गीताप्रचार आणि संस्कृत संभाषणासाठी झटणार्या, संस्कृतप्रेमींना लिहिते करणार्या संपादिका, प्रकाशिका आणि डॉ. ग. बा. पळसुले यांच्या पट्टशिष्या डॉ. आशा गुर्जर यांचे त्यांच्या जन्मदिनी अभीष्टचिंतन...
नारायणं नमस्कृत्य गुरूं च पुरुषोत्तमम्|
गजाननं भालचंद्रं वन्दे कार्यार्थसिद्धये॥
या श्लोकाने मंगल करूनच डॉ. आशा गुर्जर आपल्या कोणत्याही कार्याची सुरुवात करतात. यातील ‘नारायण’ म्हणजे त्यांचे दशग्रंथी आजोबा, रत्नागिरीतील प्रख्यात संस्कृत शिक्षक ‘व्याकरणचूडामणि’, प्रवचनकार पुरुषोत्तमशास्त्री फडके हे वडील, भालचंद्र नेने आणि डॉ. गजानन पळसुले हे त्यांचे दोन गुरू. आशा फडके यांचा जन्म १९४८ सालचा. त्याकाळात मुलींच्या शिक्षणाला दुय्यम दर्जा दिला जात असे. आशा यांच्या मोठ्या दोन बहिणींचे विवाह झाल्यावर लगेच यांचाही विवाह झालाच असता. मात्र, आशा यांच्या अभ्यासाच्या ध्यासामुळे आणि अर्थातच, आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे त्यांना ‘पीएचडी’पर्यंत शिक्षण घेणे शक्य झाले.
संस्कृत शिक्षकाच्या कन्या असल्यामुळे आशा यांनी शाळेत विषय निवडताना संस्कृतशिवाय अन्य विषयाचा विचारही केला नाही. पण, रत्नागिरीतील महाविद्यालयांत मात्र त्याकाळी ‘संस्कृत’ हा विषय नव्हता. तेव्हा आशा यांच्या जिद्दीने आणि वडिलांच्या शब्दामुळे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभाग सुरू झाला. तेथे अकरावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेत, उत्तम गुणांच्या आधारे त्यांनी तेथेच ‘बीएड’सुद्धा पूर्ण केले. या काळात त्यांना वडिलांचे जुने स्नेही संस्कृत पंडित भालचंद्र नेने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर शिष्यवृत्ती मिळवत त्यांनी पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला.
तेथे पहिल्याच वर्षी आशा यांची त्यांचे गुरू डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांच्याशी ओळख झाली. त्यांनी लिहिलेल्या एका नाटकाचे तेव्हा संस्कृत दिनानिमित्त वाचन करायचे होते. आशा यांना लहानपणापासूनच घरात संस्कृत बोलण्याची सवय असल्यामुळे त्यांना ते इतरांच्या मानाने सोपे गेले. पहिल्यापासून असलेली अफाट स्मरणशक्ती आणि खणखणीत आवाजामुळे त्यांच्या नाट्यवाचनाला पारितोषिक मिळाले. त्यानंतर संस्कृतविषयी कोणतीही स्पर्धा असली की, आशा फडके त्यात असल्याच पाहिजेत, असे जणू समीकरणच तयार झाले. त्या ‘संस्कृत वादविवाद’ स्पर्धेसाठी परदेशातही जाऊन आल्या आहेत. डॉ. पळसुले गुरुजींमुळे त्यांच्या लेखनालाही दिशा मिळाली. त्या नवनवीन नाटके लिहून गुरुजींकडून सुधारणा समजून घेत असत. आशा या त्यांच्या महाविद्यालयात नाटकाची संहिता झटपट लिहून देण्यात तरबेज म्हणून प्रसिद्ध होत्या. याच काळात त्या ‘भांडारकर इन्स्टिट्यूट’, ‘वैदिक संशोधन मंडळ’ आदी संस्थांशी जोडल्या गेल्या.
राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरील असंख्य पारितोषिके मिळवत आणि अनेक परिषदांमध्ये भाग घेतानाच, त्या पुणे विद्यापीठातच ‘पीएचडी’देखील करत होत्या. प्रबंध सादर करण्याच्या आसपासच्या काळात विद्यापीठातीलच एका शिक्षिकेच्या ओळखीने त्यांचा प्रख्यात लेखक आणि प्रकाशक रवींद्र गुर्जर यांच्याशी विवाह झाला. उत्तम गृहिणी असण्यालाच स्त्रीधर्म मानणार्या घरातील आशा यांना गुर्जरांकडे आल्यावर परिस्थितीनुरूप नोकरी करणे भागच होते. त्यांनी ‘पीएचडी’ करताना शब्दांच्या गण-रूपावर चिकित्सात्मक अध्ययन केलेले असल्यामुळे डेक्कन महाविद्यालयातील शब्दकोशनिर्मितीच्या कामासाठी त्यांची सहजी नेमणूक झाली. तेथील कामानिमित्त किंवा पूर्वस्नेहींच्या ओळखीने विविध संस्कृत परिषदांमध्ये सहभाग घेत त्यांनी भारतभ्रमण केले.
२००५ साली डॉ. आशा यांचे गुरुजी डॉ. ग. बा. पळसुले यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ एखादे पुस्तक प्रकाशित करावे, अशी कल्पना सुचली. त्याचे ‘समर्पणम्’ हे नावही अगदी साजेसे ठेवले. एवढ्या वर्षांच्या लोकसहवासातून संस्कृतप्रेमी असूनही लोकांना संस्कृत बोलता-लिहिता येत नाही, असे त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आले होते. त्यामुळे ‘समर्पणम्’च्या माध्यमातून विविध प्रकारचे साहित्य मागवत, लोकांना लिहिते करत, आज सलग २० वर्षे त्या हा वार्षिकांक प्रसिद्ध करत आहेत. आलेल्या ६० ते ७० साहित्यघटकांवर संस्कार करणे आणि साहित्य उपलब्धच न झाल्यास स्वतः निर्मिती करणे, मुद्रितशोधन करणे, मुखपृष्ठ तयार करणे, जाहिरात आणि वितरण करणे अशी सर्व कामे त्या वयाच्या पंच्याहत्तरीतसुद्धा एकहाती करतात. अतिशय प्रामाणिक आणि काटेकोरपणे काम करणार्या आशा यांनी दि. २८ नोव्हेंबरचा ‘समर्पणम्’च्या प्रकाशनाचा नेम कधीही मोडलेला नाही.
या काळात त्यांनी लोकाग्रहास्तव असंख्य पुस्तकांची भाषांतरे आणि काही साहित्यनिर्मितीही केली. तसेच वेगवेगळ्या विषयांवरील लेख संकलित करत त्यांनी ‘आम्ही भावंडे’, ‘मैत्र जीवांचे’, ‘गुरू माझा समर्थ’, ‘माझा छंद माझा आनंद’, ‘सामान्यांतला असामान्य’, ‘दुःख हे माझे मला’ इत्यादी पुस्तके प्रकाशित केली. तसेच ‘सुभाषितरत्नभाण्डागारम्’मधील आठ हजार श्लोकांचे आठ भागांमध्ये भाषांतरही त्यांनीच प्रथम प्रसिद्ध केले.
डॉ. आशा यांच्याकडे प्रतिभा असली, तरी त्यांची आर्थिक बाजू मात्र प्रकाशनाच्या मानाने दुबळीच होती. पण, ‘चांगले काम करताना पैशांची कमतरता पडत नाही,’ हे त्यांच्या वडिलांचे वाक्य वेळोवेळी मिळणार्या देणग्यांच्या रूपात खरे होत गेले.
भारतवर्षातील प्रत्येकाला ‘भगवद्गीते’चे ज्ञान आणि संस्कृत संभाषण यायलाच हवे, यासाठी त्या जीवनपर्यंत झटणार आहेत. डॉ. आशा गुर्जर यांना मनोकामनापूर्तीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे खूप शुभेच्छा!
- ओवी लेले