बांबूच्या हरितक्रांतीची ‘नवदुर्गा’

    20-Mar-2026
Total Views |
Meenakshi Walke
 
जन्मनाळापासून ते अंत्ययात्रेपर्यंत सोबत करणार्‍या बांबूच्या किमयेतून महिला सक्षमीकरणाचे जाळे विणणार्‍या, ‘द बांबू लेडी’ मीनाक्षी वाळके यांचा प्रेरणादायी प्रवास...
  
मानवी जीवनाचा आणि बांबूचा संबंध हा केवळ उपजीविकेचा नसून, तो संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा देखील आहे. बांबूच्या धारदार छडीने नाळ कापून मानवाचा या भूतलावर जन्म झाला, म्हणूनच बांबू आणि स्त्रीचे नाते आजही तितकेच अतूट मानले जाते. बाळाचा पाळणा असो वा जीवनाची शेवटची शिदोरी असणारी अंत्ययात्रा; हिंदू संस्कृतीमध्ये बांबूचा शुभ संबंध अनादी काळापासून गुंफलेला आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात यांत्रिक प्लास्टिकने निसर्गाशी असलेले हे नाते विस्कळीत करण्याचे पातक केले. त्याही आधी ब्रिटिश राजवटीने १९२७च्या ‘वन कायद्या’द्वारे बांबूला ‘वृक्ष’ घोषित करून भारतीयांना या हक्काच्या नैसर्गिक संसाधनेपासून रोखले होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे षड्यंत्र ओळखून बांबूला पुन्हा ‘गवत’ म्हणून कायदेशीर मान्यता दिली आणि ‘राष्ट्रीय बांबू मिशन’द्वारे त्याला मुख्य प्रवाहात आणले. याच बांबूच्या नाजूक विणीतून देशभरातील महिलांसाठी आत्मनिर्भरतेचे भक्कम जाळे विणणार्‍या एक आधुनिक ‘नवदुर्गा’ म्हणजे मीनाक्षी मुकेश वाळके (सोनटक्के). बांबूकलेसाठी स्वतःला वाहून घेणार्‍या मीनाक्षी यांचा प्रवास आज लाखो लोकांसाठी दीपस्तंभ ठरत आहे.
 
जयपूर येथील ‘राष्ट्रीय सेवा संगम’मध्ये महाराष्ट्राच्या बांबूकलेचे नेतृत्व करणार्‍या मीनाक्षी वाळके यांची ओळख आज संपूर्ण देशाला आहे. इंग्लंडच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये सन्मानित होणार्‍या त्या पहिल्या भारतीय महिला बांबू कलावंत ठरल्या आहेत. गेल्या आठ वर्षांपासून त्या देशभर भ्रमण करून महिला सक्षमीकरणाचे कार्य अविरतपणे करीत आहेत. नुकतीच त्यांनी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची पाहणी केली असून, येथील महिलांना बांबू प्रशिक्षणाद्वारे आत्मनिर्भर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील, नागभीड तालुक्यातील सावरगाव हे मीनाक्षी यांचे जन्मगाव. विटा तयार करणार्‍या वीटभट्टीवर दि. ७ मार्च १९९३ रोजी त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले; पण अभियांत्रिकीचे स्वप्न घरच्या विरोधामुळे भंगले. पुढे त्यांचा विवाह झाला. पण, लग्नानंतरचा प्रवासही सोपा नव्हता. २०१५ मध्ये पहिले अपत्य झाले; पण दुसर्‍या प्रसूतीच्या वेळी मोठी शोकांतिका घडली. मीनाक्षी यांचा जीव थोडक्यात वाचला; पण त्यांनी आपली मुलगी गमावली. १२ दिवस अश्रूंच्या पुरात बुडालेल्या मीनाक्षी यांना एका हितचिंतकाने बांबू केंद्राची कल्पना दिली.
 
दुःखाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ‘बीआरटीसी’मध्ये ‘बांबू हस्तकला प्रशिक्षण’ सुरू केले आणि तिथूनच महाराष्ट्राला ‘द बांबू लेडी’ गवसली. तीन वर्षांच्या मुलाला सांभाळत, १० बाय १२च्या खोलीत त्यांनी बांबूच्या वस्तू बनवण्यास सुरुवात केली. प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस असणार्‍या मीनाक्षी यांनी बांबू क्षेत्राला भारताचा पहिला ‘क्यूआर कोड स्कॅनर’ दिला. सौंदर्य स्पर्धांसाठी बांबूचे मुकुट, बांबूच्या राख्यांना जागतिक बाजारपेठ, फ्रेंडशिप बॅण्ड आणि तोरण अशा अनेक नावीन्यपूर्ण वस्तूंची बांबूपासून त्यांनी निर्मिती केली. आजवर त्यांनी दोन हजारांहून अधिक आदिवासी, वंचित आणि नक्षलग्रस्त भागातील तरुणींना या कलेच्या प्रवाहात आणले आहे.
 
स्वतःचे घर नाही, हाताशी आधुनिक यंत्रे नाहीत की, स्वतंत्र कार्यशाळा नाही; अशा परिस्थितीतही मीनाक्षी यांनी कदापि हार मानली नाही. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून त्यांनी बनवलेली राखी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतही पोहोचली. ‘जेमिनी कुकिंग ऑईल’च्या ‘प्रेरक ताई’ लघुपटातून त्यांचा प्रेरणादायी प्रवास ७२ लाख लोकांपर्यंत पोहोचला. ‘कोण होणार करोडपती’मध्ये जिंकलेली सहा लाख, ४० हजारांची रक्कम त्यांनी ठाण्यातील ‘जीवन संवर्धन’ संस्थेला दान करून आपल्या दातृत्वाचा परिचय दिला.
 
मीनाक्षी यांनी ‘बांबू रे बांबू’ या स्वतंत्र बांबू काव्यसंग्रहाची देखील निर्मिती केली असून, ‘गोंडवाना’ विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. "इतिहासात फक्त घेणार्‍यांची नाही, तर देणार्‍यांची नोंद होत असते. तुमच्याकडे जननी आणि जन्मभूमीसाठी जे काही चांगले आहे, ते देऊन जा,” असे मीनाक्षी अभिमानाने सांगतात. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना बांबूविश्वात आपली ‘ग्लोबल मुद्रा’ उमटवणार्‍या मीनाक्षी वाळके यांचा प्रवास खरोखरच नतमस्तक करणारा आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा!
 
 
 
- कमलेश संखे