धर्मक्षणार्थ समर्पित जीवन: रेखाताई राजे

    22-Mar-2026
Total Views |

रेखाताई राजे यांसारख्या निःस्वार्थी, ध्येयवेड्या कार्यकर्त्यांचे आयुष्य हे केवळ वैयक्तिक प्रवास नसून एक विचार, एक संस्कार आणि एक अखंड राष्ट्रधर्माची साधना असते. समाजातील दुर्बल, पीडित आणि दिशाहीन घटकांना नवजीवन देत, प्रतिकूलतेतही ध्येयाशी एकनिष्ठ राहण्याचा आदर्श त्यांनी उभा केला. दि. 16 मार्च रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ एक कार्यकर्ती हरपलेली नाही, तर एक जाज्वल्य प्रेरणास्रोत हरपला आहे. त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख...

ॐ नमो विश्व शक्तै नमस्ते नमस्ते...

इस्लामच्या जाळ्यात अडकून स्वधर्म आणि स्वअस्तित्व गमावलेल्या युवतींना त्या जाळ्यातून बाहेर काढणे, त्यांच्या मुलांसह त्यांना सुसंस्कृत व सभ्य जीवनमार्ग दाखवणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे; अशी अनेक धाडसी कार्ये करत रेखाताईंनी स्त्रीशक्तीची ताकद खूप पूर्वीपासूनच दाखवून दिली. विशेष म्हणजे हे सर्व त्यांनी जम्मू-काश्मीरसारख्या अत्यंत संवेदनशील प्रदेशात केले, जिथे सर्व प्रकारे प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्यांना उपेक्षा, तसेच अपमानालाही सामोरे जावे लागत होते. तरीही, त्यांनी ‌‘हिंदुत्वाचे रक्षण हाच माझा धर्म आहे‌’ हा ध्यास कायम ठेवला! त्या काळात ‌‘लव्ह जिहाद‌’ हा शब्दही प्रचलित नव्हता. कार्यकर्त्यांमध्येही आवश्यक तेवढी जागरूकता नव्हती, मग सहकार्य मिळणे तर दूरच. तरीही, सर्व अडचणींवर मात करत रेखाताईंनी आपले कार्य अखंडपणे सुरू ठेवले.

रेखाताईंचा जम्मू-काश्मीरमधील प्रवास 1984-85च्या सुमारास सुरू झाला. त्याच काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादही अगदी शिगेला पोहोचला होता. लूटमार वाढली होती, हिंदूंची घरे पेटवून दिली जात होती आणि हिंदूंच्या निर्घृण हत्या होत होत्या. परिणामी, काश्मिरी पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले होते. साहजिकच, त्यांच्या पुनर्वसनाची तीव्र गरज निर्माण झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला या कार्यासाठी अक्षरश: झोकून दिले. या कार्यात समितिचे, तसेच तेथे प्रचारिका म्हणून गेलेल्या स्वगय सिंधुताई फाटक आणि रेखाताई राजे यांचे मोठे योगदान आहे. स्थानिक महिला कार्यकर्त्यांना संघटित करणे, गावोगावी जाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, गरजेनुसार मदत करणे अशा अनेक कामांमध्ये रेखाताई अग्रस्थानी होत्या.

ज्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले, त्या पीडितांच्या मुलींसाठी जम्मूमध्ये ‌‘अदिती विद्यार्थिनी वसतिगृह‌’ सुरू करण्यात आले. या कार्यात रेखाताईंचे मोठे योगदान आहे. सध्या या वसतिगृहाची जबाबदारी तामिळनाडूच्या पंकजा अक्का यांच्याकडे आहे.

जम्मू-काश्मीरप्रमाणेच दुसरे संवेदनशील राज्य म्हणजे पंजाब. तेथे खलिस्तानचे उग्र आंदोलन सुरू होते. त्याकाळात हिंदूंची एकता अखंड राखण्यासाठी जे-जे प्रयत्न झाले, त्यामध्येही रेखाताईंचे महत्त्वपूर्ण योगदान होते. दीर्घकाळ त्यांचे केंद्र दिल्ली येथे होते. मात्र, मुख्यतः पंजाब आणि जम्मू-काश्मीरची जबाबदारी त्यांच्यावरच होती. पुढील काळात दहशतवादाने प्रभावित कुटुंबांतील मुलींसाठी जालंधर येथे वसतिगृहे उभी करण्यात आली. कारगिल युद्धानंतर लडाखमधील मुलींसाठीही जालंधर येथे वसतिगृह उभारण्यात आले. या सर्व कार्यांमध्ये इतर अनेकांप्रमाणे रेखाताईंची भूमिकाही अमूल्य होती. भावनिक एकात्मता टिकून राहावी आणि समितिचे कार्य विस्तारावे, यासाठी त्यांनी संपूर्ण पंजाब पिंजून काढला होता.

जेव्हा रेखाताईंवर उत्तर क्षेत्र प्रचारिकेची जबाबदारी आली, तेव्हा त्यांचा प्रवास हरियाणा, हिमाचल प्रदेश आदी भागांतही सुरू झाला. विशेषतः सीमावत प्रदेशांमध्ये संपर्क वाढवणे, तेथील समस्या समजून घेणे आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करणे यावर त्यांनी विशेष भर दिला होता.

एका समर्पित जीवनाची कहाणी

राष्ट्र सेविका समितिच्या प्रारंभीच्या काळातील दृढनिश्चयाने कार्यरत असलेल्या प्रचारिका म्हणजे रेखाताई राजे. त्यांचा जन्म पुण्यात झाला. समितिच्या शाखेशी त्यांचा संबंध नाशिक येथे आला. तेथे त्यांची ओळख वं. लक्ष्मीबाई केळकर (मावशी केळकर) यांच्याशी झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन त्यांनी आपल्या आयुष्यात समितिला अग्रस्थान देण्याचा निश्चय केला. नाशिकमध्ये अल्पकाळ वास्तव्यानंतर त्या आपल्या कानपूर येथील घरी गेल्या, जिथे त्यांनी शिक्षण आणि समितिचे कार्य एकत्रितपणे सुरू ठेवले. त्यांनी झपाट्याने शाखा वाढवण्याचे काम हाती घेतले. त्यांचे घर संघाशी निगडित होते. तेथे त्यांचा अशोक सिंघल यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित झाला. त्यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनाखाली रेखाताईंनी समितिच्या प्रचारिका म्हणून कार्य करण्याचा निश्चय प्रत्यक्षात उतरवला.

रेखाताईंनी ‌‘समाजशास्त्र‌’ विषय घेऊन ‌‘एमए‌’, ‌‘बीएड‌’, ‌‘एमएड‌’ असे उच्चशिक्षण पूर्ण केले आणि अध्यापनाचे कार्य सुरू केले. काही वर्षे पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेश हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते.

अभ्यासक्रम सुरू असतानाच, देशावर लोकशाहीचा गळा घोटणारी आणीबाणी लादण्यात आली. त्यावेळीही इंदिरा गांधी सरकारविरोधातील सत्याग्रहात रेखाताई अग्रेसर होत्या. मात्र, वयाने सर्वांत लहान! त्यांना तीन महिने आणि 15 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. मनात भीती निर्माण करण्यासाठी त्यांना वेडसर व गुन्हेगार महिलांसोबत ठेवण्यात आले. त्यावेळचा एक प्रसंग असा आला की, त्यांना एका गर्भवती महिलेची प्रसूतीसुद्धा करावी लागली; तेही कोणतीही पूर्वतयारी किंवा माहिती नसताना. तुरुंगवासातील त्या साडेतीन महिन्यांत त्यांनी असे अनेक कठीण प्रसंग अनुभवले.

1984 मध्ये रेखाताईंचे कार्यकेंद्र दिल्ली झाले. तेथे प्रथम प्रचारिका स्वगय सिंधुताई फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली ‌‘समर्थ शिक्षा समिती‌’अंतर्गत त्यांचे कार्य सुरू झाले. त्या दिल्लीसह उत्तर भारतातील विविध भागांत त्यांच्या सोबत प्रवास करत. रेखाताईंना अखिल भारतीय सह-शारीरिक प्रमुख आणि त्यानंतर सहकार्यवाहिका अशा जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यामुळे त्यांचा देशभर प्रवास वाढला.

माझी तशी त्यांच्याशी ओळख शालेय जीवनापासूनच. एका वर्गात आमची भेट झाली होती. त्यांच्या हसतमुख चेहऱ्याने मला आकर्षित केले आणि त्यांच्या धाडसी कार्यांविषयी ऐकून त्यांचे व्यक्तिमत्त्व मला अधिकच भावले. नंतर आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या. त्या माझ्या घरीही येत असत. मी दिल्लीला गेल्यावर आमच्यात अनेक अनौपचारिक चर्चा रंगायच्या. संघटनात्मक प्रश्नांवर त्यांच्याशी संवाद साधला की, मार्ग नक्की सापडतो, हा माझा दीर्घ अनुभव आहे.

हळदीच्या छोट्याशा तुकड्याने पिवळे होणाऱ्या (लहानशा यशात आनंद मानणाऱ्या) समाजाकडे पाहताना, एवढी मोठी कार्ये करूनही प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या रेखाताई हमखास आठवतात. कोणतीही अपेक्षा किंवा महत्त्वाकांक्षा न बाळगता एखादी व्यक्ती कशी जगू शकते? रेखाताई त्याचेच आदर्श उदाहरण होत्या.

अलीकडे फोन केला असता, त्यांनी हसतच सांगितले, “एकेकाळी मी शरीराला खूप कष्ट दिले, हात-पाय खूप चालवले. आता त्यांनीच सत्याग्रह केला आहे. मला खुचत बसवून ठेवले आहे.” या अवस्थेबद्दलही त्यांना कोणतीही तक्रार नव्हती. आयुष्यातील बदल त्यांनी नेहमीच सहजतेने स्वीकारले. देवदुर्लभ कार्यकर्ता ही संघ-समिति कार्याची खासियत आहे. अशा दीपमाळेतील रेखाताई हा तेजस्वी तारा आहे. या स्फूर्तिदायक ताईला दंडवत!

- सुनीला सोवनी
(लेखिका राष्ट्र सेविका समितिच्या अखिल भारतीय प्रचारप्रमुख आहेत.)
(साभार : विश्व संवाद केंद्र, भारत)