लिंगपिसाट अशोक खरात याच्या भयंकर कारनाम्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली. या प्रकरणामध्ये सगळ्यात भयंकर वाटते, ते शिकलेल्या सुशिक्षित आणि सर्वच स्तरांतील घरच्या महिलांनी त्याच्या विकृतीसमोर केलेले समर्पण. ‘महिला आयोगा’च्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचेही वागणे निषेध करण्यासारखेच. जागृत सत्य, श्रद्धा आणि विकृत अंधश्रद्धा यातला भेद इतका मिटावा? का? या प्रश्नाच्या उत्तराचा या लेखामध्ये घेतलेला मागोवा...
तुमच्यावर कोप होईल,’ असे अशोक खरात त्याच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांना म्हणाला. काय म्हणावे याला? ‘मी कृष्ण आणि तू राधा’ वगैरे वगैरे सांगून ‘माझ्यासोबत संबंध ठेव, नाहीतर तुझा नवरा मरेल’ (त्याच्या शापाने) किंवा बरकत येण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी महिलेने त्याच्याकडून योनीशुद्धी करून घ्यावी, त्याचे मूत्र प्यावे इत्यादी अत्यंत विकृत आणि संतापजनक कृत्य अशोक खरात महिलांकडून करवून घेत असे. हिंदू समाजाची ज्या पोथी-पुराण आणि पूजा वगैरेवर श्रद्धा आहे त्यावर अतिशय आक्षेपार्ह पद्धतीने टीका करून, वर आपण काहीतरी भारीच बहुमोल बोलत असल्याचा आविर्भाव आणणाऱ्या ‘महिला आयोगा’च्या रूपाली चाकणकर यांचेही नाव या प्रकरणात पुढे आले आहे.
“अशोक खरात गुरू असून, त्यांच्यामुळेच आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे याचे ज्ञान झाले,” असे म्हटल्याचे, त्याची पाद्यपूजा करताना किंवा त्याच्यासाठी छत्री धरताना, त्याला ‘प्रतिविठ्ठल’ संबोधतानाचे रूपाली चाकणकरचे व्हिडिओ प्रसारामाध्यमांवर झळकले. ‘महिला आयोग’ जो महिलांच्या अन्याय-निवारणासाठी आणि हक्कांसाठीच निर्माण झाला, जिथे महिलांच्या कल्याण्याच्या योजनांसाठी विचारमंथन करण्यात येते, त्याच ‘महिला आयोगा’च्या अध्यक्षस्थानी असलेल्या रूपाली अशा लिंगपिसाट नराधमाला गुरू मानत होत्या? आता त्या म्हणत आहेत की, त्याच्या या प्रकरणांबद्दल त्यांना माहितीच नव्हती. कायदा-सुव्यवस्था काय करायचे ते करतीलच; पण तरीही प्रश्न पडतो की, रूपाली चाकणकर या ‘महिला आयोगा’च्या अध्यक्षा होत्या, राज्यात महिलांवर अन्याय-अत्याचार होऊ नयेत, यासाठी तजवीज करणारी मोठी यंत्रणा त्यांच्या ताब्यात होती. याबाबत एका पत्रकाराने थेट ‘महिला आयोगा’कडे सूतोवाचही केले होते. त्यांनी याबाबत काही पाठपुरावा केला होता का? त्यांची भूमिका काय होती, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न अनुत्तरितच आहेत आणि त्यामुळेच केवळ त्यांच्या राजीनाम्याने समाधान होणार नाही. ज्यावेळी रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षस्थानी होत्या, त्याचकाळात या राज्यामध्ये अनेक मुली ’लव्ह जिहाद’च्या बळी ठरल्या. मात्र, या विरोधात रुपाली चाकणकर यांनी तोंडातून साधा ’ब्र’देखील काढला नाही. इतकेच नव्हे तर, त्या मुलींना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेमधील रुपाली चाकणकर यांचा सहभाग आज भिंग घेऊनच शोधावा लागेल.
या परिप्रेक्ष्यात एक विचार असा येतो की, याप्रकरणात शोषण झालेल्या त्या महिला या लिंगपिसाटाकडे कशासाठी आल्या असतील? तर उत्तर आहे, या जगात तुरळक अपवाद सोडले; तर प्रत्येकाला आपले भविष्य जाणून घ्यायची आंतरिक इच्छा असतेच. अशोक खरातच काय किंवा गल्लोगल्ली असलेले ते बंगाली बाबा, मौलवी किंवा चर्चचे पाणी देऊन कन्सरही बरा होतो असे थोतांड सांगणारे पाद्रीही लोकांच्या याच इच्छेचा गैरफायदा घेतात. आपण ईश्वराचा अवतार आहोत किंवा दूत आहोत आणि माझ्यामुळेच तुमचा उद्धार होणार असल्याचे दाखवण्यासाठीच, हे असले लबाड लोक माणसेही पेरतात. ही माणसे पैसे चारून उभी केलेली असतात. हीच माणसे लोकांना मुद्दाम सांगतात की, “अमूक एक बाबा/पाद्री किंवा मुल्ला यांच्याकडे जादूई शक्ती आहे. त्याला भविष्य समजते. माझे बघा खूप चांगले झाले. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. तुम्ही ऐका, तिथे जा. तुम्हाला गुण येईल.” झाले, असे म्हटले की, अतिमहत्त्वाकांक्षी व्यक्ती आपला हेतू साध्य व्हावा, यासाठी किंवा परिस्थितीने नाडलेली व्यक्ती शेवटचा उपाय म्हणून, या असल्या लोकांकडे जातात आणि तिथूनच यांच्या आयुष्याचा खेळ सुरू होतो.
अशोक खरात याच्या काळ्या कृत्यात फसलेल्या महिलांचे दुर्दैवही असेच सुरू झाले असेल. आपले भविष्य जाणून घेऊन परिस्थिती बदलण्यासाठी, या महिला गेल्या असतील. ही गद वाढत गेली आणि लोकांची गद होते म्हणजे नक्कीच याच्यात काहीतरी चमत्कार करण्याची शक्ती आहे, असे अनेकींना वाटलेच असणार. याच माध्यमातून एक अत्यंत लाजिरवाणे आणि भयानक ‘सेक्स रॅकेट’ उभे राहिले नसेल, तरच नवल. या नराधमाचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. त्या व्हिडिओमध्ये असलेल्या महिलांचे काय? कशाने का होईना; पण त्या त्याच्या सोबत तिथे अनैतिक कृत्य करत होत्या. त्यामुळे त्याही दोषी आहेतच. पण, या महिलांच्या कुटुंबाचे काय? त्यांच्या कुटुंबाच्या मनावर आता जे आघात होत असतील, त्याची कल्पना न केलेलीच बरी. न जाणो, किती पिढ्या तो आघात, त्यांचे जगणे उद्ध्वस्त करणार आहेत. त्यामुळे वाटते की, या लिंगपिसाटाचे जे व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर दिसत आहेत, त्यावर प्रशासनाने बंदी आणावी. मिळालेल्या माहितीनुसार, हा ‘कफ सिरप’मध्ये ‘व्हायग्रा’ मिसळून ते प्रसाद म्हणून द्यायचा. याचा अर्थ सरळ आहे की, त्याच्याकडे येणारा एकजण फसला की, तो दुसऱ्याला त्याच्याकडे आणत असणारच. हा प्रसाद खाऊन त्याचे अनुयायी त्याच्या विकृत लैंगिक कृत्यात सहभागी झाले आणि पुढे हे चक्र सुरूच राहिले. याची व्याप्ती कुठपर्यंत गेली, हे काळच सांगेल. पण, महिलांचे शोषण कसेही होते, याचे अत्यंत दुःखद आणि अपमानजनक वास्तव समोर आले आहे.
असो, अशोकने लोकांना स्वतःच्या कच्छपी कसे लावले, यातला केवळ एक टक्का भाग सांगणारा एक व्हिडिओ पाहिला. यातून समजले की, नाशिक ही धर्मभूमी. नागदोष-निवारण पूजा करण्यासाठी राज्यभरातले लोक नाशिकला येतात. हा अशोकसुद्धा आपण नागदोष-निवारण पूजा करतो, असे म्हणत असे. चार-दोन लोक त्याने पेरले आणि या लोकांनी इतरांना सांगायला सुरुवात केली की, “अशोक महाराजांकडे नागदोष-निवारण करण्याची अद्भुत शक्ती आहे. इतर कुणाकडे पूजा करू नका, यांच्याकडेच करा.” यातून काही लोक त्याच्याकडे जाऊ लागले. त्यांना तिथे गेल्यावर चांगले वाटेल, अशी वातावरणनिर्मिती केलेली असायची. अशोक लोकांना सांगायचा की, “मी आहे ना, नागदोष-निवारण करेन. प्रत्यक्ष नागराज मला वश आहेत.” मग तो काही मंत्र पुटपुटे. काही वेळातच एक 20 फुटांचा काळा तुकतुकीत कांतीचा नाग, डुलतडुलत त्याच्यासमोर यायचा. पूजा करतोय, अशा आविर्भावात अशोकसमोर संथ उभा राहत मान डोलवायचा, लोक अचंबित व्हायचे. 20 फुटांचा नाग? कॅप्टन महाराजांनी मंत्र देऊन आदेश दिल्याबरोबर आला आणि त्यांच्यासमोर उभा राहून त्यांचे आदेश ऐकतोय. मग अशोक नागदोष-निवारण करणाऱ्यांच्या इच्छा सांगायचा. या सगळ्यामुळे त्याची ख्याती पसरली की, कोणत्याही प्रकारचा नागदोष किंवा कोणत्याही इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर कॅप्टन अशोकच करू शकतो. पण, सत्य काय होते; तर तो नाग कागदाचा होता आणि त्यावर नागाची कात लावलेली होती. त्यात आतमध्ये एक यंत्र बसवलेले होते आणि त्याचा रिमोट अशोकच्या हातात होता. अशोक रिमोटने तो नाग बाहेर आणायचा आणि रिमोट दाबूनच त्याला डोलायला लावायचा. पण, या सगळ्या वातावरणाचा समोर बसलेल्या लोकांवर इतका परिणाम व्हायचा की, कुणीही विचार केला नाही की, हा खरा नाग आहे की खोटा!
उप्प! दांभिक आणि लबाडीची हद्दच. पण, तिथे उपस्थित असणाऱ्याला एकालाही का? कसे? हा प्रश्न पडला नाही. या अशोकला भारतीय भाषांसह जगभरातल्या इतर भाषा येतात. भोळ्या समाजाचा त्याने अभ्यास केला आणि त्यांना फसवून त्यांचे शोषण कसे करता येईल, यात मास्टरकी मिळवली. या फसवणुकीमध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी सामील असल्याचे म्हटले जाते. काही भ्रष्टाचाऱ्यांनी त्यांचे काळे पैसे पांढरे करण्यासाठी मग अशोकलाच हाताशी घेतले, असेही म्हटले जाते. अर्थात, पुढेमागे ते सगळे उघड होईलच.
या सगळ्या प्रकरणात हिंदू धर्माचा द्वेष करणारे बिनकामाचे बेकार लोक, यानिमित्ताने फारच चेकाळले आहेत. जणुकाही अशोक खरातला सगळ्या हिंदू समाजानेच गुरू मानले की, काय अशा आविर्भावात ते सोशल मीडियावर हिंदू धर्माची निंदा करत आहेत. ते असे मत व्यक्त करतात की, ‘हिंदू धर्मात हे असेच चालते.’ तर, या सगळ्यांना एकच सांगणे आहे की, हिंदू मग तो गरीब असो की श्रीमंत, तो कोणत्याही जातीचा असू दे, तो अशोक खरातच्या विकृत, घाणेरड्या आणि मानवतेला कलंक फासणाऱ्या कृत्याचे समर्थन करत नाही, त्याला पाठीशी घालणार नाही. दुसरे असे की, राज्यात ‘अंधश्रद्धा-निर्मूलन कायदा’ आहे पण, त्या कायद्याची जागृती नाही. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये याबाबत काम करणारी यंत्रणा हवी. मुळात काय श्रद्धा, काय अंधश्रद्धा हे समजण्याची कुवत समाजात हवी. देवधर्म-श्रद्धा हे ठीक आहे; पण देवाचे दैवत्व जिवंत माणसात आहे, असे समजून त्याच्याकडून शोषण करवून घेणे, हा देवाचा-धर्माचा अपमान आहे. याबाबत निःस्पृह जागृती समाजात व्हायलाच हवी. असे ढोंगी नराधम आपल्या परिसरात आहेत का? यावर समाजातील सज्जनशक्तीने बारीक लक्ष ठेवायला हवे. कारण, याच नराधमामुळे समाज आणि संस्कृती बदनाम होते, उद्ध्वस्त होते.
9594969638