भेकड पाकची दर्पोक्ती...

    23-Mar-2026
Total Views |

जागतिक राजकारणात शब्द हे शस्त्रांइतकेच प्रभावी ठरतात. परंतु, जेव्हा एखाद्या देशाच्या माजी उच्चायुक्ताकडून थेट अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली जाते, तेव्हा त्याचे गांभीर्य खचितच वाढते. पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी अमेरिकेने पाकवर हल्ला केल्यास भारतातील मुंबई आणि दिल्ली शहरांवर हल्ला करू, अशी दिलेली धमकी ही पाकच्या राजकीय, लष्करी आणि मानसिक संरचनेचे भयावह चित्र उभे करणारी ठरते.

अमेरिकेच्या भीतीने पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बसित यांनी उघडपणे भारताला धमकी दिली असून, अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर ते भारतावर सूड घेतील आणि दिल्ली आणि मुंबई हादरवून टाकतील, असे खळबळजनक व्यक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, आता पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा भीतीपोटी दहशतवादी विचारसरणीचा आधार घेत आहेत. पाकिस्तानकडून भारताला अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या यापूवही दिल्या आहेत. तथापि, यावेळचे विधान हे गंभीर ठरते. एक म्हणजे ते जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर आले असून, पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीचा विचार करता, अशा विधानांना अतिरेक म्हणून दुर्लक्षित करता येत नाही. तसेच पाकिस्तानातील अण्वस्त्र सुरक्षा आणि दहशतवाद यांच्यातील वाढती जवळीक ही जगासाठी चिंतेची बाब ठरत आहे.

अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या सहकार्यामुळे मध्य-पूर्वेतील समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. इराणविरोधातील संभाव्य कारवायांच्या चर्चेमुळे पाकिस्तानवर दबाव वाढला आहे. अशा वेळी पाकिस्तानने घेतलेली भूमिका लक्षवेधी ठरते. सौदी अरबसोबतच्या संरक्षण करारात पाकिस्तानने अपेक्षित सहकार्य न दाखवणे, गाझा आणि इराणसंदर्भातील त्यांची संदिग्ध भूमिका आणि अमेरिकेबद्दल वाढता अविश्वास या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्या, तर पाकिस्तान आणि अमेरिकेमधील दुरावा स्पष्ट होतो. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील अलीकडे तुलसी गॅबर्ड यांनी, पाकिस्तानच्या अण्वस्त्र सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता, लष्कर आणि दहशतवादी गटांमधील संबंध आणि आर्थिक अडचणी यांमुळे, पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत जागतिक पातळीवर शंका निर्माण होत आहेत.

पाकिस्तानची आर्थिकस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक गरजांसाठी पाकिस्तान कोणत्या टोकाला जाऊ शकतो, याबाबतही चिंता व्यक्त केली जाते. पाकिस्तानमधील दहशतवादाची स्थिती या चित्राला अधिक गंभीर बनवते. 2026च्या ‌‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स‌’मध्ये पाकिस्तान जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश म्हणून समोर आला आहे. दि. 1 जानेवारी ते दि. 22 मार्च या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत 245हून अधिक दहशतवादी घटना पाकमध्ये नोंदवल्या गेल्या. या घटनांमध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अनेकदा राज्यसंस्थांशी गुंतलेल्या असल्याचे आरोप पूवपासून होत आले आहेत. काही गटांना थेट किंवा अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याचे आरोप, पाकिस्तानवर अनेकदा झाले. मध्य-पूर्वेतील घडामोडींनी पाकिस्तानची द्विधा आणि अविश्वसनीय भूमिका आणखी उघडी पाडली आहे. इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरबसोबत अपेक्षित असलेले संरक्षण सहकार्य पाकिस्तानने टाळले. गाझामध्येही सैन्य पाठवण्याबाबत पाकिस्तानने टाळाटाळच केली. या विसंगतीमुळे अमेरिकेच्या मनात पाकिस्तानविषयीचा असंतोष वाढतो आहे.

अण्वस्त्र हे जागतिक स्थैर्याचा आधार मानले जाते. अण्वस्त्रधारी देशांनी संयम आणि जबाबदारी दाखवणे अपेक्षित असते. परंतु, पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्या, याच जबाबदारीच्या तत्त्वाला छेद देतात. भारतासाठी या परिस्थितीचे अनेक पैलू आहेत. एकीकडे भारताने आपल्या सुरक्षाव्यवस्थेला अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. दहशतवादविरोधी कारवाया, गुप्तचर यंत्रणांची क्षमता आणि संरक्षण व्यवस्थेची सज्जता, यावर सतत भर देणे गरजेचे आहे. दुसरीकडे कूटनीतिक पातळीवरही भारताने या प्रश्नाचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या वर्तनाचा प्रश्न अधिक ठळकपणे मांडणे, ही भारताची भूमिका असू शकते. अण्वस्त्र सुरक्षा, दहशतवाद आणि आर्थिक अस्थिरता या तिन्ही मुद्द्यांना एकत्रितपणे मांडल्यास, पाकिस्तानविषयीची जागतिक धारणा अधिक स्पष्ट होऊ शकते.

यासंदर्भात भारताची प्रतिमा महत्त्वाची ठरते. जबाबदार अण्वस्त्रधारी देश म्हणून भारताने नेहमीच संयमित भूमिका घेतली आहे. कोणत्याही उचकावणीला उत्तर देताना भारताने संतुलन राखले आहे. ही भूमिका जागतिक स्तरावर भारताच्या विश्वासार्हतेला बळकटी देते. पाकिस्तानच्या धमक्या या अनेकदा अंतर्गत राजकारणाशीही जोडलेल्या असतात. अशा वेळी बाह्य शत्रूचे चित्र उभे करून, जनमत वळवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतविरोधी भूमिका हा त्याचा सोपा मार्ग ठरतो. तथापि, यावेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तानविषयीचा अविश्वास वाढीस लागला आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर दबाव कायम असताना अण्वस्त्रांबाबत निर्माण झालेली शंका, ही बाब अधिक गंभीर आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही परिस्थिती दीर्घकालीन दृष्टीने धोकादायक ठरू शकते.

जागतिक राजकारणात विश्वास ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. एकदा तो ढासळला की, त्याची पुनर्बांधणी करणे कठीण. पाकिस्तान सध्या अशाच अवस्थेतून जात आहे. आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे त्याची प्रतिमा कमकुवत होत आहे. या पार्श्वभूमीवर अब्दुल बसित यांचे विधान एक व्यक्तिगत मत म्हणून पाहणे सर्वस्वी चुकीचेच ठरेल. ते पाकिस्तानच्या व्यापक मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. अण्वस्त्रांचा वापर हा धमकीच्या स्वरूपात करणे, हीच एकप्रकारची असुरक्षितता दर्शवणारी आहे. भारतासाठी या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम आणि सज्जता यांचा समतोल राखणे. पाकच्या उचकावणीला बळी न पडता, ठोस आणि प्रभावी प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. त्याच वेळी जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या वर्तनाचे परिणाम स्पष्टपणे मांडणेही तितकेच गरजेचे आहे. अण्वस्त्रधारी देशात वाढता दहशतवाद आणि अस्थिरता ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे. या वास्तवाकडे दुर्लक्ष करणे कोणालाही परवडणारे नाही. जागतिक राजकारणात जबाबदारीशिवाय उच्चारलेला प्रत्येक शब्द अनेकदा संकटांना आमंत्रण देणारा ठरतो. पाकिस्तानच्या अणू धमक्या हे त्याचेच उदाहरण. प्रश्न एवढाच आहे की, या धमक्यांना जग किती गंभीरतेने घेते आणि त्यावर कोणती भूमिका घेते. भारतासाठी मात्र संदेश स्पष्ट आहे आणि तो म्हणजे सजग राहणे, सक्षम राहणे आणि जगासमोर सत्य ठामपणे मांडणे.