मराठी सिनेविश्वातली एक ‘ग्लॅमरस’ अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत. पूजाने आजवर चित्रपटांतून निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण, आगामी ‘सालबर्डी’ या चित्रपटात पूजा दमदार पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी पूजाने साधलेला हा खास संवाद...
सर्वप्रथम ‘सालबर्डी’ हे चित्रपटाचं नावचं खूप आगळं-वेगळं आहे. त्याविषयी काय सांगशील?
ज्या गावात कथानकातील घटना घडते, त्या गावाचं नाव ‘सालबर्डी’ आणि चित्रपटातही त्या गावाचंच चित्रण करण्यात आलं आहे. नावातून कदाचित सुरुवातीला फार काही कळत नाही, पण कथेशी त्याचा थेट संबंध आहे. थोड्या भयावह, गूढ आणि रहस्यमय गोष्टी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या चित्रपटातील प्रत्येक पात्र वेगळं आणि खास आहे. माझ्यासोबत अंशुमन विचारे, चित्तरंजन गिरी, कमलाकर सातपुते, ओंकार भोजने आणि शशांक शेंडे असे उत्तम कलाकार आहेत. प्रत्येक पात्राची एक वेगळी छटा आहे, वेगळी कहाणी आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना भरपूर ट्विस्ट, रहस्य आणि मनोरंजनाचा जबरदस्त अनुभव मिळणार आहे.
या चित्रपटात तू एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेस. तेव्हा एकंदरीतच महिला पोलीस म्हणून भूमिका निभावतानाचा अनुभव कसा होता?
खरं तर मी पहिल्यांदाच अशा वेगळ्या भूमिकेत दिसतेय आणि यासाठी अनेक वर्षे वाट पाहिली होती. चांगली पटकथा आणि प्रभावी पात्र पाहताच, मी लगेच होकार दिला. ही संधी जरी सहज मिळाल्यासारखी वाटली, तरी त्यामागे खूप मेहनत आणि चिकाटी आहे. ‘सालबर्डी’मुळे ही संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. कोणतंही पात्र साकारताना अभ्यास हा असतोच. मात्र, पोलीस अधिकार्याच्या भूमिकेसाठी मला थोडा वेगळ्या प्रकारचा अभ्यास करावा लागला. या पात्रात कुठेही ‘ग्लॅमरस’ दिसण्याचा भाग नव्हता. उलट, जी वर्दी आहे, त्या गणवेशाचा आदर राखणं आणि त्या भूमिकेशी निगडित जबाबदारीची जाणीव ठेवणं, हा अभ्यासाचा महत्त्वाचा भाग होता आणि तो करताना मला खूप आनंद मिळाला. मला ही भूमिका फार कठीण वाटली नाही. कारण, मी याआधी अनेक गोष्टी वाचल्या होत्या, ऐकल्या होत्या आणि पाहिल्या होत्या. त्या सगळ्या अनुभवांचा या भूमिकेसाठी खूप उपयोग झाला.
रोज रस्त्यावर उभं राहून आपली जबाबदारी पार पाडणार्या, सणासुदीलाही ड्युटीवर असणार्या पोलीस महिला मला खूप प्रेरणा देतात. मी स्वतःहून त्यांच्या जवळ जाऊन गप्पा मारते, त्यांचं काम समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या खांद्यावर किती मोठी जबाबदारी असते. मोठा जमाव नियंत्रित करणे, कोणतीही अनुचित घटना घडू न देणे, हे सगळं खूप आव्हानात्मक असतं. कुठेही काही चूक घडली, तर सर्वांत आधी त्या धाडसानं पुढे येतात. खरंच, हे सगळं करण्यासाठी ‘वाघाचं काळीज’ लागतं. म्हणूनच त्या माझ्यासाठी खर्या अर्थाने प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कामाचा थोडासा अंश जरी मी या चित्रपटातून दाखवू शकले, तरी मी स्वतःला यशस्वी समजेन.
‘सालबर्डी’ नंतर यंदाच्या वर्षी आणखीन कोणत्या चित्रपटांमध्ये पूजा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे?
मला सुरुवातीपासूनच एकाच पठडीतील भूमिका करायच्या नव्हत्या. मला नेहमीच प्रयोग करायचे होते. त्यामुळे कोणतीही संहिता निवडताना मी कधीच त्या भूमिकेची लांबी पाहिली नाही, तर त्या पात्राची ताकद आणि वेगळेपण पाहिलं. तुमच्यासमोर एक सिनेमा आहेच; त्याशिवाय, आणखी एक सिनेमा (सखे गं साजणी) दि. ३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तसेच आणखी एक चित्रपटही येणार आहे, जो कदाचित दि. १० एप्रिलला येईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, तो थोडा पुढे ढकलला जाईल, असं वाटतं. त्या चित्रपटातही माझी थोडी वेगळी भूमिका आहे, जी ‘लपाछपी’सारख्या शैलीजवळची आहे.
- अपर्णा कड