क्रिकेटमधील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यानंतर आता भारतीयांना वेध लागले आहेत ते हॉकी विश्वचषक जिंकण्याचे. हॉकी या खेळाचा भारत हा अनभिषक्त सम्राट. मात्र, विश्वचषकामध्ये भारताला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे यावष ही स्पर्धा जिंकण्याची आस भारतीयांना आहे. यानिमित्ताने येत्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचा घेतलेला आढावा...
निर्णय घ्यायला वेळ घेत, इकडे किंवा तिकडे अशा संभ्रमावस्थेत, द्विधा मनस्थितीत अडकलेला पाकिस्तानचा क्रिकेट संघ खेळणार की नाही; असे तळ्यात-मळ्यात करत अखेरीस क्रिकेटच्या 20 षटकांच्या ‘विश्वचषक’ सामन्यासाठी कोलंबोत उतरला होता. त्या स्पर्धेत ‘अ’ गटातील साखळी सामन्यांत भारताने पाकिस्तानला पराभूत करत, ‘सुपर 8’मध्ये प्रवेश मिळवला आणि अंतिमतः क्रिकेट विश्वचषक भारतात देखील आणला. पाकिस्तान विरुद्धचा तो रविवार, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला साखळी सामना क्रीडाप्रेमींना आठवत असेल. पाकिस्तान क्रिकेटपटू तो चषक पाकिस्तानात नेण्यात अपयशी ठरले होते. क्रिकेट स्पर्धेतील असाच अजून एक चषक पाकिस्तानी क्रिकेटपटू आपल्या देशात अधिकृतपणे न्यायला अपयशी ठरल्याचे सगळ्यांना आठवत असेल. ही घटना 2025 च्या दुबईमध्ये झालेल्या ‘आशिया चषका’दरम्यान घडली होती. दुबईत झालेल्या ‘आशिया चषक’ क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद पटकावल्यानंतर, ‘आशियाई क्रिकेट परिषदे’चे प्रमुख आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते तो चषक स्वीकारण्यास भारताने विरोध केला होता. पहलगाम हल्ल्याचा निषेध भारतीय खेळाडूंनी दाखवला होता. नक्वींनी त्यावेळी तो चषक इतर मान्यवरांच्या हस्ते भारतीय खेळाडूंना न देता, तो स्वतःकडेच ठेवल्याने एक नवा वाद निर्माण् झाला. भारत आणि पाकिस्तानच्या राजकारणाचा प्रभाव क्रिकेटवर जसा स्पष्टपणे दिसतो, तसाच तो हॉकीवरही पडताना ठळकपणे आपल्याला जाणवते आहे.
पुरुष आणि महिला ‘हॉकी विश्वचषक - 2026’च्या स्पर्धा आता, दि. 15 ते 30 ऑगस्टदरम्यान नेदरलॅण्ड्स आणि बेल्जियममध्ये संयुक्तपणे आयोजित होत आहेत. मंगळवार, दि. 17 मार्च रोजी नेदरलॅण्ड्समधल्या मस्टरडॅम येथील वॅगेनर स्टेडियमवर या स्पर्धेचा ‘ड्रॉ’ समारंभ पार पडला. यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला. पुरुषांच्या ‘ड’ गटामध्ये भारत आणि पाकिस्तानसह, इंग्लंड आणि वेल्स या संघांचाही समावेश आहे. भारतीय महिला संघालाही महिलांच्या ‘ड’ गटामध्ये स्थान मिळाले आहे. या गटात आशियातील सर्वोत्तम संघ असलेला चीन, तसेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड अशांचा समावेश असल्याने भारतीय महिला संघाची वाटचाल आव्हानात्मकच असणार आहे.
‘पूल डी’मध्ये स्थान मिळालेला भारताचा पुरुष संघ, देशाच्या ‘स्वातंत्र्य दिना’च्या दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार 16.30 वाजता, मस्टेलवीन येथील ‘वॅगेनर हॉकी स्टेडियम’वर वेल्सविरुद्ध सामन्यातून मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर दि. 17 ऑगस्ट रोजी 18.30 वाजता त्यांचा सामना इंग्लंडशी होईल; आणि त्यानंतर दि. 19 ऑगस्ट रोजी 18.30 वाजता, गट फेरीतील सर्वाधिक उत्सुकता असलेल्या सामन्यांपैकी पाकिस्तानच्या सामन्यात भारतीय संघ उतरेल. तर, भारतीय महिला संघाच्या ‘पूल डी’मधील मोहिमेची सुरुवात, दि. 16 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार 16.30 वाजता चीनविरुद्ध करेल. त्यानंतर दि. 18 ऑगस्ट रोजी 18.30 वाजता त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल आणि दि. 20 ऑगस्ट रोजी 18.30 वाजता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासह ते गट फेरीचा समारोप करतील.
क्रिकेट विश्वचषकानंतर क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील आता ‘हॉकी विश्वचषक’ सामन्यांकडे. त्यातही सर्वाधिक उत्सुकता असेल, दि. 19 ऑगस्टच्या भारत-पाकिस्तान लढतीकडे. भारत-पाकिस्तान हॉकीचे सामनेही उत्कंठावर्धक राहिलेले आहेत.
ऑलिम्पिकमध्ये ‘सुवर्णपदक’ हे हॉकीमधील निःसंशयपणे 1970च्या दशकापर्यंत, सर्वात मोठे पारितोषिक मानले जात असे. मात्र, हॉकीच्या सततच्या वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे, एका स्वतंत्र ‘हॉकी विश्वचषका’ची तेव्हापासून गरज भासू लागली. तत्पूव, ऑलिम्पिक क्रीडाप्रकार असलेल्या ‘फुटबॉल विश्वचषका’ची सुरुवात 1930 मध्ये झाली होती. पहिली ‘फिफा विश्वचषक’ आंतरराष्ट्रीय स्पर्धा उरुग्वे या देशात आयोजित केली गेली. यामध्ये यजमान उरुग्वेने बाजी मारून, पहिला ‘फुटबॉल विश्वचषक’ जिंकला.त्याचवेळी पुरुषांच्या ‘हॉकी विश्वचषका’ची कल्पना, त्यावेळच्या हॉकीमधील दोन सर्वांत मोठ्या शक्ती असलेल्या भारत आणि पाकिस्तानने 1969 मध्ये ‘आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघा’च्या (एफआयएच) परिषदेमध्ये संयुक्तपणे मांडली. तत्कालीन पाकिस्तान हॉकी संघटनेचे प्रमुख आणि पाकिस्तानच्या क्रिकेट व स्क्वॅश फेडरेशनचे प्रमुख राहिलेल्या एअर मार्शल नूर खान यांची ही संकल्पना, सगळ्यांनीच उचलून धरली होती. ‘हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी’मागील सूत्रधार म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या नूर खान यांनी, प्रसिद्ध ‘वर्ल्ड हॉकी’ नामक प्रसिद्ध मासिकाचे पहिले संपादक पॅट्रिक रॉली यांच्यामार्फत ‘एफआयएच’ समोर ही संकल्पना मांडली. ‘एफआयएच’ने दि. 26 ऑक्टोबर 1969 रोजी या कल्पनेला मंजुरी दिली आणि दि. 12 एप्रिल 1970 रोजी ब्रुसेल्स येथे झालेल्या बैठकीत, पहिला ‘हॉकी विश्वचषक‘ ऑक्टोबर 1971 मध्ये पाकिस्तानात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राजकीय मुद्द्यांमुळे ही स्पर्धा पाकिस्तानात खेळवली गेली नाही. ‘एफआयएच’ने ‘बांगलादेश मुक्तिसंग्राम’ काळात, नकळतपणे पहिला विश्वचषक पाकिस्तानात खेळवला होता. शिवाय, सहा वर्षांपूवच पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध झाले होते. जेव्हा पाकिस्तानने भारताला स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित केले, तेव्हा पेचप्रसंग निर्माण झाला. क्रिकेटपटू अब्दुल हाफीज करदार यांच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तानींनी ‘हॉकी विश्वचषका’तील भारताच्या सहभागाला विरोध केला. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील राजकीय वातावरण लक्षात घेता, ‘एफआयएच’ने स्पर्धा दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला. मार्च 1971 मध्ये योगायोगाने त्याच महिन्यात बांगलादेशने पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केले, ‘एफआयएच’ने पहिला ‘हॉकी विश्वचषक’ एक तटस्थ आणि शांततापूर्ण असे ठिकाण म्हणून स्पेनमधील बार्सिलोना येथे खेळवण्याचा निर्णय घेतला.
त्या 1971च्या विश्वचषकात केवळ दहा राष्ट्रेच सहभागी झाली होती. हा इतिहासातील सर्वात लहान विश्वचषक होता. कालांतराने स्पर्धक राष्ट्रांची संख्या वाढली असून, आता होणाऱ्या स्पर्धेत 16 पुरुष आणि 16 महिला संघ सहभागी होतात. पहिल्या तीन स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केल्या गेल्या होत्या. 1978चा चषक ही एकमेव स्पर्धा होती, जी तीन वर्षांनी आयोजित करण्यात आली होती. ती ‘उन्हाळी ऑलिम्पिक हॉकी’ स्पर्धेच्या मध्यभागी होती आणि तेव्हापासून ती तशीच आयोजित केली जात आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, तेव्हापासून ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जात आहे.
हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या चषकाची रचना बशीर मुजीद यांची असून, ती पाकिस्तानी सैन्याने तयार केली होती. दि. 27 मार्च 1971 रोजी ब्रुसेल्समध्ये बेल्जियममधील पाकिस्तानी राजदूत श्री. एच. ई. मसूद यांच्या हस्ते या स्पर्धेचा चषक, ‘एफआयएच’चे तत्कालीन अध्यक्ष रेने फ्रँक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
पाकिस्तान लष्करातील बशीर मुजीद यांनी डिझाईन केलेली पुरुषांच्या हॉकी विश्वचषकाची ट्रॉफी ही एक चांदीची ट्रॉफी असून, तिच्यावर नाजूक फुलांची नक्षी आहे. ही ट्रॉफी हस्तिदंताने जडवलेल्या सागवान लाकडाच्या पायावर ठेवलेली आहे. चषकाच्या वरच्या बाजूला सोने आणि चांदीपासून बनवलेली पृथ्वीगोलाची प्रतिकृती आहे, ज्यावर हॉकी स्टिक आणि चेंडूची एक छोटी प्रतिकृती बसवलेली आहे.
भारतीय हॉकीसाठी व एकूणच क्रीडाविश्वासाठी तळमळीने झटून कार्य करणारे डॉ. नरिंदर ध्रुव बत्रा, हे 2016-2022 याकाळात ’एफआयएच’चे अध्यक्ष होते. त्यांनी पाकिस्तानात घडलेल्या हॉकी विश्वचषकाचा जीर्णोद्धार करायचे ठरवलेे. त्यासाठी त्यांनी भुवनेश्वरच्या ‘कलिंगा हॉकी स्टेडियम’मध्ये दि. 28 नोव्हेंबर ते दि. 16 डिसेंबर 2018 दरम्यान झालेल्या ‘हॉकी विश्वचषका’च्या आधी, ‘हॉकी विश्वचषका’चा जीर्णोद्धार करण्यासाठी योजना तयार केली. त्यानुसार, डॉ. नरिंदर ध्रुव बत्रांनी लंडनच्या ‘थॉमस लायट’ या जागतिक दर्जाच्या ट्रॉफी बनवणाऱ्या व ट्रॉफींची दुरुस्ती आणि मौल्यवान धातूंच्या वस्तू तयार करण्यात ज्यांचा हातखंडा आहे, अशा कंपनीशी संपर्क साधून त्यांच्याकडून 1971 साली तयार केलेल्या हॉकी विश्वचषकाचा जीर्णोद्धार करून घेतला. थॉमस लाईटच्या कुशल कारागिरांच्या टीमने या कामाची सुरुवात करताना, चषकाच्या वरील सुंदर पृथ्वीगोलावर देश, खंड आणि महासागरांना पुन्हा सोन्याचा मुलामा दिला. त्यानंतर यावरील नक्षी पुन्हा कोरून त्याचे नूतनीकरणही केले. नंतर ट्रॉफीचा पाया पुनर्संचयित करण्यापूव त्यावरील सर्व खुणा, दंत आणि ओरखडे काढून टाकले, ज्यासाठी रंगाने परिपूर्ण पुनर्लेपन करणे आणि चौथऱ्यावर नवीन मखमली कापड बसवणे आवश्यक होते.
पुरुष आणि महिला या दोन्ही स्पर्धेच्या विजेत्याला जो करंडक दिला जातो, त्या ‘आयसीसी टी-20’ विश्वचषक ट्रॉफीचे काम थॉमस लाईटच्या कारागिरांचेच, त्याचप्रमाणे ‘फिफा विश्वचषक’देखील याच कारागिरांचा. भारताच्या 1975च्या पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानात घडलेला ‘हॉकी विश्वचषक’ पटकावला आहे. पण, त्यानंतर ‘हॉकी विश्वचषक’ आपला संघ भारतात आणण्यात यशस्वी झालेला नाही. तर, आता दि. 19 ऑगस्ट रोजी होणारी पाकिस्तान विरुद्धची लढत, एकवेळ आपल्या मुलांनी जिंकली की आपण आनंदात बघू शकतो. पण, काय आपण बात्रांच्या काळात ‘रिनोव्हेट’ केलेला ‘हॉकी विश्वचषक’ त्यांच्यानंतर आता ‘आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघा’च्या अध्यक्षपदावर आरूढ झालेल्या मोहमद तैयब इकरान या मुळच्या पाकिस्तानी, मग चीनच्या मकाऊ प्रांताचे नागरिकत्व घेतलेल्या आणि ऑलिम्पिक व हॉकीत तेथून प्रतिनिधित्व करणाऱ्या आधिकाऱ्याच्या हातातून घेणार आहोत का? हे संबंधितांशी बोलून ठरवावे लागेल, नाहीतर क्रिकेटसारखे आपणही फक्त प्रशस्तिपत्र का होईना; पण काहीतरी हातात घेऊन येणार आहोत? पण, आधी तिथपर्यंत खेळून अंतिम सामन्यात जावे लागेल. विश्वचषकात फक्त ‘सुवर्ण‘ असते, ‘रौप्य’, ‘कांस्य’ वगैरे नसते, हे लक्षात ठेवायला हवे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत 1975ला एकदाच विश्वचषक जिंकला आहे. दि. 15 मार्च 1975 रोजी क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करून, हा ऐतिहासिक विजय मिळवला होता. तेव्हा भारतात आणलेल्या टीममधील ध्यानचंद पुत्र अशोककुमार सारख्याला नवीन रूपातला करंडक भारताने पटकावलेला दिसू शकेल का? बघू आजची टीम काय करते, ते बघायला आता काही जास्त अवधी राहिलेला नाही. मस्टेलवीनचे घोडामैदान काही दूर नाही. आपण त्या भारतीय मुला-मुलींना आतापासूनच शुभेच्छा देऊन ठेवत, इंग्रजीत म्हणतात तसे ‘लेट अस् कीप अवर हॅण्डस् क्रॉसड्’ ठेवत म्हणूयात की, “चला, आम्ही अशी आशा बाळगून आहोत, बरं का रे!”
- श्रीपाद पेंडस
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704