भारतीय हवाई दलाचा कर्मचारी पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात; आसाममध्ये हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश!

    23-Mar-2026   
Total Views |

IAF Staffer

मुंबई : (IAF Staffer Arrested for Spying for Pakistan) भारतीय हवाई दलाच्या अतिसंवेदनशील तळांची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या आसाममधील एका मोठ्या हेरगिरीच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. राजस्थान इंटेलिजन्स आणि एअरफोर्स इंटेलिजन्सने यांनी संयुक्तपणे कारवाई करत आसाममधील चाबुआ तळावर कार्यरत असलेल्या सुमित कुमार (३६) या सिव्हिल कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आरोपी सुमित हा पैशांच्या मोबदल्यात लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र प्रणालीची गुप्त माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पुरवत होता, अशी माहिती समोर आली आहे.(IAF Staffer Arrested for Spying for Pakistan)
 
पैशांच्या मोबदल्यात गुप्त माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पुरवली

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित कुमार असे त्याचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा आहे. मात्र सध्या तो आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील चाबुआ हवाई तळावर कार्यरत होता. सुमित कुमार २०२३ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे तपसात समोर आले आहे. पैशांच्या मोबदल्यात त्याने हवाई दलाच्या चाबुआ आणि नाल (राजस्थान) यांसारख्या महत्त्वाच्या तळांची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली. यामध्ये लढाऊ विमानांची ठिकाणे, क्षेपणास्त्र यंत्रणांची तैनात स्थिती आणि तळावरील कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती अशा संवेदनशील तपशिलांचा समावेश होता. (IAF Staffer Arrested for Spying for Pakistan)
 
माहिती पुरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

सुमितने माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर केला होता. इतकेच नव्हे तर, त्याने स्वतःच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरचा वापर करून पाकिस्तानी हँडलर्सना सोशल मीडिया अकाऊंट्स उघडण्यास मदत केली होती. जेणेकरुन ते ओळख लपवून संवाद साधू शकतील. या प्रकरणी जैसलमेरमधून जानेवारी २०२६ मध्ये अटक करण्यात आलेल्या झबरा राम नावाच्या संशयित व्यक्तीच्या चौकशीतून एका सुमित कुमारचे नाव समोर आले. तेव्हापासून गुप्तचर यंत्रणा सुमितवर पाळत ठेवून होत्या. खात्री पटल्यानंतर त्याला २२ मार्च रोजी आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातील चाबुआ येथून ताब्यात घेऊन जयपूरला आणण्यात आले.(IAF Staffer Arrested for Spying for Pakistan)
 
या प्रकरणी जयपूरमधील विशेष पोलीस ठाण्यात 'ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट, 1923' आणि 'भारतीय न्याय संहिता (BNS), 2023' च्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अटकेमुळे पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या हेरगिरीच्या नेटवर्कचा उलगडा झाला असून, यामध्ये आणखी काही भारतीय नागरिक सामील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(IAF Staffer Arrested for Spying for Pakistan)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\