इतिहासाच्या विकृतीकरणाचे समाजविघातक षड्यंत्र

    22-Mar-2026
Total Views |
Shivaji Maharaj
 
जितेंद्र आव्हाड यांचा आतापर्यंत शिवकालीन इतिहासाचा विकृत प्रचार एखादा कार्यक्रम-सभेपुरता मर्यादित होता; परंतु आता त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा सभागृहातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाविषयी वादग्रस्त व अपमानास्पद वक्तव्य केले असल्याने हा गंभीर प्रकार म्हणावा लागेल. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी तथा जनतेने अशा काल्पनिक वक्तव्य करणार्‍या अशा वाचाळवीरांपासून सावध असण्याची आवश्यकता आहे.
 
प्रलोभन, आमिष, जबरदस्ती आणि अल्पवयीनांचे धर्मांतरण करण्यास प्रतिबंध करणारे व सर्वच धर्मांना लागू असणारे ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नुकतेच मंजूर झाले. त्यामुळे आता कायद्याने धर्मांतरणबंदी झालेली आहे. परंतु, विधानसभा अधिवेशनात सभागृहात ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयकावर चर्चा करीत असताना, माजी मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी शिवभक्तांची दिशाभूल करणारे, कोणताही शिवकालीन ऐतिहासिक पुरावा नसणारे काल्पनिक वक्तव्य केले. विधेयकावर चर्चा सुरू असताना आणि शिवकालीन इतिहासावर चर्चा करण्याचे खरं तर कोणतेही औचित्य नसताना, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सडक्या मेंदूमधील विकृत व बेताल भाष्य सभागृहात केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासंबंधी भाष्य करून जाणीवपूर्वक खोटे आणि अपमानास्पद भाष्य आव्हाड यांनी केले. ‘शिवरायांच्या राज्याभिषेकास विरोध करून त्यांना पायाच्या अंगठ्याने कुंकुमतिलक केला होता,’ असा खोटा ‘नॅरेटिव्ह’ शिवकालीन खोटा इतिहास मांडण्याचा प्रयत्न सभागृहात त्यांनी केला. त्यांच्या या विकृत भाष्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली.
 
जितेंद्र आव्हाड जेव्हा सभागृहात बरळले, तेव्हाच मंत्री शंभूराजे देसाईंनी आव्हाडांना खडसावून माफी मागण्यास भाग पाडले. तसेच मंत्री नितेश राणे, दादा भुसे व भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहात जितेंद्र आव्हाडांना झालेला विरोध एक चांगली घटना म्हणावी लागेल. पण, जितेंद्र आव्हाडांनी आपले वक्तव्य गांभीर्याने न घेता, आदरपूर्वक माफी न मागता, केवळ दोन शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांचा जेवढा निषेध करता येईल, तेवढा कमीच!
शिवरायांचा शिवकालीन इतिहास देशातच नव्हे; तर जगात अमर असून, जितेंद्र आव्हाडसारख्या विकृतीने तो इतिहास विकृत करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो अमरच राहील.
 
पायाच्या अंगठ्याने कुंकू लावणे शक्य आहे का?
 
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकालीन इतिहासाची मोडतोड करून समाजात चुकीचे आणि खोटे ‘नॅरेटिव्ह’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी काही स्वयंघोषित विद्वानांच्या मायावी टोळ्या कार्यरत आहेत. गेल्या तीन-चार दशकांपासून या मायावी टोळ्या प्रबोधनाच्या गोंडस नावाखाली तथा छोट्या-छोट्या पिवळ्या पुस्तकांच्याद्वारे शिवकालीन इतिहासाची मोडतोड करून समाजात वैचारिक संभ्रम निर्माण करीत आहेत. ‘आम्ही सांगू तोच इतिहास आणि आम्ही देऊ तोच पुरावा’ अशा दडपशाही पद्धतीने खोट्या इतिहासाची मांडणी त्यांनी यापूर्वीही केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तोच संतापजनक प्रकार आता विधानसभेमध्ये केला. यापूर्वीसुद्धा त्यांनी शिवप्रेमींमध्ये फूट व संभ्रम निर्माण करणारी विकृत वक्तव्ये अनेकवेळा केली आहेत. म्हणूनच आता विधानसभेमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राज्याभिषेकासंबंधी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर देशातील नामवंत मान्यवर तथा विदेशी पाहुणेसुद्धा उपस्थित होते. त्यांनी शिवरायांना राज्याभिषेकाच्या शुभप्रसंगी नजराणा, भेटवस्तू दिलेल्या आहेत व त्या ऐतिहासिक घटनेच्या नोंदीदेखील उपलब्ध आहेत. मूळ महाराष्ट्राचे व काशीचे विख्यात पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते शिवरायांचा दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक शनिवार, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६, दि. ६ जून १६७४ रोजी झाला. बत्तीस मण सोन्याच्या अलंकारित सिंहासनावर बसून शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला होता व शिवराय ‘छत्रपती’ झाले होते. याप्रसंगी महत्त्वाचा मुद्दा असा की, जेव्हा शिवराय बत्तीस मण सिंहासनावर बसले असताना, सिंहासनाची उंची लक्षात घेता, त्यांना कोणी पायाच्या अंगठ्याने कुंकुमतिलक करणे कसे शक्य झाले असेल? किंवा जितेंद्र आव्हाड यांचा मुद्दा तर्कशुद्ध तरी वाटतो का? जेव्हा रायगडावर राजदरबारामध्ये शिवरायांचे सर्व पराक्रमी सवंगडी, शूर सरदार उपस्थित होते, तेव्हा छत्रपती शिवरायांना पायाच्या अंगठ्याने कुंकुमतिलक लावण्याची कोणाची हिंमत असेल? आणि जर कोणी शिवरायांना पायाच्या अंगठ्याने कुंकुमतिलक लावण्याचा अपमानास्पद प्रयत्न केला असता, तर तेव्हाच शिवरायांच्या पराक्रमी सवंगड्यांनी पायाच्या अंगठ्याने कुंकुमतिलक लावणार्‍याचे क्षणाचाही विलंब न लावता, शिर धडावेगळे करून त्यास यमसदनी पाठविले असते.तसेच जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या, ‘राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांना पायाच्या अंगठ्याने कुंकू लावले’ या वादग्रस्त वक्तव्यासंबंधी कोणत्याही शिवकालीन बखर किंवा इतिहासामध्ये अस्सल घटनेची कुठेही नोंद नाही. केवळ शिवप्रेमींमध्ये फूट आणि समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी विकृत प्रचाराचा कळस गाठला केला.
 
आव्हाडांची पोपटपंची
 
जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रेमींमध्ये फूट पाडण्यासाठी आणि मुस्लीम समाजाला खूश करण्यासाठी अनेकवेळा भन्नाट पोपटपंची केलेली आहे. अफजलखान ते औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचासुद्धा मोठा प्रयत्न केलेला आहे. शिवकालीन इतिहासाची मोडतोड करताना त्यांनी तर "औरंगजेब, अफजलखान आणि शाहिस्तेखान होते म्हणून शिवरायांचा इतिहास आहे,” असा निर्लज्ज युक्तिवाद केला होता. तसेच त्यांनी केलेला, "शिवाजी महाराज गोट्या खेळत होते काय,” हा शब्दप्रयोग तर समस्त शिवप्रेमींचा अपमानच म्हणावा लागेल. अफजलखान जेव्हा स्वराज्यावर चाल करून आला होता, त्यासंबंधीसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी मोठे वादग्रस्त वक्तव्य केले होते; "अफजलखान महाराष्ट्रात आपल्या सत्तेच्या सीमा वाढविण्यासाठी आला होता, तो धार्मिक संघर्ष नव्हता, सत्तेचा संघर्ष होता,” असे निर्लज्जपणे टीव्ही चॅनेलवर ते बोलले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या मुक्ताफळांनुसार शिवाजीराजे व तत्कालीन मुस्लीमराजे यांचा राजकीय लढा होता, तो धार्मिक लढा नव्हता. याचा विचार केल्यास स्वतःला ‘बुतशिकन’ म्हणणारा नराधम अफजलखान स्वराज्यात चाल करून आला, तेव्हा त्याने अनेक हिंदू मंदिरे पाडली, उभी पिके उद्ध्वस्त केली, जबरदस्तीने बाटवाबाटवी का केली असेल? ‘बुतशिकन’ म्हणजे हिंदू देवदेवतांची मूर्ती फोडणारी, हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करणारी असंस्कृत व रानटी प्रवृत्ती होय. अफजलखान स्वराज्यात चाल करून आला, तेव्हा त्याने अनेक मंदिरे पाडली. जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवराय आणि मुस्लीमराजे यांच्यामध्ये राजकीय लढा होता, धार्मिक लढा नव्हता, असे गृहीत धरल्यास अफजलखानाने स्वराज्यातील हिंदू मंदिरे का पाडली? बजाजी निंबाळकर यांना बाटवून ‘बजा खान’ का केले? औरंगजेबाने नेताजी पालकर यांना ‘मोहम्मद कुली खान’ करून नमाज पठण करण्यास भाग का पाडले असेल? याचा खुलासा केला पाहिजे आणि शिवप्रेमींनीसुद्धा जितेंद्र आव्हाड यांना खोट्या इतिहासासंबंधी प्रश्न विचारला पाहिजे. कारण, इतिहास पुराव्याच्या आधारावर असतो, कोणाच्याही मुक्ताफळावर आधारित इतिहास नसतो.
 
आता तोंड शिवले काय?
 
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत शिवकालीन इतिहासाची मोडतोड, काल्पनिक इतिहासाची मांडणी व मुळातच सहिष्णू असलेल्या शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरविणारी बांडगुळांची पैदास उदयास आली आहे, त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लीम होते; सेनापती, अंगरक्षक आणि वकील मुस्लीम असल्याचा खोटा इतिहास वारंवार मांडला. तसेच त्यांनी, ‘आम्ही सांगू तोच इतिहास आणि आम्ही देऊ तोच पुरावा’ अशा दडपशाही पद्धतीने खोटा इतिहास समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. कधी हल्ले करणे, तोंडास काळे फासणे, सभा उधळून लावणे, ठरवून मोबाईल फोनवर शिवीगाळ करून समाजमाध्यमांवर व्हायरल करणे अशाप्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात अन्य वेळी इतिहासाची मोडतोड होते आहे, अशी ओरड व कोल्हेकुई करणारी मंडळी आता जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर मूग गिळून गप्प का बसली आहेत? आता त्यांचे तोंड शिवले आहे का? विरोध ‘सिलेक्टिव्ह’ असतो का? तसेच जितेंद्र आव्हाड तुम्ही आपल्या राजकीय फायद्यासाठी शिवप्रेमींची किती दिशाभूल करणार आहात? असे अनेक संतप्त सवाल शिवप्रेमी करत आहोत.
 
- अशोक राणे