मुंबई : (US-Israel-Iran War) अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाला २० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही हे युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. अमेरिका-इस्रायल हे संयुक्तपणे इराणवर दररोज भीषण हल्ले करत आहेत, तर इराणही प्रतिहल्ले करत प्रत्युत्तर देत आहे. अशातच आता इराणला एक मोठा धक्का बसला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) प्रवक्ते अली मोहम्मद नैनी हे देखील ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. एएफपी वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.(US-Israel-Iran War)
दरम्यान, अली मोहम्मद नैनी यांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या युद्धाबाबत बोलताना ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली होती. अली मोहम्मद नैनी यांनी म्हटले होते की, "ट्रम्प म्हणाले नव्हते का की इराणचे नौदल नष्ट झालं आहे? तसं असेल तर त्यांनी आपलं धैर्य दाखवून आपली जहाजे पर्शियन आखातात पाठवावीत. युद्ध सुरू असूनही इराण क्षेपणास्त्र उत्पादन सुरू ठेवत आहे. तसेच आमच्याकडे क्षेपणास्त्राची कोणतीही कमतरता नाही", असे अली मोहम्मद नैनी यांनी म्हटले होते.
नैनी यांनी अमेरिकेला इशारा देताना म्हटले होते की, "अमेरिका आणि इस्रायलबरोबर इराण किमान आणखी सहा महिने तीव्रतेचं युद्ध लढू शकतो. आतापर्यंत इराणने केवळ जुने क्षेपणास्त्रे वापरले आहेत. नवीन आणि प्रगत क्षेपणास्त्रे अजून शिल्लक आहेत. पण जी लवकरच वापरली जातील."(US-Israel-Iran War)
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्म्समधील अली मोहम्मद नैनी हे एक महत्वाचे व्यक्ती मानले जात होते. त्यांच्या मृत्यूमुळे या आठवड्यात इराणी नेतृत्वाला चौथा मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांत इराणने तीन अत्यंत प्रभावशाली अधिकाऱ्यांना गमावले आहे.(US-Israel-Iran War)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\