाला काय करायचे ते करा. कुठेही तक्रार करा.” त्या रुग्णालयाने दाद दिली नाही. रुग्णाला मदत मिळावी म्हणून गजानन यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती आणि हा निकाल लागला. या निर्णयामुळे सरकारी आदेश न पाळणारी अनेक खासगी रुग्णालये सरकारी नियमाप्रमाणे ठरलेल्या गरीब रुग्णांना विनाशुल्क उपचार देऊ लागले.

मूळचे लातूरचे; पण आता मुंबईत स्थायिक झालेले गजानन आपल्या बांधवांची सेवा करावी, यासाठी अमेरिकेतली नोकरी सोडून भारतात परतले होते. राजकीय क्षेत्रातून ग्रामविकास करता येईल का, याची त्यांनी चाचपणी केली; पण त्यात यश आले नाही. तरीही, त्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवले. शेकडो मुलांना उच्चशिक्षणासाठी स्कॉलरशिप, 50 मूकबधिर मुलांच्या शस्त्रक्रियेचा खर्च उपलब्ध करून त्यांना वाचाशक्ती परत आणून देणे, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून एक हजार, 500 दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवणे, एक ना अनेक बाबींत गजानन यांनी वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली. रुग्णसेवेसाठी तन-मन-धन अर्पून काम करणारे गजानन हे तसे इंजिनिअर. पुढे त्यांनी ‌‘एलएलबी‌’चे शिक्षणही पूर्ण केले. आर्थिक सुबत्ता डावलून त्यांनी समाजकार्याचा मार्ग पत्करला. का? त्यांच्या जीवनाचा मागोवा घेताना याचे उत्तर सापडते.

लातूरचे नारायण आणि सुनंदा या दाम्पत्याचे गजानन सुपुत्र. नारायण हे पेशाने हमाल होते. कष्ट करून त्यांनी मोठ्या हिमतीने मुलांनी शिकावे, यासाठी प्रयत्न केले. साबळे दाम्पत्य अत्यंत सुसंस्कृत. वंचित समाजातले सगळेच चटके या कुटुंबाला सोसावे लागले. पण, संस्कार आणि शालीनता यामुळे त्यांनी त्या दुःखाचा कधीच बाऊ केला नाही. जे आहे, त्याला सामोरे जायचे ही चिवट वृत्ती त्यामुळेच गजानन यांच्यामध्ये उपजत होती. ते शाळेत हुशार होते. पुढे त्यांना ‌‘नवोदय‌’ विद्यालयामध्ये शिकण्याची संधी मिळाली. शिकणे सुलभ झाले. त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या पायात चप्पल आली. त्यांना बारावीनंतर छत्रपती संभाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पण, वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांना परत गावी लातूरला परतावे लागले. त्यांचे वडील साखर कारखान्यात काम करत. त्या कारखान्याचे चेअरमन पवनराजे निंबाळकर होते. वसतिगृहात प्रवेश मिळत नाही म्हणून गजानन गावी परतले, हे त्यांना कळले. त्यांनी क्षणाचा विचार न करता, गजानन यांची संभाजीनगरमध्ये राहण्याची सोय केली. शिक्षण व्यवस्थित सुरू झाले. एक वर्ष झाले; पण दुसऱ्या वष पवनराजे यांची हत्या झाली. पुन्हा पैशाची समस्या आली. गजानन छोटी-मोठी कामे करून शिकू लागले. पण, शिक्षणाचा खर्च होताच. त्यामुळे उपासमार नेहमीचीच झाली. पण, त्रास झाला तरी शिक्षण महत्त्वाचे, हा विचार करून अनेकवेळा पाणी पिऊन त्यांनी भूक मारली. ते इंजिनिअर झाले. त्यांनी वडिलांची हमालकी सोडवली. पुढे अनेक नामांकित कंपन्यांमध्ये परदेशात नोकरी केली. पण, गावचे समाजाचे प्रश्न डोळ्यांसमोरून जात नव्हते. ते प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देईनात. त्यातूनच त्यांनी अमेरिकेतली नोकरी सोडली, ते भारतात परतले.

2013 साल होते ते. गावात पाणीसमस्या मोठी होती. नव्हे, गावातल्या ज्या काही प्रमुख समस्या होत्या, त्या समस्येचा केंद्रबिंदू पाणीसमस्याच होती. यावर काम करण्यासाठी त्यांनी जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. अनेक गावांत त्यांनी पाण्याची समस्या सोडवली. पुढे ग्रामीण भागात सक्षमरीत्या काम करता यावे म्हणून मंत्री सुभाष देशमुख यांचे ते स्वीय सचिव झाले. आमदार निवासात आणि मंत्रालयात काम करताना त्यांना जाणवले की, ग्रामीण भागातले जास्तीत-जास्त लोक वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत येतात. आरोग्याची सुविधा मिळवून देणे गरजेचे आहे. त्यातूनच गजानन वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात काम करू लागले. गरजूंना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय झाले. ते म्हणतात, “चलो जलाएं दीप वहां, जहां अभी भी अंधेरा हैं| समाजात अत्यंज स्तरावर वैद्यकीय सुविधा पोहोचावी, यासाठी यापुढेही कार्यरत राहणार.” गजानन साबळे यांचे कार्य समाजाला सर्वार्थाने प्रेरणादायी आहे.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.