US-Israel-Iran War : मध्यपूर्व तणावाचा भारतावर परिणाम? इराण समर्थक कट्टरपंथींवर नजर ठेवण्याचे गृह मंत्रालयाचे निर्देश

    02-Mar-2026   
Total Views |
US-Israel-Iran War

मुंबई : (US-Israel-Iran War)
अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर भारतातील गृहमंत्रालयाने (MHA) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संभाव्य हिंसा, ठिकठिकाणी होणारे विरोध प्रदर्शन आणि दहशतवादी हालचाली याबाबत सतर्क राहण्याचा इशारा जारी केला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या अनेक भागांत निदर्शने झाली असून, पुढील काळात ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर कडक नजर

गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर, लडाख, कर्नाटक आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये शिया मुस्लिम समुदायाने अमेरिका आणि इस्रायलविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना पत्र पाठवून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्या दूतावासांसह वाणिज्य दूतावासांच्या परिसरात सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या देशांशी संबंधित प्रतिष्ठान, प्रतिनिधिमंडळे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा मजबूत करण्यासही सांगितले आहे. मंत्रालयाने राज्यांना अशा कट्टरपंथींची ओळख पटवण्याचे निर्देश दिले आहेत, जे भडकाऊ भाषणे करून हिंसाचारास प्रवृत्त करू शकतात.

याशिवाय इराण समर्थक कट्टरपंथी संघटना, तसेच आयसिस आणि अल-कायदा सारख्या जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंधित सोशल मीडिया हँडल्सवरही कठोर नजर ठेवण्यास सांगितले आहे. विद्यार्थी संघटना आणि सामाजिक-राजकीय गटांच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अफवा किंवा हिंसक कारस्थाने वेळेत रोखता येतील.

सुरक्षाव्यवस्थेला बळकट करण्याचे निर्देश

गृहमंत्रालयाने इशारा दिला आहे की, अमेरिका आणि इस्रायलचे दूतावास, त्यांचे कर्मचारी, व्यावसायिक प्रतिष्ठाने, रिसॉर्ट्स, पर्यटनस्थळे, ज्यू समुदाय केंद्रे, ही ठिकाणे संभाव्य निशाण्यावर असू शकतात. याचप्रमाणे इराणचे दूतावास आणि सांस्कृतिक केंद्रांनाही धोका कायम राहू शकतो. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि देशात शांतता व कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी मंत्रालयाने संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कव्हरेज वाढवण्याचे, आयईडी व स्फोटक पदार्थांची तपासणी कठोर करण्याचे आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\