‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नवी नाट्यकृती चर्चेत

    23-Mar-2026
Total Views |

मुंबई : ‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ या शीर्षकाने सादर झालेल्या नव्या नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी व्यक्तीच्या भावनांशी थेट नातं जोडणारा विषय या नाटकात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. संस्कृती कला प्रतिष्ठान आणि लोकजागर नाट्य संस्था निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संदिप जंगम यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील विविध घटनांचा आढावा घेत, या कलाकृतीतून त्या काळातील संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेचा अभिमान उलगडला जातो.

नाटक पाहताना कधी पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो, तर कधी महाराष्ट्र आणि मुंबईसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांच्या कथा डोळे पाणावून टाकतात. त्याचबरोबर आजच्या महाराष्ट्राची आणि विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या स्थानाची वास्तव स्थितीही या नाटकातून अधोरेखित केली जाते. गावागावातून मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या कष्टावर उभी राहिलेली ही नगरी आज बदलत चालली आहे. “मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” असा ठाम आवाज देणाऱ्या मराठी जनतेच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे नाटक विचार करायला भाग पाडते. गिरगाव, लालबाग, परळ, दादर यांसारख्या मराठी वस्तींच्या भागात आज मराठी माणूस किती उरलाय, हा सवालही या कलाकृतीतून उपस्थित केला जातो.

दिग्दर्शकाने रंगमंच, नाट्य आणि पार्श्वभूमीवरील स्क्रीन यांचा अत्यंत सर्जनशील वापर केला आहे. विशेष म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून सादर केलेले दृश्य नाटकाला एक वेगळाच आयाम देतात. ही शैली प्रेक्षकांना नाट्यचित्र माध्यमाचा नवा अनुभव देणारी ठरते. विशेष म्हणजे ह्या नाट्यकृतीला आदेश बांदेकर आणि उदय सबनीस यांचं निवेदन आहे.



नाटकाला रोहन पाटील यांचे संगीत लाभले असून प्रकाशयोजना राजेश शिंदे यांनी केली आहे. AI चित्रफितींची जबाबदारी प्रसाद सोनावणे आणि हर्ष राऊत यांनी सांभाळली आहे. शाहीर मनोहर गोलांबरे आणि रविंद्र खोमणे ह्यांनी गायन केलं आहे. गणेश जाधव आणि संदिप जंगम यांचा प्रभावी अभिनय नाटकाला अधिक बळकटी देतो.

या नाट्यकृतीची निर्मिती महेश भोसले आणि संदिप जंगम यांनी केली आहे. व्यावसायिक रंगभूमीवर वेगळे आणि विचारप्रवर्तक विषय हाताळण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. प्रेक्षकांनी या अनोख्या आणि आशयघन नाट्यकृतीचा आस्वाद घ्यावा, तसेच पुढील पिढीला महाराष्ट्राच्या इतिहासाची आणि अस्मितेची जाणीव करून देण्यासाठी हे नाटक आवर्जून दाखवावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.