Hanuman Jayanti: छतरपुरात अष्टधातूची ५१ फूट हनुमान मूर्ती साकार!

    23-Mar-2026   
Total Views |
 
Hanuman Jayanti
 
मुंबई : (Hanuman Jayanti) मध्य प्रदेशच्या बुंदेलखंड येथील छतरपूर जिल्ह्यात भारतातील पहिली ५१ फूट उंच अष्टधातूची हनुमान मूर्ती साकार झाली असून तिच्या अनावरणाची जोरदार तयारी सुरू आहे. ही मूर्ती हिंदू आणि मुस्लिम कारागिरांनी एकत्र येऊन घडवल्याची माहिती आहे. या भव्य सोहळ्याचे आयोजन धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बाबा बागेश्वर) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून देशभरातील साधू-संत यामध्ये सहभागी होणार आहेत. (Hanuman Jayanti)
 
शहरातील जानराय टौरिया येथे ५१ फूट उंच अष्टधातूची हनुमान मूर्ती पूर्णत्वास आली आहे. या अनावरण सोहळ्याची सुरुवात २४ मार्चपासून कलश यात्रेने होणार असून पुढील १० दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या निमित्ताने या मूर्तीचे भव्य अनावरण होईल. जानराय टौरियाचे महंत भगवान दास श्रृंगारी महाराज यांनी सांगितले की, या मूर्तीच्या निर्मितीत सोने, चांदी, तांबे आदी आठ धातूंचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये पितळाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या महोत्सवात देशभरातील संत-महंत आणि कथाकार सहभागी होणार असून १० दिवस भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचा उत्सव अनुभवायला मिळणार आहे. (Hanuman Jayanti)
 
१५१ क्विंटल वजनाची आणि ५१ फूट उंचीची ही मूर्ती देशातील एकमेव असल्याचा दावा केला जात आहे. या मूर्तीमुळे छतरपूरला धार्मिक क्षेत्रात वेगळी ओळख मिळणार असल्याचे सांगितले जाते. अयोध्येत राम मंदिर बांधणी सुरू झाल्यानंतर अशी मूर्ती उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता, जो आता पूर्ण झाला आहे. (Hanuman Jayanti)
 
या मूर्तीच्या निर्मितीत समाजातील सर्व स्तरातील लोकांनी योगदान दिले. कामगार, व्यापारी, समाजसेवक, पत्रकार, राजकारणी तसेच मंत्र्यांनीही आपापल्या परीने धातू देऊन या कार्यात सहभाग घेतला. ही मूर्ती राजस्थानातील कुशल कारागिरांनी तयार केली असून विशेष म्हणजे दोन हिंदू आणि दोन मुस्लिम कारागिरांनी मिळून ती साकारली आहे. (Hanuman Jayanti)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक